कागदी पर्यटन घडवणारा छंद

विवेक मराठी    29-May-2023   
Total Views |
@मृदुला राजवाडे 
 गोरेगावातील प्रमोद नवरे यांना छंद आहे तिकिटे गोळा करण्याचा. बस, ट्रेन, ट्राम, मेट्रो, पर्यटन स्थळांचे प्रवेश पास अशा विविध प्रकारच्या जवळपास साडेतीन हजार तिकिटांचा संग्रह त्यांनी केला आहे. गाव, शहर, राज्य, देश, परदेश अशा सर्व परिघातील दुर्मीळ तिकिटे त्यांच्या संग्रही आहेत. विविध ठिकाणी त्यांच्या या संग्रहाची प्रदर्शनेही झाली आहेत. या तिकिटांमुळे लोकांना कागदी पर्यटनाचाच आनंद मिळत असल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
 
tickets
 
तिकीट.. आपल्यासाठी हा केवळ कागदाचा एक तुकडा. प्रवासासाठी, एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी आपण पैसे देऊन हा तुकडा खरेदी करतो आणि याचे प्रयोजन संपले की त्याचे मूल्यही शून्य होते. रेल्वेतून किंवा बसमधून प्रवास झाला की आपण पहिले काम करतो ते तिकीट टाकून देण्याचे. कोणी ते कचरा पेटीत फेकतात, तर कोणी रस्त्यावरच त्याचा कचरा करतात. पण काही अवलिये त्याचाच संग्रह करतात आणि मग तो संग्रह त्यांच्या जीवनाचे एक ध्येयच होऊन जाते. अशा तब्बल साडेतीन हजार तिकिटांचा संग्रह करणारे प्रमोद नवरे यांच्यासाठी हा छंद त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच होऊन गेला आहे.
  
 
असा आगळावेगळा छंद का जोपासावा असे वाटले? असे विचारले असता ते म्हणाले की, “मी काही लहानपणापासून हा संग्रह करत नव्हतो. ग्रॅज्युएशनची परीक्षा झाल्यानंतर मी सुट्टीत बर्‍याच ठिकाणी फिरलो. तेव्हा गाडीने फिरण्याचा ट्रेंड नव्हता, त्यामुळे सर्वसाधारण प्रवाशाप्रमाणे मीदेखील एसटीनेच फिरत होतो. प्रथम रत्नागिरीला आजोळी गेलो. तेथील बसच्या तिकिटांचा आकार मला आवडला. ती तिकिटे मुंबईतल्या तिकिटांसारखी नव्हती. त्या तिकिटांचा आकार छोटा होता, तरी त्यावर सगळे तपशील व्यवस्थित बसवलेले होते. त्यानंतर मी पुणे, पिंपरी-चिंचवड, खोपोली अशा विविध ठिकाणी फिरलो. तिथेही प्रत्येक ठिकाणची तिकिटे वेगळ्या आकाराची. तपशील सगळ्यांचे सारखेच असले, तरी मांडणीची पद्धत वेगळी होती. कुणाची रक्कम तळात, तर कोणाची वर, कोणाचे कोड नंबर वेगवेगळ्या जागी, कोणाचे आकडे वगैरे तपशील टेबल पद्धतीत लिहिलेले, तर कोणाचे तसेच चौकटीशिवाय मांडलेले. एकाच प्रवासात वेगवेगळ्या प्रकारची तिकिटे पाहून मला खरे तर गंमत वाटली. फक्त चार दिवसांत चार वेगळ्या प्रकारची तिकिटे एकाच राज्यात पाहायला मिळाली. माझ्या मनात आले की, चार शहरांत वेगवेगळी तिकिटे असतील, तर देशभरात, जगभरात किती विविध प्रकारची तिकिटे अस्तित्वात असतील? जसा जमेल तसा याचा संग्रह का करू नये, असे मला तेव्हा वाटले आणि मी ते अमलात आणायला सुरुवात केली. तो प्रवासच माझ्या या संग्रहाला कारणीभूत ठरला. अर्थात तेव्हा एवढा मोठा संग्रह करू असे काही मनात नव्हते. फक्त तिकिटे साठवत गेलो, एवढेच.”
 

