बालिश बहु, विदेशात बडबडला

विवेक मराठी    08-Jun-2023   
Total Views |
सहा दिवसांच्या या दौर्‍यात ‘भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे’, ‘भारतात मुस्लीम समाजाला आणि अल्पसंख्याक समाजाला नीट वागवले जात नाही’, ‘मुस्लीम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’, ‘भारताची विविधता, एकात्मता धोक्यात आली असून त्याला भाजपा व आरएसएसचे लोक जबाबदार आहेत’ अशी विधाने केली. आपल्याला वर्तमानाचेही नीट आकलन नाही आणि इतिहासाचेही भान नाही याची अनेक उदाहरणे पुरवत राहुल गांधींनी स्वत:चे जागतिक स्तरावर हसे करून घेतले.
congress
  
अमेरिकेतील महत्त्वाच्या तीन शहरांना भेटी देऊन काँग्रेसचे नेते व माजी खासदार राहुल गांधी मायदेशी परतले. अपेक्षेप्रमाणे तेथील जाहीर कार्यक्रमांत व सभांमध्ये भाजपा, मोदी आणि रा.स्व. संघ यांच्यावर दुगाण्या झाडत त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधून घेतले. या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या इंग्लंड दौर्‍यातही त्यांनी सरकारवर टीका करून आपले हसे करून घेतले होते.
 
 
राहुल गांधी यांच्या अमेरिका दौर्‍याआधी काहीच दिवस ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ‘मोदी इज द बॉस’ या शब्दात देशाच्या पंतप्रधानांची स्तुती केली होती. वरवर पाहता तसे वाटले, तरी ती केवळ एका व्यक्तीची प्रशंसा नव्हती, तर जागतिक राजकारणात भारताचे वाढत असलेले महत्त्व आणि उजळत चाललेली प्रतिमा याचे ते उद्गार निदर्शक होते. मात्र इतकी वर्षे सत्तेच्या राजकारणात वावरूनही, अशा उद्गारांमागचे अर्थ समजण्याइतकी राहुल गांधी यांची बौद्धिक कुवत नाही, हेच पुन्हापुन्हा अधोरेखित होते आहे.
 
 
‘द्वेषाच्या बाजारात मी प्रेमाचे दुकान उघडले आहे’ अशी स्वत:च्या भारत जोडो यात्रेची आणि विदेश दौर्‍याची भलामण करणार्‍या राहुल यांना जर कोणी यावर विचारले की, ‘म्हणजे तुम्ही नेमके काय केले आहे वा काय करण्याचे ठरवले आहे?’ तर यावर त्यांच्याकडे तर्कसुसंगत असे उत्तर नसेल. पन्नाशी ओलांडलेल्या आणि घरातून राजकारणाचा वारसा लाभलेल्या या सर्वार्थाने अप्रगल्भ व्यक्तीला काँग्रेसला आपला नेता मानावे लागते, याहून मोठे दुर्दैव ते कोणते?
 
 
सहा दिवसांच्या या दौर्‍यात ‘भारतातील लोकशाही धोक्यात आली आहे’, ‘भारतात मुस्लीम समाजाला आणि अल्पसंख्याक समाजाला नीट वागवले जात नाही’, ‘मुस्लीम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’, ‘भारताची विविधता, एकात्मता धोक्यात आली असून त्याला भाजपा व आरएसएसचे लोक जबाबदार आहेत’, ‘आमचे पंतप्रधान देवालाही शिकवू शकतात’ अशी विधाने केली. आपल्याला वर्तमानाचेही नीट आकलन नाही आणि इतिहासाचेही भान नाही याची अनेक उदाहरणे पुरवत राहुल गांधींनी स्वत:चे जागतिक स्तरावर हसे करून घेतले.
 
 
त्यांच्या भारत जोडो यात्रेत सरकारकडून कोणत्याही प्रकारे अडथळा उत्पन्न केला जात नव्हता. उलट त्यांना सुरक्षाव्यावस्था पुरवण्यात आली होती. मात्र त्या संदर्भातील एका प्रश्नाचे उत्तर देताना “माझ्या यात्रेत पोलिसी बळाचा वापर केला गेला” असाही त्यांनी आरोप केला.
 
 
मुस्लीम लीग हा पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचा जावईशोधही राहुल यांनी या अमेरिकेच्या दौर्‍यात लावला. खुद्द त्या पक्षानेही असा कधी दावा केलेला नसताना त्यांना हे प्रशस्तिपत्र बहाल करण्याची ही धडपड हास्यास्पद आणि कीव करण्याजोगीही आहे. मुस्लिमांच्या लांगूलचालनाचे हे नवे उदहारण ठरावे.
 
