श्रीराम मंदिर - रामसेतू राष्ट्रनिर्माणाचा

विवेक मराठी    04-Jan-2024   
Total Views |
shreeram
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रामजन्मभूमी आंदोलनाच्या बाजूने लागल्यामुळे निराश झालेल्या मंडळींनी आपले डावपेच बदलले. हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी त्या जागी मंदिराचा आग्रह न धरता रुग्णालय किंवा सर्वसहमती होईल असे अन्य काही बांधावे, असा दुष्प्रचार सुरू झाला होता. हिंदू तरुण-तरुणीच काय, भले-भले लोक त्यास बळी पडले होते. मात्र राष्ट्रउभारणीच्या कार्यासाठी श्रीराम मंदिरनिर्माणाची गरज का आहे, हे विश्व हिंदू परिषद आणि रा.स्व. संघाकडून अथकपणे सांगितले गेल्यावर अनेकांना नवी दृष्टी मिळाली. यापुढे श्रीराम मंदिरनिर्माणाच्या कितीतरी पलीकडे जात आपल्याला राष्ट्रनिर्माणाचा सेतू बांधायचा आहे. या ‘शिव’कार्यात तुमचाही यथाशक्ती हातभार लागू द्या.
देश म्हणजे तेथील नद्या-डोंगर-जमीन वगैरे नसून तेथील जनता असते, असे सुलभीकरण करण्याची पद्धत अलीकडे रूढ झाली. राष्ट्र असे काही वेगळे नसून केवळ जनतेची इच्छाच सर्वतोपरी असते, हे ठसवण्याचा भाग त्यामागे असतो. यात वावगे काय आहे, असे कोणाला वाटेल. मात्र लोकांची दिशाभूल करत तेथील कुटुंबव्यवस्था उद्ध्वस्त करण्यापासून ते अराजक निर्माण करत देशात फुटीरतावाद रुजवण्यापर्यंत सर्व प्रकारचे कुटिल हेतू यामागे असतात. ज्या देशाला स्वत:ची अशी संस्कृती किंवा वारसा नसतो, तेथे हा समज रुजवणे फार सोपे जाते. भारतासारख्या प्राचीन वारसा असलेल्या देशामध्ये हे रुजवण्याचे प्रयत्न अखंडपणे होत असूनही त्यांना मर्यादितच यश मिळाले. एक राष्ट्र म्हणून या देशाचा जो वारसा आहे, त्याची नोंद या दुष्प्रचारकांनी घेतलेली नव्हती आणि या राष्ट्राचा आत्माच त्यांना ओळखता आला नव्हता. त्यामुळे बाबराच्या काळात श्रीरामजन्मभूमीवर उभ्या केलेल्या वादग्रस्त स्थळी(च) श्रीराम मंदिर उभे केले जावे, या मागणीला थोपवण्यासाठी संविधानाची ढाल वापरली गेली. हिंदू-मुस्लीम एकता भंग पावेल अशी भीती घातली गेली.. मुळात अशी एकता कधी तरी अस्तित्वात होती का, याकडे साफ दुर्लक्ष करत. काँग्रेससह जे तद्दन जातीयवादी व मुस्लिमांचा अनुनय करणारे आणि आपापल्या राज्यांमध्ये ’जंगलराज’ निर्माण करणारे प्रादेशिक पक्ष होते, ते स्वत:ला पुरोगामी व धर्मनिरपेक्ष म्हणवून घेऊ लागले. हिंदुद्वेषाच्या आधारावर या देशाची एकदा फाळणी झालेली असतानाही इथल्या मुस्लिमांच्या कट्टर नेत्यांच्या हिंदूंना आव्हान देण्याच्या भूमिकेला या राजकीय पक्षांच्या हिंदू नेत्यांमुळेच पाठबळ मिळाले आणि त्यामुळे श्रीरामजन्मभूमी आंदोलनाची वाट बिकट झाली. हे मुस्लीम आणि ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या काळात नव्हे, तर स्वतंत्र म्हणवणार्‍या भारतात घडत होते आणि भारताच्या राष्ट्रपुरुषाला हे असाहाय्यपणे पाहावे लागत होते. पुढे समेट घडवण्याच्या हिंदूंच्या प्रत्येक प्रयत्नात अडथळे आणले गेले. ही जागा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेची आहे, तुम्हाला हीच मशीद आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने इतरत्र हलवून देतो, असेही सुचवण्यात आले. परंतु श्रीरामजन्मभूमीच्या शत्रूंनी त्याला साफ नकार दिला. त्यातून हे आंदोलन शमण्याऐवजी आणखी तीव्र होत गेले आणि ते वादग्रस्त बांधकाम उद्ध्वस्त होण्यात त्याची परिणती झाली. श्रीरामजन्मभूमीच्या शत्रूंनी यातूनही काही धडा घेतला नाही आणि ती जागा हिंदूंच्या ताब्यात न जाण्यासाठी न्यायालयांना हत्यारासारखे वापरले. म्हटले तसे राष्ट्रमानसाचा अविभाज्य भाग असलेल्या श्रीरामांबाबतच्या भारतवासीयांच्या भावनांशी अशा पद्धतीने खेळले जात होते. मध्यंतरीच्या काळामध्ये या धूर्त मंडळींनी आपले दांभिक धर्मनिरपेक्षतेचे हत्यार चालत नसल्याचे लक्षात आल्यावर आपली कार्यपद्धत बदलली. भारत या राष्ट्राचा जीव - म्हणजे या राष्ट्राची चिती कशात आहे हे ओळखून त्यांनी त्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रामजन्मभूमी आंदोलनाच्या बाजूने लागल्यामुळे निराश झालेल्या मंडळींनी आपले डावपेच बदलले.
 एका पिढीचे अंतर
 