tickets 
 
दुर्मीळ बेस्ट आणि ट्राम तिकिटे
 
नवरे यांच्याकडे आज रेल्वे, बस, विमान, मेट्रो, विविध पर्यटन स्थळांवरील प्रवेशपत्रे अशा देशविदेशातील, भारतातील जवळपास सर्व राज्यांतील तिकिटांचा संग्रह आहे. मुंबईतील पर्यटन स्थळे, राज्यातील पर्यटन स्थळे, देशातील आणि विदेशातील पर्यटन स्थळे अशी विविधता त्यांच्याकडील पर्यटन स्थळांमध्ये प्रवेशपत्रांमध्ये आहे. या सगळ्या तिकिटांचे प्रदर्शनही ते आयोजित करत असतात. त्यांच्या प्रदर्शनाची संकल्पनाच ‘कागदी पर्यटन’ अशी आहे. स्थानिक रेल्वे-बसपासून ते थेट लंडन म्युझियम, बुर्ज खलिफा आणि नायगारा धबधबा येथील प्रवेशपत्रे असा व्यापक प्रवास या कागदांद्वारे आपण करतो, असे ते सांगतात. किमान एक आण्यापासून पुढे विविध रकमांची तिकिटे त्यांच्याकडे आहेत. एकाच रकमेची वेगवेगळ्या काळातील तिकिटेही त्यांच्याकडे आहेत. उदाहरण द्यायचे, तर बेस्टच्या पाच रुपयांच्या तिकिटाच्या स्वरूपात काही बदल झाला की ते तिकीट त्यांच्या संग्रहात जमा होते. एका तिकिटातील किमान अंतर, कोड, सिरियल नंबर, तिकिटाच्या भाषेतील बदल, रंगातील बदल, विशेष सवलत असल्यास त्याचे तपशील, तसेच तिकिटाची रक्कम असे वेगवेगळे तपशील असतात. रक्कम हा त्यांनी संग्रहासाठी ठेवलेला मुख्य आधार आहे. आजही प्रवास केल्यावर ते डेपोत किंवा बोर्ड झालेल्या ठिकाणी फेरफटका मारतात व वेगळे तिकीट असल्यास ते संग्रहित करतात.
 

