घन कचरा व्यवस्थापनातील दिशादर्शक पाऊल

विवेक मराठी    27-Feb-2023   
Total Views |
 
 
vivek
 
विवेक व्यासपीठ संचालित पार्क (PARC) अर्थात पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर आणि लातूरमधील जन-आधार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच लातूर येथे एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण वर्ग पार पडला. खर्‍या अर्थाने मोलाची संपत्ती असणार्‍या घन कचर्‍याचे व्यवस्थापन आणि कचरावेचक स्वच्छतामित्रांची सर्वांगीण प्रगती या दृष्टीने हा प्रशिक्षण वर्ग अत्यंत महत्त्वाचा होता. मुंबईतील आयसीटी आणि ग्रीनशिफ्ट या संस्थांचाही यात मोलाचा वाटा होता. पार्कची वारसा ही संकल्पना, सफाईमित्रांची सद्य:स्थिती आणि लातूर येथील प्रशिक्षण वर्ग याचा हा विस्तृत आढावा.
“मी कचरा वेचून पोट भरते. मीच न्हाई, माझ्या समद्या मागच्या न पुढच्या पिढ्याबी हेच काम करत असतेत. पूर्वी लई तरास व्हायचा. उकिरड्यावर कचरा भरायचो, वेगळा करायचो. त्यातलं प्लास्टिक, धातू भंगारात विकायचो न पोट भरायचो. झोळी, पोतं खांद्यावर घेऊन काम करावं लागायचं. कुत्रे मागं लागायचे, महिन्याला दोनतीनदा तरी पायाचा लचका तोडायचे, तरीही मी काम सुरू ठेवलं. लई घाण वाटायची. पण पोटापुढं इलाज नव्हता..” पद्मिनीबाई काळे सांगत होत्या.
 
 
अशीच कथा लताबाई रसाळांची. त्या सांगतात, “लगन झालं, तेव्हा तेरा वर्सांची होते मी. पाठोपाठ चार पोरं झाली. धाकटी मुलगी सव्वा वर्षांची होती, तेव्हा आमचे मालक (नवरा) वारले. मी पोरांना घेऊन आईकडं आले, पण तिथेही गरिबीच. मालकांच्या पाठीमागे मलाच पोरांना सांभाळायचं होतं. कचरा, भंगार गोळा करून, पोटाला चिमटा काढून पोरांना शिकवलं. दिवसरात्र कष्ट केले, लोकांनी लई अपमान पण केला. कचर्‍यात काय काय सापडायचं. एकदा तर चक्क सोनंही सापडलं. पण मी काम करताना बेइमानी नाही केली. त्या बाईला तिची महागडी वस्तू परत केली. पोरांनी माझ्या या कष्टाचं चीज केलं. ग्रॅज्युएशनपर्यंत शिकली, त्यांचं लगन बी झालं. माझं नाव पोरांनी मोठं केलं.”
 
vivek 
पद्मिनीबाई काळे 
 
पद्मिनीबाई, लताबाई, रघूदादा, शुभम, व्यंकटदादा ही आपल्या दृष्टीने अगदीच सर्वसामान्य नावे. पण तरीही ही माणसे आज लातूरकरांच्या किंवा खरे तर कोणत्याही सामान्य आयुष्याचा महत्त्वाचा घटक आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात कितीतरी घटकांवर अवलंबून असतो - मग तो दूधवाला असो, पेपरवाला असो, पोस्टमन असो किंवा वाणसामान पुरवणारा वाणी असो. या सगळ्यापलीकडे आणखी एक घटक आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे आणि शहराच्या, परिसराच्या स्वच्छतेत त्याचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. पद्मिनीबाई आणि उपरोक्त सर्व मंडळी मांगगारुडी समाजातील. या समाजातील लोक गेली अनेक वर्षे, काहींच्या तर अनेक पिढ्या कचरा वेचण्याचे हे काम करीत आहेत. दुर्दैवाने फार पूर्वीपासून हा घटक अत्यंत दुर्लक्षित राहिला. कचरावेचक नावाच्या या समाजघटकाला स्वच्छता कर्मचारी म्हणू लागलो खरे, पण त्यांच्यासाठी विकासाची दारे मात्र पुरेशी उघडली नाहीत. या घटकाला समाजात समान स्थान मिळावे, त्यांचे काम हलक्या दर्जाचे न समजता ते कौशल्य विकासात गणले जावे आणि ‘कचरा’ नावाच्या फुकट जाणार्‍या या संपत्तीचे नीट व्यवस्थापन व्हावे, या हेतूने दि. 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात लातूर जिल्ह्यात एक महत्त्वाचा अभ्यासवर्ग पार पडला. कचरावेचकांना प्रशिक्षित करणार्‍या प्रशिक्षकांसाठी हा अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आला होता.
 