या विषयात कोर्टबाजी व अन्य कारणांमुळे कालहरण झाल्यानेे ’श्रीराम मंदिर हा विषय आजच्या काळातदेखील महत्त्वाचा कसा आहे’ याबाबतची जागृती करणे गरजेचे भासू लागले. अलीकडेच झालेल्या काशी कॉरिडॉरच्या भव्य प्रकल्पाच्या निमित्ताने इस्लामी शासकांनी हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर हेतुपुरस्सर कसा घाला घातला, ही जाणीव नव्या पिढीच्या मनातही निर्माण झाली. ज्या खमकेपणाने सद्य सरकारने हा प्रकल्प यशस्वी केला, ते पाहून हिंदू मनांवर समाधानाची फुंकर मारली गेली. त्या जोडीला श्रीराम मंदिरनिर्मितीचा संदेश घराघरात नेण्यासाठी फार मोठ्या पातळीवर प्रयत्न केले गेले. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून अयोध्येतील श्रीराम मंदिर हा केवळ देव-देव करण्यापुरता विषय नसून त्याचा आवाका फार मोठा आहे, याचे नव्या पिढीसह सर्वसामान्य हिंदूंना आकलन होऊ लागले. आता मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असताना देशात सर्वसाधारणपणे भक्तिमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे, ते यामुळे.
 

rammandir 
पाचशे वर्षांची प्रतीक्षा आणि कोंडलेल्या भावनांना वाट
 
प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने अक्षता कलशाच्या दर्शनाचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहेत. त्या कलशाचे दर्शन घेताना काहींच्या डोळ्यांमध्ये पाणी उभे राहत आहे, असे वाचले. पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेचे फळ आता मिळत आहे, यामागचा अर्थ फार खोल आहे. राम मंदिर उद्ध्वस्त केले गेले व हे कमी झाले म्हणून की काय, त्यावर मशीद उभी केली गेली, या घटनेचा तेव्हाच्या जनमानसावर केवढा गंभीर परिणाम झाला असेल, याची कल्पना करणेही आज अशक्य आहे. काही जणांनी श्रीरामाचे मूळ मंदिर भग्न केले जात असताना प्राणपणाने विरोध करत मरण पत्करले असेल.. काही जणांनी भावना अनिवार होऊन दु:खातिरेकाने डोके आपटून घेऊन प्राण सोडले असतील.. हातात तलवारी असलेल्या या क्रूर आक्रमकांना आपण प्रत्युत्तर देऊ शकत नाही, या भावनेतून आलेली हतबलता पुढच्या कित्येक पिढ्यांनी अनुभवली असेल. पुढे काही वर्षांनंतर त्या ठिकाणी जे काही उरले असेल, त्याचे दर्शन घेत अनेकांनी मूकाश्रू वाहवले असतील आणि त्याच हतबलतेचा वेदनादायक अनुभव घेतला असेल. तेव्हा या पाचशे वर्षांचा अगदी सहज उल्लेख करणे हे फार वरवरचे ठरते. त्याच्या आत डोकावून पाहिल्यास नाकर्तेपणा, हतबलता, अन्याय, दु:ख, विषाद, आशा, प्रार्थना व संताप अशा विविध भावनांचा कोलाहल त्यात असल्याचे आढळून येईल. त्या सामूहिक वेदनेतून आलेला आताचा हा समाधानाचा व परमानंदाचा हुंकार आहे.
 
