समाजभक्तीचे अग्रदूत संत नामदेव

विवेक मराठी    08-Jul-2023   
Total Views |

sant namdev 
महाराष्ट्र ते पंजाब सर्व समाजाला एकत्र जोडणारे निर्जीव कापडाचे दोन तुकडे सुईदोर्‍याने जोडण्यापेक्षा बंधुत्वाच्या सूत्रात सर्व भारतीयांना गुंफण्याचा सफल उद्योग संत नामदेवांनी केला. त्यांचे हे ‘शिवणकाम’ अजोड म्हणायला हवे. संत नामदेव हे समाजभक्तीचे किंकर म्हणजे अग्रदूतच आहेत. संत नामदेव महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या महतकार्याचे अल्प दर्शन.
संत बहिणाबाई यांनी आपल्या लोकप्रिय अभंगात संत नामदेवांचे यथार्थ वर्णन केले आहे -
 
ज्ञानदेवे रचिला पाया। उभारिले देवालया।
 
नामा तयाचा किंकर। तेणे केला विस्तार॥
 
 
किंकर या शब्दाचा अर्थ दूत असाही होतो. मात्र संत नामदेव हे साधेसुधे दूत नव्हते, तर ते वारकरी पंथाचे ‘अग्रदूत’ आणि एका अर्थाने ‘राजदूत’च होते. कारण त्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर वैष्णवभक्तीची पाळेमुळे रुजविण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. वरील अभंग चरणात पाठभेद असाही आहे की, ‘तेणे रचिले ते आवार।’ पण काहीही म्हणा, संत नामदेवांच्या आवाराचा विस्तार इतका प्रचंड होता की, त्यांच्या कामगिरीवर भाष्य करताना त्यांचे चरित्रकार डॉ. मोहन सिंह असे म्हणतात की, ‘जर महाराष्ट्रात संत नामदेव झालेच नसते, तर तेथे तुकारामसुद्धा झाले नसते, उत्तर प्रदेशात कबीर झाले नसते, राजपुतान्यात दादू झाले नसते आणि पंजाबात गरीबदास झाले नसते. कोणत्याही मध्ययुगीन गूढवादी पदांमध्ये एवढी निर्भयता आणि मधुरता आढळत नाही, जेवढी ती शिंप्याच्या कुळात जन्मलेल्या नामदेवांच्या पदांमध्ये आहे. गुरू हाच ईश्वर आहे आणि भक्त व भगवंत हे एकरूपच आहेत असे सिद्ध करणारे ते सर्वांत पहिले महापुरुष होत.’
 
 
खरे म्हणजे व्यवसायावरून माणसाचे उच्चनीचपण ठरविले, हा शुद्ध मूर्खपणा होय. या भेदभावात्मक वृत्तीला आपल्या कार्यकर्तृत्वाने तिलांजली दिली ती संत नामदेव यांनीच. कोणत्याही कुळात जन्मलेला आणि कोणताही व्यवसाय करणारा मनुष्य आपल्या कार्याने ईश्वरभक्तांच्या मालिकेत सर्वोच्च गौरवपूर्ण स्थान अर्जित करू शकतो, हे दाखविण्यासाठीच कदाचित त्यांनी शीख संप्रदायाचा पवित्र ग्रंथ ‘ग्रंथसाहेब’ यातील त्यांच्या संकलित पदात स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की,
 
 
छीपे के घरि जनमु दैला, गुरु उपदेसु भैला।
 
संतन्ह के परसादि नामा हरि मेटुला॥
 
संत नामदेवांचे वडील दामाशेटी यांनी आपल्या पुत्राला वंशपरंपरागत व्यवसायात आणण्याचा महाप्रयास केला, पण संत नामदेवांना ‘विठ्ठलनामाचा टाहो’ हा दाही दिशांना प्रसारित करण्याचा उद्योग करायचा असल्यामुळे त्यांनी त्या व्यवसायाकडे लक्ष दिले नाही आणि निर्जीव कापडाचे दोन तुकडे सुईदोर्‍याने जोडण्यापेक्षा बंधुत्वाच्या सूत्रात सर्व भारतीयांना गुंफण्याचा सफल उद्योग केला. त्यांचे हे ‘शिवणकाम’ अजोड म्हणायला हवे.
 
