विक्रमी गवसणी

विवेक मराठी    24-Aug-2023   
Total Views |
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देश अशी विशेष ओळख मिळवणार्‍या भारताने या यशस्वी चांद्रमोहिमेमुळे रशिया, अमेरिका आणि चीन यांच्या बरोबरीने बसण्याचा मानही पटकावला आहे. अतिशय कमी खर्चात ही मोहीम यशस्वी करून दाखवली, हेही दखल घेण्याजोगे! या चंद्रावतरणानंतर नासासह जगभरातून अनेकांचे अभिनंदनाचे संदेश आले. आता सगळ्यांचे लक्ष इस्रोच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.
 
India makes history with Chandrayaan-3 moon landing 
 बुधवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ठीक 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ चंद्रयान 3 अलगद उतरले आणि भारताच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला गेला. या देदीप्यमान यशासाठी अविरत परिश्रम घेणार्‍या ‘इस्रो’तील सर्व शास्त्रज्ञांचे, तंत्रज्ञांचे मन:पूर्वक अभिनंदन! अंतराळ विज्ञानातील हा विश्वविक्रम ‘इस्रो’च्या पुढील महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी बळ, उत्साह आणि ऊर्जा देणारा तर आहेच, त्याचबरोबर करोडो भारतीयांच्या मनात देशप्रेमाचे-देशाभिमानाचे नवे स्फुल्लिंग चेतवणारा आहे.
 
 
याआधीच्या चांद्रयान 2 मोहिमेत शेवटच्या टप्प्यात आलेले अपयश इस्रोसह सर्व भारतीयांच्या मनाला वेदना देऊन गेले होते. मात्र या अपयशाने खचून न जाता, झालेल्या चुकांचे विश्लेषण करून ‘इस्रो’तील शास्त्रज्ञांनी लगेचच पुन्हा नव्या उत्साहात एकदिलाने नवी मोहीम हाती घेतली. मागील अनुभवामुळे सर्व भारतीयांचे मन चंद्रयान 3च्या सॉफ्ट लँडिंगविषयी साशंक असताना, ‘ही मोहीम 100 टक्के यशस्वी होणार’ असा विश्वास इस्रोतील शास्त्रज्ञ अगदी शेवटच्या क्षणापर्यंत व्यक्त करत होते. आणि तसेच घडले. अपयश - मग ते कितीही मोठे का असेना, त्याने खचून न जाता डोळसपणे आणि तटस्थपणे त्यामागच्या कारणांचे विश्लेषण करून पुन्हा नव्या जोमाने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले, तर यशाला गवसणी घालता येते, हा संदेश इस्रोने कृतीतून दिला आहे. तसेच, ‘भारतीयांनो, मी माझ्या ईप्सित स्थळी (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्हीसुद्धा! भारतीयांचे अभिनंदन!‘ असा संदेश प्रसारित करून इस्रोने मोहिमेच्या यशासाठी देवाची मनापासून प्रार्थना करणार्‍या भारतीयांनाही आपल्या यशात, आनंदात सहभागी करून घेतले.
 
