समन्वय व सुसंवादातून मंदिर निर्माण

विवेक मराठी    10-Jan-2024   
Total Views |
Ayodhya Ram Mandir 2024
श्रीरामजन्मभूमी मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. माजी आयएएस अधिकारी व श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम वायुवेगाने सुरू आहे. मिश्रा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कार्यकाळात पंतप्रधान कार्यालयात प्रधान सचिव होते. अनेक महत्त्वपूर्ण संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदार्‍या सक्षमपणे सांभाळणारे, 1967च्या बॅचचे आयएएस अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांची विशेष मुलाखत मागील नोव्हेंबर महिन्यात ‘एएनआय पॉडकास्ट विथ स्मिता प्रकाश’वर घेण्यात आली. या मुलाखतीवर आधारित संपादित लेख विवेकच्या वाचकांसाठी देत आहोत. श्रीराम मंदिराच्या निर्माणाची एकूण प्रगती, त्यातील विविध टप्पे, मंदिर उभारणीमागील व्हिजन, अयोध्येतील भाविकांसाठी करण्यात येणार्‍या सोयीसुविधा याचा आढावा यात घेतला गेला आहे.
श्रीरामजन्मभूमी मंदिरात लवकरच श्रीरामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. 500 वर्षांच्या संघर्षानंतर सर्वांचे लाडके रामलल्ला त्यांच्या मूळ स्थानी भव्य मंदिरात विराजमान होत आहेत. समस्त हिंदू समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. या श्रीरामजन्मभूमी मंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्ती साकारल्या आहेत. एका वेळेस तीन मूर्तींची निर्मिती केली जात आहे व त्यापैकी एका मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी 2024 रोजी केली जाणार आहे. जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात एक दिवस निश्चित करून ही मूर्ती शरयू तिरावर नेली जाईल. तेथून रामलल्ला एका रथातून अयोध्येतील महत्त्वाच्या प्राचीन मंदिरांना भेट देतील. अंतिमत: रामलल्लाचा रथ मंदिरात प्रवेश करेल व ही मूर्ती पवित्र गर्भगृहात ठेवली जाईल. 22 जानेवारी रोजी प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर भाविकांना रामलल्लाच्या मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीराम आणि रामभक्त यांचे भक्तिसंधान कायमचे बांधले जाईल. प्रभू श्रीरामांना त्यांच्या भक्तांचे व भक्तांना प्रश्रू श्रीरामांचे एकाच वेळेस दर्शन व्हावे, या भावनेतून गर्भगृहात प्रवेशलेल्या रामलल्लाच्या चक्षूंवर पट्टी बांधण्यात येणार आहे व ती प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस काढण्यात येणार आहे. प्राणप्रतिष्ठेदरम्यान होणार्‍या मंत्रोच्चारानंतर, नामस्मरणानंतर ती पट्टी काढली जाईल. तत्क्षणी त्या अचेतन मूर्तीमध्ये चैतन्याचा, देवत्वाचा संचार होतो व परमात्मा स्वरूपात त्या शक्तीचे वैश्विक प्रकटन होते, अशी धार्मिक मान्यता आहे.
रामलल्लाची आताची मूर्ती असताना नवीन मूर्ती कशाला? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणे अगदीच साहजिक आहे.
 
