गाथा राम मंदिराची संघर्षाची आणि दैवी वरदहस्ताचीही.. .- श्री श्री रविशंकर

विवेक मराठी    16-Jan-2024   
Total Views |
एखाद्या मोठ्या अपूर्व अशा घटनेमागे अनेक सूक्ष्म पैलू दडलेले असतात. छोट्या-छोट्या घटनांचेच रुपांतर पुढे व्यापक घटनांमध्ये होत असते. आपण अनेकदा मोठ्या स्वरुपातील घटनांमागील कारणे आणि परिणाम याबद्दल वाद घालत राहतो, पण क्वचितच यापलीकडे पाहतो. देवदेवतांची सूक्ष्म शक्ती व्यापक स्वरुपात घडणार्‍या घटनांमध्ये फार स्पष्ट, ठोस भूमिका बजावत असते आणि अर्थातच त्याचा परिणामही तसाच दिसून येतो. हा दैवी वरदहस्त असाच पुढेही भारताला मार्गदर्शन करत राहो.
 
Sri Sri Ravi Shankar
 
 
 
अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देश सिद्ध झाला आहे. होय! खूप वर्षांपासूनचे भारताचे स्वप्न आता पूर्णत्वास येत आहे. हे कार्य सफल होण्यासाठी भारताचे सर्वोच्च न्यायालय, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाकीच्या अगणित व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची जाण ठेवून, त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याची हीच योग्य वेळ आहे. अयोध्येतील राम मंदिराची गाथा अनेक आकर्षक किस्से आणि रहस्यांनी भरलेली आहे.
 
 
2002च्या उन्हाळ्याच्या दिवसांत विहिंपचे (विश्व हिंदू परिषद) तेव्हाचे अध्यक्ष अशोक सिंघल हे मला बंगळुरू आश्रमात भेटायला आले होते. त्याआधी कांचीपुरम येथे जाऊन त्यांनी कांची कामकोटी पीठाचे तत्कालीन शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती यांची भेट घेतली होती. या भेटीत शंकराचार्यांशी त्यांनी रामजन्मभूमी आणि बाबरी ढाचा वादावर चर्चा केली व तिथूनच ते बंगळुरूत आले. तत्पूर्वी, नुकतीच शंकराचार्य आणि काही मुख्य मुस्लीम नेते यांच्यातील याबाबतची चर्चा निष्फळ ठरली होती. त्यानंतर लगेचच या दोघांची भेट झाली.
 

Sri Sri Ravi Shankar  
 
आपले तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी निश्चय करून तातडीने राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करावा, अशी अशोकजींची इच्छा होती. हाच अशोकजींच्या दृष्टीने एकमेव असा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा किंवा अजेंडा होता. अर्थात, वाजपेयीजी अनेक पक्षांचे कडबोळे असलेले युतीचे सरकार चालवत होते. त्या दृष्टिकोनातून पाहिल्यास अशोकजींच्या काही मागण्या त्यांना अव्यवहार्य वाटण्यासारख्या होत्या.
 

Sri Sri Ravi Shankar  
 
मी 2001मध्ये ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’वरून परतल्यानंतर माझी आणि वाजपेयीजींची अयोध्येच्या मुद्द्यावर अनेकदा भेट आणि चर्चा झाली. या बहुप्रलंबित वादावर शांतपणे आणि सौहार्दाने मार्ग काढण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. मी मुस्लीम समुदायातील नेते आणि काही प्रभावी व्यक्तींसोबत चर्चा करण्याची मालिकाच सुरू केली. या विचारविमर्शात मांडलेले मुद्दे, त्याच्या तपशीलाबद्दलची सगळी रंजक कहाणी नंतर कधीतरी सांगेन.
 
 
त्या काळात अशोकजी वाजपेयीजींवर रागावले असल्याने त्यांच्याशी बोलत नव्हते. विशेषत:, अयोध्या मुद्द्यावर ते आमरण उपोषणास बसले असताना वाजपेयीजींनी जबरदस्तीने खायला लावून उपोषण सोडण्यास लावले होते. त्यानंतर अशोकजी अधिक नाराज होते. रामजन्मभूमीचा विषय कायमचा मार्गी लावण्यासाठी कायदा केला जावा, याकरिता वाजपेयींना तयार करण्याचे काम मी खात्रीने करू शकेन, असे वाटल्याने ते मला भेटायला आले. यामुळे सरकार पडले, तरी ‘मला त्याची फिकीर नाही’ असेही ते म्हणाले.
 