 
‘वारसा’ अहवालाचे मोठे योगदान
 
 
सर्वोच्च न्यायालयापासून स्थानिक संस्था-संघटनांपर्यंत सर्वत्र ज्यावर विचारमंथन चालू आहे, जो पर्यावरणाच्या दृष्टीने एक यक्षप्रश्न झाला आहे, तो प्रश्न म्हणजे घन कचरा व्यवस्थापन. घन कचरा हा आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, परराष्ट्रीय संबंध या सगळ्यावर परिणाम करणारा घटक आहे. या घटकाकडे बघण्याचा एक अभिनव दृष्टीकोन देणारा पार्कचा हा उपक्रम आहे. घन कचरा व्यवस्थापनाबाबत समाजजागृती करण्याबरोबरच या व्यवस्थापनात सर्वात खालच्या स्तरावर कार्यरत घटकाचा - म्हणजे कचरावेचकांचा सर्वांगीण विकास या उपक्रमाद्वारे साधला जाणार आहे. विवेक व्यासपीठ संचालित पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर अर्थात पार्क (PARC) ही संस्था विविध कार्यशाखांमध्ये संशोधन करते व धोरणे तयार करते. या संस्थेने 25 सप्टेंबर 2021 रोजी दूरदृश्यप्रणालीद्वारे घन कचरा व्यवस्थापन या विषयासंदर्भात "WARSA (वारसा) - - Waste As Resource by Changing Stakeholders' Approach' नावाने शोधनिबंध प्रकाशित केला. पार्कमधील संशोधक अमरजा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने या अहवाल प्रकाशित करण्यात आला होता. घन कचरा व्यवस्थापन ही समाजापुढील अनेक वर्षे भेडसावत असलेली एक अत्यंत जटिल समस्या आहे. पण याकडे समस्या म्हणून पाहण्यापेक्षा संधी म्हणून पाहता येईल का, या उद्देशाने पार्कने हा अहवाल प्रकाशित केला. घन कचरा व्यवस्थापनाला चालना दिली, तर पर्यावरणीय समस्यांना उत्तरे मिळतील, असे हा अहवाल सांगतो. भारतभरातील घन कचरा व त्याचे व्यवस्थापन याची सद्य:स्थिती, अन्य देशांशी या बाबतीतली तुलना याचाही विचार यात करण्यात आला होता. घन कचरा व्यवस्थापन व्यवस्थेचा अविभाज्य भाग असलेले घटक, त्याचप्रमाणे ही व्यवस्था सुधारण्यासाठी किंवा नवीन व्यवस्थेची पायाभरणी करण्यासाठी केल्या जाणार्‍या उपाययोजना या सार्‍याचा ऊहापोह या अहवालात करण्यात आला आहे.
 
vivek
 
या अहवालाच्या निर्मितीदरम्यान जी मते घेतली गेली, विमर्श करण्यात आला, त्यात कचरावेचकांची शैक्षणिक प्रगती घन कचरा व्यवस्थापनात मोलाची भूमिका बजावू शकते, असे लक्षात आले. त्याचप्रमाणे तांत्रिक साहाय्य आणि कौशल्य विकासाला उत्तेजन देऊन या क्षेत्रातील कामगारवर्गाचा विकासही साधता येऊ शकतो. या अहवालासंबंधीचा विस्तृत लेख ऑक्टोबर 2021मध्ये साप्ताहिक विवेकमध्ये प्रकाशित झाला होता. लातूर येथील जन-आधार सेवाभावी संस्थेचे संस्थापक संजय कांबळे यांच्या वाचनात हा लेख आला आणि सुरू झाला प्रवास एका महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण वर्गाचा. दररोज कचरा वेचणार्‍या, त्याचे वर्गीकरण करणार्‍या सेवेकर्‍यांच्या व्यवस्थापन प्रशिक्षणाची खरे म्हणजे आपण कल्पनाही करत नाही. पण संजय यांना ही कल्पना सुचली, त्यांनी पार्कच्या अमरजा कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला व या प्रशिक्षण वर्गावर काम करण्यास सुरुवात झाली.
 
 
vivek
मुळातच, संजय कांबळे हे जन-आधार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे लातूरमध्ये कचरावेचक कर्मचार्‍यांसाठी काम करत आहेत. या संस्थेविषयी व तिच्या कार्याविषयी कांबळे यांनी सांगितले की, “गेली 21 वर्षे जन-आधार सेवाभावी संस्था कुष्ठपीडित व कचरावेचक समाजासाठी कार्यरत आहे. कुष्ठपीडितांच्या शारीरिक व्यंगामुळे समाज त्यांना स्वीकारत नाही, त्यांना आपल्यातला समजत नाही. त्यामुळे भिक्षा मागूनच त्यांना आपली उपजीविका चालवावी लागते. दुसरीकडे कचरावेचक हादेखील आपल्याकडे अद्याप वंचित राहिलेला घटक आहे. खरे म्हणजे आम्ही कुष्ठपीडितांसाठी काम सुरू केले. त्यांच्या समस्यांइतक्याच बाजूच्याच वस्तीत राहणार्‍या कचरावेचक महिलांच्या समस्या अत्यंत विदारक होत्या, हे आमच्या लक्षात आले. कित्येक बायका अशा होत्या, ज्या तब्बल पन्नास-साठ वर्षे पाठीला झोळणा लावून उकिरड्यावरून कचरा गोळा करत होत्या. कचर्‍यातून भंगार निवडून विकून गुजराण करत होत्या. खरे तर कचरा व्यवस्थापन हा आमचा मूळ उद्देश नव्हता, तर समाजातील सर्वात दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणायचे, हा होता. या दुर्लक्षित घटकाचे आरोग्यविषयक प्रश्न, रोजगारविषयक प्रश्न, मुलांचे शिक्षण याकडे मुख्य रोख होता. कचरावेचक हा प्रामुख्याने मांगगारुडी या अत्यंत वंचित मानल्या जाणार्‍या जातीतला समाज. केवळ लातूरमध्येच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात, काही प्रमाणात कर्नाटकातही हा मांगगारुडी समाजच गेली अनेक शतके सफाईचे हे काम करत आला आहे. या समाजघटकावर कायम चोरी-गुन्हेगारीचा ठपका ठेवला जातो. त्यांच्यावर अशा केसेसही दाखल झालेल्या आहेत. या कचरावेचकांना काही मदत करता येईल का, याचा आम्ही विचार करत होतो. त्याचप्रमाणे त्यांना आर्थिक स्वावलंबन शिकवता येईल का, या दृष्टीने बचत गटाचे काम हेच सुरू होते.
 