Ayodhya Ram Mandir 2024 
  नृपेंद्र मिश्रा
 
रामलल्ला तेथे प्रकट झाले आहेत यावर लोकांचा गाढ विश्वास आहे. 1947पासून तेथे होणार्‍या पूजाअर्चनेत कधीही खंड पडलेला नाही. अयोध्या येथील मूल स्थानी अत्यंत छोट्या जागेत रामलल्लाच्या मूळ मूर्तीची स्थापना झाली होती. पण आता उभे राहणारे मंदिर अत्यंत भव्य असून 25 ते 30 फूट अंतरावरून भाविकांना रामलल्लांचे दर्शन घ्यावे लागणार आहे. त्यामुळे दुसरी मोठी मूर्ती असणे आवश्यक होते. यावर आम्ही विचारविनिमय केला व नंतरच दुसरी मूर्ती घडवण्याचा निर्णय घेतला. गर्भगृहात बालरूपातील श्रीरामाची - म्हणजेच चार-पाच वर्षांच्या रामलल्लाची उभी मूर्ती असणार आहे. या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असून ती अचल मूर्ती असेल - अर्थात ही मूर्ती कोणत्याही कारणासाठी तेथून हलवली जाणार नाही. आताच्या रामलल्लाची मूळ छोटी मूर्ती ही उत्सवमूर्ती असेल. विविध उत्सवांच्या निमित्ताने देवाची रथयात्रा काढण्याची आपली परंपरा असते. अशा विविध प्रसंगी रामलल्लाची उत्सवमूर्ती बाहेर आणली जाईल. दोन्ही मूर्ती कायम गर्भगृहातच असतील. अचल मूर्ती आणि उत्सवमूर्ती या दोन्हींची स्वतंत्रपणे नियमित पूजाअर्चा केली जाईल.
 
Ayodhya Ram Mandir 2024 
 
रामलल्लाची नवीन मूर्ती घडवताना अनेक निकष पाळले गेले आहेत. ही मूर्ती शतकानुशतके, दीर्घकाल टिकणे अत्यंत आवश्यक. त्यामुळे हवेतील कार्बनचा त्यावर परिणाम होता कामा नये, त्यात पाणी मुरता कामा नये हे त्यातील काही मूलभूत निकष होते. त्यामुळे आम्ही प्रथमत: विविध ठिकाणांहून काही पाषाण मागवले. मैसुरूमधील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रॉक मेकॅनिक्स’ या संस्थेने या विविध पाषाणांचे परीक्षण केले. या परीक्षणानंतर तीन पाषाण निश्चित करण्यात आले. जयपूरमधील संगमरवर व कर्नाटकातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांतील कृष्णशिला असे हे पाषाण तीन वेगवेगळ्या मूर्तिकारांकडे पाठवण्यात आले व त्यांनी दोन-तीन महिने काम करून त्याच्या मूर्ती घडवल्या. हे काम अत्यंत गोपनीयतेने पार पडले. मूर्ती पाषाणाची असावी की पंचधातू-अष्टधातूंची, यावरही बराच विचारविनिमय करण्यात आला. मूर्ती दीर्घकाल टिकण्याच्या हेतूने ती पाषाणाचीच असावी, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. केवळ मूर्तीच नव्हे, श्रीराम मंदिराच्या एकूणच सर्व बांधकामात कोठेही लोहाचा वापर करण्यात आलेला नाही.
 
 
नोव्हेंबर 2019मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर फेब्रुवारी 2020मध्ये ‘श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’ची स्थापना झाली व त्यानंतर दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य मंदिराचे भूमिपूजन झाले. न्यासाच्या माध्यमातून या राम मंदिरनिर्माणाचे आज काम सुरू आहे. निव्वळ मंदिराचा एकूण आकार 2.7 एकर, बांधकाम क्षेत्र 57000 चौरस फूट, कळसासह मंदिराची एकूण उंची 161 फूट आहे. या मंदिराचे बांधकाम तीन मजल्यांचे आहे. या मंदिरातील खांबांच्या चौकोनी बैठकीवर शंभर दगडी कोरीव भित्तिचित्रांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे.
 

