सावधानतेचा इशारा देणारा अहवाल

विवेक मराठी    10-Mar-2023   
Total Views |
आगामी काळात पाकिस्तान व चीनकडून भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर भारताकडून लष्करी कारवाईच्या माध्यमातून त्याचा आक्रमक प्रतिकार केला जाऊ शकतो, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2024मध्ये भारतात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका हे यामागचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. त्या निवडणुका शाांततेत पार पडू नयेत, विद्यमान सरकारविषयी भारतीयांची दिशाभूल व्हावी, देशातील हिंदूंसह सर्व नागरिकांची काळजी घेणारे हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी अशी विघ्ने आणली जातील.

vivek
 
 
2014पासून केंद्रात सत्तेवर असलेला भाजपा आणि त्याच्या नेतृत्वाखाली प्रगतिपथावर घौडदौड करत असलेला, कर्तृत्वाच्या नव्या झळाळीसह जगाचे लक्ष वेधून घेत असलेला समर्थ आणि कणखर भारत हा जगभरातल्या अनेक देशांसाठी असूयेचे कारण बनला आहे. त्यातही शेजारी असलेले चीन आणि पाकिस्तान यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भारताला लागून असलेल्या सीमाभागात दोन्ही देशांच्या सततच्या चाललेल्या कारवाया हे त्यांच्या मनात भारताविषयी असलेल्या वैरभावाचे, असूयेचे दृश्य स्वरूप. या दोन्ही देशांचा भारताविषयीचा दृष्टीकोन गेल्या 75 वर्षांत दिसून आलेला. त्या त्या वेळी त्यांना भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले असले, तरी गेल्या 8-9 वर्षांत हे प्रत्युत्तर अधिकच कडवे व ठाम झाले आहे, याची या दोन्ही देशांना जाणीव आहे. पण जे कळते आहे ते वळत मात्र नाही. कुत्र्याचे शेपूट.. नळीत घातले तरी वाकडेच, अशी या दोन शेजार्‍यांची मानसिकता. केवळ भौगोलिक सीमांमुळे शेजारी झालेले हे शत्रू. हे शत्रुत्व वेगवेगळ्या मार्गांनी प्रकट करणे आणि भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का देणे, हे त्यांचे उद्योग. कधी एकत्रितपणे चाललेले, कधी एकमेकांच्या आडून.
 
 
 
पाकिस्तान व चीनकडून भारताच्या सीमाभागात चाललेल्या कारवाया/हल्ले थांबावेत आणि या तीन देशांमध्ये - म्हणजेच पर्यायाने आशिया खंडात शांतता नांदावी, ही अपेक्षा जागतिक स्तरावर सातत्याने व्यक्त केली जात आहे. वास्तविक या दोन्ही शेजार्‍यांशी असलेल्या संबंधात शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी भारताने दोन्ही देशांशी द्विपक्षीय चर्चा आणि त्यातून मार्ग काढण्याची मानसिकता कायमच दाखवली आहे. हे दोन शेजारी मात्र अद्यापही त्या मानसिकतेत नसल्याचेच अमेरिकन गुप्तचर खात्याच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालाने अधोरेखित केले आहे.
 
 
 
आगामी काळात पाकिस्तान व चीनकडून भारताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर भारताकडून लष्करी कारवाईच्या माध्यमातून त्याचा आक्रमक प्रतिकार केला जाऊ शकतो, असे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2024मध्ये भारतात होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुका हे यामागचे सगळ्यात महत्त्वाचे कारण आहे. त्या निवडणुका शाांततेत पार पडू नयेत, विद्यमान सरकारविषयी भारतीयांची दिशाभूल व्हावी, देशातील हिंदूंसह सर्व नागरिकांची काळजी घेणारे हे सरकार पुन्हा सत्तेवर येऊ नये यासाठी अशी विघ्ने आणली जातील.
 
