सत्ता गेली, पक्षही गेला सोबत उरले खुशमस्करे

विवेक मराठी    11-Jan-2024   
Total Views |
Maharashtra todys politics Why and how Eknath Shinde became Shivsena president
ज्या खुशमस्कर्‍यांनी आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर ही वेळ आणली, त्याचे कारनामे आणि मनसुबे वेळीच ओळखायला हवे होते. पण तसे झाले नाही.

vivek
  
अखेर शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागला. सर्वोच्च न्यायालयाने, ‘आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभाध्यक्षांचा’ असे सांगितल्याने हे प्रकरण विधानसभाध्यक्षांच्या कोर्टात दाखल झाले. पक्षाच्या मालकीसाठी समोरासमोर उभे ठाकलेले मूळ शिवसेनेचे दोन नेते आणि निवाडा करणाराही मूळचा शिवसैनिक अशी अभूतपूर्व स्थिती या निमित्ताने तयार झाली होती. या निकालाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर अधिकृत पक्ष म्हणून शिक्कामोर्तब झाले, पात्र-अपात्रतेची संदिग्धता संपली, हे उत्तम झाले. पण एवढेच पुरेसे नाही. न्यायालयीन वादविवादात झालेल्या सरशीवर आता जनतेच्या दरबारात शिक्कामोर्तब व्हायला हवे. तेव्हा शिंदे यांच्या शिवसैनिकांनी आता आगामी लोकसभा आणि त्या पाठोपाठ येणार्‍या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यावर लक्ष केंद्रित करणे पक्षासाठी हितकारक ठरेल. त्यातून पक्ष पुन्हा उभा राहण्याची शक्यता आहे. तसे झाले, तर इतकी जोखीम घेऊन केलेले बंड पूर्णांशाने यशस्वी झाले, असे म्हणता येईल.
 
 
विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कायद्याच्या चौकटीत आणि संविधान तसेच पक्षाची घटना प्रमाण मानत दिलेला निकाल अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रशंसनीय आहे. विधानसभाध्यक्षांच्या कायदेविषयक सखोल ज्ञानाचे आणि या पदावरून अपेक्षित असलेल्या तटस्थ निवाड्याचेही ते उदाहरण ठरावे.
 
या निकालाने उद्धव ठाकरे यांची गत ‘दैव देते आणि कर्म नेते’ अशी केली आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असण्यापलीकडे अन्य राजकीय पात्रता वा योग्यता नसलेल्या उद्धव यांना पक्षप्रमुख म्हणून मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. ज्या हिंदुत्वाचा बाळासाहेबांनी सातत्याने पुरस्कार केला आणि तसे करताना यशापयशाची तमा बाळगली नाही, ते हिंदुत्व पेलण्याची ताकद उद्धव यांच्यात नव्हती. सत्तेच्या राजकारणात राहून हिंदुत्वाची ध्वजा सन्मानपूर्वक सांभाळता येण्यासाठी जी धमक लागते, तिचे नामोनिशाण उद्धव यांच्यात नाही. हिंदुत्वाचा प्रखर अग्नी सांभाळणे हे येरागबाळ्याचे काम नव्हेच. भर सभेत शेलक्या शब्दांत विरोधकांची अवहेलना करण्याची लागलेली सवय आणि भवतालच्या खुशमस्कर्‍यांनी सातत्याने केलेली त्याची भलामण यामुळे उद्धव यांचे स्वत:च्या क्षमतेबद्दल फारच मोठे गैरसमज झाले होते. त्या गैरसमजांना कुरवाळत बसल्यानेच त्यांची राजकीय कारकिर्द अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने अध:पतनाच्या वाटेला लागली. त्यांच्या अध:पतनाने, जी मिळवायला संस्थापकांनी आणि तत्कालीन निष्ठावंत शिवसैनिकांनी कष्ट घेतले होते, ती पक्षाची प्रतिष्ठाही धुळीस मिळाली.
 
