दोन अक्षरांचे सामर्थ्य

विवेक मराठी    12-Jan-2024   
Total Views |
आपल्या देहाचा उंबरठा म्हणजे मुख, यात जर रामनाम सदैव ठेवले, तर तुम्हाला लौकिक आणि पारमार्थिक असे दोन्ही प्रकारचे ज्ञान होईल. मतामतांचा गलबला, सगुण-निर्गुणाचा वाद, आक्रमक संस्कृतीचे आव्हान, तिला मिळालेले पाठबळ हे लक्षात घेता समाजाला स्थिर राखण्यासाठी ‘राम’ या दोन अक्षरांत सामर्थ्यशक्ती दडली आहे. एकूण ‘राम’ या दोन अक्षरांनी भूतकाळातही समाजाला तारले, आताही तारत आहे आणि भविष्यकाळातही तारणार आहेत.
 
rammandir
 
वानरसेनेने बांधलेल्या त्या सेतूवरून विशाल सागराकडे एकटक पाहताना श्रीरामप्रभूंनी सहज एक मोठा दगड उचलून सागराच्या पाण्यात टाकला. ‘डुबुक’ असा आवाज करून तो लगेच सागरतळात दिसेनासा झाला. तेवढ्यात एका शिळेआडून हनुमान बाहेर आले आणि टाळ्या वाजवत नाचू लागले.
 
“हनुमंता, काय पाहिलंस?” प्रभूंनी विस्मयाने विचारले.
 
“देवा, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सोडलं, ते सर्व बुडाले. मग ज्याला प्रत्यक्ष तुम्हीच सोडलं, तो साधा दगड का असेना, कसा काय तरणार?”
 
‘भगवान राम कुणाचे?’ असा जो गदारोळ माजविला गेला आहे, त्या पार्श्वभूमीवर वरील कथा सहज आठवावी. या कथेचा मथितार्थ एवढाच आहे की, रामनामाने तो लहानसा सेतू तरला हा चमत्कार पाहत असताना या दोन अक्षरांनी हा विशाल भारत, त्यातील समाज, धर्म, संस्कृती आणि परंपरा या सर्वच गोष्टी तारल्या आहेत, या तथ्याकडे आपण पाहत नाही.
 
हा भारत देश एक हजार वर्षांच्या गुलामीच्या अंधकारात जेव्हा चाचपडत होता, तेव्हा संत तुलसीदासांनी म्हटल्याप्रमाणे -
 
राम नाम मनिदीप धरू, जिह देहरीं द्वार।
 
तुलसी भीतर बाहेरहुँ, जौं चाहसि उजियार॥
 
- अर्थात, ज्याप्रमाणे उंबरठ्यावर ठेवलेल्या दिव्याचा घराच्या आत आणि बाहेर असा दोन्हीकडे प्रकाश पडतो, त्याचप्रमाणे आपल्या देहाचा उंबरठा म्हणजे मुख, यात जर रामनाम सदैव ठेवले, तर तुम्हाला लौकिक आणि पारमार्थिक असे दोन्ही प्रकारचे ज्ञान होईल व तुमच्या आत व बाहेरही प्रकाशच प्रकाशच होईल.
 
मुस्लिमांचे पाशवी आणि क्रूर आक्रमण, तर इंग्रजांचे चतुर व धूर्त आक्रमण यांनी ग्रासलेल्या गुलामीच्या काळात भारताला जिवंत ठेवण्याचे कार्य या रामनामाने केले आहे. वासाहतिक मानसिकता असलेले तथाकथित बुद्धिवादी धूर्त असा प्रश्न विचारतात की, भारतात एवढे संत आणि महात्मे जन्माला आले, तर मग भारताची इतकी अवनती कशी झाली? या कुतर्काचे एवढेच उत्तर आहे की, भारताची जेव्हा अवनती होत होती, तेव्हा ती घसरण व अधोगती थांबविण्यासाठीच या संतांचा व महात्म्यांचा अवतार झाला. कसे, ते आपण पाहणार आहोतच.
 