 
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत झाली होती, असे म्हणत महात्मा गांधींना श्रेय देण्याच्या नादात आपण इतिहासाच्या संदर्भात केवढी मोठी अक्षम्य चूक करत आहोत, हे त्यांच्या गावीही नसावे.
 
 
एखाद्या राष्ट्रीय पक्षात महत्त्वाचे पद भूषवणारी व्यक्ती जेव्हा परदेशात जाते, तेव्हा ती पक्षाबरोबरच आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असते. त्यामुळे देशाच्या लौकिकाला बाधा येईल वा कमीपणा येईल अशी बेजबाबदार विधाने न करणे हे अशा व्यक्तींकडून अपेक्षित असते. आतापर्यंतचा इतिहासही असे सांगतो. परदेश दौर्‍यात आपण एका पक्षाचे नाही तर देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत, याचे भान इंदिरा गांधी यांच्यासह अनेकांनी राखले आहे. मात्र राहुल गांधी याला अपवाद आहेत. शिवाय त्यांच्या पाठिराख्यांनाही त्यात काही वावगे वाटत नाही, हे दुर्दैव. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी सरकारवर टीका म्हणजे देशावर टीका नाही, असे म्हणत राहुल यांच्या विधानांची पाठराखण केली आहे. नेत्याची समज बेताची आणि भोवती फाजील शहाण्यांची फौज असा योग राहुल यांच्या बाबतीत जुळून आल्याचा हा परिणाम आहे.
 
 
 
भाजपाने वा सरकारने राहुल गांधी यांच्या टीकेला उत्तर देण्याआधी, त्यांच्या टीकेमधली हवा निघून जाईल अशा दोन घटना ते अमेरिकेत असतानाच घडल्या. पहिली म्हणजे, मॉर्गन स्टॅन्ली या अमेरिकेतील जगविख्यात अर्थसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ‘गेल्या 9 वर्षांत भारतात ज्या काही आर्थिक सुधारणा झाल्या आहेत, त्या आर्थिक सुधारणांमुळे भारताने एक नवी झेप घेतली आहे. हे जे बदल झाले आहेत, ते वरवरचे वा तात्पुरते नाहीत’ असे म्हटले आहे आणि याचे श्रेय त्यांनी विद्यमान मोदी सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांमध्ये आणि त्यासाठी राबवायच्या आर्थिक योजनांमध्ये केलेले बदल याला दिले आहे. त्याच वेळी भारताचा विकासदर 7.2वर पोहोचल्याची बातमीही आली आहे. अशा सगळ्या सकारात्मक घटना घडत असतानाही आपल्या देशाची जाणीवपूर्वक निंदानालस्ती करणे हे कोणत्याही राष्ट्रीय नेत्याला शोभा देणारे नाही. पण हा अहवाल, त्यातील विश्लेषण यांची गंधवार्ताही राहुल यांना नसावी वा ते समजून घेण्याची मानसिकता नसावी.
 
 
दुसरी घटना म्हणजे, भारतात अतिशय सुदृढ लोकशाही असल्याचे प्रतिपादन ज्यो बायडन प्रशासनाने केले असून राहुल गांधी यांच्या आरोपातील हवाच काढून घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जून ते 23 जून दरम्यान अमेरिका भेटीवर जात आहेत. 22 जून रोजी त्यांच्या सन्मानार्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी शाही भोजन योजले आहे. त्याआधी अमेरिकेत जाऊन आपण विद्यमान सरकारची निंदानालस्ती केली तर अमेरिकी सरकार आपल्याला/आपल्या बोलण्याला गांभीर्याने घेईल, तसेच तिथले अनिवासी भारतीय आपल्या बिनबुडाच्या आरोपांवर विश्वास ठेवतील असा राहुल गांधी यांचा भाबडा समज असावा. पण तसे काही होणार नाही, याचा दाखला ते अमेरिकेत असतानाच मिळाला आहे.
 
 
 
नऊ वर्षे सत्तेपासून दूर राहिल्याने आता या पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना सत्ता मिळवण्याची झालेली घाई समजू शकते. पण अति घाई आणि त्यातून आलेले अविचारीपण फक्त विनाशाच्या वाटेवर नेऊ शकते. काँग्रेसचे नेते आणि नेत्यांचे मार्गदर्शक दोघेही तेच करत आहेत.