 
घन कचरावेचकांच्या कल्याणार्थ दीर्घकाळ कार्यरत - जन-आधार सेवाभावी संस्था
vivek
घन कचरा व्यवस्थापन ही सध्या जगासमोरील मोठी समस्या. घन कचरावेचक हा एक मोठा घटक समाजाचा एक भाग. या घटकाच्या कल्याणासाठी लातूरमध्ये 2003 साली जन-आधार सेवाभावी संस्थेची स्थापना झाली. सोसायटी रजिस्ट्रेशन अ‍ॅक्ट 1860 व बॉम्बे पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्ट 1950 अंतर्गत ही संस्था नोंदणीकृत आहे.
मराठवाड्यातील कचरावेचकांसाठी ही संस्था दीर्घकाळ कार्यरत आहे. सुरुवातीच्या काळात कुष्ठपीडितांसाठी आणि सेवावासियांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित केल्यानंतर संस्थेच्या लक्षात आले की, कचरा वेचत असल्यामुळेच हे लोक कुष्ठरोगाने आणि तत्सम त्वचाविकारांनी ग्रस्त आहेत. या कायमस्वरूपी उपाय आणि कचरा वेचण्याच्या व्यवसायातूनच त्यांचा उदरनिर्वाह सुरू राहावा, त्याप्रमाणे स्वयंपूर्ण रोजगार, आरोग्य, शिक्षण, सुरक्षा आणि प्रतिष्ठा याचा त्यांना लाभ व्हावा, यासाठी संस्थेने कार्य सुरू केले. त्यासाठी जनसेवा घन कचरा व्यवस्थापन सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. 165 कचरावेचक महिलांना सुरुवातीच्या टप्प्यात संस्थेने रोजगार पुरवला. आजच्या घडीला संस्थेच्या माध्यमातून 150 गाड्यांच्या माध्यमातून सुमारे 800 स्त्री-पुरुषांना घन कचरा व्यवस्थापनाच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. घंटागाडीच्या माध्यमातून दारोदारी जाऊन ही मंडळी कचरा गोळा करतात. तिथेच सुका व ओला कचरा असे त्याचे विभाजन करतात. त्यानंतर संकलन केंद्रावर आणून त्याचे प्लास्टिक, काच, धातू, पुनर्वापरायोग्य प्लास्टिक असे विभाजन केले जाते. पुन:चक्रीकरणयोग्य शेषक खरेदी-विक्री केंद्रात विकले जाते. केवळ लातूर शहर महापालिकेशीच नव्हे, तर औसा, अहमदपूर, उदगीर (जि. लातूर) व उमरगा (जि. धाराशिव) या महापालिकांशीही ही संस्था घन कचरा व्यवस्थापन कराराद्वारे जोडलेली आहे. संस्थेच्या माध्यमातून 95 हजार कुटुंबांतील पाच लाख नागरिकांपर्यंत ही सेवा पुरवली जाते.
 
 
या काळात काही गोष्टी आमच्या लक्षात आल्या. कचरा वेचणारी बाई पहाटे पाचला घर सोडत असेल, तर स्वयंपाक कधी करत असेल, काय खात असेल हा प्रश्नच होता. त्यामुळे त्यांच्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक होते. कचरा उचलत असल्याने अनारोग्यकारक जीवजंतूंशी थेट संपर्क येतो. त्यामुळे काही ना काही आजारही होते. काहींना दमा, कर्करोग होता, तर काही जणींच्या तर चक्क गर्भपिशव्याही काढण्यात आलेल्या होत्या. या बायकांच्या दैनंदिन कामामुळे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत होते, ती शाळेत जात नव्हती. यातील काही मुले केवळ शाळेच्या रेकॉर्डवर होती, पण आयांबरोबर कचरा वेचत होती, काही लहान भावंडांना सांभाळत होती, तर अनेक मुले शाळेकडे दुर्लक्ष करत होती. व्यसनी नवरे, उद्ध्वस्त कुटुंब अशी त्यांची एकूण चित्रकथा होती. यामागे कचरा वेचण्याचे काम हे मुख्य कारण होते. पण जोपर्यंत दुसरी वाट सुरू होत नाही, तोपर्यंत कचरा वेचण्याच्या कामाची वाट बंद करणे शक्य नव्हते. त्यांच्यासाठी आम्ही खराटे तयार करणे, मेणबत्त्या-खडू तयार करणे असे उपक्रम सुरू केले. मशीनऐवजी हाती तयार करत असल्यामुळे महाग पडत होते व घाऊक बाजारात किंमत मिळत नव्हती. त्याचप्रमाणे यात मुख्य अडचण अशी होती की कचरावेचक महिलांना किंवा कामगारांना रोजचे भंगार रोज विकून पैसे कमावण्याची सवय. महिन्याचा पगार त्यांच्या पचनी पडत नव्हता. यावर त्या बायकांनी दिलेला पर्याय असा होता, की आम्ही आमचा कचरा वेचण्याचा उद्योगच सुरू ठेवतो. फक्त आम्हाला चोर, गुन्हेगार ठरवण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. त्या दृष्टीने आमच्या संस्थेने कचरा व्यवस्थापनाचा मार्ग निश्चित केला.”
 