आदिकवी वाल्मिकी यांची रामकथा म्हणजे एक आदर्श मनुष्यजीवनाचे समग्र दर्शनच होय. त्यामुळेच या रामकथेला भरपूर काळ लोटल्यानंतरही संत तुलसीदासांनी ‘रामचरितमानसा’च्या रूपाने आणि त्यांचेच समकालीन संत एकनाथ यांनी ‘भावार्थ रामायणा’च्या रूपाने भारतीय जनमानसावर पुन्हा साकार केले. त्यांच्यानंतर संत रामदास आणि संत तुकाराम या समकालीन संतांनीही रामनामाचा महिमा वाढवीत नेला. या चार संतांचेच कार्य आपण या लेखात वानगीदाखल पाहणार आहोत आणि रामनामाचे समाज तारण्याचे महिमान जाणून घेणार आहोत.
 
आपण या संतकवींचा काळ पाहिला, तर आपल्याला दिसून येईल की, या काळात भारतावर परदेशी आक्रमकांचे शासन होते. प्रजाहितदक्ष आणि लोककल्याणकारी राज्य या संकल्पनांपासून हे शासन हजारो योजने दूर होते. येथील समाजावर राज्य करणे म्हणजे जणू काही त्यांचा सूड घेणे आहे याच भूमिकेतून या सुलतानशाही पातशाहांनी राज्य केले. येथील जनतेवर खरोखरच राक्षसी अत्याचार केले. त्यांच्या अत्याचारांपुढे हिरण्यकशिपू, रावण, अही- मही, कंस, शिशुपाल यांनीही लाजून मान खाली घातली असती. आपल्याला या संतकवींच्या साहित्यातून जी राक्षसी राज्याची वर्णने वाचायला मिळतात, ती काही त्यांची काल्पनिक भरारी नव्हती, तर त्यांना वर्तमानात जी काही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थिती दिसून आली, त्याच परिस्थितीचे वास्तव चित्रण केले होते. भारतीय संस्कृती सनातन आहे आणि विविध संस्कृतीच्या आक्रमणातून ती टिकून राहिली आहे असे आपण नेहमी सांगतो. मग या संस्कृतीला अमरत्वाचे वरदान कोठून लाभले? तर, ‘राम’ हीच ती दोन अक्षरे आहेत, ज्यांनी हे समाजतारक वरदान दिले.
 
 
संतांनी आपले समाजजागृतीचे कार्य इतक्या कुशलतेने आणि प्रभावीपणे केले की, त्यांचा हेतू त्या काळातील ‘बाबर-अकबर’ यांच्या लक्षात आला नाही आणि आताही हीच विचारधारा पुढे नेणार्‍या आधुनिक ‘बाबरी-अकबरी’ विचारवंतांना जाणून घेता आलेला नाही. गुलामीच्या जाचक वरवंट्याखाली आपला समाज भरडत चालला होता आणि समाजाचे मनोधैर्य खच्ची होत चालले होते. सामाजिक चौकट मोडून पडली होती. समाज दिशा हरवून बसला होता आणि त्याची नीतिमत्ताही ढासळत चालली होती. एकंदरच धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय अशा सर्वच आघाड्यांवर समाजाची अधोगती झाली होती. परकीयांची लाचारी करून हीनदीन अवस्थेत तग धरून राहणे एवढेच काम उरले होते.
 
 
संतकार्याचे महत्त्व आपल्या पुरोगामी विचारवंतांच्या यासाठी लक्षात येऊ शकत नाही की, त्या काळातील सामाजिक प्रश्न आणि राजकीय परिस्थिती या संदर्भात या संतसाहित्याचा विचार करीत नाही. महर्षी वाल्मिकींच्या ‘रामायण’ या महाकाव्यातील वेगवेगळी प्रतीके त्यांनी वर्तमान संदर्भात कशी वापरली, त्याचबरोबर समाजाला कसा कर्तव्यबोध करून दिला, यासाठी या संतसाहित्याचे सूक्ष्म आणि यथार्थ अवलोकन आवश्यक आहे. पण पुरोगामी विचारवंत स्वत:ला सेक्युलर सिद्ध करण्यासाठी लोकांच्या श्रद्धाभावनेचे प्रतीक असलेल्या रामाला आणि रामायणाला धार्मिक अंधश्रद्धा म्हणून सतत हिणवतात. त्यासाठी कधी या चरित्राला ते काल्पनिक म्हणतात, तर कधी आपल्या कुटिल व बालिश बुद्धीने त्यातील ऐतिहासिकतेला वाकडेतिकडे वाकवून आपल्या मनातील ‘भ्रामक राम’ आणि ‘भ्रामक रामायण’ उभे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. या प्रयत्नात ते कसे तोंडघशी पडतात, हे आपणही पाहिले आहे.
 
