अबुधाबी हिंदू मंदिर - भारत-यूएईमधील सौहार्दाचे प्रतीक

विवेक मराठी    09-Dec-2023   
Total Views |
@डॉ. विजय चौथाईवाले
 
रामलल्लाच्या अयोध्येतील भव्य मंदिराच्या लोकार्पणाची आपण सर्व जण चातकाप्रमाणे वाट पाहत आहोत, तसेच अयोध्येपासून तब्बल अडीच हजार किलोमीटर दूर अंतरावर अबुधाबी येथे बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण (बीएपीएस) संस्थेच्या संकल्पनेतून व माध्यमातून ‘अबुधाबी हिंदू मंदिर’ साकारत आहे. या मंदिराला भेट देण्याचे मला भाग्य लाभले. हे हिंदू मंदिर मोदीजींच्या नेतृत्वात भारत आणि यूएई या देशांमधील सशक्त झालेल्या द्विपक्षीय नातेसंबंधांचेही फलित आहे.

vivek
 
भारताच्या इतिहासात मैलाचे दगड ठरावेत अशा अनेक सोहळ्यांचा, कार्यक्रमांचा अनुभव आपण सगळे 2014पासून घेत आहोत. आपण भाग्यवान आहोत, म्हणूनच या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार ठरलो वा त्यात प्रत्यक्ष सहभागी होऊ शकलो, अशीही भावना अनेकदा मनात दाटून आली आहे. सगळे जण गेले अनेक दिवस चातकाप्रमाणे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाची वाट पाहत आहेत. त्याच वेळेस अयोध्येपासून तब्बल अडीच हजार किलोमीटर दूर अंतरावर अबुधाबी येथे महान भारतीय संस्कृतीचे व परंपरांचे एक अतिभव्य असे वास्तुशिल्प आकाराला येत आहे. बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण (बीएपीएस) संस्थेच्या संकल्पनेतून व माध्यमातून साकारत असलेल्या या भव्य निर्माणाधीन ‘अबुधाबी हिंदू मंदिरा’ला भेट देण्याचे भाग्य मला लाभले.
 
 
फेब्रुवारी 2018मध्ये संयुक्त अरब अमिरातीत (यूएईमध्ये) असताना अबुधाबीतील या मंदिराच्या निर्माणस्थळी जाण्याची मला पहिल्यांदा संधी मिळाली. एका प्रचंड मोठ्या तंबूत या प्रकल्पाचे प्रमुख आर्किटेक्ट, बीएपीएस संस्थेचे श्री ब्रह्मविहारी स्वामी यांनी मला मंदिराचे स्केच दाखवले. त्याचप्रमाणे अबुधाबीत हे मंदिर बांधण्यामागील त्यांचा दृष्टीकोनही स्पष्ट केला. त्यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चेनंतर मी तेथून निघालो, तेव्हा एकीकडे मनात आनंद तर होताच, त्याच वेळेस इतक्या प्रचंड मोठ्या मंदिराचे प्लॅनिंग वास्तवात कसे येईल याबद्दल कुतूहलही होते. त्यानंतर काही दिवसांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीने दुबई येथून या प्रकल्पाचे भूमिपूजन केले, त्याचप्रमाणे प्रस्तावित मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरणदेखील केले. अत्यंत आनंदाने मी या क्षणाचादेखील साक्षीदार झालो होतो.
  

vivek
 
वेळोवेळी मला या बांधकामाचे अपडेट्स मिळत राहिले असले, तरी फेब्रुवारी 2018च्या भेटीनंतर पुन्हा तिथे जाण्याची संधी मात्र मिळाली नव्हती. अखेर नशिबाने थोडा मोकळा वेळ मिळाला आणि ही संधी साधून मी तिथे नोव्हेंबर महिन्यात गेलो. दरम्यानच्या काळात या प्रकल्पाने अनेक आव्हानांचा सामना केला होता. कोविड महामारी, यूएई सरकारची गुंतागुंतीची नियामक प्रणाली, एका भव्य प्रकल्पासाठी आवश्यक गंगाजळीचे नियोजन, कुशल कामगारांचा शोध घेणे अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती.
एखाद्या प्रकल्पाचे तपशीलवार नियोजन आणि त्याची तितकीच काटेकोर अंमलबजावणी कशा रितीने फलद्रूप होते, ते आज मी पाहिले. प्रेम आणि सौहार्द या व्यापक संकल्पनांवर अबुधाबीतील हे मंदिर आधारित आहे. गंगेचे व यमुनेचे पवित्र जल मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंनी वाहत आहे व सरस्वतीचे जल अंडरग्राउंड अर्थात जमिनीखालून प्रवाहित आहे. येथे त्रिमितीय पद्धतीने वॉल ऑफ हार्मनी म्हणजेच सौहार्दाची भिंत साकारली असून या ठिकाणी कोणत्याही मतपंथाची व्यक्ती प्रार्थना करू शकते. मंदिर परिसरातील वृक्षवाटिकेत चित्रांच्या माध्यमातून आपल्या प्राचीन वाङ्मयात आढळणारा प्रेम आणि बंधुत्वाचा वैश्विक संदेश देण्यात आला आहे. अतिथींसाठी, अभ्यागतांसाठी या रोपवाटिकेचे दर्शन हा नक्कीच मंत्रमुग्ध करणारा अनुभव असेल. येथील कोरीवकाम केलेल्या शिला उपस्थितांना माहितीद्वारे केवळ रामायण-महाभारताचाच नव्हे, तर अन्यही प्राचीन संस्कृतींचा परिचय करून देतील.
 