 
Sri Sri Ravi Shankar
 
माझ्याहून दीडपट वयाचे म्हणजे 76 वर्षांचे असतील अशोकजी. त्यांच्या बोलण्यात तळमळ होती, डोळ्यांत एक वेगळाच भाव होता. तो भाव होता उत्कटतेचा, सात्त्विक संतापाचा, नैराश्याचाही. त्यांनी मला अत्यंत उद्वेगाने विचारले की, मंदिर कधीतरी बांधले जाणार आहे का? मी माझ्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकेन का? मला माझ्या अंतर्ज्ञानाने उत्तर मिळाले की, पुढील किमान 14 वर्षांत तरी हे नक्कीच घडून येणार नाही. ‘प्रार्थना करा, तुमची प्रार्थना आणि वचनबद्धता याद्वारे सारे काही शक्य होईल,’ असे उत्तर मी त्यांना तेव्हा दिल्याचे स्मरते. अशोकजी माझ्या या उत्तराने फारसे समाधानी झाले नाहीत व ते आश्रमातून बाहेर पडले. दुसर्‍याच दिवशी सकाळी ध्यानधारणेस बसलो असताना मला एका देवीचे जीर्णावस्थेतील मंदिर नजरेस पडले, ज्याला लागून एक पाण्याचे कुंडही होते. त्या दोन्हींची अवस्था इतकी बिकट झाली होती की तातडीने त्यांचा जीर्णोद्धार होणे गरजेचे होते. या स्वप्नाकडे वा ध्यानप्रसंगी मला दिसलेल्या त्या दृश्याकडे मी त्यावेळेस फारसे लक्ष दिले नाही. काही दिवसांनी तामिळनाडूतील एक वयोवृद्ध नाडी सिद्धार(सिद्ध संप्रदायातील नाडीपरीक्षक) यांनी आश्रमास भेट दिली व मला भेटण्याची इच्छा प्रकट केली. त्यांना ताडपत्र वाचता येत होते. त्यानुसार ते अत्यंत नम्र अधिकारवाणीने मला म्हणाले, ‘गुरुदेव, या श्रीरामजन्मभूमी वादावर तोडगा काढण्याकरिता दोन्ही समुदायांना एकत्र आणण्यात तुम्हाला अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावायची आहे,’ असे या पत्रांत लिहून ठेवले आहे.
 
 
पुढे ते सिद्धपुरुष असेही म्हणाले की, श्रीरामाची कुलदेवता देवकालीसाठी बांधलेले मंदिर आत्यंतिक दुर्लक्षामुळे सध्या अतिशय दुरवस्थेत आहे, असेही ताडपत्रांवरून स्पष्ट होत आहे. जोपर्यंत त्या मंदिराचा जीर्णोद्धार होत नाही तोपर्यंत अयोध्येतील राममंदिर परिसरातील हिंसा आणि वादाची स्थिती शमणार नाही. हे काम लवकरात लवकर झाले पाहिजे, असे पुनःपुन्हा मला सांगताना त्यांच्या स्वरात त्याबद्दलची निकड आणि निश्चित असा ठोसपणा जाणवत होता.
 

Sri Sri Ravi Shankar  
 
वास्तविक, ते नाडी सिद्धार किंवा मी, आम्हाला दोघांनाही अशा कोणत्या मंदिराच्या अस्तित्वाबाबत काहीच माहिती नव्हती. माझे काही संपर्क वापरून अयोध्येत असे कोणते काली मंदिर आहे का, याची चौकशी सुरू केली. अगदी थोड्याच काळात तिथे दोन काली मंदिरे असल्याचे आम्हाला समजले. त्यातले एक मंदिर शहराच्या अगदी मध्यभागी होते. ते मंदिर छोटी देवकाली मंदिर म्हणून परिचित होते. या मंदिरापासून थोडे दूर आणखी एक मंदिर होते, जे देवकाली मंदिर म्हणून ओळखले जात होते.
 
