शतायुषी कार्याचा उचित सन्मान

विवेक मराठी    22-Jun-2023   
Total Views |
 
 
vivek
श्रीमद्भगवद्गीतेसह भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञानाशी संबंधित साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी वाहून घेतलेल्या गोरखपूर येथील गीता प्रेस या शतायुषी प्रकाशन संस्थेला भारत सरकारचा 2021 सालचा गांधी शांती पुरस्कार जाहीर झाला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे चालू वर्ष हे या संस्थेचे शताब्दी वर्ष आहे. गेली शंभर वर्षे कोट्यवधी भारतीयांची धार्मिक व आध्यात्मिक जोपासना करण्याचे आणि आपल्या सनातन धर्माचा प्रवाह या माध्यमातून अखंडित प्रवाहित ठेवण्याचे महान कार्य या संस्थेने केले आहे. अशा कामाला जाहीर झालेला पुरस्कार म्हणजे केंद्र सरकारने दिलेली मानवंदना आहे. या संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
 
 
कोलकाता येथील जयदयालजी गोएंका आणि मारवाडी समाजातील त्यांचे समविचारी सहकारी यांनी या प्रेसच्या माध्यमातून सनातन धर्माच्या प्रसाराची पताका 1923 साली आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी हे काम हाती घेतले, तेव्हा ख्रिस्ती धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर चालू होते. त्याला आळा घालण्यासाठी आणि आपल्या धर्मातील तत्त्वज्ञानाची माहिती व महती सर्वसामान्य भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला. भारतीय संस्कृती अक्षुण्ण ठेवायची असेल, तर आपल्या संस्कृतीचे संचित असलेले हे विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचायला हवे, तरच ते त्याचे जतन, वहन करतील अशी संस्थापकांची यामागची भूमिका होती. या संस्थेच्या उभारणीचा कालखंड हा स्वातंत्र्यपूर्व काळातला मोठ्या धामधुमीचा. अशा कालखंडात हिंदू धर्माची पताका उघडपणे खांद्यावर घेत काम करणे हे किती धाडसाचे व जोखमीचे असेल, याची कल्पना केली की कामाची महत्ता लक्षात येते. सरणार्‍या काळाबरोबर कामाची जबाबदारी घेणार्‍यांच्या पिढ्या बदलल्या, तरी मूळ संस्थापकांनी घालून दिलेल्या वाटेवर आजही संस्थेची वाटचाल चालू आहे, हे त्यांचे वैशिष्ट्य.
 
आज गीता प्रेस ही प्रकाशन संस्था जगातल्या सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक समजली जाते. नेपाळी भाषेसह 14 भारतीय भाषांमध्ये आतापर्यंत 41 कोटीहून अधिक पुस्तके गीता प्रेसने प्रकाशित केली आहेत.
 आज गीता प्रेस ही प्रकाशन संस्था जगातल्या सर्वात मोठ्या प्रकाशकांपैकी एक समजली जाते. नेपाळी भाषेसह 14 भारतीय भाषांमध्ये आतापर्यंत 41 कोटीहून अधिक पुस्तके गीता प्रेसने प्रकाशित केली आहेत. यामध्ये विविध भारतीय भाषांमधील भगवद्गीतेच्या 41 कोटीहून अधिक प्रतींचा समावेश आहे. निर्मितीच्या दर्जाशी तडजोड न करता सर्वसामान्य भारतीयाला अतिशय नाममात्र मूल्यात भगवद्गीतेसह महत्त्वाचे अन्य धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून देण्याचा वसा या प्रकाशन संस्थेने स्थापनेपासून घेतला आहे. भारतीय आध्यात्मिक विचारांचा प्रसार व प्रचार हे त्यांचे उद्दिष्ट (आणि बलस्थान) काळाच्या ओघातही टिकून राहिले आहे. जास्तीत जास्त घरांमध्ये ही पुस्तके जावीत यासाठी पुस्तकांच्या किमती नाममात्र ठेवण्याचा नियम आजही काटेकोरपणे पाळला जातो. असे असूनही ही प्रकाशन संस्था अगदी सुरुवातीपासूनच उत्पन्नासाठी जाहिरातीवर अवलंबून राहिलेली नाही, हेही तिचे उल्लेखनीय वैशिष्ट्य.
 