 
जन-आधार सेवाभावी संस्थेशी आज शेकडो कचरावेचक जोडले गेले आहेत. उकिरड्यावरून कचरा गोळा करण्याऐवजी नेमून दिलेल्या परिसरात घरोघरी जाऊन या महिला कचरा गोळा करतात. त्यांना छोट्या हातगाड्या, अ‍ॅप्रन व ओळखपत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे ओझे उचलावे लागत नाही. रस्त्यावरील उकिरड्यातून कचरा गोळा करायचा नसल्यामुळे डुकरे, कुत्रेही मागे लागत नाहीत. याबाबत पद्मिनीबाईंची एक आठवण मन हेलावणारी आहे. एका नेमून दिलेल्या परिसरात लोक कचरा गोळा करण्यासाठी ठरलेले पैसे देत नव्हते. त्या वेळी संजय कांबळे यांनी त्यांना फुकट काम करू नका असा सल्ला दिला. त्याऐवजी दुसरा परिसर नेमून देतो, तोपर्यंत काही काळ थांबा. या वेळी पद्मिनीताई म्हणाल्या, “दादा, माझे पाय बघा. गाडी, अ‍ॅप्रन अशा सर्व सुविधांसह काम करताना पूर्वीसारखे कुत्रे मागे लागत नाहीत. गेल्या किती महिन्यांत मला एकदाही कुत्रा चावलेला नाही. दुसरा परिसर मिळेपर्यंत मला असेच काम करत राहू दे” असे त्यांनी हृदयपूर्वक सांगितले. हा अनुभव आमचेही डोळे उघडणारा होता, असे संजय कांबळे सांगतात. या अशिक्षित, अडाणी बायकांना कचर्‍याच्या वर्गीकरणाचे जेवढे ज्ञान आहे, तेवढे केमिकल इंजीनिअरिंगच्या किंवा पर्यावरणातील माहीतगारालाही कदाचित नसेल, असे ते आठवणीने नोंदवतात. “आज या बायका 18 प्रकारच्या प्लास्टिकचे वर्गीकरण करू शकतात. पेयजलाच्या/सॉफ्ट ड्रिंकच्या बाटल्या, जाड प्लास्टिक, पुनर्वापरायोग्य प्लास्टिक, पुन:चक्रीकरणायोग्य प्लास्टिक, कमी मायक्रॉनचे-जास्त मायक्रॉनचे प्लास्टिक, चकचकीत प्लास्टिक, पर्यावरणासाठी घातक, अविघटनशील यांची सोयीच्या बोलीभाषेत त्यांनी विभागणी केली आहे. फक्त या ज्ञानाला योग्य दिशा मिळण्याची गरज होती. हे सगळे घटक वेगवेगळे करून या महिला त्या प्लास्टिकची विक्री करतात. खर्‍या अर्थाने या महिला पर्यावरणरक्षक म्हणायला पाहिजेत” असेही ते सांगतात.
 
vivek
 
‘जनसेवा घन कचरा व्यवस्थापन सहकारी सेवा संस्था’ या नावाने सहकारी संस्थेच्या माध्यमातून लातूरमध्ये जन-आधारचे घन कचरा व्यवस्थापन सुरू झाले. विशेष म्हणजे या कचरावेचक मांगगारुडी समाजातील लोकांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शिक्षण देऊन, प्रशिक्षित करून जन-आधारमध्ये प्रामुख्याने विविध पदांवर नियुक्तही केले आहे. म्हणजेच या समाजातील कचरावेचक कर्मचार्‍यांप्रमाणेच सुशिक्षित तरुण लेखापरीक्षण, डेटा ऑपरेटिंग, पर्यवेक्षण, ड्रायव्हर, सोशल वर्क अशी विविध कामेही करतात. या संस्थेच्या माध्यमातून ओल्या कचर्‍याची विल्हेवाट लावली जाते. त्याचप्रमाणे बेलिंग मशीनद्वारे प्लास्टिकचा चुरा केला जातो व ते पुनर्वापर प्रक्रियेसाठी पाठवले जाते. निर्णयप्रक्रिया ते सर्वात खालच्या स्तरावरचे काम यात या समाजाची माणसे संस्थेत कार्यरत आहेत. ‘तुम्हीच तुमच्या कामाचे मालक व्हा’ या उद्देशाने संस्थेने हे केले असल्याचे कांबळे नमूद करतात.
 
