व्रतस्थ अभिनेता

विवेक मराठी    03-Aug-2023   
Total Views |
 @सुनील बर्वे
 
नाट्यक्षेत्रापासून ते वेब सिरीजपर्यंत वैविध्यपूर्ण माध्यमांद्वारे प्रेक्षकांना निखळ आनंद देणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं वृद्धापकाळाने नुकतंच निधन झालं. जवळपास सात दशकं मनोरंजन क्षेत्रात कार्यरत राहूनही अहंकाराचा तसूभरसुद्धा स्पर्श न झालेले सावरकर हे आपल्यापेक्षा तरुण सहकलाकारांमध्ये विशेष लोकप्रिय होते. मित्रत्वाचं नातं जपणार्‍या या पितृतुल्य कलावंतांच्या गुणवैशिष्ट्यांचा, स्वभाववैशिष्ट्यांचा सुनील बर्वे आणि आनंद इंगळे या सहकलाकारांनी घेतलेला वेध.

vivek
 
जयंत सावरकरांची म्हणजेच प्रिय अण्णांची आणि माझी पहिली भेट झाली ती 1988च्या सुमारास. गंगाराम गवाणकरांनी लिहिलेल्या आणि विनय आपटेंनी दिग्दर्शित केलेल्या ‘वन रूम किचन’ नावाच्या नाटकात आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. माझं रूढार्थाने तिसरं नाटक. या नाटकात अण्णांप्रमाणेच प्रदीप वेलणकर, सयाजी शिंदे असे अनेक अनुभवी नट होते. मी त्या मानाने फारच नवखा होतो. या नाटकात अण्णांचं पात्र हे अत्यंत बिलंदर इस्टेट एजंटचं पात्र होतं. चाळीत राहणार्‍या मध्यमवर्गीय माणसाला मोठी जागा घेण्याची मनीषा असते. हा एजंट त्यांना तसं करण्यास कसं प्रवृत्त करतो, किती शिताफीने सगळं समजावून घर घेण्यास भाग पाडतो, हे त्यांनी अतिशय छान साकारलं होतं.
 
 
अण्णांच्या अभिनयाचं तर मला कायमच कौतुक वाटत असे. याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांना अनेक नाटकांचे उतारेच्या उतारे मुखोद्गत होते. त्यांचा ते सतत सरावही करत. दौर्‍यावर असताना जुन्या आठवणी सांगत असत, ते उतारे आम्हाला म्हणून दाखवत असत. त्यामुळेच कोणत्याही नाटकासाठी फोन आला तरी आपलं पाठांतर आणि अभिनयाची हातोटी यावर ते तो प्रयोग करू शकायचे - मग ते शाकुंतल असो वा लग्नाची बेडी असो, ते प्रयोग करत असत. त्यांचे एकाच वेळी वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोगही सुरू असायचे. आम्ही मालिकांतूनही एकत्र कामं केली. एका मालिकेच्या चित्रीकरणासाठी अण्णा, मी, आनंद अभ्यंकर, आनंद इंगळे वगैरे मंडळी हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये होतो. चित्रीकरणाव्यतिरिक्तच्या वेळेत आमची धमाल सुरू असायची. तरुण कलाकारांशी त्यांची विशेष मैत्री असे. कधीकधी आम्ही त्यांना प्रेमाने एकेरी हाकही मारायचो, पण त्याचा त्यांनी कधीही राग मानला नाही किंवा त्याचं भांडवलंही केलं नाही. त्यांच्या बाबतीत उल्लेखनीय बाब होती ती त्यांची आयुष्यातला काटेकोरपणा. सकाळी लवकर उठणं, दररोज व्यायाम करणं - चालायला जाणं, पौष्टिक आहार म्हणून दौर्‍यावर असतानाही लक्षात ठेवून बदाम भिजवून खाणं, स्वत:च्या फिटनेसची काळजी घेणं हे सारंच आम्हा तरुण कलाकारांसाठी कौतुकाचं आणि अनुकरणीय होतं. काटेकोरपणाचं, शिस्तीचं हे व्रत त्यांनी आयुष्यभर अंगीकारलं.
 

