हिमालय-सह्याद्रीचे बंध विस्तारणारा ‘अथ्वास’

विवेक मराठी    14-Mar-2023   
Total Views |

kashmir
मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे येत्या 17 ते 22 मार्च या काळात जम्मू-काश्मीर-लदाख आणि महाराष्ट्र यांच्यातील आर्थिक व सामाजिक बंध विस्तारणार्‍या ‘अथ्वास’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार, गुलशन फाउंडेशन, पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर (पार्क), फाउंडेशन ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट, सहकार भारती, पनाश फाउंडेशन, उद्योग मित्र अशा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही भूभागांत क्रीडा, शिक्षण, उद्योग, संस्कृती यांचे आदानप्रदान व्हावे व जम्मू-काश्मीर-लदाखमधील वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमाची माहिती देणारा हा लेख.
उत्तरेतला शुभ्रधवल, भव्य हिमालय आणि पश्चिम भारतातला काळा, रांगडा पिळदार मावळ्यासारखा सह्याद्री. जशी इथली भौगोलिक स्थिती, तशीच इथली राजकीय, सामाजिक स्थिती आणि तशीच इथली माणसेही. हिमालयाच्या सान्निध्यातील जम्मू-काश्मीर हे कायमच पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण, पण स्थानिक वातावरण मात्र कमालीचे अस्थिर, द्वेषाचे आणि अशांत. पूर्वी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा असल्यामुळे हा भाग भारतापासून कायमच तुटलेला, समाजासाठी विकासाची दारे न उघडलेला असाच राहिला. पण 2019 साली 370 व 35 अ कलम रद्द झाले आणि या प्रदेशातील वातावरणही बदलू लागले.
 
 
 
जम्मू-काश्मीर व लदाख या केंद्रशासित प्रदेशांचा विकास व्हावा, येथील युवकांमध्ये रोजगारक्षमता निर्माण व्हावी, कौशल्य विकास व्हावा, त्यांच्यात ती इच्छाशक्ती तयार व्हावी, या दृष्टीने (पार्कच्या) माध्यमातून येथे विविध उपक्रम चालवले जातात. येथील कलासंस्कृतींचा, कृषीसंस्कृतीचा, क्रीडासंस्कृतीचाही विकास व्हावा यासाठीही प्रयत्न केले जातात. 4 फेब्रुवारी 2022 रोजी डिपार्टमेंट ऑफ यूथ अँड सिटिझन ऑफ स्पोर्ट्स आणि जम्मू-काश्मीर स्पोर्ट्स काउन्सिल यांच्यासह क्रीडा क्षेत्रासंबंधी धोरणही तयार करण्यात आले. यासह जम्मू-काश्मीरमध्ये विकासाच्या दृष्टीने केवळ रोजगारक्षमता नव्हे, तर उद्यमशीलता वाढीस लागावी, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकसित राज्य असणारे महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर-लदाख यांच्यात सामाजिक-आर्थिक विकासाचा मार्ग प्रशस्त व्हावा, या हेतूने येत्या 17 ते 22 मार्च या काळात मुंबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे ‘अथ्वास’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकार, गुलशन फाउंडेशन, विवेक व्यासपीठ संचालित पॉलिसी अ‍ॅडव्होकसी रिसर्च सेंटर (PARC), फाउंडेशन ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट, सहकार भारती, उद्योग मित्र, सविष्कार, श्रीनगरचे पनाश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसांच्या कार्यक्रमात उद्यमतेला प्रोत्साहन देणारी चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम, कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन-विक्री, खाद्यजत्रा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे.
 
