मिनिएचर विश्वात रमलेली अबोली

छंदांच्या गावा जावे

विवेक मराठी    18-Jul-2023   
Total Views |
अनेकांना आपल्या हाताने विविध वस्तू घडवण्याचा छंद असतो. त्यात त्या व्यक्तीला आत्मिक समाधानही मिळत असतं आणि आनंदही. अंबरनाथच्या अबोली गोगटे यांना हे समाधान मिळतं ते त्यांनी केलेल्या मिनिएचर वस्तूंच्या माध्यमातून. हार्मोनिअम, बार्बी वॉर्डरोब, अग्निशमन दलाची गाडी, रॉकेट, कोकणातील पारंपरिक घर अशा अनेकांच्या लघुप्रतिकृती म्हणजे मिनिएचर्स त्यांनी घरातील टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या आहेत. त्या प्रतिकृती इतक्या तंतोतंत दिसतात की आपण कागदी मिनिएचर पाहतो आहोत की मूळ वस्तू याचा संभ्रम निर्माण होतो.
 

vivek
 
काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया स्क्रोल करताना हार्मोनिअमच्या - म्हणजेच पेटीच्या वेगवेगळ्या कोनातून काढलेल्या फोटोंवर माझी बोटं थबकली. इतकी सुंदर कलात्मक फोटोग्राफी पाहून मी थक्क झाले. पण ते फोटो मूळ पेटीचे नसून तिच्या काही इंचाच्या आकारातील प्रतिकृतींचे आहेत, हा पुढचा धक्का माझ्यासाठी जास्त मोठा होता. अंबरनाथ येथे राहणार्‍या अबोली गोगटे यांनी हे मिनिएचर मॉडेल तयार केलं होतं. केवळ पेटीच नाही, तर बाइक, घर, रॉकेट अशी विविध मिनिएचर्स त्यांनी तयार केली आहेत. आरती गोगटे हे त्यांचं मूळ नाव असलं, तरी त्यांना ओळख मिळवून दिली ती अबोली या नावाने. अबोली यांनी आजवर अशी अनेक मिनिएचर्स तयार केली असून त्याचं कौतुकही झालं आहे.
 

रसमयी लता

विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक…
साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…

पुस्तकाच्या मॅटर सहित लतादीदींचे सुंदर पोट्रेट, लतादीदींच्या विविध भावमुद्रांची रंगीत चित्रं आणि हार्डबाऊंडिंग कव्हर ही या पुस्तकाची खास वैशिष्टये…
पुस्तकाची किंमत – रु. २00/-

https://www.vivekprakashan.in/books/a-book-on-songs-sung-by-latadidis/

  
  
कलाकुसर किंवा वस्तूंची जडणघडण याची बालपणापासून आवड होती का? असं विचारल्यावर अबोली म्हणाल्या की, ‘’मला बालपणापासून चित्रकलेची आवड होती. पण मी त्याकडे करिअरच्या दृष्टीने फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. बी.ए. इकॉनॉमिक्स झाल्यावर पुढे माझी केटरिंगकडे वळण्याची इच्छा होती. पण एसएनडीटीमध्ये त्या कोर्सची चौकशी केली, तेव्हा तिथे प्रशिक्षणादरम्यान नॉनव्हेजही करावं लागेल असं सांगितलं, आणि ते मला शक्य नव्हतं. त्याच वेळी तिथे ग्रंथपालाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियादेखील सुरू होत्या. बाबांनी मला तो कोर्स करण्याबद्दल सुचवलं. पुढे काही ठिकाणी ग्रंथपाल म्हणून नोकरीही केली. एका आर्किटेक्चर महाविद्यालयात ग्रंथालयात कार्यरत असताना त्यांच्या प्रारूपांचे नमुने, त्यातील बारकावे माझ्या सतत पाहण्यात येत असत. आमच्या घरात सगळ्यांनाच विविध कलांकडे, नाटक-सिनेमाकडे चिकित्सकपणे पाहण्याची सवय होती. त्यामुळे तेदेखील झिरपत गेलं असावं. खूप पूर्वीपासून मी संस्कार भारतीच्या रांगोळ्या काढायचे. त्याने मला ओळख मिळवून दिली व माझे कलागुणही विकसित झाले. पुढे मिनिएचर तयार करताना मला या सार्‍याचा उपयोग होत गेला.”
 