 
rammandir
हिंदू मनाची विभागणी
 
सश्रद्ध हिंदूंच्या मनात असलेल्या रामाचे कोणत्या ना कोणत्या निमित्ताने प्रकटीकरण होत असते. आपल्याकडे ते रामनवमीला म्हणा किंवा दसर्‍याला किंवा अगदी दररोज घरात म्हटल्या जाणार्‍या रामरक्षेच्या स्वरूपात घडत असते. संत रामदास किंवा हनुमान यांच्या उपासनेच्या किंवा श्रीरामचरितमानसाच्या निमित्तानेही ते घडते. मात्र हे होत असताना रामरक्षेत सांगितलेला श्रीरामाचा दुष्टांचे निर्दालन करण्याचा भाव लक्षात घेतला जात नाही आणि केवळ ’भक्ती’ होते. गीतरामायणासारखी अलौकिक कलाकृती असो किंवा दूरचित्रवाणीवरील रामायण ही लोकप्रिय मालिका असो, त्यातून भाविक हिंदूंच्या भावना उचंबळून आल्या, परंतु तेवढ्यापुरत्या. हिंदूंवर झालेल्या आणि अखंडपणे घडत असलेल्या अन्यायाबाबत त्यातून जागृती झाली नाही. त्या त्या पिढीमधील संस्कारक्षम मनांवर रामायणाचे संस्कार झाले, असे मात्र म्हणता येईल. अर्थात तेदेखील कमी महत्त्वाचे नाही. मात्र हिंदूंमधील एकूणच उदासीनतेमुळे ’तुमचा राम वेगळा, आमचा वेगळा’, ’तुमचा राम नेहमी धनुर्धारी म्हणजे सशस्त्रच का असतो?’, ’आम्ही हिंदू आहोत, परंतु आम्हाला हिंदुत्व मान्य नाही’ अशा प्रकारचे कुतर्क लढवणारेदेखील या सश्रद्ध हिंदूंमध्येच मोडताना दिसतात. संतशिकवणीच्या आधारावर किंवा श्रीरामचरित्राच्या आधारावर यापैकी काहींचे शंकासमाधान करता येते. हिंदू टिकले तरच येथे श्रीरामाचे नाव उरेल, हे सांगितले आणि वास्तवाला धरून हिंदूंच्या अस्तित्वासमोरील धोक्यांची जाणीव करून दिली, तर त्यापैकी अनेकांचे समाधान होते. मात्र काही हिंदूंना या देशातील सकल हिंदू आपले कोणीतरी आहेत, या जाणिवेचा स्पर्शच स्वत:ला होऊ द्यायचा नाही. इतर हिंदूंवरील अन्यायाबद्दल त्यांच्या मनात कसलीच संवेदनशीलता नाही. श्रीराम-श्रीकृष्ण-महादेव ही त्रयी या राष्ट्रहृदयात वसणार्‍या दैवतांपैकी आहे व त्यांच्या बाबतीत संविधानाच्या व धर्मनिरपेक्षतेच्या आडून होणारा मस्तवालपणा सहन केला जाणार नाही, हा विचारच त्यांच्या मनात उमटत नाही. आपल्या सभोवतालची, सामाजिक वा राजकीय प्रतिमा जपण्याच्या नादात विकृत पातळी गाठत त्यांना जाहीरपणे हिंदुविरोधी भूमिका घ्यावी लागते. हिंदुहिताचा विचार करणार्‍यांना ते संकुचित विचारांचे ठरवतात. यातून आपण देशहिताशीही तडजोड करत आहोत, हे कळत असूनदेखील केवळ आपले अस्तित्व राखण्यासाठी ते निलाजरेपणे असे करत असतात. त्यामुळे स्वत:ला हिंदू म्हणवणारे असे लोक केवळ जन्मानेच हिंदू आहेत असे खेदाने म्हणावे लागते. हे लोक मग हिंदुभावनेची टिंगल करण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. आदिवासी हिंदू नाहीतच, असा निव्वळ देशघातकी प्रचार करण्यास खळखळ करत नाहीत.
 