 
kashmir
 
370 व 35 अ कलम रद्द झाले आणि जम्मू-काश्मीरमध्ये व लदाखमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. तत्पूर्वीही पीएमएसएसएस अंतर्गत स्थानिक युवक शिक्षणासाठी बाहेर पडत होते, ते शिक्षणानंतर भारतात अन्यत्र वा परदेशी स्थायिक होत. त्यांनी तसे न करता आपल्या मायभूमीत परतावे, तिकडच्या युवकांच्या मानसिकतेनुसार केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता स्वत:च उद्योजक व्हावे, या दृष्टीने ‘अथ्वास’मध्ये युवककेंद्री कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या या उद्यमशीलतेला योग्य बाजारपेठही मिळणे तितकेच आवश्यक आहे. त्यासाठी अर्थात देशाची आर्थिक राजधानी असणार्‍या मुंबईसारखा दुसरा सर्वोत्तम पर्याय असूच शकत नाही. हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर म्हणूनच उपरोक्त संघटनांनी याच शहरात कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. दि. 17 मार्च रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून गुढीपाडव्याला या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. जम्मू-काश्मीर-लदाख आणि महाराष्ट्र यांच्यात सांस्कृतिक, आर्थिक विकास व्हावा, व्यावसायिक आदानप्रदान व्हावे यासाठी विविध मान्यवरांची, शासकीय अधिकारी, संघटनांचे नेते, व्यावसायिकांचे प्रतिनिधी यांची व्याख्याने, त्याचप्रमाणे चर्चासत्रे यांचा समावेश यात असणार आहे.
 
 
kashmir
 
या प्रदेशांतील युवकांमध्ये उद्यमशीलतेचा विकास व्हावा, यासाठी दि. 18 मार्च ते 21 मार्च काळात ‘अथ्वास’ कार्यक्रमात उद्यमशीलता विकास कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील व लडाखमधील व्यावसायेच्छुक युवकांना व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने काय काय व्यवस्था करावी लागेल, व्यवसायाची तयारी कशी केली जाते, त्याचे वेगवेगळे घटक कोणते याचे मार्गदर्शन या चार दिवसांत केले जाणार आहे. दि. 18 मार्च रोजी ‘बिझनेस मीट’ अर्थात व्यावसायिक बैठक होणार आहे. या बैठकीत जम्मू-काश्मिरातील उद्योजकांना महाराष्ट्रातील उद्योजकांशी चर्चा करण्याची संधी मिळणार आहे. ‘अथ्वास’मध्ये पार्क, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज व अ‍ॅग्रीकल्चर यांच्या पाठिंब्याने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रातील विविध घटकांना एकत्र आणून त्यांना जम्मू-काश्मीर-लदाखमधील आर्थिक ताण कमी करण्यासंबंधी विचारविनिमय करून मार्ग सुकर करणे, तसेच युवा उद्योजकांमध्ये कल्पकता-चैतन्य जागृत करणे, तसेच या निमित्ताने प्रधानमंत्री विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मुंबईत राहणार्‍या काश्मिरी विद्यार्थ्यांना जम्मू-काश्मीर-लदाखमधील विविध लघु, मध्यम उद्योजक, विविध स्टार्ट अप्स, स्थानिक खाद्यान्न, पर्यटन क्षेत्र, शिक्षण क्षेत्र इत्यादींना पाठिंबा देणे हा यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची माहिती मिळेल. सुमारे 150 काश्मिरी उद्योजक ‘अथ्वास’मध्ये सहभागी होणार आहेत.
 
 
जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘अथ्वास’
आम्ही फार वर्षांपासून नियमितपणे जम्मू-काश्मीर-लदाखला जात आलो आहोत. तेथील युवकांना वेळोवेळी भेटल्यावर लक्षात आले की त्यांना उर्वरित भारत माहीतच नाही. त्यामुळे त्यांना उर्वरित भारताशी जोडले पाहिजे. शिक्षणासाठी ते पूर्वीपासून येतातच. परंतु बिझनेस मीटच्या निमित्तानेही त्यांना इथे आणले पाहिजे, असा विचार लॉकडाउनच्या आधीपासूनच मनात घोळत होता. त्या दृष्टीने उद्योजकता, सहकार क्षेत्र, कला क्षेत्र अशा विविध अंगांचा एकत्रित विचार करून आम्ही ‘अथ्वास’चे आयोजन केले आहे. त्या भागात पार्कचे संशोधनाचे कार्य चालते. सहकार भारतीचे तिथे सहकाराच्या दृष्टीने काम चालते. स्टार्ट अप क्षेत्रात कार्य करणारा ‘सविष्कार फोरम’ हा अभाविपचा एक भाग आहे. उद्योगमित्र एमएसएमई क्षेत्रात कार्य करते. पनाश संस्था तिथे महिला उद्योजिकांसाठी, बचत गटांसाठी कार्यरत आहे. जम्मू-काश्मीर-लदाखमधील युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा. तिथे उद्योग विश्व, स्टार्टअप्स कार्यरत व्हावेत, शैक्षणिक गरजा पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या मातृभूत स्थायिक व्हावे, उद्यमशील व्हावे, त्यांच्या कला सांभाळाव्यात यासाठीच हा कार्यक्रम आहे. त्यांच्या वस्तूंना ती थेट किंमत मिळावी किंवा त्यांनी स्वत:च आपल्या वस्तू शहरात आणून विकाव्यात व थेट नफा मिळवावा अशीही आपली भूमिका आहे. या कार्यक्रमात आयोजित बिझनेस मीटचा त्यांना नक्की यासाठी उपयोग होईल.
- इरफान अली पीरजादे,
 
