एचडी फायर प्रोटेक्ट खारीचा... तरीही मोलाचा वाटा

विवेक मराठी    22-Jul-2023   
Total Views |
भारताच्या चंद्रयान -3 मोहिमेने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी भारतभरातील शास्त्रज्ञांचा-तंत्रज्ञांचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील काही कंपन्या आणि संशोधक/तंत्रज्ञ यांचाही या मोहिमेत खारीचा वाटा आहे. त्यातील दोघांशी संवाद साधून मोहिमेचा तपशिलात घेतलेला वेध.
 
महाराष्ट्रातील एचडी फायर प्रोटेक्ट कंपनीचाही यात महत्त्वपूर्ण सहभाग होता. या एकूणच योगदानाबद्दल या कंपनीचे संचालक मिहीर घोटीकर यांच्याशी झालेली बातचीत.
 
chandrayaan 3 
..आणि अखेर चंद्रयान-3 अवकाशात झेपावले. बहुसंख्य भारतीयांनी आनंदभरल्या डोळ्यांनी हा अभिमानास्पद क्षण पाहिला, अनुभवला. अहोरात्र झटणार्‍या आपल्या शास्त्रज्ञांच्या, तंत्रज्ञांच्या कष्टाचा पहिला यशस्वी टप्पा पार पडला. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेला हा भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा अर्थात इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. 2019 साली भारताची दुसरी चांद्रमोहीम असलेल्या चंद्रयान-2शी संपर्क तुटला आणि शास्त्रज्ञांप्रमाणेच अवघा देश हळहळला. यश टप्प्यात आले असताना, हुलकावणी देऊन गेले होते. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत भारताने चंद्रयान-3 प्रक्षेपणासाठी सिद्ध केले आणि श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून शुक्रवार, 14 जुलै रोजी दुपारी 2-35ला या यानाने गगनभरारी घेतली. आता हे यान आपल्या पुढच्या प्रवासाकडे मार्गस्थ झाले असून 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर या यानाचे सॉफ्ट लँडिंग करण्याची इस्रोची योजना आहे. अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पात अनेकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्वरूपात मोलाचा सहभाग असतो. अग्निसुरक्षा क्षेत्रात गेली अनेक वर्षे यशस्वीपणे काम करणार्‍या महाराष्ट्राच्या एचडी फायर प्रोटेक्ट या कंपनीचाही चंद्रयान-3मधील सहभाग असाच महत्त्वपूर्ण स्वरूपाचा होता.
 

chandrayaan 3
 
फायर सेफ्टीशी अर्थात अग्निसुरक्षेशी संबंधित कंपनीचा या यानाशी काय संबंध असावा? हा अगदी स्वाभाविक प्रश्न आपल्याला पडतो. एचडी फायर प्रोटेक्टचे संचालक मिहीर घोटीकर यांनी या प्रश्नाचे सविस्तर उत्तर दिले. ’चंद्रयान-3’चे प्रक्षेपण करताना लाँच पॅडवर घोटीकर यांच्या कंपनीने तयार केलेल्या एचडी वर्षा नॉझल्स (H D Varsha Nozzles) या उपकरणाचा वापर करण्यात आला. इस्रोला पुरवलेल्या या सेवेबाबत घोटीकर म्हणाले की, “आमची कंपनी सुरुवातीपासून धोकादायक घटक किंवा हॅझार्डस केमिकल क्षेत्रातील ऑइल, गॅस, पेट्रोकेमिकल, ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांना, बिल्डिंग आणि वेअरहाउसिंग क्षेत्राला आणि आयटी डाटा सेंटर या पाच प्रकारच्या कार्यक्षेत्रांना अग्निसुरक्षा पुरवण्याचे काम करते. त्यामुळे अनेक रिफायनरीज, पेट्रोकेमिकल प्लांट्स, फ्युएल स्टोरेज आणि हँडलिंग एरियाज या ठिकाणी आम्ही अग्निसुरक्षा देतो. आम्ही भारतभरात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसीएल), हिंदुस्थान पेट्रोलियम (एचपीसीएल), भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), रिलायन्स इंडस्ट्रीज रिफायनरीज अशा कंपन्यांना पाण्यावर आधारित तसेच फोम बेस्ड फायर फायटिंग सेवा पुरवतो. इस्रो ही गेली अनेक वर्षे एचडी फायर प्रोटेक्ट या कंपनीशी संलग्न असून चंद्रयानच नव्हे, तर संस्थेच्या अशा विविध प्रकल्पांत या कंपनीच्या उत्पादनांचा वापर करण्यात आला आहे. इस्रोचे काही मॅन्युफॅक्टरिंग प्लांट आहेत, काही रिसर्च आणि डेव्हलपमेंट केंद्रे आहेत. अशा अनेक ठिकाणी त्यांना अग्निसुरक्षेची गरज भासते. चंद्रयान-2मध्येही आमचा सहभाग होता. दुर्दैवाने ते यशस्वी झाले नाही.
 