 
बुधवारी रात्री उशिरा विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या जमिनीवर उतरले आणि त्यानंतर 3-4 तासांमध्ये सौर पॅनलच्या साहाय्याने रोव्हरची बॅटरी चार्ज झाल्यानंतर त्याची हालचाल सुरू झाली. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणे, प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या जमिनीवरून फिरवणे आणि शास्त्रीय नोंदी घेऊन चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे ही या मोहिमेची उद्दिष्टे आहेत. ठरलेल्या उद्दिष्टांपैकी पहिली दोन पूर्ण करण्यात ‘इस्रो’चे शास्त्रज्ञ यशस्वी झाले आहेत. चंद्राची भूमी, तिथले हवामान, तिथली खनिजे, तिथे बर्फरूपात असलेला पाण्याचा साठा यांचा, तसेच अन्य काही घटकांचा अभ्यास केला जाईल. आणि याचा लाभ फक्त भारताला होणार नाही, तर सार्‍या जगाला होईल. अशा प्रकारच्या मोहिमा आखताना केवळ आपल्या देशाला त्यातून लाभ व्हावा इतकी संकुचित दृष्टी इस्रोने ठेवलेली नाही. अशा मोहिमेतून जे गवसेल, ते सर्व मानवजातीचे.. हीच भावना आहे. मनाची विशालता हे भारतीय मानसिकतेचे वैशिष्ट्य आहे, त्याचे हे प्रातिनिधिक उदाहरण ठरावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही त्याचे प्रतिबिंब पडलेले दिसले. जोहान्सबर्ग येथे ‘ब्रिक्स’साठी गेलेल्या पंतप्रधानांनी चंद्रयान मोहीम फत्ते झाल्यावर दूरदृश्य प्रणालीद्वारे आपल्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिला देश ठरल्याचा अभिमान व्यक्त करतानाच, ‘हे यश संपूर्ण मानवतेचे आहे’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. ‘वसुधैव कुटुम्बकम’ हे भारताचे घोषवाक्य असून भारताच्या सर्व कृती त्याच उद्देशाने सुरू असतात. चांद्रमोहीम हीदेखील मानवकेंद्रित होती, असे ते पुढे म्हणाले.
 
 
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ पोहोचणारा पहिला देश अशी विशेष ओळख मिळवणार्‍या भारताने या यशस्वी चांद्रमोहिमेमुळे रशिया, अमेरिका आणि चीन यांच्या बरोबरीने बसण्याचा मानही पटकावला आहे. अतिशय कमी खर्चात ही मोहीम यशस्वी करून दाखवली, हेही दखल घेण्याजोगे! या चंद्रावतरणानंतर नासासह जगभरातून अनेकांचे अभिनंदनाचे संदेश आले. आता सगळ्यांचे लक्ष इस्रोच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे.
 
 
नियोजनबरहुकूम यशस्वीपणे पार पडत असलेल्या एकेका टप्प्यामुळे लक्षवेधी ठरलेली ही विक्रमी गवसणी पुढील अनेक अवकाश मोहिमांच्या यशाची नांदी ठरेल, असा विश्वास या मोहिमेने दिला आहे. सप्टेंबर महिन्यात सूर्याच्या दिशेने झेपावणारे ‘आदित्य एल 1’ ंहे अवकाशयान सूर्य आणि त्याभोवतीच्या वातावरणाचा अभ्यास करणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आखलेली इस्रोची ही पहिलीच मोहीम असणार आहे. त्यानंतर, जानेवारी ते मार्च या कालावधीत भारतीय अंतराळवीराला अवकाशात घेऊन जाणारी ‘गगनयान’ ही मोहीमदेखील इस्रोच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवणारी ठरेल. यानंतर शुक्राचा अभ्यास करण्यासाठी शुक्रयान-1 आणि 2025मध्ये मार्स ऑर्बिटर मंगळयान-2 या इस्रोच्या आगामी महत्त्वाकांक्षी मोहिमा आहेत.
 
 
आमच्याकडे अर्थगर्भ अशा वेद-उपनिषदांचा जसा संपन्न वारसा आहे, तसा अंतराळातील गूढाचा शोध घेणार्‍या अंतराळविज्ञानाचाही समर्थ वारसा आहे, असे येणार्‍या पिढ्या जगाला अभिमानाने सांगू शकतील, अशी ही अविस्मरणीय घटना आहे. ज्ञान-विज्ञानाचा या देशात झालेला संगम, त्यामागे असलेला मानवकल्याणाचा विचार यामुळे भारताकडे पाहण्याची अवघ्या जगाची नजर आता बदलेल. म्हणूनच चंद्रयान मोहिमेतील यश केवळ अवकाश संशोधन क्षेत्रापुरते सीमित नाही. सामर्थ्यशील भारताचे झालेले हे दर्शन जगाला स्तिमित करणारे आणि भारतीयांच्या मनात ऊर्जा, उत्साह, देशाभिमान नव्याने प्रवाहित करणारे आहे.
 
 
ही विक्रमी गवसणी स्वतंत्र भारताच्या शिरपेचातला लखलखता हिरा आहे. त्या क्षणाचे साक्षीदार आपल्याला होता आले, ही भाग्याची गोष्ट आहे.