 
 
प्रशिक्षण वर्गाची वाटचाल
 
वर म्हटल्याप्रमाणे, पार्कच्या अहवालावरील लेख ऑक्टोबर 2021मध्ये विवेक साप्ताहिकात प्रकाशित झाला. घन कचरा व्यवस्थापनास कौशल्य विकासाची (स्किल डेव्हलपमेंटची) अत्यंत आवश्यकता आहे. या दोन्हींमध्ये असणारी दरी दूर झाली, तर या क्षेत्रात रोजगारनिर्मिती होईल, त्याचप्रमाणे कचरा वर्गीकरणाची शास्त्रोक्त पद्धत विकसित होईल, हा विचार अमरजा कुलकर्णी यांनी या लेखात मांडला होता. अमरजा यांचा हा लेख वाचल्यानंतर संजय कांबळे यांनी पार्कशी संपर्क साधला व या दोन्ही संस्थांचा हेतू समान असल्याचे सांगितले. त्यानंतर कचरावेचकांसाठी संबंधित प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचा विचार सुरू झाला. ‘सफाईमित्र - सर्वांगीण क्षेत्रीय स्थिती परिचय, सुरक्षितता आणि कौशल्य विकास अभ्यासक्रम’ अशा नावाने हा अभ्यासवर्ग डिझाइन करण्यास सुरुवात झाली. मूळ जन-आधार सेवाभावी संस्थेद्वारे काही प्रशिक्षण दिले जात असले, तरी त्याला व्यवस्थित दिशा नव्हती किंवा त्यात हायजीनचा फारसा विचार नव्हता, असे कांबळे सांगतात. मात्र पार्कच्या साथीने अभ्यासक्रमाची रचना करताना रोजगाराबरोबरच सफाई कर्मचार्‍यांच्या हायजीनचा, आरोग्याचा अधिक लक्षपूर्वक विचार केला जाऊ लागला.
 
हा कचरा नव्हे, तर ‘सोने’ आहे हा विचार प्रत्यक्षात आणायचा असेल, तर तो आधी कचरावेचकांना पटवावा लागतो आणि हे त्यांच्या प्रबोधनातून, नियोजनबद्ध प्रशिक्षणातून होऊ शकते ही अभिनव संकल्पना ’पार्क’ने मांडली. अतिशय कमी खर्चात होणारा आणि सर्व महापालिकांनी करण्याजोगा असा हा प्रबोधन-प्रशिक्षणाचा उपक्रम आहे. कचरावेचकांच्या श्रमाला प्रतिष्ठा देणारा, त्यांचे प्रशिक्षण करणारा आणि त्यांना उत्पन्नवाढीचे मार्ग सुचवणारा असा हा उपक्रम आहे. पण कोणत्याही उपक्रमाचे किंवा अभ्यासक्रमाचे नियोजन करताना त्या बाबतीत मुळातून संशोधन होणेही आवश्यक असते. या कामासाठी मुंबईतील इन्स्टिट्यूट फॉर केमिकल टेक्नॉलॉजी अर्थात आयसीटीने (पूर्वीची यूडीसीटी) पुढाकार घेतला. आयसीटीमधील साहाय्यक प्राध्यापक, संशोधक डॉ. सौरभ पाटणकर, ग्रीनशिफ्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक डॉ. कुणाल गोडांबे यांचाही या चमूत समावेश झाला. विवेक व्यासपीठ पार्क व्यवस्थापन सहयोगी, आयसीटी (माटुंगा) संशोधन सहयोगी, जन-आधार सेवाभावी संस्था अंमलबजावणी सहयोगी आणि ग्रीनशिफ्ट औद्योगिक सहयोगी अशा स्वरूपात या अभ्यासक्रमाच्या निर्मितीचे काम सुरू झाले. या चारही संस्थांनी तब्बल एक वर्ष संशोधन व कार्यवाही करून इंग्लिशमधून एक अभ्यासक्रम तयार केला व त्यानंतर तो मराठीत भाषांतरित करण्यात आला. कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना औपचारिक प्रशिक्षण देणे, त्यासाठी कष्टांचा सामना करणार्‍या सामान्य माणसाचे जीवनमान सुधारण्यासाठी विद्यापीठांतील ज्ञानाचा व तंत्राचा प्रसार करणे आवश्यक असल्याचे अभ्यासक्रमाचे प्रमुख निर्माते डॉ. सौरभ पाटणकर नमूद करतात.
 
घन कचरा व्यवस्थापनाचा मोलाचा वारसा (WARSA)
vivek

सध्याच्या घडीला घन कचर्‍याची समस्या, तिचे पर्यावरणीय दुष्परिणाम व या घनकचर्‍याचे व्यवस्थापन या विषयावर जगभरात विविध स्तरांवरती चर्चा होत असते. या विषयासंबंधात पार्कने अर्थात पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटरने सप्टेंबर 2021मध्ये ‘WARSA’ (वारसा) - "Waste As Resource by Changing Stakeholders' Approach' हा शोधनिबंध प्रकाशित केला. पार्कमधील प्रमुख संशोधन अमरजा कुलकर्णी यांनी विस्तृत व दीर्घकालीन संशोधनानंतर हा अहवाल तयार केला आहे. घरगुती आणि व्यावसायिक माध्यमातून निर्माण होणार्‍या घन कचर्‍यामुळे निर्माण होणार्‍या आव्हानांचा आणि व्यवस्थापनाबाबतीतल्या जागृतीचा विस्तृत विचार या शोधनिबंधात करण्यात आला आहे. वास्तविक हा घन कचरा हा दुर्लक्ष करण्याजोगा नाही, तर औद्योगिक दृष्टीने कच्च्या मालाची निर्मिती करणारा घटक आहे. फक्त त्यासाठी आवश्यक वैज्ञानिक निकषांची जोड, व्यवसायपूरक शिक्षण, तंत्रज्ञान व कौशल्यविकास या सर्व घटकांचा समन्वय करणे आवश्यक आहे, या वास्तवावर हा अहवाल भाष्य करतो.