 
या परवशतेच्या पाशात समाजाचा गळा कसा अडकला होता, याचे वर्णन करताना संत तुलसीदास म्हणतात -
 
 
भुजबल बिस्व बस्य करि राखेसि कोउ न सुतंत्र।
 
मंडलीक मनि रावन राज करइ निज मंत्र॥
 
 
- अर्थात, आपल्या बाहुबळाने रावणाने सर्व जगाला दास करून टाकले होते. या राक्षसी मनोवृत्तीला कोणतेच चांगले तंत्र नव्हते - म्हणजे लोककल्याणकरी शासन नव्हते. सर्वांना मांडलिक केले होते. रावणाचे राज्य त्याच्या स्वत:च्या लहरीनुसार चालत होते.
पुढे आणखी विशद करून सांगतात -
 
 
देखत भीमरूप सब पापी।
 
निसिचर निकर देव परितापी॥
 
करहिं उपद्रव असुर निकाया।
 
नाना रूप धरहिं करि माया॥
 
 
निशा म्हणजे रात्र. देशावर गुलामीची काळरात्र होती आणि यात बेबंदपणे हिंडत असणार्‍या लोकांना निशाचार म्हणजे राक्षस असे संबोधले आहे. हे राक्षस नाना रूपे धारण करून प्रजेला नाना प्रकारे उपद्रव करीत होते.
 
 
जेहि बिधि होइ धर्म निर्मूला।
 
सो सब करहिं बेद प्रतिकूला।
 
जेहिं जेहिं देस धेनु द्विज पावहिं।
 
नगर गाउँ पुर आगि लगावहिं॥
 
 
देशावर इस्लामी शासकांचे राज्य होते. त्यांना देशातून हिंदू धर्म आणि संस्कृती उखडून टाकायची होती. यासाठीच त्यांचे विविध प्रयत्न चालले होते. हिंदू धर्मग्रंथांत - म्हणजे वेदांत सांगितलेल्या गोष्टीच्या बरोबर विरोधात त्यांचे आचरण होते. हे गोमांसभक्षक असल्यामुळे गोहत्या करीत होते. समाजात धर्म टिकवून ठेवणार्‍या ब्रह्यवृंदास त्रास देत होते. गावांना आणि नगरांना आग लावून जाळपोळ करीत होते. कोठे धर्माचरण, जप-तप चालले आहे हे रावणाच्या कानावर गेले की त्याच्या फौजा या गोष्टींना रोखण्यासाठी तातडीने धाव घेत असत. या सर्व गोष्टींचा ते विध्वंस करून टाकत आणि यासाठी मुळीच परवानगी देत नसत. कोठेही धार्मिक कार्यक्रम करणे अत्यंत कठीण होऊन बसले होते. हिंदू धर्मग्रंथ व मंदिरे नष्ट करण्यात येत होती. धर्माचरण करणार्‍यांना नगरातून हाकलून लावण्यात येत होते. त्यांनी परागंदा व्हावे यासाठी नाना प्रकारे त्यांचा छळ करण्यात येत असे. इस्लामी अत्याचारांचे हे जिवंत वर्णन वाटत नाही का? रावणाचे प्रतीक वापरून तुलसीदास तेव्हाची सुलतानी अत्याचाराची सद्य:स्थिती बेमालूमपणे सांगत होते.
 