rammandir 
 
या संदर्भात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. बाबरी जमीनदोस्त झाल्यावर हिंदू-मुस्लीम ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी त्या जागी मंदिराचा आग्रह न धरता रुग्णालय किंवा सर्वसहमती होईल असे अन्य काही बांधावे, असा दुष्प्रचार सुरू झाला होता. जे रूढ अर्थाने धार्मिक नव्हते वा हिंदूंच्या देवस्थानांना भ्रष्ट करण्याबाबत ज्यांच्या भावना तीव्र नव्हत्या, असे हिंदू तरुण-तरुणीच काय, भले-भले लोक त्यास बळी पडले होते. मात्र राष्ट्रउभारणीच्या कार्यासाठी श्रीराम मंदिरनिर्माणाची गरज का आहे, हे विश्व हिंदू परिषद आणि रा.स्व. संघाकडून अथकपणे सांगितले गेल्यावर अनेकांना नवी दृष्टी मिळाली. या संदर्भात उत्तम अभिनेता रणवीर शोरे याने नुकतीच दिलेली प्रामाणिक प्रतिक्रिया फार मोलाची आहे. त्याने ’एक्स’वर (ट्विटरवर) कबूल केले की ‘शांततेच्या मृगजळाला नको तेवढे महत्त्व देण्याच्या नादात त्याच्या बुद्धीने जे सत्य आहे, त्याचा बळी दिला आणि मशिदीच्या जागी श्रीराम मंदिराऐवजी एखादे स्मारक किंवा रुग्णालय उभे करावे या दुष्प्रचाराला तो बळी पडला, याची त्याला शरम वाटते.’
 
 
हिंदुत्व म्हणजे हिंदू असणे इतकी सोपी व्याख्या. मग त्यात हिंदुहिताचा विचारदेखील आला. कारण धर्माचे रक्षण करणे, धर्मावरचा अन्याय दूर करणे हे त्या धर्मापेक्षा वेगळे कसे असू शकते? संपूर्ण देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेले श्रीराम मंदिर उद्ध्वस्त करून त्या जागी मशीद बांधणे हा हिंदूंच्या मानसिकतेवरचा क्रूर घाला होता. शिवाय हे एकमेव उदाहरण नव्हते. हे आघात दूर करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य होते. त्यामुळे श्रीराम मंदिरनिर्माण हा निश्चितपणे हिंदुत्वाचाच भाग होता. याची जाणीव नसणे एकवेळ क्षम्य समजले जाऊ शकते. मात्र आता-आता आलेल्या संविधानाचा दाखला देत सेक्युलर असल्याचा दावा करणार्‍या इथल्या पाताळयंत्री राजकारण्यांनी हे करणे जणू मोठा गुन्हा असल्याचे चित्र निर्माण केले. त्यांच्या या दुष्प्रचारात वाहवत जाणार्‍या हिंदूंसमोर रणवीरचे हे उदाहरण ठळकपणे आणायला हवे.
 
shreeram 
राजकारणी आणि श्रीराम मंदिर
 
हिंदुहित जपण्याबाबतचा काँग्रेसी राजवटींचा व बिगरभाजपा आघाडी सरकारांच्या कारकिर्दीचा इतिहास काळाकुट्ट आहे. सर्वात हद्द झाली ती 2007मध्ये. रामजन्मभूमी आंदोलनाशी संबंधित नसलेल्या रामसेतू प्रकरणात काँग्रेस आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात ’श्रीराम काल्पनिक आहेत’ असे सांगणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले. या देशाची शून्य समज असलेल्या सोनिया गांधी यांच्याकडे तेव्हाच्या काँग्रेस सरकारचे नेतृत्व होते आणि सनातन धर्मावर सातत्याने विखारी टीका करणार्‍या तामिळनाडूमधील द्रमुक सरकारची मर्जी राखण्यासाठी हे केले गेले. मनाने अभारतीय असलेल्या दोन शक्ती एकत्र आल्यावर केवढा अनर्थ होऊ शकतो आणि निर्लज्जपणे केवढा हिडीसपणा केला जाऊ शकतो, हे त्या वेळी देशाने पाहिले. त्या काँग्रेस सरकारमधील एकाही मंत्र्याने, खासदाराने किंवा आमदाराने या अभद्र घटनेचा निषेध केला नाही की आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता. हे पाहता स्वत: हिंदू असूनही गेल्या सात दशकांमध्ये हिंदुद्रोही वर्तन यांच्या कसे अंगवळणी पडले आहे, याची प्रचिती येईल.
 