vivek 
 
80 वर्षं जुने ट्रामचे तिकीट
 
 
आपल्या संग्रहातील वैशिष्ट्यपूर्ण तिकिटांबाबत सांगताना ते म्हणाले की, “पूर्वी मुंबईत ट्राम सेवा होती. कालांतराने ती बंद झाली. त्या ट्राममधून 80 वर्षांपूर्वी प्रवास केलेल्या एका व्यक्तीने त्याच्याकडील ट्रामचे तिकीट मला दिले. हे माझ्या संग्रहातील सर्वात जुने तिकीट. ट्रामच्या तिकिटावर पूर्वी मार्ग लिहिलेले असत, काही वेळा स्टॉपची नावे लिहिलेली असत. ट्रामचे हे तिकीट सहा आण्याचे आहे. बंगालमधील बसचे तिकीट सर्वात लहान - म्हणजे अक्षरश: एका बोटाच्या दोन पेरांच्या आकाराचे आहे आणि विशेष म्हणजे तरीही त्याच्यावर सगळे तपशील भरलेले आहेत. कलकत्ता मेट्रो, मुंबई तसेच देशातील सर्व रेल्वेसेवा, बससेवा, विमानसेवा, परदेशातील सर्व प्रकारच्या प्रवाससेवा, सिटी टूर पास यांची असंख्य तिकिटे त्यांच्याकडे आहेत. “भारतात पर्यटन स्थळांच्या प्रवेशपत्रांचे किंवा टूर्सचे स्वरूप साधे असले, तरी त्या ठिकाणांचे तपशील असलेले आहे, पर्यटकाने आकर्षित व्हावे अशी चित्रे त्यावर नसतात, पण माहिती असते. धार्मिक स्थळे असतील, तर एखादा संस्कृत श्लोक किंवा त्या ठिकाणाचे बोधवाक्य वगैरे असते. याउलट परदेशात त्यांचा भर चित्रे छापण्यावर असतो, त्यांच्या तिकिटांचा कागदही चांगला असतो” असे ते आवर्जून नमूद करतात. त्यांच्या संग्रहात युनेस्कोच्या भारतातील वारसा स्थळांच्या प्रवेशपत्रांचा एक नमुना आहे. युनेस्कोच्या दहा-बारा वेगवेगळ्या साइट्ससाठी एकच प्रवेशपत्र आहे व त्यावरील फोटोही अक्षरश: स्टँपच्या आकाराचे आहेत. वास्तविक, त्यावर स्वतंत्र चित्र व माहिती देणे शक्य असते. परदेशात रेल्वे, मेट्रो, ट्रामसाठी तिकिटांपेक्षाही सीझन पासची पद्धत जास्त आहे. वर्षभर तो पास तुम्ही वापरू शकता. त्यामुळे तिकिटांची विक्री कमी होते. अथेन्स, व्हिएन्ना, बार्सिलोना, पॅरिस अशा सुमारे देशभरातील, जगभरातील 45 शहरांतील तिकिटे त्यांच्या संग्रहात आहेत. पण त्याचे स्वरूप हे सीझन पाससारखेच आहे. परदेशात पर्यटन स्थळांचे प्रवेश पास अत्यंत आकर्षक असतात. ते आपण आठवण म्हणून जतन करावे असे त्याचे स्वरूप असते. बुर्ज खलिफा, नायगारा धबधबा, लंडन म्युझियम, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अशा ठिकाणी पासांवर आकर्षक चित्रे असतात. भारत व इंग्लंड यांच्यामध्ये लॉर्ड्स या सुप्रसिद्ध मैदानावर खेळल्या गेलेल्या 100व्या कसोटी सामन्याचा पासही त्यांच्या संग्रही आहे.
 “भारतात पर्यटन स्थळांच्या प्रवेशपत्रांचे किंवा टूर्सचे स्वरूप साधे असले, तरी त्या ठिकाणांचे तपशील असलेले आहे, पर्यटकाने आकर्षित व्हावे अशी चित्रे त्यावर नसतात, पण माहिती असते. धार्मिक स्थळे असतील, तर एखादा संस्कृत श्लोक किंवा त्या ठिकाणाचे बोधवाक्य वगैरे असते. याउलट परदेशात त्यांचा भर चित्रे छापण्यावर असतो, त्यांच्या तिकिटांचा कागदही चांगला असतो” असे ते आवर्जून नमूद करतात. त्यांच्या संग्रहात युनेस्कोच्या भारतातील वारसा स्थळांच्या प्रवेशपत्रांचा एक नमुना आहे. युनेस्कोच्या दहा-बारा वेगवेगळ्या साइट्ससाठी एकच प्रवेशपत्र आहे व त्यावरील फोटोही अक्षरश: स्टँपच्या आकाराचे आहेत. वास्तविक, त्यावर स्वतंत्र चित्र व माहिती देणे शक्य असते. परदेशात रेल्वे, मेट्रो, ट्रामसाठी तिकिटांपेक्षाही सीझन पासची पद्धत जास्त आहे. वर्षभर तो पास तुम्ही वापरू शकता. त्यामुळे तिकिटांची विक्री कमी होते.
 