गुलशन फाउंडेशन, प्रमुख आयोजक संस्था
 
 
समाजाला एकत्र आणण्याच्या अनेक मार्गांमधील एक म्हणजे मॅरेथॉन. ‘अथ्वास’च्या निमित्ताने 19 मार्च रोजी ‘एकता दौड’चे (Integrity marathonचे) आयोजन करण्यात आले आहे. बंधुभाव जपण्यासाठी, प्रांतिक-वांशिक-सांस्कृतिक भेद मिटवण्यासाठी, त्याचप्रमाणे राष्ट्रीय मूल्यांचा प्रचार, सहिष्णुता व सौहार्द यांचा आग्रह यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. देशाची एकात्मता अबाधित राहावी, त्याचप्रमाणे युवकांमधील नेतृत्वगुणांचा विकास व्हावा हा यामागील उद्देश आहे. महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर-लदाखमधील नागरिक या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत. या निमित्ताने या दोन्ही भूभागांतील नागरिकांमध्ये एकतेची भावना वृद्धिंगत व्हावी, अशीही आयोजकांची भावना आहे. दि. 20 मार्च रोजी शैक्षणिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर-लदाखमध्ये आजघडीला पूर्वप्राथमिक ते विद्यापीठीय अशा सर्व स्तरांतील शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत. या भूभागांतील शैक्षणिक सोयीसुविधा व संधी यावर या चर्चासत्रात विचारविनिमय करण्यात येणार आहे.
 
 
kashmir
 
आजवर आपण चित्रपटांतूनच काश्मीरचे निसर्गचित्रण पाहत आलो. काश्मीर हे साधारण ऐंशीच्या दशकापर्यंत बॉलीवूडचे चित्रीकरणाचे महत्त्वाचे ठिकाण होते. पण 90च्या दशकात काश्मिरात झालेल्या नरसंहारानंतर व अशांत-असुरक्षित वातावरणामुळे असेल कदाचित, पण निर्मात्यांनी परदेशातील चित्रीकरण स्थळांकडे आपला मोर्चा वळवला. वास्तविक काश्मीरला आजही भारताचा स्वर्ग असे म्हटले जाते; तर मुंबई हे बॉलिवूडचे केंद्र मानले जातेच, त्याच वेळेस ती देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे, म्हणूनच ‘अथ्वास’मध्ये एका वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. भारतीय चित्रपट निर्मात्यांनी, मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांनी चित्रीकरण स्थळ म्हणून काश्मीरचा पुन्हा एकदा विचार करायला हवा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा हा ट्रेंड स्थिरावला, तर स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळेल, त्याचप्रमाणे पर्यटकांचाही ओढा पुन्हा एकदा या भूभागाकडे वाढू लागेल. गेल्या काही वर्षांत एकूणच होम स्टे (घरगुती निवास) आणि स्थानिक खाद्यपदार्थ हे पर्यटकांच्या आकर्षणाचे विषय राहिले आहेत. हा प्रवाह या भूभागातही रुजला, तर या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक रहिवाशांना यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व आर्थिक उलाढालीवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. ‘अथ्वास’ कार्यक्रमादरम्यान पारंपरिक सुफीनामाही आयोजित करण्यात आला आहे. दि. 21 मार्च या दिवशीच पारंपरिक फॅशन शोदेखील आयोजित करण्यात आला आहे. यामुळे या प्रदेशांतील पारंपरिक वस्त्रप्रावरणे, सौंदर्यालंकार यातील विविधता अनुभवता येणार आहे.
 
