यशस्वी अवकाश झेपेसाठी साने ब्रदर्सच्या फ्रिक्शन रिंगची कामगिरी

विवेक मराठी    09-Sep-2023   
Total Views |
Aditya L1 Mission Highlights
ऑगस्ट महिन्यात चंद्रयान-3चे चंद्रावर यशस्वीपणे सॉफ्ट लँडिंग झाले. या महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण जगातील आबालवृद्धांचे, तज्ज्ञांचे लक्ष लागून राहिले होते. भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला, त्या वेळी अनेकांचे मदतीचे हात त्या पर्वताला लागले होते. अगदी त्याचप्रमाणे या मोहिमेत भारताच्या विविध प्रांतांतील वेगवेगळ्या कंपन्यांचे, संस्थांचे सक्रिय योगदान होते. ठाण्याच्या साने ब्रदर्स यांचाही यात मोलाचा वाटा होता. त्यांनी तयार केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा फ्रिक्शन रिंगचा वापर चंद्रयानात करण्यात आला होता. याबद्दल साने ब्रदर्सचे सुरेश साने यांच्याशी झालेला हा वार्तालाप.
दि. 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान-3चे चंद्रावतरण झाले. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित उतरले आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल टाकणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. चंद्रयान-3ने चंद्रावर उतरल्यानंतर आपल्या जबाबदार्‍या सुनिश्चित वेळेत व्यवस्थित आणि सुस्थितीत पार पाडल्या असून चंद्रावरील तापमानासह अनेक प्रकारची माहितीही इस्रोला पुरवली. चंद्रयान-2 अगदी अंतिम टप्प्यात आल्यानंतर निराशेचा धक्का देऊन गेल्याने चंद्रयान-3 या मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा या इस्रोच्या म्हणजे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या या मोहिमेत अनेक परिचित-अपरिचितांचे मोलाचे योगदान होते. अनेक तज्ज्ञांचे हात या मोहिमेला लागले होते. ठाण्यातील साने ब्रदर्स यांनी तयार केलेल्या, आकाराने बांगडीसारख्या किंवा कड्यासारख्या दिसणार्‍या छोट्याशा पण अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘फ्रिक्शन रिंग्स’चा वापर चंद्रयानाच्या विकास इंजिनात करण्यात आला होता. याबद्दल साने ब्रदर्सचे सुरेश साने यांनी माहिती दिली.
 
 

Aditya L1 
 
फ्रिक्शन रिंग म्हणजे अगदी छोट्याशा बांगडीसारखा दिसणारा एक धातूचा तुकडा. चंद्रयान मोहिमेत या फ्रिक्शन रिंगचे मोलाचे योगदान आहे. फ्रिक्शन रिंग म्हणजे नेमके काय आणि त्याचे महत्त्व काय? असे विचारले असता साने ब्रदर्सचे संचालक सुरेश साने म्हणाले की, “यानाच्या अगदी तळाशी ही धातूची फ्रिक्शन रिंग लावलेली असते. यान जेव्हा वरती जातं, तेव्हा त्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध बाजूस ऑर्बिटबाहेर म्हणजेच कक्षेबाहेर ढकलायला ही रिंग मदत करते. या रिंगचं काम फक्त 195 सेकंदाचं आहे. काम पूर्ण झालं की रिंग जळून पावडर होऊन खाली पडते. या रिंगचं वैशिष्ट्य हे तिच्यासाठी वापरलेल्या धातूशी नाही, तर त्याच्या पृष्ठभागाच्या गुळगुळीतपणाच्या अचूकतेशी संबंधित आहे. या स्टेनलेस स्टीलच्या रिंगचं हार्ड कोअर प्लेटिंग 50 ते 100 मायक्रॉन असावं लागतं. त्याचा कठीणपणा 900 ते 1100 मायक्रॉनचा असावा लागतो. ही विशिष्ट आकाराची रिंग यानाच्या तळाशी एका विशिष्ट पार्टला जोडली जाते. या रिंगचा फ्लॅटनेस म्हणजे सपाटपणा 0.0005 म्हणजे अर्धा मायक्रॉन असावा लागतो. 1 मिलिमीटरचे हजार भाग केले, तर तो एक भाग 1 मायक्रॉन इतका असतो - म्हणजे एका मिलिमीटरचा दोन हजारावा भाग. ही अचूकता साधणं हे आमच्यासमोरचं खरं आव्हान होतं. पण हा टप्पा गाठू शकलो, ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.‘’
 