 
जप जोग बिरागा तप मख भागा श्रवन सुनई दससीसा।
 
आपुनु उठि धावइ रहै न पावइ धरि सब घालई खीसा॥
 
अस भ्रष्ट अचारा भा संसारा धर्म सुनिअ नहिं काना।
 
तेहि बहुबिधि त्रासइ देस निकासई जो कह बेद पुराना॥
 
बरनि न जाइ अनीति घोर निसाचर जो करहिं।
 
हिंसा पर अति प्रीति तिन्ह के पाप कवनि मिति॥
 
 
आपणही आज या काव्यांचे वाचन करताना हा साक्षेप डोळ्यांपुढे अवश्य ठेवला पाहिजे, म्हणजे या समाजप्रबोधक काव्यांना केवळ धार्मिक म्हणून बाजूला ठेवण्याचा करंटेपणा आपल्याकडून होणार नाही.
 
आताही लोकशाही राज्यांत निवडणुकांच्या वेळी प्रत्येक पक्ष आपल्या जाहीरनाम्यांच्या माध्यमातून चांगल्या दिवसांचे चित्र चितारत असतो. मग तुलसीदासांनी रामराज्याचे तपशीलवार केलेले वर्णन हे त्यांच्या कल्पनेतील स्वराज्याचे नव्हते, असे म्हणणे योग्य ठरेल का? त्यांच्याप्रमाणे संत एकनाथांसमोरही एका आदर्श समाजाचे स्वप्न होते. ते स्वप्न त्यांनी एकट्यानेच पाहिले असे नाही, तर काव्याच्या माध्यमातून अगदी उघड उघडपणे संपूर्ण समाजासमोर मांडण्याचा धाडसी प्रयत्न त्यांनी केला. हे त्या काळातील खरोखरच क्रांतिकार्य म्हणायला हवे!
 
 
मारुनिया दशशिरा। स्वस्थ करावी वसुंधरा।
 
सुखी करावें चराचरा। श्रीरामचंद्रा निज नेम॥
 
सोडावी देवाची बांधवडी। तोडावी नवग्रहांची बेडी।
 
उभारावी रामराज्याची गुढी। मर्यादा गाढी श्रीरामें॥
 
 
याचा अर्थ केवळ सीतेला रावणाच्या तावडीतून सोडविण्यासाठीच राम-रावण युद्ध झाले असे म्हणणे म्हणजे व्यापक लढ्याला व्यक्तिगत लढ्याचे संकुचित स्वरूप देणे होईल. प्रभू रामांचा अवतार मुळात गुलामीच्या अंधकारात खितपत पडलेले देव, प्रजा आणि संतसज्जन यांच्या मुक्तीसाठी झाला होता. अवताराचे प्रयोजन सांगताना याच गोष्टी कथन केल्या आहेत. मात्र वरील सर्व हिंदुत्ववादी विश्लेषण आहे, आता हिंदुत्ववादी मंडळी सत्तेवर आल्यामुळे ते आपल्या मनातील भगवा इतिहास जनतेवर थोपत आहेत, हे म्हणायला भरकटलेले विचारवंत कमी करणार नाहीत. पण जेव्हा देशात याच मंडळींना मिंधे करून इतिहासाचे विकृतीकरण घडविणारे शासक देशावर राज्य करत होते, त्या काळातही खर्‍या विचारवंतांनी, इतिहासकारांनी आणि अभ्यासकांनी खरा इतिहास सांगण्याचा परोपरीने प्रयत्न केला होता. पण या मुखंडांनी त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले होते.
 