 
 
2019च्या भारतातील सार्वत्रिक निवडणुकांआधीही अमेरिकी गुप्तचर खात्याने पाकिस्तान व चीनकडून धोका असल्याची शक्यता वर्तवली होती आणि फेब्रुवारी 2019मध्ये पुलवामाची घटना घडली. भारताने 10-12 दिवसांतच त्याला चोख प्रत्युत्तर देऊन शेजारी शत्रूला नामोहरम केलेही. नंतर गलवान खोर्‍यात चीनने केलेल्या आगळिकीनंतर भारतीय सैन्याने त्यांनाही त्यांची जागा दाखवून दिली. दोघांच्या नामुश्कीचा हा इतिहास अगदी अलीकडचा असला, तरी त्यांची खुमखुमी जिरलेली नाही, हेच ताज्या अहवालावरून स्पष्ट होते.
 
 
 
पाकिस्तानमध्ये सध्या अराजकसदृश परिस्थिती आहे. आर्थिक विपन्नावस्था, दिवाळखोरी असली, तरी आजही पाकिस्तानात लष्कर हेच सर्वोच्च आहे. सध्या तिथे लष्कर विरुद्ध राजकारणी अशी दुफळी माजली असली, तरी त्यावरून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर भारताविरुद्ध आगळीक करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या वेळी ते काश्मीरमध्ये घुसतील असे नाही, तर आपचे कमकुवत सरकार असलेल्या, खलिस्तानी चळवळीने पुन्हा डोके वर काढलेल्या अस्वस्थ पंजाबमध्ये ते घुसू शकतात. वाढती गुन्हेगारी, नशिल्या पदार्थांच्या आणि दहशतवादाच्या विळख्यात अडकलेली तरुणाई म्हणजे पंजाब असे आजच्या पंजाबचे चित्र आहे. त्यातच आपच्या हाती आलेली सत्ता हे दुर्दैव. यातून पंजाबची समस्या अधिकच गंभीर आणि भारतासाठी अतीव धोकादायक बनली आहे. पंजाबमध्ये घडत असलेल्या घटना किरकोळ नाहीत. ‘वारीस पंजाब दे’ या खलिस्तानवादी चळवळीचे नेतृत्व करत असलेल्या अमृतपाल सिंगचा निकटवर्ती सहकारी लंडनला पळून जायच्या तयारीत असताना त्याला अमृतसर विमानतळावर पकडण्यात आले. ही घटना अगदी अलीकडचीच. पंजाबातली ही अस्वस्थता वाढण्यासाठी आयएसआयची पंजाबमध्ये पेरलेली माणसे काहीतरी गडबड करू शकतात. अशा प्रकारे घटना/चकमकी घडवून आणायच्या, हे तर पाकिस्तानी लष्कराचे वैशिष्ट्य आहे. आपल्या देशातील नागरिक भुकेने तडफडले तरी चालतील, पण भारताच्या प्रगतीत बिब्बा घालायची एकही संधी गमवायची नाही, हे पाकिस्तानी लष्कराचे धोरण आहे. त्याच्या माध्यमातून पाकिस्तानी गुप्तचर संघटना - आयएसआय सगळी सूत्रे हलवत असते, हेही उघड गुपित.
 
 
 
शी जिनपिंग हे सलग तिसर्‍यांदा चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. अगदी अलीकडेच त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. चीन हा भारताचा सगळ्यात धोकादायक आणि बलाढ्य शेजारी शत्रू. कोरोनापश्चात त्याची आक्रमकता तुलनेने कमी झालेली असली, तरी त्याच्यासारख्या धूर्त शत्रूने धारण केलेला हा मुखवटा असू शकतो. मांडलिक झालेल्या पाकिस्तानला मदत करण्याचे भासवत प्रत्यक्षात भारताविरुद्ध मोर्चेबांधणी करण्याचे उद्योग तो या ना त्या मार्गाने चालूच ठेवेल. सध्या विविध विषयांवर भारताशी चर्चा करण्याचे धोरण चीनने अवलंबले असले, तरी त्यामुळे बेसावध न राहणे हेच भारताच्या हिताचे असेल. भारत सरकार याबाबत सजग असेलच, तसे असणे किती गरजेचे आहे, हे या अहवालाने अधोरेखित केले आहे.
 
 
 
देशातले तथाकथित पुरोगामी आणि डाव्या चळवळी हा अहवाल गांभीर्याने घेतील काय? वैचारिक भेदांपलीकडे जाऊन, देशाची अखंडता आणि सुरक्षितता याला प्राधान्य दिले तर या अहवालाचे महत्त्व त्यांच्या लक्षात येईल. तसे होईल तो सुदिन.