श्रद्धा, विज्ञान आणि समाजमाध्यमे

विवेक मराठी    29-Sep-2023   
Total Views |
नवबौद्ध बांधव धम्मदीक्षा घेतल्यानंतर गणेशोत्सव साजरा करत होते. समाजमाध्यमे हाताशी आली आणि ही गोष्ट सार्वत्रिक झाली. मग स्वयंघोषित धम्मरक्षक याच समाजमाध्यमांतून आपल्या बांधवांना धम्मद्रोही ठरवू लागले. समाजमाध्यमे विज्ञानाच्या आधारे चालतात. या विज्ञानाचा उपयोग श्रद्धाजागृती करण्यासाठी करायचा की श्रद्धाळूंवर प्रहार करण्यासाठी करायचा, या गोष्टीचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.

vivek
 
दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गणपतीबाप्पा परत गेले ते पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आश्वासन देऊनच. सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन्ही प्रकारच्या गणेशोत्सवांमुळे मागील काही दिवस आनंदाला आणि उत्साहाला उधाण आले होते. वर्षभरात ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडत असतात, त्याचे प्रतिबिंब सार्वजनिक गणेशोत्सवात सजावटीच्या, देखाव्याच्या माध्यमातून उमटत असते. या वर्षी बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सवांत चंद्रयान 3 या विषयावर चलचित्र देखावे साकारले होते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी असे देखावे केले, तर एकवेळ समजू शकते; पण शहरापासून, सोईसुविधांपासून दूर असणार्‍या छोट्या छोट्या खेडेगावांतही घरगुती गणेशोत्सवात चंद्रयान 3चे देखावे करण्यात आले होते. आपल्या ठिकाणी जे उपलब्ध होते, त्याच्या आधारे हे देखावे तयार केले गेले. अगदी झाडूभोवती कागद गुंडाळून रॉकेट म्हणून त्याचा उपयोग केला गेला. हे कशामुळे झाले? यामागची प्रेरणा काय? याचा शोध घेताना असे लक्षात येते की आज जिथे पक्के रस्ते, दळणवळणाची साधने पोहोचली नाहीत, तिथे समाजमाध्यमे पोहोचली आहेत. भ्रमणध्वनीवर विविध प्रकारच्या माहितीचा महापूर आलेला असतो व समाजमनावर याचा नक्कीच परिणाम होत असतो, याचे हे उदाहरण आहे. समाजमाध्यमातून मिळणारी माहिती, तिची होणारी देवाणघेवाण आणि त्यातून होणारी भावजागृती काय असते, हे या देखाव्यांच्या माध्यमातून लक्षात आले. 23 ऑगस्ट रोजी चंद्रयान 3 मोहीम यशस्वी झाल्याची घोषणा झाली आणि त्यानंतर समाजमाध्यमांतून भारत गौरवाची मोठी लाट उसळली. ‘हे यश केवळ इस्रोच्या संशोधकांचे नसून मीही या यशामध्ये भागीदार आहे, कारण हे यश माझ्या देशाने प्राप्त केले आहे आणि मी या देशाचा नागरिक असल्याने हे यश माझे आहे’ असा राष्ट्रीय भाव या काळात समाजमाध्यमांवर अनुभवता आला आणि तोच भाव सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाच्या देखाव्यांच्या रूपाने प्रकट झाला. समाजमाध्यमे अशी प्रभावशाली आहेत की विघ्नहर्ता श्रीगजाननासमोर आपले राष्ट्रीय यश प्रदर्शित करण्यासाठी प्रेरणा जागृत करतात. या निमित्ताने व्यक्तिकेंद्री विषयाकडून राष्ट्रकेंद्री विषयाकडे समाजाची वाटचाल झाली, याचे सर्वाधिक श्रेय समाजमाध्यमांना दिले पाहिजे.
 
