घर सांधणारा संवाद

विवेक मराठी    30-Dec-2023   
Total Views |
anurup
अनुरूप विवाह संस्थेच्या माध्यमातून दीर्घकाळ या विषयाशी संबंधित असलेल्या अनुरूपच्या संचालिका गौरी कानिटकर यांचे हे मासिक सदर. या कुटुंबकथांतून आपण समजून घेऊ या विषयाचे विविध पदर.. त्यातली गुंतागुंत सोडवण्याचे मार्ग.. समाजासाठी आणि व्यक्तीसाठीही अत्यावश्यक असलेली कुटुंबसंस्था टिकवण्याचे मार्ग आणि विवाह मोडण्यामागची कारणेही.
anurup
 
पतिपत्नीचे नाते हे जन्मापासून आलेले नाते नव्हे. त्यामुळेच ते नाते टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न दोघांनीही करणे अपेक्षित असते. ह्या नात्याला आवर्जून आत्मीयतेचे खतपाणी घातले, तर ते नाते सुंदर, सशक्त बनते.
 
लग्न हा आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. जोडीदार कसा मिळतो यावर आपल्या सगळ्यांचे बरेचसे आयुष्य अवलंबून असते. सध्याच्या सामाजिक परिस्थितीत तर लग्नसंस्था टिकेल की नाही, असा संभ्रम अनेकांच्या मनात आहे. पण लग्नसंस्था किंवा कुटुंबसंस्था भक्कम पायावर उभी राहणे हे समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.
 
 
आपल्या आसपास अनेक जोडपी आणि त्यांचे सहजीवन आपण बघत असतो. काही जण परस्परांबरोबर अगदी मजेत असतात, तर काही जणांची कायम तक्रार असते. मात्र छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांसाठी करत राहिल्याने नाते हळूहळू सुधारतही जाते, असे आपल्याला दिसते. पतिपत्नीचे नाते हे जन्मापासून आलेले नाते नव्हे. त्यामुळेच ते नाते टिकवण्यासाठी, वृद्धिंगत करण्यासाठी आवर्जून प्रयत्न करावे लागतात. हे प्रयत्न दोघांनीही करणे अपेक्षित असते. ह्या नात्याला आवर्जून आत्मीयतेचे खतपाणी घातले, तर ते नाते सुंदर, सशक्त बनते.
 
शेखर आणि सुधा एक मध्यमवयीन जोडपे. जेव्हा त्यांचे लग्न ठरले, तेव्हा शेखरला सुधा फारशी पसंत नव्हती, पण शेखरच्या आईच्या मते त्याच्या स्वभावाला अनुरूप अशी सुधा असल्याने ती जीवनसाथी म्हणून त्याच्यासाठी अगदी योग्य होती. आईच्या मताने शेखरने लग्न केले, तरी अनेक दिवस त्याच्या मनात सुधाबद्दल अढी होती. त्याच्या वागण्यातून ते दिसून येई. तिच्या अगदी छोट्याछोट्या गोष्टी त्याला खटकत असत आणि मग तिचे पूर्ण व्यक्तिमत्त्वच त्याला अपूर्ण वाटू लागे. त्याला ती स्वत:पेक्षा सर्वार्थाने खुजी वाटे आणि जाता-येता तो ते जाणवून देत असे.
 
 
’इतकंही कळत नाही?’, ‘तुझी अक्कल चुलीपुरतीच’, ‘कितीही महागडी चहा पावडर आणून दिली, तरी तुला चांगला चहा जमतच नाही.. परत असा गुळचट चहा दिलास तर डोक्यावर ओतीन’ अशा अनेक शेलक्या उद्गारांनी शेखर तिला घायाळ करीत असे.
 
 
सुधाला कळत नव्हते की आपले नेमके काय चुकते आहे? ती दिवसेंदिवस निराश होत होती. तिच्या तब्येतीवरही त्याचा परिणाम होत होता.
 