भारत हा दोन नंबरचा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे. त्या दृष्टीने येथे घन कचरा व्यवस्थापन मोठ्या प्रमाणावर कच्चा माल निर्मितीस व रोजगारनिर्मितीस कारक ठरू शकते. भारतातील विविध महापालिकांचे घन कचरा व्यवस्थापन विभाग, घन कचर्‍याचे नैसर्गिक स्रोत, त्याचे परिणाम आणि आर्थिक परिणाम याचा विस्तृत विचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे यासाठी उपयुक्त मार्गदर्शक पुस्तके, घन कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील दरीचे विश्लेषण, घन कचरा व्यवस्थापनातील प्रत्येक घटकाचे महत्त्व, घन कचरा व्यवस्थापनातील आव्हाने, या व्यवस्थापनातील घटकांचा पुढाकार, घन कचरा व्यवस्थापनातील संधी अशा विविध घटकांचा ऊहापोह व विश्लेषण करण्यात आले आहे. असलेल्या व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्यासाठी महत्त्वाच्या स्वतंत्र व्यावसायिक संस्था, शासकीय, निम-शासकीय संस्था, शिक्षण संस्था, स्वयंसेवी सामाजिक संस्था आणि सुविधा पुरवणारे उद्योजक यांच्यासाठी ‘वारसा’ अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या व्यवस्थापनामुळे बेरोजगारीच्या जागतिक समस्येवरही तोडगा निघत असल्याने याचा सर्व स्तरांवर विचार होणे आवश्यक ठरते.
 
 
या प्रायोगिक तत्त्वांवर (पायलट) राबवल्या जाणार्‍या अभ्यासक्रमांतर्गत लातूरमधील सात संकलन केंद्रांमधील सफाई मित्रांचा/तायांचा समावेश असून त्यांच्या प्रशिक्षकांना सुरुवातीच्या टप्प्यात - म्हणजेच 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या काळात प्रशिक्षण देण्यात आले. या जन-आधार सेवाभावी संस्था (मुख्य कार्यालय), जेएसएस अहिल्याबाई होळकर संकलन केंद्र, जेएसएस संत गाडगेबाबा संकलन केंद्र, जेएसएल शाहू महाराज संकलन केंद्र, जेएसएस स्वामी विवेकानंद संकलन केंद्र, लातूर महापालिका कचरा भूमी या सात केंद्रांवरील 15 पर्यवेक्षकांना डॉ. सौरभ पाटणकर, कुणाल गोडांबे आणि अमरजा कुलकर्णी यांनी प्रशिक्षण दिले. पाच विभागांसाठी प्रत्येकी दहा तास असे एकूण पन्नास तासांचे हे प्रशिक्षण होते. त्यात 3 ते 4 तास संकल्पनात्मक ज्ञान आणि उर्वरित तास व्यावहारिक ज्ञान अशी विभागणी करण्यात आली होती. या कचरावेचकांपैकी अनेक जण अशिक्षित वा अल्पशिक्षित होते, त्यामुळे शैक्षणिक पात्रतेची अट घालण्यात आली नव्हती. लातूरमधील या प्रशिक्षण वर्गात कचरा व्यवस्थापन सद्य:स्थितीचा परिचय, सुरक्षितता आणि जोखीम, पदार्थांचे ज्ञान व हाताळणी, आदर्श कार्यपद्धती व प्रतिबंधात्मक उपाय, कचर्‍यापासून मूल्यनिर्मिती, कचरा मूल्यांकन, वातावरण व पर्यावरण प्रणालीवरील परिणाम, घन कचरा व्यवस्थापनाचे नियम अशा विषयांवर माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकेही करण्यात आली. यासाठी घन कचरा व्यवस्थापन (SWM) नियमावली व कामकाजातील सुरक्षितता व आरोग्य (OSH) नियमावली या मानकांना डोळ्यासमोर ठेवण्यात आले. आता प्रशिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात हे सगळे आपल्या हाताखालील 639 कामगारांना हे प्रशिक्षण देतील व त्यांची परीक्षाही घेतील.
 