Ayodhya Ram Mandir 2024 
 
या मंदिरासाठी एकूण 3500 कामगार अविरत परिश्रम घेत आहेत. हे कामगार भारतभरातून विविध ठिकाणांहून आलेले आहेत. मंदिराप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचे बांधकाम या ठिकाणी केले जाणार आहे, ते आहे परकोटा अर्थात मंदिराची संरक्षण भिंत. मंदिराचे रक्षण करण्याच्या दृष्टीने या संरक्षण भिंतीची बाह्य बाजू अत्यंत भक्कम पद्धतीने तयार केली जाईल. या परकोटामध्येच प्रदक्षिणा मार्गही तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या बाजूला असणारी अंतर्गत भिंत आणि बाह्य भिंत यादरम्यान हा परिक्रमा मार्ग असेल. प्रत्यक्ष मंदिर एकूण अडीच एकरांवर वसलेले आहे व परकोटापासून मोजले, तर हे आकारमान सुमारे साडेआठ एकर होते. कुबेर टिला, जटायूचा 15 फूट बाय 20 फुटांचा रामलल्लाकडे तोंड करून उभा राहणारा ब्राँझ पुतळा अशी विविध प्रकारची शिल्पे, बांधकामे या आवारात आहेत. सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी जटायूचा पुतळा घडवला आहे. एकाच वेळेस पाच हजार भक्तांची निवासाची सोय करू शकेल अशा भक्तनिवासाचे बांधकाम परकोटाच्या बाहेरच्या बाजूस, पण मंदिर परिसरात करण्यात येत आहे.
 

rammandir 
 
आताच्या घडीला या 71 एकराच्या मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध पाच ते सहा बांधकामांमध्ये अगणित कामगार सहभागी आहेत. ‘लार्सन अँड टूब्रो’ ही कन्स्ट्रक्टिंग एजन्सी आहे. या कंपनीद्वारे विविध बांधकामे सुरू आहेत. ‘टाटा कन्सल्टंट ऑफ इंजिनिअर्स’च्या देखरेखीखाली एल अँड टीचे काम सुरू आहे. त्यामुळे सर्व कामगार, कारागीर यांची निवड करण्याचे काम या संस्थांनी केले आहे. मंदिरात एकूण 390 खांब आहेत. प्रत्येक खांबावर 30 वेगवेगळ्या आकृत्या कोरण्यात आलेल्या आहेत. खांबावरील आकृत्या कोरण्यात ओडिशातील कारागीर निपुण आहेत. त्यामुळे या कामासाठी त्यांना पाचारण करण्यात आले. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे मंदिराच्या बांधकामात कुठेही लोहाचा वापर नाही. वैशिष्ट्यपूर्ण रितीने दगडावर दगड रचून, जोडणीसाठी तांब्याच्या क्लिप्सचा वापर करून हे बांधकाम करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या दगडी बांधकामात राजस्थानातील, सहारणपूर येथील कारागीर कुशल आहेत, त्यासाठी ते कार्यरत आहेत. या बांधकामातील अचूकतेकडे, दगडांच्या रचनेत कुठेही फट राहत नाही ना, याकडे ‘सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेचे बारकाईने लक्ष आहे. मंदिराच्या बांधकामात मुख्यत्वे पश्चिम भारतातील अनेक कारागीर, कामगारवर्ग अविरत काम करत आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि ओडिशा या चार राज्यांतील कामगारांची निवड यात करण्यात आली आहे. या मंदिर निर्माण प्रक्रियेनिमित्त दोन-तीन वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली, तेव्हा मला प्रकर्षाने जाणवले की जेव्हा देशाच्या कानाकोपर्‍यातून आलेले भाविक या मंदिरात प्रवेश करतील, तेव्हा त्यांना हे केवळ पूर्व किंवा उत्तर भारतातील मंदिर वाटता कामा नये, ते अंतिमत: श्रद्धेचे प्रतीक असले पाहिजे, असे त्यांचे मत आहे व याबाबत ते अत्यंत आग्रही होते. त्यामुळे रामजन्मभूमी मंदिराचा पाया तयार करताना भारतभरातून पाच लाख गावांतून गोळा करण्यात आलेल्या चार लाखांहून अधिक विटा त्यात जाणीवपूर्वक वापरण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतातील गावागावांचा या मंदिरात मूलभूत सहभाग आहे, असे आपण म्हणू शकतो.
 