 
तू उच्चशिक्षित आहेस, हुशार आहेस, तर मग तुझे वागणे अधिक जबाबदारीचे असायला हवे. दुसर्‍या व्यक्तीचा योग्य तो मान ठेवणारे असायला हवे.” शेखरला मित्राचे असे सांगणे अनपेक्षित होते, तरी त्याने ते नीट ऐकून घेतले. 
नात्यातला ताण, नाराजी असह्य होऊन एक दिवस शेखरने त्याच्या जवळच्या मित्राला हे सगळे सांगितले. शेखरचे आपल्या पत्नीसंबंधीचे विचार ऐकून तो मित्र अवाक झाला. त्याला शेखरकडून असे वागणे अजिबात अपेक्षित नव्हते. तरी सुरुवातीला तो त्याला काहीच बोलला नाही. आधी त्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेतले. मग तो म्हणाला, “हे बघ शेखर, आपला मेंदू जो आहे ना, तो ज्या ज्या गोष्टी आपण मनात सारख्या घोळवतो, त्याच लक्षात ठेवतो. आणि तू जर स्वत:च्या मनाशी सतत म्हणत राहिलास की ‘सुधा मला आवडत नाही, आई म्हणाली म्हणून मी लग्न केले’ तर तुला तिच्या चांगल्या गोष्टी कधीही दिसणार नाहीत. तुझ्या अशा फटकून वागण्याने, सतत टीका करण्याने तिचा आत्मविश्वास कमी होईल. अशाने नात्यातली दरी दिवसेंदिवस वाढत गेली, तर घटस्फोटाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. वैगुण्य शोधायचे असा तुझा स्वभाव असेल, तर दुसरे लग्न करूनही तू समाधानी होण्याची शाश्वती नाही. कारण नव्या जोडीदारामध्येही तुला दोष आढळतील. त्यापेक्षा सुधाबद्दलची अढी मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न कर. सतत चुका शोधण्यापेक्षा तिच्यातले गुण समजून घ्यायचा प्रयत्न कर. अरे, प्रत्येक जण गुणदोषांचा पुतळा आहे हे जर मान्य केले, तर प्रत्येक माणसात काही ना काही तरी चांगले असतेच. ते शोध आणि तेच लक्षात ठेवायची सवय लाव. सगळ्यात आधी काय करशील तर तिला अपशब्द बोलायचे टाळ. त्याने तिचे हिरमुसलेपण कमी होईल. तुझ्या बोलण्याचा तिने धसका घेतला असेल तर तो कमी होईल. तू उच्चशिक्षित आहेस, हुशार आहेस, तर मग तुझे वागणे अधिक जबाबदारीचे असायला हवे. दुसर्‍या व्यक्तीचा योग्य तो मान ठेवणारे असायला हवे.” शेखरला मित्राचे असे सांगणे अनपेक्षित होते, तरी त्याने ते नीट ऐकून घेतले. त्याला सगळा सल्ला पटला नसला, तरी मेंदूबाबत सांगितलेली गोष्ट विचार करण्याजोगी वाटली, म्हणून त्याने वागण्यात बदल करायचे ठरवले. त्याचा हळूहळू का होईना, पण नात्यावर चांगला परिणाम होत असल्याचे त्याला जाणवू लागले. सुधा सुगरण होती. निरनिराळे पदार्थ करायची तिला आवड होती. टापटिपपणाच्या असलेल्या आवडीने व सवयीने तिने घर अगदी नीटनेटके ठेवले होते. अनेक जण तिच्या या गुणाची दखल घेत होते. शेखरच्या आईशी तिचे प्रेमाचे, मायेचे संबंध होते.
 
 
त्यांच्यामधल्या नात्याविषयी, त्यातल्या ताणाविषयी शेखरने सुधाशी सविस्तर बोलायचे ठरवले. त्याला तिच्याकडून पत्नी म्हणून नेमकी काय अपेक्षा आहे, यावरही त्याने विचार केला. त्याने तिला आवर्जून काही पुस्तके वाचायला दिली. पुस्तक वाचून झाल्यावर त्या पुस्तकाविषयी तिच्याशी गप्पा मारल्या. तिला घर सांभाळण्याव्यतिरिक्त काय करायला आवडेल हे गप्पांमधून जाणून घेतले. तिने मन लावून केलेल्या पदार्थांची तो आवर्जून तारीफ करायला लागला. गप्पांसाठी मुद्दाम वेळ काढू लागला. सुरुवातीला स्वत:च्या मनाविरुद्ध वागताना त्याला खूप जड गेले. त्याविषयी तो सल्ला देणार्‍या मित्राशी सतत बोलत राहिला.
 