 
कचरावेचक नव्हे, हे तर आरोग्याचे रक्षक
 
लातूरमधील प्रशिक्षण वर्गासारखे वर्ग महाराष्ट्रभरात घेतल्यास रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध होतील, असे मत संजय कांबळे यांनी नोंदवले. महाराष्ट्रभरात शासकीय स्वच्छता कर्मचार्‍यांव्यतिरिक्त तब्बल साडेचार लाख व्यक्ती कचरावेचक म्हणून काम करतात. या प्रशिक्षण वर्गाचा फायदा झाल्यास त्यांचा शैक्षणिक व आरोग्यविषयक विकास तर होईलच, त्याच वेळी वैविध्यपूर्ण स्वरूपाचा प्रचंड मोठा रोजगार तयार होईल. कचरा व्यवस्थापनात सुरुवातीच्या संकलन, विलगीकरण आणि वहन एवढाच विचार केला, तरी हा आकडा खूप मोठा आहे. यापलीकडे व्यवस्थापनातील प्लास्टिकचा व कागदाचा पुनर्वापर, पुन:चक्रीकरण, बायोगॅस (निर्मिती/व्यवस्थापन) अशा वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही कांबळे म्हणाले.
पार्कच्या ज्येष्ठ संशोधक अमरजा कुलकर्णी या प्रशिक्षण वर्गाबद्दल म्हणाल्या की, “मुळातच घन कचरा व्यवस्थापनात अनेक घटक महत्त्वाचे आहेत. आपल्या दृष्टीने कचरावेचक हा पहिला घटक असतो. पण वास्तविक कचरा निर्माण करणारे आपण हा यातला पहिला घटक आहोत. जोपर्यंत कचरा निर्मिती, त्याचे विलगीकरण, विभाजन याचा विचार आपण करत नाही, तोवर उर्वरित घटकांना दोष देता येणार नाही. इतकाच महत्त्वाचा आणखी घटक म्हणजे भविष्यातील पिढी. कचरा व्यवस्थापन या विषयातील शैक्षणिक, सैद्धान्तिक, व्यावसायिक, औद्योगिक घटक, शहर विकास ते थेट कचरावेचक या वरपासून खालपर्यंत अशा सगळ्या घटकांना एका मंचावर आणण्याच्या दृष्टीने व त्याद्वारे या क्षेत्राला गती देण्याच्या दृष्टीने पार्कचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शहरी विकास विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, कौशल्य विकास विभाग यांचा सहभाग वाढवता येईल का, याचाही विचार करण्यात आला. या सगळ्यामुळे रोजगारनिर्मितीत भर पडली, तर त्याचा नक्की उपयोग होईल असे वाटते. ग्रीनशिफ्ट आणि आयसीटी यांनी अभ्यासक्रमाचे विभाजन आणि सोप्या भाषेतील रचना यासाठी काम केले आहे. यातलाच काही भाग आपण सर्वसाधारण समाजालाही शिकवू शकतो का, असा एक विचार या दोन संस्थांच्या मनात आहे. पायलट स्वरूपात सुरू झालेला हा अभ्यासवर्ग त्याचाच एक भाग आहे. गेले अनेक महिने यासंबंधी चर्चा, विचारविमर्श सुरू होता. यानंतर पाच दिवसांचा हा अभ्यासवर्ग पार पडला.”
vivek
 
या प्रशिक्षण वर्गासाठी कचरावेचकांना गोळा करणे हेसुद्धा एक आव्हानच होते, असे अमरजा म्हणाल्या. “हा रोज ठरावीक वेळात एकच एक काम करणारा आणि हे असेच चालत राहणार हे गृहीत धरलेला हा समाज आहे. हे काम शारीरिकही आहे आणि एका विशिष्ट चाकोरीत चालणारे आहे. गेली अनेक वर्षे आपण हे काम एकाच पद्धतीने करत आहोत. त्यात आता सुधारणात्मक बदल हवा आहे, अशी सहभागींची भावना आहे. सध्याच्या टप्प्यावर पर्यवेक्षक, पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले असले, तरी अभ्यासवर्गाच्या आयोजकांच्या वतीने या विविध संकलन केंद्रांवरील कचरावेचकांशीही आवर्जून चर्चा करण्यात आली. त्या वेळी आमच्या लक्षात आले की हे लोक अशिक्षित अडाणी असले, तरी त्यांना शिक्षणाची भूक आहे. काही जण म्हणाले की, तुम्ही सांगितले तर आम्ही पहाटेदेखील क्लासला येऊ. थोडक्यात, माणूस गांजलेला असला, तरी त्याची शिक्षणाची जिद्द कायम असते असे आमच्या लक्षात आले. आपण पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता असते. त्यांच्या कामाच्या वेळानुसार, लोडनुसार त्यांना काम करता करताच सोयीनुसार आता त्यांचे पर्यवेक्षक प्रशिक्षित करतील, जेणेकरून हे शिक्षण फार पुस्तकी न होता थेट प्रात्यक्षिक स्वरूपात होईल” असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
या फेब्रुवारीत झालेल्या प्रशिक्षणातून मिळालेल्या त्यातील ज्ञानाच्या उपयोजनामुळे कचरावेचकांचे आरोग्य तर सुधारेलच, त्याच वेळी कौशल्यविकास होईल, समाजात प्रतिष्ठा मिळेल, पर्यावरण प्रणालीचा आपण एक महत्त्वाचा भाग असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. कचरा व्यवस्थापनातील स्वत:च्या स्थानाविषयी स्वच्छ दृष्टीकोन तयार होईल. त्याचप्रमाणे या व्यवस्थापनामुळे कचरामालाची पुन:प्राप्ती अधिक दर्जात्मक रूपात होईल. मालाच्या पुन:प्राप्तीच्या प्रक्रियेत नियमांचे अधिक कठोर पालन होईल. या कामाच्या निमित्ताने कौशल्याने परिपूर्ण असा कामगार वर्ग तयार होईल.
vivek
 
