मंदिर वही बन गया है!

विवेक मराठी    19-Jan-2024   
Total Views |

vivek
‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वही बनायेंगे’.. देशातील हिंदूंनी रामरायाला दिलेल्या या वचनाची पूर्तता झाल्याचा समाधानाचा, साफल्याचा क्षण आपण सगळ्यांनी ‘याचि देही, याचि डोळां’ अनुभवला. देशवासीयांपैकी काही मोजक्या व्यक्तींनाच प्रत्यक्ष अयोध्येत उपस्थित राहून घटनेचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले असले, तरी बाकी सर्व हिंदू त्या क्षणी मनाने अयोध्येतच होते आणि प्रत्यक्ष सोहळ्याची अनुभूती घेत सार्थकता अनुभवत होते.
  
या देशात गेली पाचशे वर्र्षे रामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी वेळोवेळी आंदोलन उभारले गेले, वेळोवेळी ते चिरडलेही गेले, तरीही हिंदूंच्या मनातला हा वज्रनिर्धार कोणीही संपवू शकला नाही. हिंदूंमधल्या संघर्षशक्तीला, विजिगीषू वृत्तीला कोणी नख लावू शकले नाही. भव्य राम मंदिराची झालेली निर्मिती आणि प्राणप्रतिष्ठेचा झालेला दिमाखदार सोहळा ही त्याचीच परिणती. पुढची शेकडो वर्षे ज्या घटनेचे स्मरण केले जाईल अशा एका अभूतपूर्व क्षणाचे, ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षीदार झालो आहोत. एक हिंदू म्हणून यापरते भाग्य ते कोणते! हे भाग्य तर आहेच, त्याचबरोबर आपल्या यशस्वी सामूहिक लढ्याचे ते प्रतीक आहे, जे अनेक शतके आपल्याला प्रेरणा देत राहील.
 
 
चार दशकांपूर्वी रामजन्मभूमी मुक्ती लढ्याची सूत्रे जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि उत्तरेतले अनेक साधू-महंत यांच्याकडे गेली, तेव्हा या आंदोलनाने एक महत्त्वाचे वळण घेतले. 1983 साली उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे झालेल्या हिंदू संमेलनात अयोध्या, मथुरा आणि काशी ही स्थाने आणि तेथील मंदिरे मुक्त करण्याबाबत ठराव झाला. या ठरावाचे पुढचे पाऊल म्हणून विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेण्याचे निश्चित झाले. त्यानुसार एप्रिल 1984मध्ये विहिंपने नवी दिल्ली इथे धर्मसंसदेचे पहिले अधिवेशन आयोजित केले. त्या अधिवेशनात हिंदूंच्या तीन पवित्र धर्मस्थळांपैकी रामजन्मभूमी मुक्तीचा प्रश्न सर्वप्रथम हाती घेण्याचे ठरले.
 
 
फेब्रुवारी 1986मध्ये रामलल्ला बंदिवासातून मुक्त झाले. विश्व हिंदू परिषदेने हाती घेतलेल्या आंदोलनाचा एक टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आणि त्यातून आंदोलकांना बळ मिळाले. संकल्पित राम मंदिरासाठी गावोगावी आयोजित केलेल्या रामशिलापूजनाला सर्वसामान्यांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या साध्याशाच दिसणार्‍या प्रतीकात्मक कृतीने पूर्ण देश ढवळून निघाला आणि मुक्ती आंदोलन सामान्य जनतेचे होण्यास हे शिलापूजन कारणीभूत ठरले. दोन हजारपेक्षा जास्त वस्ती असलेल्या देशातल्या तीन लाख सोळा हजार गावांमध्ये शिलापूजन तर झालेच, त्याचबरोबर हिंदू समाज असलेल्या जगभरातल्या 56 देशांमध्येही शिलापूजन झाले. अशा प्रकारे देशभर आणि जगभरात भक्तिभावाने पूजल्या गेलेल्या पावणेतीन लाखांहून अधिक शिला अयोध्येत पोहोचल्या. ‘प्रभुरामाचे स्मरण करत मी पूजलेली ही वीट अयोध्येत उभारल्या जाणार्‍या राम मंदिराचा एक अविभाज्य भाग असणार आहे’ ही भावना हिंदूंच्या मनात नंदादीपासारखी अखंड तेवत राहिली. त्यामागे उपास्य दैवताविषयीची अजोड श्रद्धा होती आणि आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या संघटनेबद्दल अपार विश्वास.
 
