गणपतीच्या नैवेद्याचे खास कोकणी पदार्थ

विवेक मराठी    14-Sep-2023   
Total Views |

kokan
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव आहे. याच काळात कोकणात प्रचंड मोठी उलाढाल होत असते. त्यामध्ये गणपतीच्या नैवेद्यासाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांचा वाटा अर्थातच फार मोठा असतो. आजवर मुंबई-पुण्यातून येणार्‍या या पदार्थांची जागा आता कोकणातील स्थानिक उद्योजकांनी घेतली आहेच, तसेच हे पदार्थ कोकणाची गरज भागवून मुंबई-पुण्यातही जात आहेत. अशा मोजक्या उद्योजकांचा परिचय.
 
गणपती आणि कोकण यांचं नातं तसं खूप जवळचं आहे. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वांत मोठा उत्सव आहे. म्हणूनच मुंबई, पुणे किंवा अन्यत्र असलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी हमखास आपल्या गावी पोहोचतात. गणेशोत्सवाच्या काळातच कोकणात प्रचंड मोठी उलाढाल होत असते. त्यामध्ये गणपतीच्या नैवेद्यासाठी वापरल्या जाणार्‍या पदार्थांचा वाटा अर्थातच फार मोठा असतो. मोदक हे गणपतीचं सर्वांत आवडतं खाद्य असतं. मात्र अनेक वर्षं कोकणातल्या गणपतीच्या नैवेद्यासाठी लागणारे मोदक मुंबई-पुण्यातून कोकणात चाकरमानी आपल्याबरोबर घेऊन येत असत. मोदकाचा आकार तोच ठेवत काजू, आंबा, चॉकलेट, सुकामेवा इत्यादींचे वैविध्यपूर्ण पद्धतीने तयार केलेले मोदक असत. मोदकाच्या आतल्या सारणाचं वैविध्य लक्षणीयरित्या बदललं आहे. अन्य विविध स्वादांच्या मोदकांचा भरणा असे, पण गेल्या काही वर्षांपासून गणपतीच्या नैवेद्यासाठी लागणारा सर्वांत महत्त्वाचा पदार्थ कोकणातच मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. रत्नागिरीत मोदकाला, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोदकाच्या बरोबरीने करंजीलाही तितकंच महत्त्व असतं. या पदार्थांची निर्मिती आणि विक्री केवळ कोकणातच होते असं नाही, तर ती मुंबई-पुण्यातही मोठ्या प्रमाणावर होते, हे विशेष. रत्नागिरी आणि परिसरात तर ताजे, उकडीचे, अल्पायुषी असलेले मोदक तयार करून मागणीनुसार पुरविले जातात. संगमेश्वरमधले खोबर्‍याचे मोदक हे आणिक एक वैशिष्ट्य आहे.
 