vivek 
 
अण्णांनी ज्या काळात मनोरंजन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला, तो अत्यंत आव्हानात्मक काळ होता. अनेकांना माहीत नसेल, पण अण्णा हे एक नंबरचे स्टेनोग्राफर होते, त्यांचा टायपिंगचा स्पीडही विलक्षण होता आणि इंग्लिशवर उत्तम प्रभुत्व होतं. त्यामुळे त्यांना अतिशय उत्तम नोकरी सहज मिळाली असती. पण त्यांनी रंगभूमीच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेतलं होतं. कलाकारांची भाषा शुद्ध असली पाहिजे, त्यांनी स्वत:च्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी स्वत:चं शरीर व्यायाम करून व्यवस्थित राखलं पाहिजे, व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे, वेळेच्या बाबतीत काटेकोर असलं पाहिजे या त्यांच्या मतांवर ते अत्यंत ठाम तर होतेच, त्यांनी कायम या मतांचं अनुसरण केलं. त्याचप्रमाणे रंगभूमीवर अचानक उद्भवणार्‍या संकटांनाही कलाकाराने तोंड दिलं पाहिजे असंही त्यांना वाटायचं. काही वेळा प्रेक्षक गडबड करत असतात, कोणी कॉमेंट पास करत असे. त्याला हजरजबाबीपणे उत्तर दिलं पाहिजे, याबाबत त्यांचा कटाक्ष असे.
  
शिस्तप्रिय व समर्पित नाट्यकर्मी
@आनंद इंगळे
‘आम्ही जगतो बेफाम’ या माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकापासूनच मला जयंत सावरकरांचा सहवास लाभला. या नाटकात अण्णांचीही भूमिका होती. त्यानंतरही अनेक नाटकांतून, मालिकांतून, चित्रपटांतून आम्ही एकत्र भूमिका केल्या. सुदैवाने मला त्यांच्यासह ‘व्यक्ती आणि वल्ली’देखील करता आलं. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी स्वत:च्या आयुष्याला लावून घेतलेली शिस्त, जी त्यांनी अगदी शेवटचे आजारी असतानाचे तीन-चार दिवस सोडले, तर कायम पाळली. त्यांना असलेलं व्यवसायाचं भान हेदेखील अत्यंत शिकण्यासारखं होतं. मनोरंजन क्षेत्र हे अत्यंत अस्थिर क्षेत्र आहे. या क्षेत्रात महिन्याला ठाम उत्पन्न मिळेलच याची शाश्वती नसते. अशा वेळेस सतत कार्यरत राहण्यासाठी तुमची कशाची तयारी असली पाहिजे, याचं त्यांना असलेलं भानही शिकण्यासारखं होतं.


vivek

मनोरंजन क्षेत्र इतकं अशाश्वत आणि बेभरवशी असताना तुम्ही 65-70 वर्षांपूर्वी नोकरी सोडून यात पडण्याचा निर्णय कसा घेतला? हा प्रश्न आम्ही तरुण कलाकारांनी त्यांना अनेकदा विचारला. त्यावरचं त्यांचं उत्तर हे खरोखरच प्रत्येकाने आचरणात आणण्यासारखं आहे. ते म्हणाले की, “मी बायकोची परवानगी घेऊनच या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर मी माझे खर्च कमी केले. मला ज्यात आनंद मिळतो ते करायचं असेल, तर माझी हौस मला कमी करावी लागेल. त्याबदल्यात मला काही गोष्टी मिळणार नाहीत, हे स्वीकारावं लागेल हे मला माहीत होतं. मी जेव्हा ठरवलं की आपल्याला हाच व्यवसाय करायचा आहे, तेव्हा आहे त्या पैशात मी निगुतीने संसार केला.”


अण्णा स्वभावाने अत्यंत खट्याळ होते. त्यामुळे ते प्रस्थापित आणि आम्ही नवोदित ही आमच्यातली दरी त्यांनी स्वत: कमी केली. कायम आमच्याशी मित्राप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न केला. अगदी काही दिवसांपूर्वी माझं ‘खरं खरं सांग’ हे नाटक पाहायला ते गडकरीला आले. सध्याचे तरुण काय करतात, काय लिहितात याबद्दल त्यांना फार कुतूहल असायचं. त्यामुळे त्यांनी अशी अनेक नाटकं, चित्रपट आवर्जून पाहिले. नट म्हणून आपली बुद्धी आणि वाचा या दोन्ही गोष्टी नीटच असल्या पाहिजेत, हा धडा त्यांनी आम्हाला कायम दिला. अगदी चार-पाच महिन्यांपूर्वीपर्यंत ते व्यायाम म्हणून दररोज एक तास पोहत असत. आम्ही हैदराबादला असताना रोज पहाटे उठायचे, भिजवलेले बदाम न चुकता खायचे, ठरावीक व्यायाम करायचे. तो त्यांच्या शिस्तीचा भाग होता. ते स्वत: तर असं वागायचेच, तसंच आम्हालाही उठवायचे. कलाकाराने वेळेवर उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तब्येत चांगली राखली पाहिजे हे त्यांचं ठाम मत होतं. आपल्याला जो प्रयोग करायचा आहे, त्याची एकतरी तालीम केल्याशिवाय रंगमंचावर उभं राहायचं नाही, हे व्रतही त्यांनी आजन्म पाळलं.

