युरोपची वाटचाल गृहयुद्धाकडे?

विवेक मराठी    20-Jul-2023   
Total Views |
फ्रान्समध्ये अल्जीरियन मुस्लीम वंशाचा एक मुलगा पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडला व त्यातून हिंसाचार भडकला, तर तिकडे स्वीडनमध्ये एका इराकी ख्रिश्चन नागरिकाने जाहीररित्या कुराणाची प्रत जाळली आणि त्यातून भडका उडाला. हळूहळू बेल्जियम, ब्रिटन, स्वित्झर्लंड वगैरे आसपासच्या देशांतही हा भडका पोहोचला आणि तिथेही हिंसक घटना घडल्या.  या घटनांतून युरोपातील वांशिक संघर्ष, स्थलांतरितांचा आणि निर्वासितांचा प्रश्न, धार्मिक संघर्ष आज पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्य म्हणजे, या सार्‍या घुसळणीत पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला विषय म्हणजे यातील युरोप विरुद्ध इस्लाम अशी होऊ घातलेली विभागणी, जी युरोपच्या भवितव्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न बनत चालला आहे.

Burning of Quran
 
ज्या युरोपने एकेकाळी जगावर राज्य केले, राजकीय व आर्थिक साम्राज्यवाद उभा केला, दोन-दोन संहारक जागतिक महायुद्धे घडवली, जगाच्या कानाकोपर्‍यात आपल्या वसाहती उभ्या केल्या, तोच युरोप आज अंतर्बाह्य धुमसताना दिसतो, तितकाच तो आपल्या भविष्याकरिता चाचपडतानाही दिसतो. याला कारणीभूत ठरल्या आहेत त्या गेल्या काही दिवसांतील विविध घटना. फ्रान्समध्ये अल्जीरियन मुस्लीम वंशाचा एक मुलगा पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडला व त्यातून हिंसाचार भडकला, तर तिकडे स्वीडनमध्ये एका इराकी ख्रिश्चन नागरिकाने जाहीररित्या कुराणाची प्रत जाळली आणि त्यातून भडका उडाला. हळूहळू बेल्जियम, ब्रिटन, स्वित्झर्लंड वगैरे आसपासच्या देशांतही हा भडका पोहोचला आणि तिथेही हिंसक घटना घडल्या. फ्रान्स, स्वीडन, ब्रिटन आणि इतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात घडलेल्या या घटना व त्यातून उद्भवलेला हिंसाचार, जाळपोळ, अशांतता ही सारी यामागील तात्कालिक कारणे. परंतु, या घटनांतून युरोपातील वांशिक संघर्ष, स्थलांतरितांचा आणि निर्वासितांचा प्रश्न, धार्मिक संघर्ष आज पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेत आहे. मुख्य म्हणजे, या सार्‍या घुसळणीत पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला विषय म्हणजे यातील युरोप विरुद्ध इस्लाम अशी होऊ घातलेली विभागणी, जी युरोपच्या भवितव्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न बनत चालला आहे.
 
 
इस्लाम विरुद्ध युरोप हा संघर्ष आजचा नाही, तर त्याला कित्येक शतकांचा रक्तरंजित इतिहास आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये अनेक पिढ्यांपासून राहत असलेल्या मुस्लीम समुदायाची संख्याही मोठी आहे. स्पेन, पोर्तुगाल, इटली, ग्रीस आदी पश्चिम-दक्षिण युरोपातील देशांत ही संख्या लक्षणीय आहे. तथापि, मागील 25-30 वर्षांत आणि त्यातही विशेषत: अरब देशांतील इस्लामी कट्टरतावाद्यांच्या अराजकानंतर युरोपात निर्वासित म्हणून दाखल झालेल्या मुस्लीम समुदायामुळे हा प्रश्न अधिक चिघळला आहे. युरोपात प्रत्येक देशात असलेल्या तथाकथित पुरोगामी - उदारमतवादी गँगचा प्रचंड दबाव व त्यातून आखलेली निर्वासितविषयक धोरणे यामुळे आज युरोपातील जवळपास प्रत्येक देशात निर्वासित मुस्लिमांची लोकसंख्या वाढताना दिसते. चिंतेची बाब म्हणजे हे केवळ मुस्लीम देशांना लागून असलेल्या युरोपीय देशांतच घडत नसून तेथून प्रचंड दूर असलेल्या, तुलनेने सुरक्षित समजल्या जाणार्‍या उत्तर युरोपात - स्कँडिनेव्हियन देशांतही घडत आहे. युरोपातील महानगरांतूनच नव्हे, तर छोट्या शहरांतूनही लोकसंख्येचे धार्मिक गुणोत्तर लक्षणीयरित्या बदलते आहे. ख्रिश्चन व मुसलमान हे दोन्ही अब्राहमिक समुदाय आहेत, ज्यांची संस्कृती बंदिस्त आहे, हिंदूंप्रमाणे सहिष्णू, विविध प्रवाह सामावून घेण्याची शक्ती असलेली नाही. त्यामुळे अशा दोन बंदिस्त संस्कृती, विचारधारा जेव्हा अचानक एकमेकांच्या शेजारी नांदू लागतात, तेव्हा त्यातून उद्भवणार्‍या संघर्षांची चव आज युरोपला चाखावी लागत आहे.
 