kokan 
 गणेश अ‍ॅग्रो टूरिझमचे गणेश रानडे (संपर्क क्रमांक - 9226340546) उकडीचे तयार मोदक
गणपती आला म्हणजे मोदक आलेच. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जशी गणपतीच्या पूजेने होते, तशीच गणपतीच्या खाऊची ओळखही मोदकापासूनच होते. तांदळाच्या पिठाची उकड घेऊन त्याची कणीक मळून त्याच्या हातावर गोलाकार पार्‍या करून त्यामध्ये भरलेलं ओल्या नारळाचं गोड सारण म्हणजे मोदक. गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत घराघरांमध्ये असे मोदक बनवले जातात. पण अलीकडे महिलाही नोकरीधंद्यासाठी घराबाहेर पडल्या आहेत. त्यांना ते सगळं सांभाळून उकडीच्या मोदकांचा घाट घालणं शक्य होत नाही. ही गरज लक्षात घेऊन नाटे (ता. राजापूर) इथल्या गणेश अ‍ॅग्रो टूरिझमचे गणेश रानडे (संपर्क क्रमांक - 9226340546) उकडीचे तयार मोदक उपलब्ध करून देत आहेत. हे मोदक अगदी घरी तयार केल्यासारखेच असतात. रानडे अ‍ॅग्रो टूरिझममध्ये येणार्‍या पर्यटकांना खास कोकणी पदार्थ म्हणून उकडीचे मोदक देत असत. या पर्यटकांमध्ये रत्नागिरीचे पर्यटकही असत. रत्नागिरीत रानडे यांनी पितांबरी शॉपी सुरू केल्यानंतर रत्नागिरीतल्या या पर्यटकांनी रानडे यांच्याकडे उकडीच्या मोदकांचा आग्रह धरला. तसे मोदक देता येतील का, असा विचार सुरू असतानाच रानडे यांच्या पुण्यात राहणार्‍या मावशी ज्योती गोडबोले यांनी रानडे यांना प्रोत्साहन दिलं. ज्योती गोडबोले यांचा पुण्यात उकडीच्या मोदकांचाच व्यवसाय आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत त्यांच्याकडे एक लाखापेक्षा अधिक मोदक विकले जातात. गणपतीच्या पहिल्या दिवशी तर 25 हजारांहून अधिक मोदकांची मागणी असते. उकडीच्या मोदकांना असलेली ही मागणी लक्षात घेऊनच त्यांनी आपल्या भाच्याला उकडीचे मोदक तयार करायला प्रवृत्त केलं. प्रोत्साहन दिलं. शिवाय रत्नागिरीच्या ग्राहकांची मागणी होतीच. तिला प्रतिसाद म्हणून रानडे यांनी 2020पासून रत्नागिरीत उकडीचे ताजे मोदक पुरवायला सुरुवात केली. दर महिन्याला संकष्टीला, विनायकीला आणि मंगळवारी मोदकांची मागणी वाढू लागली. हॉटेलांकडून, मंगल कार्यालयांकडूनही मागणी येऊ लागली. रानडे मोदक, सोलकढी आणि पुरणपोळी पुरवितात. त्यातल्या मोदकांना अधिक मागणी असते. कारण मोदक तयार करणं हे तसं कष्टाचं काम असतं. शिवाय ते ताजेच खावे लागतात. ते दुसर्‍या दिवशीपर्यंतही टिकत नाहीत. सध्या 20 रुपये नग या दराने मोदकांची विक्री होते. घरीच तयार केलेल्या या मोदकांचा मागणीनुसार पुरवठा केला जातो. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुमारे दोन हजार मोदकांची मागणी असते. या वर्षी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन रानडे सज्ज आहेत.
 
 
kokan
 
सुनील घडशी (संपर्क क्रमांक 7719016566) नारळाचे मोदक

मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरपासून दोन किलोमीटर अंतरावर माभळे गाव लागतं. या गावात सुनील घडशी (संपर्क क्रमांक 7719016566) यांचं ‘गणेश कृपा’ नावाचं उपाहारगृह आहे. खोबर्‍याच्या विशिष्ट प्रकारच्या मोदकांसाठी ते प्रसिद्ध झालं. घडशी यांची आई सुमारे पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत खोबर्‍याच्या वड्या तयार करत असे. तिच्याकडून प्रेरणा घेऊन घडशी यांनी नारळाचे मोदक तयार करायला सुरुवात केली. या मोदकांमध्ये सारण म्हणून खोबरं वापरलं जात नाही, तर संपूर्ण मोदकच खोबर्‍याचा असतो. स्वाद म्हणून आंब्यासारख्या स्थानिक फळांबरोबरच अन्य फळांचा रस वापरला जातो. त्यामुळे मोदकांचा रंगही त्या त्या फळाप्रमाणे आकर्षक होतो. गेली 14 वर्षं सतत असे मोदक नेहमीच तयार केले जातात. त्यामध्ये कृत्रिम रंग वापरला जात नाही. किवीच्या फळाचा रंग हिरवा असतो. चॉकलेटसाठी बोर्नव्हिटा वापरला जातो. तो तो रंग मोदकांना येतो. तसंच प्रिझर्व्हेटिव्हचा वापरही होत नाही. तरीही हे मोदक 10 ते 12 दिवस टिकून राहतात. या मोदकांसाठी ओलं खोबरं लागतं. असे दररोज सुमारे 500 नारळ लागतात. गणपतीच्या दिवसांत रोज दोन हजार नारळही लागतात. मोदक तयार करण्याच्या या उद्योगामुळे सुमारे 25 मुलींना नियमित रोजगार मिळाला आहे. सध्या 320 ते 350 रुपये किलो दराने मोदक विकले जातात. एका किलोत 24 मोठे किंवा छोटे 32 मोदक असतात. कोकणातले सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले भागातले मुंबईत लालबाग, परळ, भांडुप भागात स्थायिक झालेले ग्राहक मोठ्या प्रमाणावर मोदक मागवतात. त्यांचं प्रमाण सुमारे 80 टक्के आहे. त्यांना अ‍ॅमेझ़ॉनसारख्या माध्यमातून मोदक पुरविले जातात. याशिवाय व्हर्जिन कोकोनट ऑइल, नारळपाणी, व्हिनेगर तयार केलं जातं. त्यालाही मागणी असते.
 