 शेखरच्या लक्षात आले की तिला स्वतःची मते आहेत आणि ती विचारपूर्वक बनलेली आहेत. तिला नवनवीन गोष्टी शिकायची आवड आहे.
“तुला जर हे नाते मनापासून टिकवायचे असेल, सुधारायचे असेल तर काय करायला हवे ते तुला आपसूकच सुचेल. आपण बोलत राहू या. सुधाला तुझ्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे याची जाणीव तुझ्या वागण्यातून तिला होत गेली, तर तिलाही खूप बरे वाटेल आणि मग तीही हे नाते टिकावे, परस्परांमधले बंध अधिक घट्ट व्हावेत यासाठी विचार करेल, पावले टाकेल. एखादी व्यक्ती प्रथमदर्शनी पसंत नसते, म्हणून तिच्यावर असा कायमचा शिक्का मारायचा नसतो. आणि आपलेही माणूस समजून घेण्याचे निकष चुकलेले असू शकतात, हेही लक्षात ठेवावे. सुसंवाद हा कोणत्याही टिकाऊ नात्याचा पाया आहे. कोणतेही पूर्वग्रह बाळगून तिच्यशी व्यवहार करण्याऐवजी संवादातून सत्य समजून घे.” शेखरला हे पटले. तिच्याशी होत असलेल्या मन:पूर्वक संवादामुळे सुधाही मोकळी होऊ लागली. संवादात खुलेपणा आला. त्यातून शेखरच्या लक्षात आले की तिला स्वतःची मते आहेत आणि ती विचारपूर्वक बनलेली आहेत. तिला नवनवीन गोष्टी शिकायची आवड आहे. त्याच्या आधीच्या तुटक बोलण्यामुळे ती मनातून मिटून गेली होती. शेखरमध्ये जसा बदल होत गेला, तशी ती धीट झाली. व्यक्त होत गेली. आत्मीयता, आपुलकी वाढली, तशी त्यांचे नाते बहरत गेले.
 
 
सुधाला समजून घेण्यात झालेली चूक शेखरच्या वेळीच लक्षात आली. नाते टिकण्याला त्याने दिलेल्या महत्त्वामुळे त्याने आत्मपरीक्षण करून स्वत:त बदल केले. त्यातून मनातले विकल्प, अढी दूर होत गेली. एक घर मोडण्याआधी, विस्कटण्याआधी सावरले गेले. मने जोडली गेली.
 
 
विवाहातून आपल्याला नेमके काय हवे आहे, जोडीदार कसा हवा आहे यावर गांभीर्याने विचार करणे, त्याबाबत घरातल्या मोठ्यांशी मोकळेपणाने बोलून आपल्या अपेक्षा नक्की करणे, तडजोडीचे विषय कोणते असतील, समजून घेण्याचे विषय कोणते असतील यावर उभयपक्षी विचार केलेला असणे चांगल्या सहजीवनासाठी अतिशय आवश्यक आहे. लग्नाच्या मैदानात उतरताना इतकी तरी पूर्वतयारी असायला हवी.

गौरी कानिटकर

'अनुरूप विवाह संस्थे'च्या संचालिका व विवाह समुदेशन या विषयतील तज्ज्ञ लेखिका. विवाहइच्छुकांचे समुपदेशन करण्याचेही काम करतात. गेली अनेक वर्षे विविध वृत्तपत्रांतून तसेच मासिकांतून त्यांचे विवाहविषयक लेख गाजले आहेत. सध्या विवेकमध्ये त्यांचे लग्ाच्या गोष्टी हे सदर सुरू आहे.