अति घाई, संकटात नेई

विवेक मराठी    14-Jun-2023   
Total Views |
 
vivekकुठल्यातरी खाजगी सर्वेक्षणामुळे, शिडात हवा भरलेल्या कार्यकर्त्यांनी मागचापुढचा कोणताही विचार न करता आणि (कदाचित) पक्षश्रेष्ठींना निष्ठेचे दर्शन घडवण्यासाठी केलेेले हे अविचारी कृत्य असावे. कोणत्याही राजकीय नेत्याकडे आणि पक्षाकडे असे अपरिपक्व कार्यकर्ते वा हितचिंतक नसलेलेच बरे!  एखाद्या सर्वेक्षणामुळे आपण किती फुशारून जायचे, याचे तारतम्य सत्तेवर असलेल्या पक्षाने बाळगायला हवे. अशी सर्वेक्षणे अनेकदा दिशाभूल करणारी असतात.  
 
अलीकडे सलग दोन दिवस राज्यातल्या मुख्य मराठी दैनिकांच्या पहिल्या पानावर जे जाहिरात नाट्य रंगले, ते पाहता ‘अति घाई, संकटात नेई’ हाच वाक्प्रचार कोणत्याही सुबुद्ध, सुजाण व्यक्तीला आठवेल.
 
  
‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे.. अफाट प्रेम मिळते आहे जनतेचे’ अशा ओळी असलेली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे नसलेली जाहिरात अनेक दैनिकांच्या पहिल्या पानावर झळकली आणि उलटसुलट चर्चांना उधाण आले. मोठ्या टायपातल्या ज्या ओळींनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले, त्या अतिशय खोडसाळपणे लिहिलेल्या आहेत हे वाचताक्षणी लक्षात येत होते. जाहिरातीत वरच्या भागात शिवसेना असे नमूद केलेले असले, तरी ती पक्षाने दिलेली जाहिरात नव्हती तर एका हितचिंतकाने दिली होती, असे नंतर सांगण्यात आले. अशा जाहिरातींसाठी वर्तमानपत्रांचे असलेले अफाट दर लक्षात घेतले, तर इतका खर्च करणारा शिवसेनेचा जो कोणी हितचिंतक असेल, त्याने पक्षप्रमुखांची भलामण करण्याच्या नावाखाली पक्षाचे अहित करण्याची सुपारी तर घेतली नाही ना, अशी शंका यायला वाव आहे.
 
 
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, ‘देवेंद्र यांचा फोटो जाहिरातीत असेल वा नसेल, पण आम्ही दोघे जनतेच्या मनात आहोत’ असे स्पष्टीकरण माध्यमांसमोर द्यावे लागले आणि दुसर्‍या दिवशी देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रांसहित ‘जनतेचा कौल.. शिवसेना भाजपा युतीलाच’ अशी जाहिरात प्रकाशित करावी लागली. ही नामुश्की ओढवली ती आधीच्या जाहिरातीमुळे.
 
 
कुठल्यातरी खाजगी सर्वेक्षणामुळे, शिडात हवा भरलेल्या कार्यकर्त्यांनी मागचापुढचा कोणताही विचार न करता आणि (कदाचित) पक्षश्रेष्ठींना निष्ठेचे दर्शन घडवण्यासाठी केलेेले हे अविचारी कृत्य असावे. कोणत्याही राजकीय नेत्याकडे आणि पक्षाकडे असे अपरिपक्व कार्यकर्ते वा हितचिंतक नसलेलेच बरे!
 