 
गांधी शांती पुरस्कारासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठित केली होती. या समितीने गीता प्रेसची निवड केली. यासाठी प्रकाशनासह त्यांच्या अन्य कामाचाही नक्कीच विचार केला गेला असणार. या संस्थेने भारतीय तत्त्वज्ञानाचा मूलाधार असलेली गीता कोट्यवधी भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले आणि भगवद्गीता महात्मा गांधींसाठी सर्वात मोठा मानसिक आधार होती, तेव्हा त्यांच्या नावाचा पुरस्कार या संस्थेला मिळणे हा समसमा संयोग आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर चालणार्‍या या कामाची आणि त्यामागच्या उद्दिष्टाची महात्मा गांधींना माहिती होती आणि या कामाला त्यांचे आशीर्वादही होते.
 
जन्मभर एखाद्या कठोर व्रताचे आचरण मनोभावे करावे, अशा पद्धतीने गीता प्रेसच्या संस्थापकांनी कारभार चालवला. नंतरच्या पिढीनेही त्याच वारशाचे जतन केले. गेल्या 100 वर्षांत प्रकाशन संस्थेच्या मूळ कामाला विविध कामांची जोड देण्यात आली. गीता भवन हे आध्यात्मिक साधनेसाठी उभारण्यात आलेले बाराशे खोल्यांचे सत्संग भवन, गीता सेवा दल, आयुर्वेद संस्थान, वेदिक विद्यालय हे गीता प्रेसचे अन्य आयाम आहेत.
 
 देशावर पूर, दुष्काळ यासारखे नैसर्गिक संकट ओढवले, तेव्हा गीता प्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणताही गाजावाजा न करता आपत्तिनिवारणाच्या कामात आपले योगदान दिले.
 जेव्हा जेव्हा देशावर पूर, दुष्काळ यासारखे नैसर्गिक संकट ओढवले, तेव्हा गीता प्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोणताही गाजावाजा न करता आपत्तिनिवारणाच्या कामात आपले योगदान दिले. कोविडच्या काळात गीता भवनाच्या बाराशे खोल्यांमध्ये जवळपासच्या वृद्धांची व्यवस्था करण्यात आली आणि वैद्यकीय उपचारांबरोबरच त्यांची योग्य ती देखभालही करण्यात आली.
 
 
अशी संस्था गांधी शांती पुरस्काराने गौरवण्यात येते, हे काँग्रेसीजनांना खुपते आहे. ‘गीता प्रेसला पुरस्कार देणे म्हणजे सावरकर, गोडसे यांना पुरस्कार देणे’ अशी टीका करून त्यांनी त्यांच्या खालावलेल्या वैचारिक पातळीचे दर्शन घडवले आहे. हिंदुद्वेष ही काँग्रेसची पूर्वापार परंपरा आहे. राममंदिराला विरोध करणे, रामसेतूचे अस्तित्व अमान्य करणे, देशातल्या हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळणे ही काँग्रेसची रीत आहे. त्याच वेळी मुस्लीम लीगला सेक्युलर म्हणणे, पीएफआयसारख्या दहशतवादी संघटनेला पाठीशी घालणे हेही काँग्रेस उघडपणे करत आली आहे. या पुरस्कारानंतर केलेली टीकाही त्यांची नियत स्पष्ट करणारी.
 
 
या पार्श्वभूमीवर, गीता प्रेसने या जाहीर झालेल्या पुरस्कारासंदर्भात घेतलेला निर्णय त्यांचे मोठेपण अधोरेखित करणारा. मुळात कोणताही पुरस्कार स्वीकारायचा नाही हे या संस्थेचे धोरण आहे. मात्र, महात्मा गांधींच्या नावे देण्यात येणारा शांती पुरस्कार ते अपवाद म्हणून स्वीकारणार आहेत, तोही त्या पुरस्काराचा भाग असलेली रक्कम न स्वीकारता. फक्त स्मृतिचिन्ह आणि अन्य वस्तू स्वीकारू असे या संस्थेने जाहीर केले आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने समोर आलेले संस्थेचे वेगळेपण त्यांच्याविषयीचा आदरभाव वाढवणारे आणि पुरस्कारासाठी त्यांची झालेली निवड किती योग्य आहे हेच अधोरेखित करणारे.
 
 
अशा संस्था म्हणजे आपल्या संस्कृतीची मानचिन्हे असतात. अशांचा उचित सन्मान करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ते सरकारने केले, याचा आनंद आहे.