 
kokan
 
कोकणात, त्यातही रत्नागिरीत आल्यानंतर स्थानिक खाद्यपदार्थांसाठी आवर्जून नाव घेतलं जातं, ते योजकचं. योजकची उत्पादनं म्हणजे कोकणचा अस्सल मेवाच असतो. आंबा, काजू, करवंद, कोकम अशा कोकणातल्या फळपिकांवरच आधारित प्रक्रिया करण्याचा उद्योग नाना भिडे यांनी सुमारे 45 वर्षांपूर्वी सुरू केला. आता त्याचा चांगलाच विस्तार झाला आहे. मात्र तो करताना स्थानिक फळांवरच प्रक्रिया करण्याचा मूळ उद्देश पुढे नेण्याचं व्रत पुढच्या पिढीने कसोशीने सांभाळलं आहे. नानांच्या स्नुषा आणि योजक फूड अँड बेव्हरेजेस प्रा.लि. कंपनीच्या संचालिका दया भिडे (संपर्क क्रमांक 9423877599) या कंपनीचा कारभार समर्थपणे सांभाळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आठ रिटेल काउंटर सुरू करण्यात आले आहेत, तर राज्यभरात कंपनीने पाच सुपर स्टॉकिस्ट नेमले आहेत. बाहेरच्या उद्योगांचे घाऊक विक्रेते कोकणात असतात. पण कोकणातल्या उत्पादनांचे विक्रेते राज्यभरात नेमण्याएवढी मजल योजक फूड्सने मारली आहे. अर्थातच दर्जा आणि कोकणातल्या स्थानिक मालावर प्रक्रिया केलेली उत्पादनं हेच या उद्योगाचं वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवासाठी खास आणि केवळ आंबा मोदक तयार केले जातात. श्रावण महिन्यापासूनच त्यांची तयारी केली जाते. मोदकांसाठी अस्सल आंब्याचाच वापर केला जातो. इतर कोणत्याही प्रकारचे मोदक केले जात नाहीत. प्रत्येकी 11 आणि 21 मोदकांची पाकिटं विकली जातात. विशेष म्हणजे राज्यभरात सर्वत्र एकाच किमतीला पदार्थ विकले जातात. वेगवेगळ्या गावात वेगवेगळी किंमत लावली जात नाही. त्यामुळे ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.
 