 
या देवकाली मंदिराची अवस्था अगदीच भयानक झाली होती आणि त्याच्या मध्यभागी असणार्‍या जलकुंडाची शब्दशः उकिरडा किंवा ’डम्पिंग ग्राऊंड’ वाटावे, अशी परिस्थिती होती. मी दिल्लीतील व लखनौमधील आमच्या स्वयंसेवकांना संपर्क केला आणि मंदिराचे नूतनीकरण (जीर्णोद्धार) व कुंडाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम सुरू करण्यास सांगितले.
 
 
अखेर, मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले. हे काम पूर्ण करणार्‍या चमूने अयोध्येच्या देवकाली मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास मी उपस्थित राहावे, अशी इच्छा व्यक्त केली. सप्टेंबर 2002मध्ये माझे काही अनुयायी, त्याचप्रमाणे प्राणप्रतिष्ठेचे पवित्र विधी पार पाडणारे वैदिक व आगम पंडित यांचा समूह यांच्यासह मी अयोध्येत पोहोचलो.
 
 
Sri Sri Ravi Shankar
 
अयोध्येत मी हनुमान गढी, श्रीरामजन्मस्थान आणि अन्य काही पवित्रस्थळांना भेटी दिल्या. शहरातील छोट्या गल्ल्या, प्रातर्विधींनी घाण झालेले रस्ते व एकूणच अस्वच्छता हे सगळे या भागाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे चित्रच स्पष्ट करीत होते. नागरिकांमध्ये एक भीतीयुक्त वातावरणही होते. एक खूप मोठा काळ सुरू राहिलेल्या या संघर्षात किती साधुसंतांना जीवे मारण्यात आले, याच्या अत्यंत भीतीदायक कथा मी जिथे जिथे गेलो तेथील नागरिकांनी मला सांगितल्या. स्वतःचा आश्रम किंवा परिवार वा सामाजिक स्थान नसलेल्या या साधूंच्यावतीने बोलण्याची हिंमत कोणामध्येही नव्हती. माध्यमांमध्ये कधीही स्थान न मिळालेल्या साधूंच्या त्या वेदनादायी कहाण्या या अत्यंत काळीज पिळवटून टाकणार्‍या होत्या.
 
 
 
देवकालीच्या मंदिरात दि. 19 सप्टेंबर, 2002 रोजी सकाळी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. बंगळुरूमधील आमच्या वेद आणि आगम पाठशाळेतील प्रमुख पुरोहित श्री सुंदरमूर्ती शिवम यांच्या नेतृत्वाखाली पुरोहित समूहाने संपन्न केलेल्या यज्ञात मी पूर्णाहुती दिली. देवकालीला तिच्या मूळ तेजस्वी रुपात उजळलेले पाहणे हे माझ्यासाठी अत्यंत आनंददायी होते. मंदिराला त्याचे पुनर्वैभव प्राप्त झालेले पाहून त्याचे वयोवृद्ध पुजारी आनंदाने निःशब्द झाले. त्यांनी मला आलिंगन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या, तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. माझ्याच विस्मरणात गेलेल्या त्या स्वप्नाची मला आठवण झाली. ते स्वप्न आणि त्या नाडी परीक्षकाचे भाकित मी त्या दिवशी कार्यक्रमास उपस्थित असणार्‍या डॉ. बी. के. मोदी यांना सांगितले. विशेष म्हणजे, मंदिरात पूजा सुरू असताना बाहेर कुठेही सांप्रदायिक हिंसाचारामुळे रक्तपात किंवा संघर्ष सुरू झाला नव्हता. त्या सिद्धपुरुषाचे भाकित खरे ठरले होते.
 
 
अशोकजी त्या दिवशी उपस्थित होते आणि मला अंतर्ज्ञानाने पुन्हा एकदा सूचना मिळाली की, राममंदिर पूर्ण होण्यास अजून 14 वर्षांचा काळ जावा लागेल. त्या दिवशी संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात संतसमागमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आम्ही हिंदू आणि सुफी दोन्ही संतांना निमंत्रण दिले होते. अत्यंत आनंदी वातावरणात पार पडलेल्या या सत्संगाला अक्षरशः हजारो लोक उपस्थित होते. यावेळेस मी काही मुस्लीम नेत्यांचा सन्मान केला. त्यांनी कुराणची प्रत आणि ‘तुलसी रामायण’ मला भेट म्हणून दिले. त्याचप्रमाणे श्रीरामाविषयीचा आपल्या मनातील आदरही व्यक्त केला. त्यांच्या वर्तणुकीत निर्विवादपणे एक प्रकारचा भ्रातृभाव मला आढळला. या दोन्ही समुदायांनी या वादावर समोरासमोरच उभे असावे, हा अनेकांसाठी मतपेटीचे राजकारण आणि गुंतलेल्या हितसंबंधांचा विषय असावा, असे मला मनापासून वाटते.
 
