अस्वस्थतेमागची कारणे

विवेक मराठी    03-Aug-2023   
Total Views |
 
 देश स्वकर्तृत्वावर जगाचे लक्ष वेधून घेत आहे, अशा देशात सतत अस्वस्थता राहण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न केले जाणार आहेत. या कामात देशाबाहेरही अनेक जण गुंतलेले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येतील, तशा या समाजविघातक शक्ती अधिकाधिक ‘हिंस्र’ होत जातील. त्यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ही मोठी संधी आहेच, पण त्याआधीही देशातील शांतता व सुव्यवस्था मोडकळीस आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत होत असलेल्या G20 परिषेसाठी भारतात येणार्‍या विविध देशांच्या शिष्टमंडळांसमोर या देशाचे विपरीत चित्र उभे करण्यासाठी हर तर्‍हेने प्रयत्न केले जातील. सर्व अडचणींवर मात करत, लवकरच होणारे राममंदिराचे पुनर्निर्माण हाही अनेकांसाठी पोटशूळाचा विषय आहे.
 
vivek
 
हरियाणातील नूह इथे झालेल्या जातीय हिंसाचाराच्या विरोधात विहिंपने आयोजित केलेल्या आंदोलनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला नकार महत्त्वाचा आहे. त्यामुळे झालेल्या हिंसाचारासंदर्भात विरोध नोंदवण्याच्या हिंदूंच्या मूलभूत अधिकाराची जपणूक झाली. त्याच वेळी रॅलीदरम्यान द्वेषयुक्त भाषण किंवा हिंसाचार होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच पोलिसांना दिले आहेत हेही समजण्याजोगे आणि समाजात शांतता प्रस्थापित होण्यासाठी गरजेचेही. मुख्यमंत्री खट्टर यांनीही सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हल्लेखोरांच्या मालमत्ता ताब्यात घेतल्या जातील, असे जाहीर केले आहे. असे खरेच घडले, तर त्यातून अशा कारवायांना काही प्रमाणात चाप बसण्याची शक्यता आहे.
 
 
हरयाणातल्या नूहमध्ये जो हिंसाचार झाला, त्याला कारणीभूत आहे तेथील मुस्लीम नेत्यांनी आपल्या समाजाला हिंदूंविरोधात दिलेली चिथावणी. ही द्वेषमूलक आव्हाने या घटनेच्या मुळाशी आहेत. हरयाणातला नूह जिल्हा, जो काही वर्षांपूर्वीपर्यंत मेवात या नावाने ओळखला जात असे, हा भाग मुस्लीमबहुल आहे. येथे आज सुमारे 80 टक्के मुस्लीम आणि जेमतेम 20 टक्के हिंदू राहतात. याच भागात महाभारतकालीन मंदिरांचे प्रमाण खूप असल्याने तो परिसर हिंदूंसाठी अपार श्रद्धेचा आहे. अशा या परिसरात दर वर्षीच्या यात्रांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न मुस्लिमांकडून बर्‍याच काळापासून केला जात आहे. तेव्हा हिंदू यात्रेत अडथळा येणे हे नवीन नसले, तरी समाजमाध्यमांमुळे त्याची तीव्रता आता खूपच वाढलेली आहे. यात्रेवर झालेला हल्ला केवळ पूर्वनियोजितच नव्हता, तर या हिंसक हल्ल्यासाठी पुरेशी पूर्वतयारीही करण्यात आली होती. येथील घराघरांमध्ये सापडलेला दगडांचा, अ‍ॅसिड बाँब्जचा, पेट्रोल बाँब्जचा साठा यातून पूर्वतयारीची कल्पना येते. इतकेच नव्हे, तर अहसान मेवाती पाकिस्तानी असे नाव लावणार्‍या यूट्यूबरने या यात्रेआधी तीन दिवस पोस्ट केलेला व्हिडिओदेखील हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचे अधोरेखित करतो. या जलाभिषेक यात्रेत सहभागी होणार्‍या गोसेवक मोनू मानेसरला धडधाकटपणे परत पाठवू नका, असेही त्याने आपल्या एका व्हिडिओत सांगितले आहे.
 