 kokan
 
याशिवाय गणपतीसाठी म्हणून सुकं खोबरं, पिठीसाखर, वेलची घालून खास खिरापत तयार केली जाते. कोकणात गणपती पाहायला येणार्‍यांना तोच प्रसाद दिला जातो. प्रसादासाठी म्हणून खास बुंदी लाडूही तयार केले जातात. बेदाणे, खजूर इत्यादींचा वापर करून पारंपरिक पंचखाद्यही तयार केलं जातं. हरितालिकेच्या उपवासासाठी आंबा पोळीला, फणस पोळीलाही चांगलीच मागणी असते. महिलांसाठी मोदक पीठ तयार केलं जातं. गेल्या वर्षीपासून योजकने आंबा पेढा बाजारात आणला आहे. त्यालाही चांगली मागणी आहे. नैसर्गिक स्वरूपात सर्व माल वापरला जातो. कोणत्याही स्वरूपात भेसळ केली जात नाही. त्यामुळे सर्वच पदार्थांचा टिकाऊपणा वाढतो आणि साहजिकच मागणीही वाढत जाते. गोळप इथल्या कारखान्यात सर्व पदार्थ तयार केले जातात. या निर्मिती प्रक्रियेमुळे परिसरातल्या सुमारे 70 ते 80 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. महिलाच चालविणार असलेल्या जिल्ह्यातल्या पहिल्या संजीवन हेल्थ फूड प्रा.लि. कंपनीचं सूतोवाचही योजक फूड्सने केलं आहे. स्थानिक स्वरूपात मोदकांची आणि लाडवांची निर्मिती करणारा मोठा उद्योग पुराणिक फूड्स या नावाने सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) इथेही सुरू झाला आहे. सुमारे 12 वर्षांपूर्वी बाळ पुराणिक (संपर्क क्रमांक - 9422436147) यांचा हा उद्योग सुरू झाला. गणेशोत्सवात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि गोव्यात मोदकांबरोबरच करंजीला मोठी मागणी असते. ती हेरून पुराणिक फूड्समध्ये गुळाची आणि साखरेची करंजी तयार केली जाते. सध्या 15 रुपये दराने करंजीची विक्री होते. याशिवाय गेली चार वर्षं दोन प्रकारचे विशेष मोदक तयार केले जाता. मँगो कोकोनट म्हणजे आंबा खोबरं मोदक हा त्यातील एक प्रकार. ओल्या नारळाचं खोबरं, हापूस आंब्याचा रस आणि गूळ वापरून कोणतंही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता हे मोदक तयार केले जातात. प्रत्येकी 11 आणि 21 मोदकांचं पाकीट 60 रुपयांपासून 150 रुपये दराने विकलं जातं. याशिवाय ड्राय फ्रूट शुगरफ्री मोदक ही पुराणिक फूड्सची खासियत आहे. त्यामध्ये साखर किंवा गूळ वापरला जात नाही. काजू, खजूर, बेदाणे, बदाम, अंजीर, शेंगदाणे वापरून केले जाणार्‍या या मोदकांनाही मुंबई, पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि गोव्यातही मोठी मागणी असते. ती पुरविण्यासाठी गणपतीच्या आधी दोन महिन्यांपासून तयारी करावी लागते. अनेकदा मागणी पूर्ण करणं शक्य होत नाही, असं पुराणिक यांनी सांगितलं. स्थानिक मिठाईवाल्यांना आणि दुकानांनाही पुरवठा केला जातो.
  
 
पावसाळ्याच्या दिवसांत मोठ्या हिरव्या आणि पांढर्‍या सालीच्या दुधीभोपळ्याच्या आकाराच्या काकड्या भरपूर प्रमाणात आणि स्वस्त मिळतात. याच काकडीपासून गौरींकरिता एक चविष्ट गोड पदार्थ बनवला जातो, ज्याला काकडीचं सांदण असं म्हणतात. मनगणं हा गोव्यातला आणि कोकणातला पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. पंचखाद्य हाही खिरापतीचाच एक प्रकार असतो. फक्त सुक्या खोबर्‍याऐवजी त्यात ओलं खोबरं वापरतात. चुरमुर्‍याचे लाडू, गुळाचे लाडू हे सारं आता गावागावांमध्ये तयार स्वरूपात मिळू लागलं आहे. त्यामुळे गावागावांमध्ये रोजगार तर निर्माण होत आहेच, त्याचबरोबर प्रत्येक बाबीसाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्थानिक स्वरूपातच पदार्थ तयार करणं आणि विकणं याकडे कल वाढू लागला आहे.
 

प्रमोद कोनकर

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार आहेत...