त्यांना ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘तुझे आहे तुजपाशी’ अशा अनेक नाटकांचे उतारेच्या उतारे तोंडपाठ होते. केवळ आपल्या भूमिकेचे नाही, तर समोरच्याचेही संवाद त्यांना पाठ असत. चित्रीकरण झाल्यानंतर त्यांना आम्ही अनेकदा ते म्हणून दाखवण्याचा आग्रह करायचो आणि तेही उत्तम मैफील रंगवायचे. केवळ उतारेच नव्हेत, तर त्यांना अनेक श्लोक, निरनिराळी स्तोत्रंही पाठ होती आणि भाषेवरील-वाचेवरील प्रभुत्व कायम राहावं, म्हणून ते ती स्तोत्रं आवर्जून म्हणत असत. एखादा कलाकार आपल्या कामाप्रती किती समर्पित आणि स्वयंशिस्तीचा असू शकतो, याचंच हे एक उदाहरण होतं. अनेक गोष्टींची खंतही ते व्यक्त करत. गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात इव्हेंटचा ट्रेण्ड आहे. त्याच्या तुम्ही सर्व कलाकार एकत्र तालमी का करत नाही? असं ते कायम विचारायचे. तालमींबाबत कलाकार गंभीर नसणं त्यांना फार खटकायचं.


अण्णांचं गंभीर आणि विनोदी अशा दोन्ही स्वरूपाचं काम आम्हाला सुदैवाने पाहता आलं. तल्लख बुद्धी, उत्तम वाचा आणि वेळ पाळणं या तीन तत्त्वांच्या आधारे त्यांनी आयुष्यभर वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. कितीही हिंदी-मराठी मालिका, चित्रपट केले, तरी नाटकावर त्यांचं निरतिशय प्रेम होतं. म्हणून एखाद्या लहानशा भूमिकेसाठीही त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीपर्यंत पुणे-मुंबई प्रवासही केला. स्टेजवर भूमिका करण्यापलीकडे त्या भूमिकेसाठी पूर्वतयारी करणं, त्यासाठी प्रवास करणं, सहकलाकारांचा सहवास, त्यांच्याशी गप्पा मारणं हे सारंच त्यांच्यासाठी आनंददायक होतं. या आनंदासाठीच ते आयुष्यभर जगत आले. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या रंगमंचीय कर्तृत्वाची दखल खूप आधीच घेतली जायला हवी होती, असं मात्र अनेकदा वाटून जातं. त्यांचं जाणं ही माझ्यासाठी फार मोठी वैयक्तिक हानी आहे, माझ्यावर आयुष्यभर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं. ही पोकळी भरून निघणं कठीण आहे.

 
पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’चा रंगमंचीय आविष्कार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या काळात साकारला. पुढे त्यावर खासगी वाहिनीवर मालिकाही झाली. वन रूम किचननंतर 2013 साली व्यक्ती आणि वल्ली नाटकात आम्ही पुन्हा एकदा एकत्र काम केलं. हरीतात्या आणि अंतू बर्वा अशी दोन पात्रं त्यांनी या नाटकात अनेक वर्षं साकारली. त्यांनी साकारलेला अंतू बर्वा आजही लोकांच्या लक्षात राहिलाय. ते पात्र त्यांनी इतकं बेमालूम साकारलं की पुलंचा अंतू बर्वा आणि त्याच्या एकूणच व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेताना, अंतू बर्वाची रेकॉर्ड ऐकताना अण्णांचाच चेहरा डोळ्यासमोर यावा.
  