 
या विषयाचे विश्लेषण करताना अनेक पाश्चात्त्य अभ्यासकांनी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आलेले स्थलांतरित आणि आश्रयासाठी आलेले निर्वासित यामध्ये गल्लत केलेली आढळते. आपापल्या वांशिक-भाषिक-जातीय समूहात एकत्र राहणे हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे व तो सर्वत्र आढळतो. जगभरात आज भारतीय समुदायाचे नागरिक त्या त्या देशांत गुण्यागोविंदाने राहत आहेत, त्यांनी आपापल्या नोकरी-व्यवसायात स्वकर्तृत्वाने स्थानही मिळवले आहे, हिंदू संस्कृती-परंपराही ते तेथे अभिमानाने जोपासत आहेत. परंतु यावर त्या देशांतील नागरिकांनी आक्षेप घेतल्याचे उदाहरण अभावानेच आढळेल. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अमेरिकेपासून ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, जपान, आफ्रिकेसारख्या असंख्य ठिकाणी हजारोंच्या संख्येने अनिवासी भारतीयांचे मेळावे झाले, तिथे ’भारतमाता की जय’सारख्या घोषणा दिल्या गेल्या आणि या कार्यक्रमांत त्या देशांच्या राष्ट्रपती-पंतप्रधानांनी उपस्थित राहून भारतीय समुदायाची जाहीर प्रशंसा केल्याचे आपण अनेकदा पाहिले. हेच तेथील मुस्लीम निर्वासितांच्या बाबतीत घडले नाही, कारण हा सर्व समुदाय ज्या धार्मिक कट्टरतावादी पार्श्वभूमीतून तेथे आला, त्यांचे युरोपीय स्थानिकांशी सांस्कृतिक आदानप्रदान होणे अशक्य बाब बनली. त्यामुळे मागील काही वर्षांत हा समुदाय हिंसक घटना, रस्ते व जागा बळकावणे, महिलांना त्रास देणे, अन्य गुन्हेगारी कारवाया यांकरिता अधिक चर्चेत येऊ लागला.
 
 
ही सद्य:स्थिती लक्षात घेता या धुमसत्या युरोपची भविष्यातील वाटचाल गृहयुद्धाकडे होण्याची भीती आज जगभरातून व्यक्त होते आहे आणि यातून एक मोठी राजकीय, सामाजिक-सांस्कृतिक घुसळणही घडण्याची शक्यता आहे. या निमित्ताने ’बाहेरून आलेले लोक’ असे सरसकटीकरण करून विचार करण्याच्या पाश्चात्त्य पद्धतीमुळे स्वदेशासह परदेशांतही हिंदू म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व - ओळख जपण्याची व त्याला साजेसे वर्तन ठेवण्याची गरजही अधोरेखित झाली आहे. तसेच, भारतीय संदर्भात विचार करत असताना अराजकवादी डाव्या व तथाकथित पुरोगाम्यांच्या नादाला लागून धोरणे आखण्याचे दुष्परिणाम किती गंभीर असू शकतात, याचाही धडा आपल्याला पुन्हा एकदा मिळतो आहे.