 
 
देशाची राजधानी दिल्लीपासून जेमतेम 100 किलोमीटरवर असलेला मुस्लीमबहुल मेवात हा भाग दारिद्य्र, दर्जेदार शिक्षणाचा अभाव यामुळे महाराष्ट्रातल्या गडचिरोली जिल्ह्यापेक्षाही मागास समजला जातो. सायबर गुन्ह्यांबरोबरच गो तस्करीसाठी, गाड्यांच्या चोर्‍यांसाठी हा भाग कुप्रसिद्ध आहे. शिक्षणाच्या अभावामुळे बेकारीवर उपाय म्हणून झटपट पैसे मिळवून देणारा सायबर गुन्ह्याचा मार्ग इथल्या अनेकांनी शोधला. बरेचदा सायबर गुन्ह्यात एकटीदुकटी व्यक्ती नसते, तर संपूर्ण कुटुंबच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा गुन्ह्यांमध्ये गुंतलेले असते, असे याविषयीचा अभ्यास सांगतो.
 
 
 
श्रावण महिन्यात येथील पांडवकालीन शिवमंदिरात जलाभिषेक करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील भाविक हिंदू मोठ्या संख्येने येतात. डोंगरानी वेढलेल्या या मंदिरात पोहाचिण्यासाठी हिंदू यात्रेचा जो मार्ग आहे, त्या मार्गावरच हिंसा घडवून आणण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. यासाठी समाजमाध्यमांच्या मदतीने मुस्लिमांना, इथल्या मौलवींना आवाहन करण्यात आले. केवळ किशोरवयीन मुलांनाच नाही, तर अगदी घरातल्या लहान मुलांनाही यात सहभागी करून घेण्यात आले. या संदर्भातले व्हिडिओज आंतरजालावर उपलब्ध आहेत. पण आपल्या उदारमतवादी प्रसारमाध्यमांना ते दिसत नाहीत. त्यांना या हिंसेला हिंसेने दिलेले प्रत्युत्तर फक्त दिसते. ती हिंसाही चुकीची व असमर्थनीय असली, तरी क्रियेला देण्यात आलेली प्रतिक्रिया आहे, याचा या प्रसारमाध्यमांना जाणीवपूर्वक विसर पडतो आणि ते हिंदू संघटनांवर तोंडसुख घेत आपल्या बोलवित्या धन्याला खूश करण्यात धन्यता मानतात. हरयाणातल्या हिंसाचारामुळे या देशात अल्पसंख्याक कसे असुरक्षित, जीव मुठीत धरून आहेत अशी बांग द्यायला सुरुवात झालीच आहे.
 
 
 
जो देश स्वकर्तृत्वावर जगाचे लक्ष वेधून घेत आहे, अशा देशात सतत अस्वस्थता राहण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न केले जाणार आहेत. या कामात देशाबाहेरही अनेक जण गुंतलेले आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुका जशा जशा जवळ येतील, तशा या समाजविघातक शक्ती अधिकाधिक ‘हिंस्र’ होत जातील. त्यांच्यासाठी लोकसभा निवडणूक ही मोठी संधी आहेच, पण त्याआधीही देशातील शांतता व सुव्यवस्था मोडकळीस आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. सप्टेंबर महिन्यात दिल्लीत होत असलेल्या ॠ20 परिषेसाठी भारतात येणार्‍या विविध देशांच्या शिष्टमंडळांसमोर या देशाचे विपरीत चित्र उभे करण्यासाठी हर तर्‍हेने प्रयत्न केले जातील. सर्व अडचणींवर मात करत, लवकरच होणारे राममंदिराचे पुनर्निर्माण हाही अनेकांसाठी पोटशूळाचा विषय आहे.
 
 
 
यामुळेच समाजात अस्वस्थता निर्माण करणार्‍या अनेक घटना देशभर घडताहेत. त्या घडवून आणणार्‍यांची मानसिकता, त्यामागचे कारस्थान लक्षात घेणे आणि ते हाणून पाडणे हे केवळ राज्यकर्त्यांचे कर्तव्य नाही, तर सुबुद्ध नागरिकांची आणि प्रसारमाध्यमांचीही ती जबाबदारी आहे. आपण ती गांभीर्याने निभावली पाहिजे.