 
संत नामदेवांना लक्ष्मीचा लोभ नव्हता, त्यांना लक्ष्मीपती हवा होता. परिसा भागवत यांच्या पत्नी कमलाबाई यांनी संत नामदेवांची पत्नी राजाबाई यांना परीस आणून दिला होता. राजाबाई यांनी लोखंडाचे सोने करण्याचा उपक्रम केल्याचे जेव्हा संत नामदेवांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी तो परीस उचलून नदीत फेकून दिला. जेव्हा परिसा भागवत परीस मागण्यासाठी भांडण करू लागले आणि म्हणाले की, “जर नदीत परीस फेकला असेल तर तो शोधून द्या!’‘ तेव्हा नामदेवांनी नदीतील ओंजळभर दगड हातात घेतले व “यातील तुमचा परीस शोधून घ्या” असे सांगितले. परिसा भागवत यांना ती चेष्टा वाटली. पण जेव्हा त्या दगडांना लोखंडाच्या सुया लावल्या, तेव्हा त्या सर्व सोन्याच्या झाल्या. हा चमत्कार पाहून परिसा भागवतांचे डोळे उघडले आणि ते संत नामदेवांच्या चरणी लीन झाले. नामदेवांच्या हातातील परीस हे खरे नसून संत नामदेवच खरेखुरे परीस आहेत, हे सत्य त्यांना व समाजासही पटले व त्यांच्या पदस्पर्शाने आपल्या जीवनाचे सोने व्हावे यासाठी सर्व समाज संत नामदेवांच्या चरणी लीन झाला. परीस लावल्याने लोखंडाचे सोने होते की नाही, हा चमत्कार आम्ही पाहिलेला नाही; मात्र नामदेवांच्या स्पर्शाने अनेकांच्या जीवनाचे सोने झाले, हा दाखला त्यांचे चरित्रकार डॉ. मोहन सिंह यांनी अवश्य दिलेला आहे, तोच महान चमत्कार समजला पाहिजे.
 
 
भेदभावांचे उच्छेदन करण्यासाठी स्वत: भगवान पंढरीनाथ नामदेवांना साहाय्यभूत झालेले दिसतात. तत्कालीन ब्राह्मणमंडळींचे गर्वहरण करण्यासाठी त्यांनी ‘अनंत’ नावाच्या ब्राह्मणवेषाने महाभोजनाचे आयोजन केले, ज्यात त्यांनी स्वत: नामदेवरायांचे उष्टे खाल्ले. तेव्हा सर्व ब्राह्मणमंडळींनी वर्णधर्म बुडविला असा कांगावा केला, तेव्हा पंढरीनाथांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले - ‘आपल्या सर्वांचे देह हे पंचतत्त्वांनी बनलेले आहेत व शेवटी त्या पंचतत्त्वांतच मिसळून जाणार आहेत. तेव्हा या महान पंचतत्त्वांतही आपल्याला काही दोष आढळत असेल तर तो तुमचा दृष्टिदोष आहे.’ संतचरित्रकार महिपती महाराजांच्या ‘भक्तविजय’ या ग्रंथात आपल्याला हा संपूर्ण प्रसंग आढळतो.
 
 
संत नामदेव सर्व तथाकथित उच्च जातीच्या लोकांना प्रश्न विचारतात -
 
नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध।
 
तुम कहाँ के ब्राह्मण हम कहाँ के सूद॥
 
मन मेरी सुई तन मेरा धागा।
 
खेचरजी के चरण पर नामा सिंपी लागा॥
 
मनाला सुई करून आणि देहाला धागा करून अखिल जनांची मने जोडण्यात आणि तनमनाने ईश्वरभक्तीत गुंफण्यात नामदेवांची अत्यंत मोलाची भूमिका आहे.
 
 
देशाटन करणे ही तर संतांची भूमिकाच आहे. संत ज्ञानेश्वरांच्या नेतृत्वात जे देशभ्रमण झाले, त्याचे वर्णन संत नामदेवांनी आपल्या तीर्थावळीच्या 59 अभंगांत केलेले आहे. या सर्व संतमंडळींनी औंढ्या नागनाथ, पैठण, प्रयाग, अयोध्या, काशी, मारवाड, कोलायत, बिकानेर, विजापूर, घटप्रभा, मलप्रभा, ॠष्यमूक, किष्किंधा, तुंगभद्रा, कुमारतीर्थ, तिरुपती, मल्लिकार्जुन, सेतुबंध रामेश्वरम असे भ्रमण केले व ते पंढरपुरात परतले. ही भूमी, येथील सर्व मंडळी आणि येथील सर्व तीर्थक्षेत्रे आपली असल्याची भावना मनात असल्यावाचून प्राणप्रिय पंढरपुराला सोडून या संतमंडळींनी असे देशभ्रमण का बरे केले असते? बंधुत्वाचा आणि आपुलकीचा संदेश देण्यासाठीच ना! तरी आजकालची अभ्यासक मंडळी संतकार्यात ‘सामाजिक’ आशय शोधतात. समाजभक्तीची तळमळ हाच संतकार्याचा पाया आहे. संतांनी जे काही धर्ममार्गाचे आचरण केले, ते आपल्या मनाला शुद्ध करून त्याला बळकट करून मानवी आयुष्याचे परमकल्याण साधण्याची प्रेरणा लोकांच्या मनात जागविण्याच्या विशुद्ध हेतूने केले, हा भाव आपण जाणून घेतला, तर संतांचे कार्य धार्मिकपेक्षा अनंत पटींनी सामाजिकच होते, हे सहजपणे आपल्या लक्षात येते.
 