 
chandrayaan 3
 
चंद्रयान-3च्या प्रक्षेपणाच्या वेळेस लाँच पॅडवर एचडी वर्षा नॉझल्सचा (HD Varsha Nozzlesचा) वापर करण्यात आला. या नॉझलबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, “नॉझलची संकल्पना इस्रोचीच होती. यानाशी आमचा तसा थेट संबंध नाही. पण जेव्हा कोणतेही यान प्रक्षेपित होते, तेव्हा त्या प्रक्रियेदरम्यान लाँच पॅडवर प्रचंड मोठा - ज्याला हाय डेसिबल म्हणता येईल असा ध्वनी निर्माण होतो. या ध्वनिलहरींमुळे इस्रोच्या यंत्रांचे नुकसान होऊ शकते. इस्रोला त्या ध्वनिलहरींची तीव्रता कमी करणारी यंत्रणा हवी होती. पाणी हे ध्वनिलहरी शोषून घेते. वाहत्या पाण्याचा उच्च वेगात (हाय व्हेलॉसिटी) मारा केला गेला, तर हा ध्वनी नियंत्रित होऊ शकतो, असे इस्रोचे म्हणणे होते व त्यासाठी त्यांना हाय व्हेलॉसिटी वॉटर जेट तयार करून हवे होते. त्यात त्यांना ठरावीक व्हेलॉसिटी, ठरावीक आकार हवा होता, जेणेकरून ध्वनिलहरीही नियंत्रित होतील व पाणी वाहून जाईल. ध्वनी नियंत्रित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ते पाणी वीस सेकंदात वाहून जाणे आवश्यक होते. असे विशिष्ट नॉझल कोण करून देऊ शकेल यासाठी त्यांनी इंजीनिअरिंग कंपन्यांशी चर्चा सुरू केली होती. आम्ही या कामात पुढाकार घेतला व रस असल्याचेही सांगितले व यावर काम सुरू झाले.”
 
 
chandrayaan 3
खरे म्हणजे एचडी फायर प्रोटेक्ट ही काही थेट अंतराळविज्ञानाशी संबंधित संस्था नाही. हे आपले कार्यक्षेत्र नाही असे सुरुवातीला घोटीकर आणि त्यांच्या सहकार्‍यांनाही वाटत होते. घोटीकर म्हणाले, “अंतराळविज्ञानाशी आमचा थेट संबंध नसला, तरी पाण्याशी फार जवळचा संबंध होता. कारण फायर सेफ्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतो. कोणत्या प्रकारच्या धोक्याचे (हॅझार्डचे) निवारण करण्यासाठी पाण्याच्या मारा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वॉटर फ्लो वापरले जातात. त्यामुळे या सगळ्याचा आम्हाला चांगला अनुभव होता. फक्त आम्ही आमची नॉझल इस्रोला हवी आहेत तशी कस्टमाइज पद्धतीने तयार करून पुरवू शकतो की नाही, असा खरा प्रश्न होता. आम्ही त्याला तयारी दर्शवली व काम सुरू झाले.”
 