याच गणेशोत्सवाच्या काळात ‘गणपती का बसवला? गणपतीचा आपला संबंध काय?‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच संदेश दिला होता का? असे जाब विचारणारे नवे आणि जुने व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रदर्शित केले गेले. 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेताना आपल्या अनुयायांना बावीस प्रतिज्ञा दिल्या. तोच संदर्भ घेऊन जे नवबौद्ध गणेशोत्सव साजरा करतात, आपल्या घरी श्रीगणेशाची स्थापना करतात अशांना जाब विचारण्याचे, धमकावण्याचे काम काही लोक करतात आणि ते व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रदर्शित करून एक प्रकारची सेन्सॉरशिप प्रस्थापित करू पाहतात. घरी गणपती बसवला म्हणून काही वर्षांपूर्वी अभिनेता भाऊ कदम यांना जाहीर माफी मागावी लागली आणि त्या निमित्ताने जगाला भाऊ कदम यांची जन्म जात कळली. मागील काही वर्षांपासून असे प्रकार सातत्याने घडत असतात. या वर्षीही अशा प्रकारचे दोन-तीन व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाले. स्वाभाविकपणे अशा प्रकारच्या व्हिडिओंवर कोणती प्रतिक्रिया द्यायची हा प्रश्न होता. बर्‍याच वेळा ज्याने घरी गणपती आणला, त्याला जातीबाहेर करण्यापासून ते गलिच्छ शिवीगाळ करण्यापर्यंत समाजबांधव विविध प्रकारे व्यक्त होत असत. या वर्षी मात्र व्यक्त होताना समाजबांधवांनी जाब विचारण्याचा पवित्रा घेतलेला दिसून आला. सुजात आंबेडकर यांचे गणपतीची आरती करतानाचे छायाचित्र प्रदर्शित करत विचारले गेले, ‘यांचे चालते, मग आमचे का नको?’ समाजात ताणतणाव निर्माण करणार्‍या व्यक्तीसाठी आणि संस्थेसाठी हा जाब असला, तर त्याचा आपण सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा का दिल्या? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्याचप्रमाणे बावीसपैकी एका प्रतिज्ञेचा आग्रह धरताना अन्य एकवीस प्रतिज्ञांचा अंगीकार कशा प्रकारे होतो? या गोष्टीचा गणपतीला विरोध करणार्‍या बांधवांनी विचार करायला हवा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बौद्ध धम्माचा अंगीकार केला, तो बौद्ध धम्म महाराष्ट्राच्या बाहेर कसा आहे? भारतात जन्मलेल्या आणि अन्य राष्ट्रांत पसरलेल्या बौद्ध धम्माची स्थिती काय आहे? तिबेट, ब्रह्मदेश, जपान, चीनमधील बौद्ध धम्मात गणेश ही देवता पूजली जाते. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा देताना काही निश्चित विचार केला होता. ‘माणसाला भाकरीइतकीच धर्माची गरज आहे’ असे म्हणणारे बाबासाहेब बावीस प्रतिज्ञा देण्याची टोकाची भूमिका का घेतात, हे समजून घेतले पाहिजे. ती सर्व समाजबांधवांची जबाबदारी आहे.
 
श्रद्धा ही हरळीच्या मुळासारखी असते. तिला अनुकूल वातावरण मिळाले की ती ओसंडून वाहू लागते. नवबौद्ध बांधव धम्मदीक्षा घेतल्यानंतर गणेशोत्सव साजरा करत होते. समाजमाध्यमे हाताशी आली आणि ही गोष्ट सार्वत्रिक झाली. मग स्वयंघोषित धम्मरक्षक याच समाजमाध्यमांतून आपल्या बांधवांना धम्मद्रोही ठरवू लागले. समाजमाध्यमे विज्ञानाच्या आधारे चालतात. या विज्ञानाचा उपयोग श्रद्धाजागृती करण्यासाठी करायचा की श्रद्धाळूंवर प्रहार करण्यासाठी करायचा, या गोष्टीचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.