tickets 
 जपानमधील तिकिटे आणि हिरोशिमा शांतता संदेश
 
हा संग्रह करताना कोणत्या अडचणी येतात? असे विचारल्यावर ते म्हणाले, “मी अनेकांना तिकीट संग्रहाबद्दल सांगतो व एखादे दुर्मीळ किंवा आगळेवेगळे तिकीट असल्यास मला द्या असे सांगतो. पण अनेकदा लोक ते तिकीट घडी करून ठेवतात. कागदाला टिकून राहण्यास मर्यादा आहेत. कागद जुना झाला की घडीवर मोडतो, त्याचा चुरा होतो किंवा त्याच्यावरील दृश्यमानतेमध्ये फरक पडतो. काही ठिकाणी तिकिटांवर कोणाच्या बुटांचा ठसा असतो, कधी धूळ-चिखल लागलेला असतो, कधी तिकीट चुरगळलेले असते, कधी फाटलेले असते. अशा वेळेस तो कागद सरळ करून पूर्ववत स्थितीत आणण्याचे आव्हान असते. वास्तविक अडचण ही आहे की लोकांना प्रवासाची परवानगी या पलीकडे त्याचे महत्त्व नसते. त्यामुळे त्याची दुरवस्था झाली, तरी त्याचे काही वाटत नाही. पण संग्रह करण्याच्या दृष्टीने मात्र ते त्रासदायक ठरते. पण काही संवेदनशील लोकही भेटले. आजवर तिघा जणांनी मला अत्यंत दुर्मीळ अशी काही तिकिटे दिली आहेत. मी या सर्व तिकिटांना बोर्डांवर शिवून वरून पारदर्शक प्लास्टिकचे वेष्टन घातले आहे. त्यामुळे आपलेच हात लागून कागद खराब होत नाहीत. तिकिटांवर ऊन-वारा-पाऊस-धूळ यापैकी कशाचा परिणाम होण्याची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे प्रदर्शनात लोकांना जवळून, हात लावून पाहण्याचा आनंद घेता येतो.”

नोकरी आणि अन्य जबाबदार्‍या सांभाळून हा छंद कसा जोपासता? असे विचारले असता ते म्हणाले की, “तारेवरची कसरत होते. कारण शनिवारी, रविवारी सुट्टीच्या दिवशी बाहेर पडतो. पण माझ्या पत्नीचाही यात मोठा सहभाग आहे. या संग्रहाचे व्यवस्थापन करण्यात तिचा मोठा वाटा असतो.” प्रमोद नवरे यांची आजवर बारा प्रदर्शने झाली आहेत. त्यांनी नुकतेच गोरेगावात छंदोत्सवाचेही आयोजन केले होते. तिकिटे म्हणजे छोटे छोटे कागदाचे तुकडे असल्यामुळे हरवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे प्रदर्शनानंतर लगेचच तिकिटांचा हा सगळा संसार व्यवस्थित आवरून ठेवावा लागतो, असे ते सांगतात. मुळातच तिकिटे ही एक संस्कृती आहे.
 
 
गेल्या काही वर्षांत अधिकाधिक ठिकाणी तिकिटांचे स्वरूप बदलले. स्टॅच्यू ऑफ युनिटी, राजभवनासारख्या अनेक ठिकाणी ऑनलाइन बुकिंग सुरू झाले, काही ठिकाणी ई-तिकिटे सुरू झाली. प्रवासात मोबाइल किंवा ई-मेलमुळे तिकिटाची प्रिंटही घ्यायची गरज भासत नाही. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे, बसेस, मेट्रोमध्ये कॉम्प्युटरच्या आदेशाने प्रिंटरवर छापली जाणारी पातळ कागदाची तिकिटे सर्वत्र मिळू लागली. त्यामुळे त्यातील वैविध्य नष्ट झाले. त्यांचे वेगवेगळे नमुने मिळणे बंद झाले. वेळ काढून, रांगेत उभे राहून आरक्षण करणे ही केवळ आठवण उरली. पूर्वीच्या काळी प्रवासाच्या आठवणी जतन करणार्‍या गोष्टींमध्ये फोटो व स्थानिक वस्तूंप्रमाणेच तिकिटेही होती. तिकिटे कमी झाल्याने आठवणी साठवण्याचा एक मार्ग बंद झाला आहे, अशी खंत ते व्यक्त करतात.
 
 
प्रमोद नवरे यांच्याकडील या तिकिटांच्या माध्यमातून कागदी पर्यटन करण्याची संधी तर आपल्याला मिळतेच, त्याच वेळी बदलत गेलेल्या संस्कृतीचेही भान येत जाते. तंत्रज्ञानातील आपली प्रगतीही कळते आणि आठवणी जपण्याचा वारसाही उमगत जातो.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.