 
या महिनाअखेरीस भाजपा-शिवसेना युती सरकारला एक वर्ष होत आहे. या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर एका सर्वेक्षणात फडणवीस-शिंदे सरकारची वाटचाल योग्य दिशेने चालली असल्याचे अधोरेखित झाले आहे. या सर्वेक्षणात 46.4 टक्के जनतेने पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना युतीलाच महाराष्ट्रात सत्तेवर आणण्यासाठी कौल दिला आहे. त्यातही भाजपाला 30.2 टक्के, तर शिवसेनेला 16.2 टक्के पसंती आहे. याचा अर्थ लक्षात न घेता, आणि त्यावर जाहिरातीत भर न देता मुख्यमंत्रिपदासाठीची पसंती डोळ्यात भरेल अशा पद्धतीने सांगण्यात आली.. तीही कशी, तर मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचे छायाचित्र प्रकाशित करून. आपल्या सहकार्‍यांना उभे करून, त्यांना बळ देऊन पुढे नेण्याचा पंतप्रधानांचा स्वभाव आहे, याची कल्पना असतानाही देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र वगळून केवळ मुख्यमंत्र्यांसोबतचे पंतप्रधानांचे छायाचित्र प्रकाशित करून शिंदे त्यांच्या जवळचे दाखवण्याचा केलेला प्रयत्न केवळ हास्यास्पदच नाही तर पोरकटही आहे. या खोडसाळपणामुळे त्यांचा पक्षही अडचणीत आला आहे.
 
 
एखाद्या सर्वेक्षणामुळे आपण किती फुशारून जायचे, याचे तारतम्य सत्तेवर असलेल्या पक्षाने बाळगायला हवे. अशी सर्वेक्षणे अनेकदा दिशाभूल करणारी असतात. याआधीचे मुख्यमंत्री आणि त्यांचे खुशमस्करेही त्या वेळी झालेल्या सर्वेक्षणाने आणि त्यातल्या निष्कर्षांनी हवेत गेले होते. त्यातल्या निष्कर्षांनी फुशारलेल्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हुजर्‍यांनी तर त्यांना ‘बेस्ट सी.एम.’ हा किताबही बहाल केला होता. या बेस्ट सी.एम.च्या भोंगळ आणि घरबसल्या केलेल्या कारभाराने महाराष्ट्राला किती वर्षे मागे नेऊन ठेवले, हे इथल्या जनतेने पाहिले आणि त्याचे परिणामही भोगले आहेत. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून पूर्ण पाच वर्षे केलेल्या जनहिताच्या कारभाराचीही नोंद लोकांच्या मनात आहे. प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित जनमनातल्या या नोंदी कोणत्याही सर्वेक्षणापेक्षा महत्त्वाच्या असतात. मात्र याचे भान अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन जाहिराती देणार्‍या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नाही.
 
 
2019च्या निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचा ज्या हीन पद्धतीने मुख्यमंत्रिपदाचा अधिकार डावलला गेला, तेही जनतेने पाहिले आहे आणि त्यानंतरची विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या तडाखेबंद कामगिरीचीही जनता साक्षी आहे. गेल्या वर्षीच्या महानाट्याची जोखीम समर्थपणे आणि यशस्वीपणे आपल्या खांद्यावर घेणारे आणि पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरोधार्य मानून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन राज्यकारभारात मन:पूर्वक सहभागी होणारे फडणवीसही जनता पाहत आहे. गेल्या वर्षभरातल्या त्यांच्या कामगिरीने तर उपमुख्यमंत्रिपदालाही नवी उंची प्राप्त करून दिली आहे.
 
 
हे सगळे समोर असतानाही त्यांचा अवमान होईल अशी जाणीवपूर्वक कृती करून, त्यांच्यावर कुरघोडी करण्याची संधी शोधत असलेल्या विरोधी पक्षांना आयते कोलीत देणे हे असे करणार्‍या पक्षासाठी आत्मघातकीपणाचे तर आहेच, तसेच राज्याचेही नुकसान करणारे आहे.
  
 
भाजपा-शिवसेना युती प्रत्यक्ष कारभारातून जनतेचा विश्वास संपादन करीत असताना अशा अविचारी कार्यकर्त्यांच्या कारवायांना लगाम घालणे आवश्यक आहे. त्यांची कृत्ये युतीला आणि त्यापेक्षाही त्यांच्याच पक्षाला संकटात नेऊ शकतात, याची त्यांना स्पष्ट जाणीव आणि कडक शब्दांत समज द्यायला हवी. शिवसेनेच्या नेतृत्वाने हे तातडीने करायला हवे.
 
अशाने बाळासाहेबांनी कमावलेली विश्वासार्हताही पणाला लागते, याचे भान ठेवावे.