 
आंदोलनाचा त्यानंतरचा प्रवासही आव्हानांनी भरलेला, खडतर आणि चढउतारांचाच होता. शिलापूजन होऊन देशभरातल्या रामशिला अयोध्येत आल्यावर पुढचा टप्पा होता शिलान्यासाचा. त्या संकल्पित शिलान्यासातही अडथळे आणले गेले. शिलान्यासावरची स्थगिती उठल्यावर, ठरलेल्या जागेवर नोव्हेंबर 1989मध्ये संकल्पित राम मंदिराची पायाभरणी व शिलान्यास मोठ्या उत्साहात पार पडला. या शिलान्यासामुळे विहिंपने या आंदोलनातला महत्त्वाचा आणखी एक टप्पा पार केला. राम मंदिर होऊ शकते, हा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात दृढ व्हायला हा शिलान्यास कारणीभूत ठरला.
 
 
त्याच दरम्यान उत्तर प्रदेशात झालेल्या सत्तांतराने राज्याची सूत्रे मुलायमसिंह यांच्या हातात गेली आणि त्यांच्या मुस्लिमानुनयी भूमिकेने, हिंसक राजकारणाने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाला अधिकच धार चढली. सप्टेंबर 1990मध्ये भाजपाचे तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ या रथयात्रेने राजकीय पक्षही सक्रिय सहभागी झाला, आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला. त्यानंतर पहिल्या कारसेवेपासून आंदोलनाचा पुढचा टप्पा हा तीव्र झालेल्या लढ्याचा, रक्तरंजित कहाण्यांचा, असंख्य अनाम कारसेवकांनी आपल्या श्रद्धास्थानासाठी दिलेल्या बलिदानाचा आहे. त्याचबरोबर आपल्या प्रखर, तेजस्वी वाणीने अवघा देश ढवळून काढणार्‍या साध्वी ऋतंभरा, उमा भारती अशांसारख्या अनेकांच्या असाधारण योगदानाचाही आहे.
 
 
1992 साली कारसेवा थांबली आणि विवादित वास्तू उद्ध्वस्त झाल्यावर रामलल्लांची मूर्ती एका तंबूत ठेवण्यात आली. त्यापुढे सुरू झाली दीर्घकालीन न्यायालयीन लढाई. ती प्राणपणाने लढण्यात लढवय्या आंदोलकांनी कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. शेवटी विजय सत्याचा झाला आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राम मंदिर निर्मितीचा मार्ग खुला झाला.
 
 
रथयात्रेनंतर देशातल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीआधी प्रसिद्ध होणार्‍या भाजपाच्या जाहीरनाम्यात राम मंदिर निर्मितीचे आश्वासन असायचे. मात्र त्यासाठी सत्तासूत्रे हातात नव्हती आणि ती आली, तेव्हा संसदेत पुरेसे संख्याबळ नव्हते. मात्र तेव्हाही हा निर्धार बदलला नाही. यावरून विरोधी पक्षीयांनी यथेच्छ टवाळीही केली. ‘मंदिर वही बनायेंगे, मगर तारीख नही बतायेंगे’ असा उपरोध केला जाऊ लागला. 2014मध्ये निर्विवाद बहुमत मिळवत भाजपाच्या हाती देशाची सत्तासूत्रे आली, तरी 2019पर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा सुस्पष्ट निर्वाळा नव्हता. या पाच वर्षांत केंद्र सरकारने जनहिताची कामे करण्यास आणि देशाची आर्थिक घडी मजबूत करण्यास प्राधान्य दिले. सर्वोच्च न्यायालयाचा कौल मिळाल्यावर मंदिरनिर्मितीच्या दिशेने पावले पडू लागली. तरीही बहुधा वेळ आली नव्हती. कोरोनासारख्या महामारीने पुन्हा एकदा हिंदूंच्या वज्रनिर्धाराची परीक्षा घेतली. या संकटाशी धीरोदात्तपणे सामना करत भारताने हे संकटही यशस्वीपणे परतवून लावले आणि मंदिरनिर्मितीच्या कामाला वेग आला. 1984मध्ये विहिंपवर या लढ्याची जबाबदारी सोपवली, तेव्हा संघटनेने यासाठी ‘श्री राम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समिती’ची स्थापना केली होती. त्याच्या अध्यक्षस्थानी गोरखपूरच्या गोरक्षपीठाचे प्रमुख महंत अवैद्यनाथ हे होते. आज त्यांचेच शिष्य योगी आदित्यनाथजी महाराज मुख्यमंत्रिपदी असताना राम मंदिराचे निर्माण झाले. गुरूने हाती घेतलेले काम पूर्ण करण्याचे सौभाग्य योगीजींना प्राप्त झाले.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेले राम मंदिराचे निर्माण हे कोट्यवधी भारतीयांनी श्रद्धास्थानासाठी दिलेल्या यशस्वी जनआंदोलनाचे आणि सामूहिक वज्रनिर्धाराचे प्रतीक आहे.