 
 
प्रभू श्रीरामांनी मर्यादापुरुषोत्तम असल्याच्या आपल्या गुणवैशिष्ट्याचे उदाहरण वनवासादरम्यान प्रस्थापित केले, असे आपण मानतो. पण वास्तविक 14 वर्षांच्या वनवासादरम्यान त्यांनी स्वत:ला आणि खरे तर संपूर्ण विश्वाला उत्तम प्रशासक कसा असावा याचा उत्तम नीतिवस्तुपाठ घालून दिला. सामाजिक सौहार्द हा याच नीतिमूल्यांचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते निषादराजांना, शबरीमातेला, त्याचप्रमाणे अहल्येला भेटले. ही नुसती भेट नव्हती, तर या सगळ्यात एक महत्त्वाचा सामाजिक संदेश दडलेला होता - समाजाच्या प्रत्येक स्तरातील व्यक्ती ही परमेश्वराचेच एक रूप आहे, ती परमेश्वरास प्रिय आहे, हाच सामाजिक सौहार्दाचा संदेश श्रीरामजन्मभूमी मंदिरातही जपला गेला आहे.
 
 
rammandir
 
परकोटाच्या बाहेरील बाजूस सात स्वतंत्र मंदिरे उभारण्यात येत आहेत. यात महर्षी वाल्मिकी, वशिष्ठ मुनी, निषादराज, शबरी, अहल्या यांचा समावेश आहे. श्रीरामाच्या सामाजिक सौहार्दाचाच संदेश या कृतीतून दिला जात आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात दाक्षिणात्य पद्धतीच्या प्रवेशद्वाराचे - अर्थात उंच गोपुराचेही बांधकाम येथे केले जाणार आहे. त्यामुळे दक्षिणेतून येणार्‍या रामभक्ताला आपल्या परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांचेच एक अंग अयोध्येतही पाहायला मिळेल. प्रभू श्रीरामांचा जन्म सूर्यवंशी इक्ष्वाकू कुळात झालेला आहे. त्यामुळे अयोध्येतील श्रीराम मंदिरात लावण्यात आलेल्या ध्वजांवर सूर्यवंशाचे चित्र आहे.
 
 
श्रीरामजन्मभूमी न्यास ही स्वायत्तपणे काम करणारी नोंदणीकृत संस्था आहे. स्वायत्तपणे काम करणार्‍या एखाद्या संस्थेप्रमाणेच या संस्थेचेही काम चालते. जनसंपर्क मोहीम, निधी संकलन, मंदिर निर्माणाशी संबंधित सर्व गोष्टींच्या निर्णयाची जबाबदारी व कार्यवाही या न्यासाचीच राहिली आहे. मंदिरनिर्माणाबाबतचे सर्व निर्णय अत्यंत स्वायत्तपणे न्यासाच्या माध्यमातून घेण्यात आले. त्याचे ताळेबंद, हिशोब हेदेखील व्यवस्थित हाताळले गेले, आजही तेच कायम आहे. मंदिर निर्माणासाठी जे निधी संकलन झाले, त्यातली बरीचशी रक्कम गावागावातल्या रामभक्तांच्या छोट्या देणग्यांतून उभी राहिली. न्यासाच्या वतीने शंभर रुपयांची कूपन्स तयार करण्यात आली होती. एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांना ही पावती पुस्तके देण्यात आली होती. त्यांनी पंचायत पातळीवर जनसंपर्क केला, लोकांना आवाहन केले. इच्छुक देणगीदारांनी दिलेली रक्कम जिल्हास्तरावर व पुढे राज्यपातळीवर खात्यात जमा करण्यात आली. आमच्याकडे आलेल्या आकडेवारीनुसार भारतभरातील पाच लाखांहून अधिक खेड्यांमध्ये संपर्क करण्यात आला. मंदिराचे प्रयोजन नागरिकांना विशद करण्यात आले व लोकांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले गेले. ज्याप्रमाणे देशभरातून या मंदिर निर्माणासाठी विटा गोळा करण्यात आल्या, अगदी तसेच जनसंपर्क मोहिमेतही भारतभरातील विविध खेड्यांतून यात आर्थिक योगदान दिले.
 