 
Aditya L1
 
साने ब्रदर्सचे सुरेश साने पुरस्कार स्वीकारताना
 
साने ब्रदर्स यांनी या फ्लॅटनेसचे मोजमाप करण्यासाठी करण्यासाठी तब्बल 25 लाखांची मशीनची व्यवस्था करावी लागली. या मशीनवरची अचूकता 0.00002 इतकी आहे - म्हणजे अपेक्षित परिणामांच्या पंचवीस पट पुढे. या मशीनचे दर वर्षी कॅलिब्रेशन करावे लागते. इस्रोने त्यांना सुचवलेले मशीन जवळपास साडेतीन कोटींचे होते. पण त्यांनी आपल्याकडील मशीनमध्ये आवश्यक ते सगळे बदल करून पंचवीस लाखात त्याचे बजेट बसवले. सुरेश साने यांच्याच भाषेत सांगायचे, तर त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने ‘इंडियन जुगाड’ करून हे साध्य केले. फ्रिक्शन रिंगच्या उत्पादनाबद्दल अधिकची माहिती देताना ते म्हणाले की, “स्टेनलेस स्टील या धातूपासून ही रिंग तयार केली जाते. त्यानंतर ती ओव्हरसाइज असते, त्यामुळे तिचं ग्राइंडिंग केलं जातं. त्यानंतर तिच्यावर क्रोमिअम हार्ड प्लेटिंग केलं जातं. या प्रत्येक टप्प्याची तपासणी केली जाते. कारण त्या रिंगचा आकार आणि त्याची आवश्यक परिमाणं या सार्‍याच्या बाबतीत खूप अचूकता आणि नेमकेपणा गरजेचा असतो. प्लेटिंगनंतर पुन्हा एकदा ग्राइंडिंग केलं जातं. हा टप्पा खूप महत्त्वाचा असतो. यानंतर पुन्हा एकदा पडताळणी केली जाते. त्यानंतर हे वापरासाठी सज्ज होतं. वर उल्लेखलेल्या मशीनच्या आधारे एका विशिष्ट सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्याची अचूकता मोजली जाते. यासाठी निश्चित केलेल्या परिमाणांशी ते ताडून पाहिलं जातं. या मशीनला वातानुकूलित यंत्रणेत विशिष्ट तापमानावरच ठेवावं लागतं. कारण वातानुकूलन नसेल, तर ऊन-पाऊस याच्या परिणामामुळे हवेची घनता कमी-जास्त होते. त्याचा परिणाम निकालावर होऊ शकतो. त्यामुळे या सगळ्या मशीनना एसीची गरज लागते. साधारणत: एक मानवी केस चाळीस मायक्रॉनचा असतो. त्याचे ऐंशी भाग केले, तर त्यातील एका भागाइतकी अचूकता या फ्लॅटनेसमध्ये आम्ही मिळवून देतो.”
 

Aditya L1
 
या सगळ्या प्रक्रियेला जवळपास एक ते दीड वर्ष लागल्याचे ते सांगतात. या फ्रिक्शन रिंगचा अत्यंत अचूक आणि नेमका फ्लॅटनेस हेच साने यांच्या उत्पादनाचे वैशिष्ट्य होते. अत्यंत छोट्यात छोटा ओरखडा असेल, तरी त्यातून इंधन लीक होऊन यानाचा स्फोट होऊ शकतो, म्हणूनच हा फ्लॅटनेस आणि गुळगुळीतपणा अत्यंत महत्त्वाचा असतो.
 
 
2009पासून साने ब्रदर्स इस्रोशी संलग्न असून त्यांना वेगवेगळ्या प्रकल्पांत सक्रिय साहाय्य करीत आहेत. मंगळयान, चंद्रयान 1, चंद्रयान 2 व आता चंद्रयान-3 या मोहिमांत त्यांचा सहभाग होता. इस्रोच्या मोहिमांमध्ये प्रवेश मिळणे हेसुद्धा अत्यंत आव्हानात्मक असल्याचे साने नमूद करतात. ते सांगतात, “इस्रोसाठी काम करताना प्रचंड पेपरवर्क करावं लागतं. अनेक टप्पे पार पाडावे लागतात. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल इस्रो आपल्याला पुरवतं. तो बाजारातून आपण खरेदी करायचा नसतो. आपल्या उत्पादनाचं इस्रोच्या तज्ज्ञांच्या माध्यमातून टेस्टिंगही होतं व त्यानंतरच तो पार्ट त्यांना सुपुर्द केला जातो. आपल्या शास्त्रज्ञांना, तंत्रज्ञांना, उत्पादकांना वेगवेगळ्या प्रयोगांसाठी प्रोत्साहित करणं हे इस्रोचं खास वैशिष्ट्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इस्रोचं काम हे अंतराळाशी संबंधित अशा सैद्धान्तिक, संशोधकीय आणि प्रयोगशीलतेशी संबंधित असलं, तरी त्याला देशभक्तीचा सुवास आहे. तिकडचे अधिकारी अत्यंत नम्र असून देशाच्या प्रगतीसाठी ते काम करीत असतात. चंद्रयान-3ने चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर इस्रोने मेसेज करून आवर्जून आमचं अभिनंदन केलं.”
 