chandrayaan 3 
 
एचडी फायर प्रोटेक्ट ही कंपनी गेली तीन दशके अग्निसुरक्षा क्षेत्रात कार्यरत आहे. जळगावसारख्या छोट्या शहरात यांचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट असून ठाण्यात कार्यालय आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा क्षेत्रांमध्ये ही कंपनी अग्निसुरक्षा पुरवण्याचे काम करते. थर्मल पॉवर प्लांटची सुरक्षा, हेलीपॅडची सुरक्षा, थर्मल प्लांटमध्ये वापरल्या जाणार्‍या कोळशाचे वहन करणार्‍या कन्व्हेयर बेल्टची सुरक्षा, फ्युअल स्टोरेज टँकची सुरक्षा अशा विशिष्ट अग्निसुरक्षा क्षेत्रांत या कंपनीने स्वत:ला सिद्ध केले आहे. सध्याच्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात डाटा स्टोअर करणारी डाटा सर्व्हर रूम असतात, त्याचीही अग्निसुरक्षा करण्याचे काम असते.
आपल्या सर्व उत्पादनांच्या बाबतीत दर्जा सांभाळण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता? असे विचारल्यावर घोटीकर म्हणाले की, “अग्निसुरक्षेशी संबंधित एखाद्या उपकरणाची निर्मिती केल्यानंतर कंपनीच्या माध्यमातून त्याच्या सर्व आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. जगभरात अमेरिकेतील केवळ दोनच कंपन्या विशेष अग्निसुरक्षा उपकरणांना परवानगी किंवा मान्यता देतात. त्या आपल्याकडून ते उपकरण घेतात. अग्निसुरक्षेच्या जागतिक मानकांप्रमाणे त्याची निर्मिती झाली आहे की नाही, याची आपल्या प्रयोगशाळेत पडताळणी करतात. त्यासाठी विशिष्ट वातावरणात ठरावीक तास त्याची वेगवेगळ्या प्रकारे चाचणी केली जाते. खार्‍या पाण्याचा फवारा मारून तपासणी केली जाते. विशिष्ट प्रकारचा दाब देऊन त्याची स्ट्रेन्थ (ताकद) तपासली जाते. विशिष्ट कोनातून विशिष्ट लीटर पाणी त्या स्प्रेमधून नीट बाहेर येते का, याची तपासणी केली जाते. सहा महिने ते एक वर्ष सर्व तपासण्या झाल्यानंतरच त्याला मान्यता मिळते. एचडी वर्षा नॉझलदेखील या सर्व तपासण्यांतून, प्रक्रियेतून पार झाल्यानंतरच चंद्रयान-3मध्ये वापरण्यात आले. एचडी फायर प्रोटेक्ट कंपनीला ही नॉझल तयार करायला साधारण तीन महिने लागले. कंपनीच्या जळगाव येथील मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्येच ही एचडी वर्षा नॉझल्स तयार करण्यात आली. कंपनीत आधीही वर्षा नॉझल तयार होत होती. या वेळी इस्रोच्या मागणीनुसार कस्टमाइज्ड पद्धतीने त्यात बदल करायचे होते. यासाठी इस्रोचे संशोधक स्वत: फॅक्टरीत आले होते. त्यांनी स्वत: त्या नॉझलची तपासणी केली. त्या तपासण्यांनंतर ते पार्ट्स श्रीहरिकोटाला पाठवण्यात आले.”
 
 
इस्रोचे मंगलयान असो, चंद्रयान-2 असो वा चंद्रयान-3, या मोहिमा जगाच्या पटलावर भारताचे शीर उंचावणार्‍याच असतात. चंद्रयान-3चे थेट प्रक्षेपण पाहून अनेकांचे डोळे पाण्याने आणि ऊर अभिमानाने भरून आला. आपण अशा मोहिमांचा एक भाग आहोत ही भावना सुखावते का? असे विचारल्यावर मिहीर घोटीकर म्हणाले की, “आमच्याच कंपनीत तयार झालेली, सगळ्या चाचण्यांचे टप्पे पार केलेली नॉझल्स चंद्रयानात लागणार होती. चाचण्या यशस्वी झाल्या तरी शेवटपर्यंत धाकधूक होतीच. अखेर चंद्रयान यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले, नॉझल्सनी आपली भूमिका पुरेपूर बजावली आणि आम्हीही कार्यालयात आनंदोत्सव साजरा केला. पेढे वाटले. अशा मोहिमांचा भाग असणे हे आमच्यासाठीही अभिमानास्पदच असते. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या मोहिमांमध्ये कमी बजेटचे आणि तरीही दर्जात्मक तडजोड न करता तयार झालेले हे चंद्रयान आहे. देश स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करतो आहे. देशात अग्निसुरक्षा क्षेत्राबाबत बोलायचे, तर येथे उत्पादन क्षेत्रात अनेक लोक कार्यरत आहेत. हे अनेक उत्पादक अग्निरोधक तयार करण्याचे काम करतात, पण हाय हॅझार्ड - सर्वाधिक धोका असणार्‍या विशेष अग्निसुरक्षा क्षेत्रात मात्र उत्पादक कमी आहेत. उदाहरण द्यायचे तर हेलीपॅडच्या अग्निसुरक्षेत विशिष्ट नॉझल, विशिष्ट उपकरणे लागतात, पण देशात याचे खूप कमी उत्पादन होते. त्यामुळे एकूणच देशातील अग्निसुरक्षा क्षेत्रात युवकांना अनेक संधी उपलब्ध आहेत. आजही अनेक प्रकारच्या यंत्रांसाठी आपण परदेशांतील कंपन्यांवर अवलंबून आहोत. जितका आपल्याकडील उत्पादनाचा टक्का वाढेल, तसतसे आपण स्वयंपूर्ण होत जाऊ” असे ते आवर्जून नमूद करतात.
 

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.