 
kashmir
 
या पाच दिवसांच्या कार्यक्रमकाळात जम्मू-काश्मिरातील विविध कलाकुसरीच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. आजवर असे पाहण्यात आले आहे की, विविध राज्यांच्या प्रदर्शनांमध्ये जम्मू-काश्मीरचे विक्रीकेंद्र विशेष लक्षात येत नाही. त्यामुळे संपूर्ण प्रदर्शनच या केंद्रशासित प्रदेशांसाठी असावे, या विचाराने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पारंपरिक कलाकुसरीच्या जीआय मानांकनप्राप्त वस्तू लोकांना पाहायची, तसेच विकत घेण्याची संधी मिळेल. या प्रदेशांतील अनेक कला आज मरणासन्न अवस्थेत आहेत. कलाकुसरी करणार्‍या अनेकांच्या शेवटच्या पिढ्या आज कार्यरत आहेत. पण त्यांनी अत्यंत धीरोदात्तपणे आपली कला सुरू ठेवली आहे. पण पुढची पिढी ते करण्यास उत्सुक नाही, कारण त्यांना बाजारपेठ मिळत नाही. उदाहरणच द्यायचे, तर तेथील पारंपरिक लाकडी खडावांचे देता येईल. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असणार्‍या काश्मिरी खडावांचे आज अगदी नाममात्र कारागीर अस्तित्वात आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा लोप पावत चाललेल्या कलांना, पारंपरिक वस्त्रांना बाजारपेठही मिळेल. शहरातील नागरिकांपर्यंत या कला पोहोचायला मदत होईल. यामुळे यांचा परिचय तर नागरिकांना होईलच, त्याच वेळी उद्यमशील तरुण पुन्हा एकदा आपल्या परंपरांचा, पारंपरिक वस्तूंचा व वस्त्रांचा व्यवसायाभिमुख विचार करू लागतील, असा विचार या कलाप्रदर्शनांमागे आहे. या कार्यक्रमादरम्यान जम्मू-काश्मीरमधील व लदाखमधील विविध पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे.
 
 
kashmir
 
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो, त्याचप्रमाणे या भूभागांत नववर्षदिनी ‘नवरेह’ साजरा केला जातो. नववर्ष या शब्दाचा अपभ्रंश होऊनच नवरेह हा शब्द तयार झाला आहे. काश्मिरी हिंदू अत्यंत आनंदाने, उत्साहाने नवरेह साजरा करतात. ‘अथ्वास’चा समारोप पारंपरिक पद्धतीने नवरेह साजरा करून केला जाणार आहे. महाराष्ट्रीय गुढीपाडवा आणि काश्मिरी नवरेह याचा एकत्रित आनंद घेतच या कार्यक्रमाचा समारोप होईल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने या वेळी 75 फूट उंच गुढी उभी केली जाणार आहे. सध्या रमझान मासही सुरू आहे.जम्मू-काश्मीर-लदाखमधील यादेखील संस्कृतीचा, परंपरांचा परिचय उपस्थितांना होईल.
 
 
 
‘अथ्वास’ हा कार्यक्रम जम्मू-काश्मीरच्या आणि लदाखच्या सांस्कृतिक, सहकार, औद्योगिक, शैक्षणिक असा विविध पातळ्यांवर परिणामकारक ठरेल. उर्वरित भारताची या भूभागाशी तुटलेली नाळ अशा उपक्रमांमुळे पुन्हा एकदा जोडली जाईल व उर्वरित राज्यांमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासात हा प्रदेशही मोलाची भर घालेल, यात शंका नाही. हिमालयाच्या संस्कृती, कला, क्रीडा, उद्यमता यांचा सह्याद्रीशीही वेगळा बंध तयार होईल. जम्मू-काश्मीर-लदाख आणि महाराष्ट्रातील आर्थिक व सामाजिक बंध विस्तारणारा ‘अथ्वास’ हा एक आगळावेगळा कार्यक्रम ठरेल, यात शंका नाही.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.