 
संतांच्या कार्यावर टीका ही त्यांच्या काळातही होत होती. गोदावरीच्या पावन तटावर संतमंडळींचे कीर्तन सुरू असताना तेथे काही वर्णाभिमानी ब्राह्मणमंडळी वितंडवादासाठी दाखल झाली. त्यातील एक जण कुत्सितपणे म्हणाला, “अरे, हे कसले संत! हे तर रिकामटेकडे आहेत. यांना कोणताच कामधंदा नाही. गळ्यात तुळशीमाळ घालायची आणि हातात चिपळ्या घेऊन विठ्ठल, विठ्ठल ओरडायचे की झाली भक्ती! अशा रिकामटेकड्यांच्या भजनी ब्राह्मणसुद्धा लागले आहेत, ही तर अपमानाची गोष्ट आहे. या ढोंगी लोकांना येथून धक्के मारून हाकलून लावले पाहिजे!’ मग या ठिकाणी पुढील प्रश्नोत्तरे झाली -
 
प्रश्न - तुमचे नाम आणि जात कोणती?
 
उत्तर - या देहाचे नाव नामदेव आणि जात शिंपी.
 
प्रश्न - तुमची आराध्यदेवता कोणती?
 
उत्तर - या कणांकणांत व्याप्त श्रीविठ्ठल.
 
हे ऐकून टवाळांनी आरडाओरडा सुरू केला - ‘तुमच्या विठ्ठलाला बोलवा कीर्तनात! अरे, कसला विठ्ठल येतोय कीर्तनात? सर्व ढोंग आहे. पळवून लावा या ढोंगी लोकांना!’
 
 
यामुळे नामदेवांचे मन कळवळले आणि त्यांनी देवाचा धावा सुरू केला. असे म्हणतात की, तत्काळ पांडुरंगाच्या आदेशाने त्या कीर्तनात देवसभाच अवतरली आणि कीर्तनात सहभागी झाली. इंद्रादिक देव कीर्तनात नाचताना पाहून वर्णाभिमानी टवाळांची बोबडी वळली आणि त्यांचे पुरते गर्वहरण झाले. कोणी वाचक याला चमत्कार म्हणेल! पण सज्जनशक्तीची एकजूट झाल्यावर दुर्जनांना काढता पाय घ्यावा लागतो, हाच या घटनेचा मथितार्थ आहे.
 
आपले सखा ज्ञानदेव यांच्या समाधिसोहळ्यानंतर नामदेवांनी पंढरपूर सोडले व देशभ्रमणाला निघाले आणि 54 वर्षे देश जागवून त्यांनी पुन्हा महाप्रयाणासाठी पंढरपुरात आगमन केले. पंजाब, राजस्थान या राज्यांसहित सर्व उत्तर भारतात नामदेवांच्या पदांचे आदराने गायन केले जाते व ती खूप लोकप्रिय झाली आहेत. सर्वच मध्ययुगीन संतकवी नामदेवांचा आदरपूर्वक आणि श्रद्धेने उल्लेख करतात.
 
संत कबीर म्हणतात -
 
गुरु परसादी जैदेव नामा।
 
प्रगति के प्रेम इन्हहि है जाना॥
 
संत रैदास म्हणतात -
निमत नामदेऊ दूध पिआइओ,
 
तऊ जग जनम संकट नहीं आइआ॥
 
संत पीपा म्हणतात -
 
जास की जाति अछोप छिपा।
 
नामा की नामना सपत दीपा॥
 
धन्ना जाट म्हणतात -
 
संत गोविंद गोविंद संगि नामदेव मनु लीणा।
 
आढ दाम को छीपरो होइओ लाखीणा॥
 
संत दादू दयाल म्हणतात -
 
नामदेव कबीर जुलाहौ, जन रैदास तिरै।
दादू बेगि बार ही लागै, हरि सूं सबै सरै॥
 
संत सुंदरदास म्हणतात -
 
जैसे नाम कबीर जी यौं साधु कहाया।
 
आदि अंत लौ आइकैं राम राम समाया॥
 
 
ही सर्व स्तुतिसुमने काय सांगावीत! आजही आपण कोठेही आरती करतो, तेव्हा शेवटी नामदेवांचेच पद म्हणतो -
 
घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यांनी पाहीन रूप तुझे।
 
प्रेमे आलिंगीन आनंदे पूजीन, भावे ओवाळीन म्हणे नामा॥
 
 
एवढी सर्वसहमती लाभलेला आणि सर्वप्रिय झालेला हा संत खरोखरच वेगळा आणि विरळा म्हटला पाहिजे. महाराष्ट्र ते पंजाब सर्व समाजाला एकत्र जोडणारे आणि मनरूपी सुईने तनरूपी धागा घेऊन समाज‘शिंपी’काम करणारे संत नामदेव हे समाजभक्तीचे किंकर म्हणजे अग्रदूतच आहेत.