rammandir 
 
मंदिराच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही न्यासाने अत्यंत सखोल विचार केला आहे. यात सुरक्षेचे दोन प्रकारात विभाजन करावे लागते. मंदिर आवारातील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी न्यासाची असेल. न्यास यासाठी आवश्यक त्या सर्व सोयींची सज्जता करेल. न्यासाच्या योजनेनुसार, नियमांनुसार ही व्यवस्था कार्यरत असेल. परंतु एकूण संपूर्ण सुरक्षेची जबाबदारी उत्तर प्रदेश सरकारची असेल. सरकारच्या वतीने विशेष सुरक्षा पथकाची (एसपीजीची) व्यवस्था करण्यात आली आहे. भारत सरकारने ठरावीक मंदिरांच्या सुरक्षेसाठी पोलीस व्यवस्थेत एक वेगळी शाखा सुरू केली आहे. हे एसपीजी याच व्यवस्थेचा एक भाग आहे. मंदिराच्या आवारात आतापासूनच या एसपीजी कॉन्स्टेबलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे येणारे रामभक्त अत्यंत चिंतामुक्त मनाने येथे रामलल्लाच्या दर्शनासाठी येऊ शकतात.
 
 
रामजन्मभूमी मंदिर निर्माण समितीचा अध्यक्ष म्हणून माझा अनुभव अत्यंत आनंदी असा राहिला आहे. या कामाचा ताण नेहमी येत राहिला, आजही आहे. पण मी स्वत: देवभक्त असून ईश्वरी शक्तीवर माझा गाढ विश्वास आहे. या कामाच्या निमित्ताने, एखादी विनंती करण्यासाठी मी ज्यांना भेटलो, ज्यांच्याशी समन्वय साधला त्यांच्याकडून मला सहकार्य मिळत गेले. त्यांच्याशी झालेल्या नुसत्या संवादातही केव्हाही सकारात्मक ऊर्जेचा अनुभव मला आला, एकदाही शंका उपस्थित केली गेली नाही, मग ती रेल्वे सेवा असो, उत्तर प्रदेश पोलीस असोत, ट्रक वाहतूक असो, दक्षिण भारत-राजस्थान आदी विविध स्थळांवरून पाषाण मागवणे असो.. असे मदतीचे कितीतरी हात यात गुंतलेले होते. पण कुठेही कसलीही अडचण आली नाही. मला नेहमी वाटते की मी केवळ एक साधन आहे. ही सगळी परमेश्वरी योजनाच होती, ज्याचा मी केवळ एक भाग झालो. माता अमृतानंदमयींशी मागे एकदा भेट झाली व त्यांचे आशीर्वाद प्राप्त झाले. त्या भेटीदरम्यान मी सर्व कामाची, जबाबदार्‍यांची कल्पना दिली. त्या हसल्या आणि तत्परतेने म्हणाल्या, “हे काम तुम्ही समर्पिततेने पूर्ण कराल. फक्त त्यासाठी परमेश्वराला शरण जा, समर्पित व्हा. तरच हे काम तुम्ही पूर्ण करू शकाल. तसे नाही केले तर मात्र हे काम पूर्ण होणार नाही. या कामावर होणारी निरर्थक टीका, कामात उभे केले जाणारे अडथळे यामुळे तुम्ही डिस्टर्ब होणार नाही. या कामात सगळ्यापासून दूर राहण्यात तुमचे समर्पण साहाय्यभूत ठरेल. त्यामुळे समर्पित व्हा.” त्यांचा हा संदेशच मी माझ्या कृतीत उतरवला, समर्पिततेने या कार्याला स्वत:ला वाहून घेतले व आताची श्रीराम मंदिर निर्माणाची प्रगती त्याचीच फलश्रुती आहे.
 
 
शब्दांकन - मृदुला राजवाडे

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.