या कार्यशाळेचे एक लाभार्थी रोहिदास राठोड सांगतात की, “या कार्यशाळेमुळे आम्हाला आमची सुरक्षा, कचरा कसा हाताळावा याची माहिती हे सर्व समजले व आम्ही ते नक्की अमलात आणू. पण याचबरोबर लोकांचा हेटाळणीचा सूरही हळूहळू बदलला पाहिजे. कारण मानसिक स्थिती चांगली असेल तर आमचे कामही अधिक चांगले होईल व मनही प्रसन्न राहील.” या कार्यशाळेच्या निमित्ताने पार्कने संकलन केंद्रांवरील अनेक कचरावेचकांशी संवादही साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. लेखाच्या सुरुवातीला लिहिलेले पद्मिनीबाईंचे आणि लताबाईंचे हृद्य मनोगत त्याचाच एक भाग. आज पद्मिनीताईंचा मुलगा सतीश काळे जन-आधारमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. आज सतीश यांचा मोठा मुलगा बीए झाला आहे, तर धाकटा एमबीए करत आहे. शुभम काळे हा त्यांचा मुलगा अहिल्याबाई होळकर संकलन केंद्रात कार्यरत आहे. प्लास्टिक बेलिंग मशीनवर काम करताना घेण्याची काळजी आपल्याला या प्रशिक्षणातून मिळाल्याचे तो नमूद करतो. केवळ गरजूंनाच नव्हे, तर वाट चुकलेल्या अनेकांना या कचरा व्यवस्थापन व्यवसायाने आधार दिला आहे. थेट हाफ मर्डरपर्यंत गुन्हेगारीचा स्तर गाठलेल्या व वेगवेगळ्या पोलीस स्थानकांत तक्रारी दाखल झालेल्या, गुन्हेगारीला कंटाळलेल्या एकाला त्यातून बाहेर पडण्याची इच्छा होती. आधी कामगार म्हणून, तर 2008नंतर ड्रायव्हिंग शिकून चालक म्हणून तो या व्यवस्थापनाचा एक भाग झाला आहे व अभिमानाने आपले आयुष्य जगतो आहे. प्रवीण मुळे हे बीएससी कॉम्प्युटर्सपर्यंत शिकलेले आहेत. त्यांना प्लास्टिक प्रोसेसिंगची आवड आहे.
 
सुपरवायझर छायाताई सांगतात की, “हा कचरा आहे ही मानसिकताच मुळात बदलली पाहिजे. हा कचरा नाही, तर हे सोने आहे. अनेक व्यवसायांसाठी लागणारा कच्चा माल या कचऱा वर्गीकरणातून उपलब्ध होतो. खरे तर आपल्या बाजूने प्रत्येकानेच स्वत:च याचे विलगीकरण केले पाहिजे. रंगवलेल्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होते, त्याचे घरीच विसर्जन करावे. मोठमोठ्या कार्यालयांत ओला कचरा वेगळा करून त्याचे कंपोस्टिंग व्हावे. अशा पद्धतीने कंपोस्टिंग झाले, तर तो कचरा आधीच संकलनातून वजा होईल. प्लास्टिक, ई-कचरा, सुका कचरा वेगवेगळा ठेवावा. कचरा ज्या संकलन केंद्रांवर येतो, त्यांनी कर्मचार्‍यांसाठी प्रथमोपचार पेटी कायम तयार ठेवावी, त्याचा वापर शिकवावा. कर्मचार्‍यांकडे सुपरवायझरप्रमाणेच अग्निशमन यंत्रणेचेही संपर्क क्रमांक असावेत.”

छायाताईंनी उपस्थित केलेले मुद्दे अत्यंत महत्त्वाचे होते. थोडे बारकाईने पाहिल्यास लक्षात येते की, माणूस शिक्षित असो वा अशिक्षित, तो मुळातच विचारशील असतो, कष्ट करणारा असतो. त्याला त्यासाठी योग्य संधी मिळणे अत्यंत आवश्यक असते. मुद्दा येतो तो संधीच्या प्रतिष्ठेचा. ज्याप्रमाणे रेल्वे-बस किंवा पाणीपुरवठा किंवा दूधपुरवठा किंवा वैद्यकीय सुविधा या व्यवस्था समाजात असणे अनिवार्यच असते. संजय कांबळे म्हणाले, त्याप्रमाणे जसे सैनिक सीमेवर राष्ट्राचे रक्षण करतात, तसेच कचरावेचक समाजाच्या पर्यावरणाचे रक्षण करतात. म्हणूनच या व्यवस्थेलाही प्रतिष्ठा मिळणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी तिथे सुव्यवस्थित व्यवस्थापन, कर्मचार्‍यांचे आरोग्यरक्षण, त्यांची सुरक्षा, त्यांना प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे. त्याच वेळी या जागतिक समस्येचे नियोजनबद्ध व्यवस्थापन होणेही व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते जनमानसात व व्यवस्थेत रुजणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पार्क (PARC), जन-आधार, ग्रीनशिफ्ट आणि आयसीटी यांच्या संयुक्त विद्यमाने कचरावेचकांच्या प्रशिक्षणार्थींसाठी आयोजित ही कार्यशाळा एक दिशादर्शक, प्रबोधनात्मक प्रकल्प ठरू शकते.
 

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.