 
aboli
 
मुलाच्या संगोपनासाठी अबोली यांनी नोकरीतून ब्रेक घेतला व त्यातच रमल्या. त्यांनी आईला संक्रांतीचे दागिने करताना अनेकदा पाहिलं होतं. एक प्रयोग म्हणून 2014 साली पहिल्यांदा भावाच्या बायकोसाठी संक्रांतीचे हलव्याचे दागिने केले आणि त्याला खूप छान प्रतिक्रिया आल्या. त्याच्या ऑर्डर्सही येऊ लागल्या. पारंपरिक दागिन्यांच्या पलीकडे जाऊन हलव्यापासून त्यांनी विविध वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. काळ्या तिळाच्या तीळगुळाच्या मिश्रणाला आकार देऊन तिळाची भातुकली (पाटा-वरवंटा, चूल, खलबत्ता, जातं, पोळपाट-लाटणं), तिळाचे खेळ (भोवरा, कॅरम, स्कूटर, बॅटबॉल, विटीदांडू) अशी काही मिनिएचर्स तयार झाली. या वस्तू फक्त शोभेच्या नव्हत्या, तर खाता येण्यासारख्या होत्या. यातलेच काही फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आणि अत्यंत अभिनव प्रकार म्हणून त्याचं कौतुकही झालं. यातूनच पुढे कागदी मिनिएचर करायलाही सुरुवात झाली आणि ते जास्त आवडायला लागलं.
 

aboli 
 
मिनिएचर तयार करणं म्हणजे वेळखाऊ प्रकार, चिकाटी आणि कलात्मकता यांनाही त्यात विशेष महत्त्व. कलेचा अन्य कोणताही प्रकार निवडण्याऐवजी हाच फॉर्म का निवडला? असं विचारल्यावर त्यांनी सांगितलं, “मुलाच्या शाळेतल्या प्रोजेक्टसाठी मिनिएचर करायला सुरुवात केली आणि त्याची गंमतच वाटू लागली. मुलाची शाळा, घरातली बाकीची व्यवधानं सांभाळून उरलेल्या वेळात मी ही मिनिएचर्स करायला लागले. घरात आलेल्या बॉक्सेसचा किंवा अन्य काही टाकाऊ वस्तूंचा यासाठी वापर करायला सुरुवात केली. यासाठी लागणारे गोंद, अ‍ॅक्रिलिक कलर्स किंवा वॉटर कलर्स फक्त विकत आणले. बाकी घरातील वस्तूच यासाठी वापरते.
 
 
vivek
 
आज हार्मोनिअम, महालक्ष्मी, बार्बी डॉल वॉर्डरोब, डायपर बाबा गाडी, भगवान शंकर, वटवृक्षाखाली बसलेले श्री स्वामी समर्थ, बैठी चाळ, आयएनएस विक्रांत, मातीचं पारंपरिक घर, रॉयल एन्फिल्ड हिमालयन बाइक, अग्निशमन दलाची गाडी, रॉकेट, कोकणातील पारंपरिक घर, मिनिएचर पेंटिंग, देवगड हापूसची पेटी, साड्यांवरील आर्टवर्कची प्रतिकृती अशी विविध मिनिएचर्स त्यांनी केली आहेत. घरात उपलब्ध पुठ्ठा, कागद, कार्डपेपर, पॅकिंगचे विविध बॉक्सेस, दोरे, शोभेच्या वस्तू याचा वापर करून त्या ही मिनिएचर्स तयार करतात. नुकतीच केलेली हार्मोनियमही त्यांनी मोबाइलच्या बॉक्सपासून तयार केली आहे. पर्यावरणीय दृष्टीकोनातून पाहिलं तर त्यांचा हा छंद म्हणजे टाकाऊतून कलात्मक टिकाऊ तयार करणारा एक प्रकल्पच आहे. एक मिनिएचर तयार करायला त्यांना जास्तीत जास्त तीन ते चार दिवस लागतात.
 