 
vivek
 
मंदिर परिसरातील पृष्ठभागाचे तापमान थंड राहावे, यासाठी नॅनो तंत्रज्ञानाच्या आधारे वैशिष्ट्यपूर्ण टाइल्स तयार करण्यात आल्या आहेत. 50 अंश सेल्सियस तापमानातही मंदिरातील दर्शनार्थी अनवाणी पायांनी सहज चालू शकतील, हे या टाइल्सचे वैशिष्ट्य आहे. मुख्य मंदिरात एकूण सात हिंदू देवतांच्या मूर्ती आहेत. त्याचप्रमाणे, या मंदिर परिसरात तब्बल 3000 प्रेक्षकांना सामावू शकेल एवढ्या मोठ्या प्रेक्षागृहाचेही बांधकाम करण्यात येत आहे. डिजिटल लायब्ररी, 1300 गाड्यांसाठी वाहनतळाची सोय, तसेच चार हेलिपॅड्सचीही सोय करण्यात येत आहे. थोडक्यात, पारंपरिक कौशल्य, सांस्कृतिक वारसा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वापरकर्त्यांना अत्यंत सुलभ वाटतील अशा सुविधा या सार्‍याचे व्यापक एकत्रीकरणच या ठिकाणी झालेले दिसून येते.
यूएई सरकारच्या सक्रिय सहभागाशिवाय आणि सहकार्याशिवाय एवढा व्यापक स्वरूपाचा प्रकल्प आकाराला येणे अशक्य होते. यूएईच्या नेतृत्वाने या कामगिरीत निभावलेली सकारात्मक भूमिका खरोखरच अभूतपूर्व आहे. त्यांनी मंदिराच्या उभारणीला केवळ प्रोत्साहनच दिले असे नाही, तर दुबई आणि अबुधाबी या शहरांच्या प्रमुख मार्गांना लागून असलेला एक प्रचंड मोठा भूखंडही त्यासाठी उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या प्रगतीकडे त्यांचे लक्षही होते. पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात भारत आणि यूएई या देशांमधील सशक्त झालेल्या द्विपक्षीय नातेसंबंधांचेही हे फलित आहे. मागील वर्षी यूएई सरकारच्या एका ज्येष्ठ परराष्ट्र धोरण सल्लागारांनी ‘रिझरव्हॉयर ऑफ ट्रस्ट’ अर्थात ‘विश्वासाचे निधान’ असे भारत-यूएई नातेसंबंधांचे वर्णन केले आहे. अबुधाबीतील मंदिर हे या दोन देशांतील वृद्धिंगत होत जाणार्‍या विश्वासाचे आणखी एक उदाहरणच आहे.
 
 
नोव्हेंबर महिन्यातील तो दिवस प्रकल्पासाठी विशेष होता, कारण त्या दिवशी या मंदिरावर कलशारोहण आणि ध्वजारोहण करण्यात आले. मलादेखील मंदिराच्या कलशापर्यंत जाऊन संपूर्ण मंदिर संकुलाचे उंचावरून विहंगम दर्शन घेण्याची संधी मिळाली. काही काळापूर्वी जो प्रकल्प मला केवळ स्वप्नवत वाटला होता, तो वास्तवात साकारत होता. या निमित्ताने, पुन्हा एकदा इतिहास घडताना पाहण्याचे भाग्य मला लाभले.
 
 
अनुवाद - मृदुला राजवाडे

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.