  
सत्तेची अनाठायी हाव माणसाला किती अविचारी करू शकते, याचा एक वस्तुपाठच उद्धव ठाकरे यांनी आपल्या वर्तनातून समोर ठेवला आहे. वास्तविक पक्षप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या हातात पक्षाचे नियंत्रण ठेवत पक्ष वाढवणे अपेक्षित होते. पण 2019च्या विधानसभा निकालानंतर त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या वेडाने इतके झपाटले की त्यासाठी भाजपाबरोबर असलेली पंचवीस वर्षांची युती तोडण्यातही त्यांना काही गैर वाटले नाही. इतकेच काय, व्यक्तिगत आकांक्षेने आलेल्या आंधळेपणात हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसशी संग करण्यात, त्यांची बटीक होण्यात धन्यता मानली. आक्षेपार्ह वाटेल असा मुस्लिमानुनय केला. हे सर्व दिसत असून आणि सहन होत नसूनही केवळ बाळासाहेबांवरच्या निष्ठेपोटी, आत्मीयतेपोटी नाराज शिवसैनिक त्यांना साथ देत राहिले. त्यामागे फक्त बाळासाहेबांविषयीची कृतज्ञता होती. पण त्या साथीचे मोलही उद्धवना समजले नाही. वाढता अहंकार, मनमानी कारभार आणि सत्तेच्या राजकारणातील आपल्यातल्याच जाणत्यांच्या मार्गात अडथळे आणणे, त्यांना कस्पटासमान वागणूक देणे यातून त्यांनी पक्षसंघटनेला सुरुंग लावायला सुरुवात केली होती. कोविडसारख्या अभूतपूर्व संकटात राज्याचा गाडा यशस्वीपणे हाकून आपल्या क्षमता सिद्ध करण्याची संधी त्यांना नियतीने दिली होती. पण तीही त्यांना साधता आली नाही. त्याऐवजी त्यांनी दिवाभीतासारखे स्वत:ला घराच्या चार भिंतीत कोंडून घेत कारभार करायचा असफल प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे नुकसान तर झालेच, त्याहूनही अधिक या राज्याचे नुकसान झाले. त्यांच्या निष्क्रियतेचा फटका महाराष्ट्राला बसला. त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकार्‍यांना हे उघड्या डोळ्याने पाहणे असह्य झाले, तेव्हा त्याविरोधात बंड झाले. पण त्यानेही उद्धव शहाणे झाले नाहीत. बंड करणार्‍यांवर यथेच्छ तोंडसुख घेत, सहानुभूतीचा जोगवा मागत आपली खुर्ची टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत राहिले.
 
जनता हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत होती. पाहते आहे. या जनतेतच शिवसेनेचे पारंपरिक मतदारही आहेत. नाकर्ता, स्वार्थासाठी हिंदुत्व त्यागणारा आणि सत्तेला हपापलेला पक्षप्रमुख अशी उद्धव यांनी स्वकर्तृत्वावर बनवलेली प्रतिमा निष्ठावंत मतदारांना आणि असंख्य शिवसैनिकांना पक्षापासून दूर घेऊन गेली आहे. या वास्तवाकडे दुर्लक्ष करून आपल्याशी ‘दगाफटका’ झाल्याचा कांगावा करत ते न्यायालयात गेले. तिथेही दारुण पराभवाचे धनी झाले.
 
जेव्हा एखादा पक्षप्रमुख जनतेच्या दरबारात फारशी किंमत उरलेली नसताना आणि कायदेशीर बाजूही लंगडी असताना न्यायालयाची पायरी चढतो, तेव्हा तो स्वत:च्या हाताने पक्ष कसा संपवतो, त्याचे हे उदाहरण. तसेच, निष्ठावंत आणि योग्यता असलेले पक्ष कार्यकर्ते कोण आणि स्वार्थांध खुशमस्करे कोण यातला फरक ओळखण्याची कुवत नसली की काय होते, याचेही हे उदाहरण ठरावे.
 
ज्या खुशमस्कर्‍यांनी आज उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर ही वेळ आणली, त्याचे कारनामे आणि मनसुबे वेळीच ओळखायला हवे होते. पण तसे झाले नाही.
 
पक्षाच्या मूळ घटनेचा आधार घेत विधानसभाध्यक्षांनी कायद्याच्या चौकटीत दिलेला निकाल मान्य करून पुढच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनतेत जाऊन पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, राणा भीमदेवी थाटात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या घोषणा करणे म्हणजे सत्तेच्या राजकारणात आपण अद्यापही किती अपरिपक्व, उथळ आणि अहंकारी आहोत हेच सिद्ध करणे आहे. देशात व जगात हिंदुत्वाचा प्रभाव वाढत असताना व्यक्तिगत लालसेपोटी हिंदुत्वाशी घेतलेली फारकत आणि खुशमस्कर्‍यांची न सोडलेली साथ त्यांना आणि पक्षाला रसातळाला नेत आहे. आता तर जागे होण्याची वेळही टळून गेली आहे.

#Thane #Maharashtra #Shivsenaofc #Shivsena #Eknathshinde #PratapSarnaik #RahulNarvekar #MaharshtraPolitics