थोर इतिहास संशोधक सेतुमाधवराव पगडी यांचे ‘इतिहास आणि कल्पित’ या ग्रंथातील अवतरण पाहा - ‘तुळशीदासाचे रामायण घ्या. भक्तिरसप्रधान आणि रम्य अशा ललित भाषेत लिहिलेला हा रामचरित्रपर ग्रंथ लोकप्रिय व्हावा हे सहज समजण्यासारखे आहे. पण ज्या काळात, ज्या परिस्थितीत आणि ज्या प्रदेशात हा अपूर्व काव्यसंग्रह निर्माण झाला, ते पाहता या ग्रंथाने समाजाला टिकवून ठेवण्याचे महत्कार्य केले, हा निर्वाळा इतिहासकाराला द्यावा लागतो. मतामतांचा गलबला, सगुण-निर्गुणाचा वाद, आक्रमक संस्कृतीचे आव्हान, तिला मिळालेले पाठबळ हे लक्षात घेता समाजाला स्थिर राखण्यासाठी आदर्श स्त्री-पुरुषांची आणि नैतिक मूल्यांची दिव्य आणि भव्य चित्रे समाजासमोर उभी करणे ही त्या काळाची गरज होती. परमेश्वराची भक्ती करावी, नैतिक मूल्ये जपावीत, राम-लक्ष्मणासारखे आदर्श जीवन जगावे, सीतेसारखे पातिव्रत्य राखावे आणि मारुतीसारखी बलोपासना स्वीकारावी, फाजिल धार्मिक वादविवादांची गरज नाही, असे सांगणारा हा ग्रंथ मध्ययुगीन भारतात असंख्य लोकांचा धर्म वाचवून आणि टिकवून गेला. तुळशीदासाने घडवून आणलेले हे समाजदर्शन म्हणजे प्रचारकार्य म्हणावे काय? काव्य सुरुवातीपासून वाचा, त्यात प्रचाराचा अंश नाही. पण काव्याचा परिणाम मात्र इतिहासाच्या नजरेतून सुटू शकत नाही. उत्कृष्ट साहित्यात समाजजीवन आल्याशिवाय राहत नाही.’
 
संत तुकाराम आणि संत रामदास यांचेही कार्य संत तुलसीदास आणि संत एकनाथ याच पूर्वसुरींच्या पावलांवर पाऊल टाकून झालेले दिसते. भारतावर जे मुस्लीम आक्रमण झाले, त्या काळात भारतातील समाज असंघटित होता आणि एकछत्री राजसत्तेच्या अभावामुळे छोटी छोटी राज्ये पाशवी आक्रमणाचा विरोध करण्यास असमर्थ होती. त्या काळात प्रभू रामचंद्रांनीच सर्व समाजाला तारले. नंतर आपल्यावर झालेले ब्रिटिश आक्रमण येथील जनतेची बुद्धी नासविणारे आणि मानसिक विकृत्ती निर्माण करणारे होते. काळाच्या ओघात भारत स्वतंत्र झाल्यानंतरही तथाकथित पुरोगामी बुद्धिवाद्यांच्या रूपाने वासाहतिक मानसिकताच भारतावर राज्य करीत राहिली. भारताच्या ‘स्व’त्वाचा लोप करणारी विचारधारा प्रभावी होऊन तिचाच जय होतो की काय, असे वाटू लागले. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. प्रभू रामच समाजाच्या मदतीला धावून आले आणि रामायणाचा महिमा मंडित करणारी रामानंद सागर यांची दूरदर्शन मालिका प्रसारित होऊ लागली आणि तिने लोकप्रियतेचा उच्चांक मोडीत काढत एक इतिहासच घडविला. हीच मालिका नंतर कोरोना महामारीच्या काळातही प्रसारित झाली आणि भारतीय जनमानसावरून तिची मोहिनी अद्यापही उतरली नाही, हेच सिद्ध झाले! ही मालिका जेव्हा पहिल्यांदा प्रसारित झाली, तेव्हा संपूर्ण देशभर रामभक्तीची जागृती घडून आली. विश्व हिंदू परिषदेने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची चळवळ गतिमान केली आणि त्याचीच परिणती म्हणून आता रामजन्मभूमीवर उभ्या राहिलेल्या भव्य मंदिरात श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जणू काही रामलल्लांच्या रूपाने येथील समाजाचे प्राणतत्त्वच पुढच्या काळात पारमार्थिक उन्नतीबरोबर ऐहिक समृद्धीच्या दिशेने देशाला झपाट्याने घेऊन जाण्यासाठी विराजमान होणार आहे. एकूण ‘राम’ या दोन अक्षरांनी भूतकाळातही समाजाला तारले, आताही तारत आहे आणि भविष्यकाळातही तारणार आहेत.