 
vivek
 
अण्णांना मी कधीही रिकामं बसलेलं किंवा निराश झालेलं पाहिलेलं नाही. काम नाही म्हणून घरात बसलेत आणि त्याबद्दल तक्रार करत आहेत, रडगाणं गात आहेत असं कधी झालंही नाही. अर्थात ते सतत काही ना काही करत असायचे. नाटक नसेल तर मालिका, कधीतरी डबिंगदेखील करायचे, पण सतत बिझी असायचे आणि ते त्यांना आवडायचं. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी भूमिकेच्या लांबीचा विचार कधीही केला नाही. आलेलं काम व्यवस्थित करण्याकडे त्यांचा कल असायचा. अगदी काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘जावई माझा भला’ नाटकातही त्यांची अगदी छोटी भूमिका होती. वास्तविक त्यांची नाट्यक्षेत्रातील कारकिर्द अत्यंत प्रदीर्घ होती. पण म्हणून मी लहान भूमिका करणार नाही वगैरे भाव त्यांच्या वागण्याबोलण्यात कधीही आला नाही. भूमिका पूर्ण लांबीची असो वा अगदी छोटी, आपलं काम शंभर टक्के आणि प्रेक्षकांवर छाप सोडणारं करायचं, हाच त्यांचा कायमचा प्रयत्न असे. त्या भूमिकेत स्वत:चा वेगळेपणा कसा ठसवायचा, हे त्यांना नेमकं माहीत होतं. अर्थात हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो की दिग्दर्शकांना अण्णांचं कॅलिबर माहीत होतं. त्यामुळे त्यांना विचारली जात असलेली छोटीशी भूमिकाही नाटकात महत्त्वाची असायची आणि ती ते अगदी हमखास चांगली वठवू शकत असल्यानेच विचारली जात असे.
 
 
ते फार समर्पित अभिनेते होते. माइक चांगले चालत आहेत का, प्रेक्षक किती आहेत, नाटकाची जाहिरात किती झाली आहे, किती प्रेक्षक आपल्या सह्या घ्यायला येत आहेत याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसे. आपलं काम नीट करावं हेच त्यांना माहीत होतं. मला आजही वन रूम किचनमधला त्यांनी साकारलेला इस्टेट एजंट, अंतू बर्वा आणि विशेष उल्लेखनीय म्हणजे एकच प्यालामधील तळीराम या भूमिका विशेष लक्षात राहिल्या आहेत. चंद्रकांत कुलकर्णींनी 2009 साली नाट्यछटांतून नाट्यक्षेत्राचा प्रवास दाखवणारा एक आगळावेगळा प्रयोग केला होता. 24 कलाकार एकेका पात्राच्या माध्यमातून हा प्रवास पुढे न्यायचे. त्याची सुरुवातच अण्णांच्या तळीरामपासून होत असे. आम्ही सहकलाकारही त्यांचं ते काम स्तब्ध होऊन पाहत असू, इतक्या उंचीवर त्यांनी ते पात्र नेलं होतं. सहकलाकार म्हणून त्यांचा हृद्य अनुभव होताच, पुढे हर्बेरिअमच्या निमित्ताने ‘लहानपण देगा देवा’ नाटकात मी निर्मात्याच्या आणि ते अभिनेत्याच्या भूमिकेत होते. नातं बदललं होतं, पण त्यांनी कधीही त्याचा बाऊ केला नाही किंवा त्यांचा वागण्यातला साधेपणाही बदलला नाही.
 
 
नाटकाच्याही पलीकडे अण्णांचं अस्तित्व माझ्यासाठी अत्यंत मोलाचं आणि जवळचं राहिलंय. ते अतिशय सहृदय होते, खेळकर वृत्तीचे होते, अत्यंत संवेदनशील होते. एखादा यशस्वी कलाकार हा रंगभूमीवर वावरताना वेगळा आणि समाजात वावरताना वेगळा असू शकतो. एखाद्या यशस्वी नटाने अभिनयापलीकडे जसं असायला हवं, तसे अण्णा होते. रंगभूमीला ग्लॅमरचं वलय प्राप्त होण्याच्या कालखंडात आपली कारकिर्द सुरू केलेली असल्याने त्यांच्याही व्यक्तिमत्त्वावर त्याचा आजन्म प्रभाव राहिला. ते सामान्य माणसाप्रमाणे सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत, लोकांशी नेटकेपणे बोलत. साधेपणा हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं, जे त्यांनी आजन्म व्रतस्थपणे जपलं. आताही अण्णा सावरकर या जगात नाहीत असं मला वाटत नाही. नेहमीप्रमाणे ते कुठल्यातरी कामात बिझी असतील, अचानक कधीतरी भेटतील, मनमोकळ्या गप्पा मारतील असंच वाटत राहतं.
 
शब्दांकन : मृदुला राजवाडे

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.