aboli 
 
कागदी वस्तूंपासून तयार केलेले मिनिएचर्स सांभाळणं हे आव्हानात्मक वाटतं का? असं विचारल्यावर त्या म्हणाल्या, “आपल्याकडे धुळीचा त्रास खूप आहे. त्यातून कागद किंवा पुठ्ठा हा प्रकार म्हणजे धूळ जमवणारा प्रकार. एखादी सपाट वस्तू जतन करणं आणि त्रिमितीय वस्तू सांभाळणं यात अंतर आहे. जागेचाही प्रश्न असतो. त्यामुळे मी काही मिनिएचर स्वत:कडे ठेवले, तर काही भेट दिले. अनेक मिनिएचर्सचे फोटो काढून ठेवलेत. आपलं मिनिएचर वास्तववादी असावं असं मला कायम वाटतं. त्यामुळे मूळ वस्तूतले सगळे बारकावे टिपून त्याला प्रतिरूप देण्याचा प्रयत्न करते. यात मला रहेजा आर्किटेक्चर महाविद्यालयात केलेल्या नोकरीचा फायदा झाला. तिथे मुलांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी अशी लघुरूपातील प्रतिकृती तयार करायच्या असतात. त्यातील अचूकता मी पाहत होते. कागदी काम म्हणजे पसाराही खूप होतो, पण त्या कष्टातून जेव्हा मिनिएचर तयार होतं, त्याचा आनंद वेगळाच असतो. विशेष म्हणजे माझ्या या छंदाला मुलासह घरातल्या मंडळींचाही पाठिंबा होता.”
 

aboli 
 
अबोली यांनी अधोरेखित केलेला मुद्दा सुजाण पालकत्वाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. या अशा कलाकृतींमध्ये किंवा छंदांत मुलांना मदतीला घेणं गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याबरोबरच मुलंही एकाग्रतेने काम करतात. त्यांना वस्तू डीटेलमध्ये पाहायची सवय होते. त्यांनाही अशा उपक्रमांची आवड निर्माण होते. त्यांचाही वेळ चांगला जातो, पालकांबरोबर एखादं काम करण्यात त्यांना सहवासाचा आनंद मिळतो. त्या स्वत: आपल्या मुलाला पेपर कटिंग किंवा चिकटकाम या मदतीसाठी आवर्जून घेतात. याच वेळेस स्त्री म्हणून मनोभूमिका सांभाळण्यातही याचा उपयोग होतो, असं त्यांना वाटतं. आपण एखाद्या छंदात व्यग्र असण्यामुळे मानसिक आंदोलनं, नैराश्य, कोशात जाणं, मनस्ताप, शिणवटा यावरही मात करता येते, असं त्या आवर्जून नमूद करतात.
 

aboli 
 
 
कोणत्या मिनिएचर्सना सर्वाधिक प्रतिक्रिया आल्या? असं विचारल्यावर त्या सांगतात की, “बाइक आणि नुकतीच केलेली हार्मोनिअम याला खूप छान प्रतिसाद होता. ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांचाही आणि ज्यांनी सोशल मीडियावर पाहिलं त्यांचाही.” अबोली या नावाने सोशल मीडियावर परिचित असणार्‍या आरती गोगटे यांच्या कलाकृतींना तिथेही लोकाश्रय मिळाला. मिनिएचर घडवण्याचा त्यांचा हा छंद असाच बहरत राहो, त्यातून त्यांच्यातील कलाकाराला असाच आनंद मिळत राहो, या शुभेच्छा.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.