 
अनेक वर्षे सुरू असलेल्या या संघर्षात या आधीच अनेकांचे पुरेसे रक्त वाहिले होते आणि हे कार्य प्रस्तावित होण्यासाठी आवश्यक असलेला काळही व्यतित झाला होता. याच वास्तवाची जाणीव मनात ठेवूनच 2003मध्ये मी ‘आऊट ऑफ कोर्ट सेटलमेंट’चा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावानुसार, मुस्लीम समुदायाने सद्भावनेच्या दृष्टिकोनातून रामजन्मभूमीची जागा हिंदू समुदायाला भेट द्यावी व हिंदूंनी परतभेट म्हणून जमिनीचा पाच एकर तुकडा मशिदीच्या बांधकामासाठी भेट म्हणून द्यावा. गेल्या अनेक पिढ्यांमध्ये या दोन समुदायांमध्ये अस्तित्वात असलेल्या भ्रातृभावाचाच संदेश या कृतीद्वारे प्रकट होईल, असे सुचवले.
 
 
एकदा अशोकजींनी मला त्यांच्या अलाहाबादमधील वडिलोपार्जित घरी येण्याचे निमंत्रण दिले होते. तिथे गेल्यानंतर एका समूहाला मी ध्यानधारणेसंबंधी मार्गदर्शन केले. त्यानंतर अशोकजींना म्हणालो की, कोणत्याही कृतीच्या सफलतेत केवळ मानवी कष्ट पुरेसे नसतात. त्यासाठी दैवाचीही मोठी भूमिका असते आणि त्यासाठी गरजेचा असतो तो संयम. अशोकजींनी कोणत्याही प्रकरणांमध्ये घाई करू नये वा कोणत्याही कामात घाईघाईने पाऊल उचलू नये, असे मी त्यांना सुचवले. संध्याकाळपर्यंत ते बरेचसे शांत झाले होते, आश्वस्तही झाले आहेत, असे वाटले. त्यांनी वाजपेयी सरकारविरोधात मांडलेल्या आपल्या बाजूची धारही थोडी सौम्य केली होती.
 
 
...अशीच अनेक वर्षे गेली. 2017मध्ये दोन्ही पक्षकारांनी व सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात पुढाकार घेतला. रामजन्मभूमीच्या बाबतीत मी पुन्हा एकदा मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. अंतिमतः, सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यात जमिनीच्या वाटणीबाबत म्हटले की, संबंधित जमीन ही मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी दिली जावी व पाच एकर जमिनीचा तुकडा हा मशिदीच्या बांधकामाकरिता देण्यात यावा. हा अत्यंत आनंददायी क्षण होता. 500 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षावर शांततामय मार्गाने तोडगा निघाला होता.
 
 
साधारणत:, एखाद्या मोठ्या अपूर्व अशा घटनेमागे अनेक सूक्ष्म पैलू दडलेले असतात. छोट्या-छोट्या घटनांचेच रुपांतर पुढे व्यापक घटनांमध्ये होत असते. आपण अनेकदा मोठ्या स्वरुपातील घटनांमागील कारणे आणि परिणाम याबद्दल वाद घालत राहतो, पण क्वचितच यापलीकडे पाहतो. देवदेवतांची सूक्ष्म शक्ती व्यापक स्वरुपात घडणार्‍या घटनांमध्ये फार स्पष्ट, ठोस भूमिका बजावत असते आणि अर्थातच त्याचा परिणामही तसाच दिसून येतो. हा दैवी वरदहस्त असाच पुढेही भारताला मार्गदर्शन करत राहो.
 
जय गुरुदेव...!
 
(गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या 9 जानेवारी रोजी झालेल्या सत्संगातील राममंदिराबाबतचे मनोगत)
(अनुवाद - मृदुला राजवाडे)

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.