Aditya L1 
 
साने ब्रदर्स या कंपनीविषयीही त्यांनी माहिती दिली. सुरुवातीच्या काळात नोकरी केल्यानंतर सुरेश साने यांनी दत्तात्रेय साने आणि मधुकर साने या आपल्या बंधूंसह साने ब्रदर्स या कंपनीची स्थापना केली. शहापूर आणि आसनगाव येथे साने ब्रदर्सचे कारखाने असून ठाण्यात माजिवडा येथे ऑफिस आहे. आपला मूळचा विश्वकर्म्याचा पिंड असल्याचे ते सांगतात. त्यांच्या घराण्यात कोणत्याही खिळेजोडणीशिवाय उत्तम दर्जाच्या बैलगाड्या तयार करण्याचा व्यवसाय. ते घडवण्याचे व्रतच साने यांना नोकरीकडून व्यवसायाकडे घेऊन आले. साने ब्रदर्समध्ये डायमेकिंगचे काम केले जाते. डायमेकिंग म्हणजे यंत्राचा वा त्याच्या एखाद्या किंवा वेगवेगळ्या पार्टचा साचा (जसा मूर्तींचा साचा असतो) तयार केला जातो व त्यात तो विशिष्ट धातू ओतून तो पार्ट तयार होतो.
 
 
फ्रिक्शन रिंगच्या बाबतीतही उत्तम दर्जाचा डाय हेच वैशिष्ट्य होते. जितका अचूक ओरखडाविरहित डाय, तितकीच रिंगही अचूक तयार होण्याची खात्री, असे गणित असते. उत्तम दर्जाचे आणि दीर्घकाल सुस्थितीत वापरण्याजोगे डाय हे साने ब्रदर्सचे वैशिष्ट्य आहे. ऑटोमोबाइलसह अनेक क्षेत्रांत लागणार्‍या पार्ट्सचे डाय त्यांच्या कंपनीत तयार होतात. मंगलयान, चंद्रयानाप्रमाणे इस्रोच्या अनेक प्रकल्पांत त्यांचे योगदान आहे. 2013 साली मंगलयान यशस्वी झाल्यावर इस्रोने विशेष सुवर्णपदक देऊन साने यांना गौरवले आहे. 2015 साली जीएसएलव्ही 06च्या प्रक्षेपणानंतरही त्यांना पत्र देऊन विशेष कौतुक केले आहे.
 
 
Aditya L1
 
तरुणांमधील व्यावसायिकतेच्या व्हिजनबद्दल साने सांगत होते, “तरुणांनी व्यावसायिकतेकडे, मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राकडे वळलं पाहिजे. अर्थात गेल्या आठ-नऊ वर्षांत चित्र सकारात्मक होऊ लागलं आहे, हेही खरं आहे. विशेषत: मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, आत्मनिर्भर भारत या मोहिमांचा तरुणांवर चांगला प्रभाव आहे. पण हे प्रमाण वाढलं पाहिजे. इस्रोचं काम, अंतराळ विज्ञान याबद्दलही लोकांची उत्सुकता अधिक वाढली आहे, हे चांगलं लक्षण आहे. विशेषत: चंद्रयान 2 आणि 3 नंतर हे विषय अधिक चर्चेत येऊ लागले. डॉक्टर विक्रम साराभाईंचं यातील योगदान, तेव्हा इस्रोला मिळणार्‍या सोयीसुविधा ते थेट चंद्रयान-3बद्दल लोकांच्या मनातील जाणीवजागृती, इस्रोचे नवनवे प्रकल्प हे सारंच चित्र अत्यंत आश्वस्त करणारं आहे. आतातर आपण आदित्य एल 1चं देखील प्रक्षेपण केलंय. आदित्य एल 1च्या विकास इंजिनातही फ्रिक्शन रिंगचा वापर आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर, सतीश धवन स्पेस सेंटर, महेंद्रगिरी स्पेस सेंटर, ब्रह्मोस स्पेस सेंटर अशा विविध केंद्रांवर अव्याहत काम सुरू आहे. या अशा इस्रोच्या महत्त्वाच्या मोहिमेत आपलाही छोटासा वाटा आहे, ही भावना अत्यंत सुखावणारी असते.”
 
 
चंद्रयान, मंगलयान, आदित्य या इस्रोच्या मोहिमा म्हणजे खर्‍या अर्थाने जगन्नाथाचा रथ असतात. अनेक हात या रथाचा दोर ओढतात, तेव्हाच भगवान जगन्नाथाचा हा रथ मार्गक्रमण करतो. साने ब्रदर्सच्या फ्रिक्शन रिंगच्या माध्यमातूनही हेच मोलाचे कार्य होत आहे, असे नक्कीच म्हणता येईल.

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.