 
मुस्लिमांचा अनुनय करण्यासाठी अयोध्येतील कारसेवकांवर गोळीबार करणारे मुलायमसिंह आता हयात नाहीत. मात्र त्याच आधारावर आपले उरलेसुरले अस्तित्व टिकवून धरलेले अखिलेश यादव आजदेखील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला ‘धार्मिक ध्रुवीकरण’ असेच संबोधत आहेत. कर्नाटकमध्ये कारसेवकांवर कारवाई करण्यासाठी जुने प्रकरण उकरून काढले जात असताना सोनिया गांधी आणि त्यांच्या शब्दाबाहेर जाणे शक्य नसलेले खरगे यांनी ते या कार्यक्रमाला हजर राहणार की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. वर उल्लेख केल्याप्रमाणे गेली अनेक दशके भारतात राहूनही या देशाचा आत्माच कळलेला नसल्यामुळे त्यांची मुलेदेखील निवडणूक आल्यावरच मंदिरभेटींचे सत्र आरंभतात. त्यांनाही काही स्वत्व उमगलेले आहे असे दिसत नाही. हे अतिशय दुर्दैवी आहे. ‘या देशात (मुस्लिमांचा अनुनय थांबून) जेव्हा हिंदूंची मतपेटी बनेल, तेव्हा हे काँग्रेसवाले कोटावरूनही जानवे घालायला कमी करणार नाहीत’ हे भविष्य वर्तवणारे स्वा. सावरकर खरोखर द्रष्टे होते. अर्थात राहुल व प्रियंका गांधी घेत असलेले हिंदू असण्याचे हे सोंग बेगडी असल्याचे लगेच उघड होते. कर्नाटक निवडणुकीत निव्वळ एकगठ्ठा मुस्लीम मतांच्या आधारावर निवडून येण्याचे काँग्रेसचे डावपेच तेलंगणमध्येही यशस्वी ठरले. त्यामुळे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास हजर राहिल्यास निर्माण होणारा मुस्लिमांचा रोष कसा पत्करायचा, हे आव्हान काँग्रेससमोर आज 2024 या वर्षातदेखील आहे. दुसरीकडे आजवर आपण सतत राम मंदिरविरोधात भूमिका घेतली असल्यामुळे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमास कोणत्या तोंडाने उपस्थिती लावायची, हा प्रश्नदेखील त्यांच्यासमोर आहे. तेव्हा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमामुळे ’इकडे आड तिकडे विहीर’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. मुस्लीम अनुनयाच्या नादात सातत्याने श्रीराम मंदिराविरुद्ध भूमिका घेणार्‍या जंगलराज लालूच्या पक्षाला आतादेखील काही सद्बुद्धी सुचण्याची शक्यता नाही. सत्तेच्या लोभापायी हिंदुत्वाची झूल सहजपणे फेकून देणारे आणि तरीदेखील स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवण्याचे ढोंग करणारे उबाठा शिवसेनेचे भोंदू साफ उघडे पडले आहेत व त्यांना आता तोंड दाखवण्यासही जागा उरलेली नाही. पक्षाच्या नावात ’राष्ट्रवादी’ हा शब्द नावापुरताच असलेले शरद पवार आताही आपले देशघातकी राजकारण सोडायला तयार नाहीत. ‘आमचा राम मशीद पाडून प्रसन्न होणारा नाही’ असे म्हणण्याइतकीच विचारांची झेप असलेले केजरीवाल प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला हजर राहतील हे संभवत नाही. बंगालमध्ये ममता आणि कम्युनिस्ट या दोघांनीही अपेक्षेप्रमाणे या कार्यक्रमाला हजर न राहण्याची भूमिका घेतली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सातत्याने सनातन धर्माविरूद्ध भूमिका घेणार्‍या द्रमुक पक्षाची भूमिका आजही तशीच असली, तरी मुख्यमंत्री स्टॅलिन यांची सावत्र बहीण असलेल्या कनिमोळी यांच्या कुटुंबीयांनी श्रीराम मंदिराकरता इंग्लिशमध्ये ’जय श्रीराम’ असे लिहिलेली सहाशे कि.ग्रॅ. वजनाची घंटा भेट म्हणून पाठवली आहे. तूर्त तरी हाच एक आश्चर्यकारक अपवाद आहे.
 
भारत वेगळा कसा?
 
इस्लामने व ख्रिस्ती आक्रमकांनी अत्याचार करत व विविध मार्गांनी जगाच्या अनेक भागांची मूळ संस्कृतीच नष्ट केली. आता त्या भागांमधील संस्कृती फार फार तर तेथील संग्रहालयांपुरती उरली आहे. भारतात यांचा धोका आजही संपलेला नसला, तरी आणि आता झालेली व होत असलेली हिंदूंमधील जागृती पाहता हे आव्हान यशस्वीपणे परतवले जाईल यात कोणालाही शंका नसेल. अर्थात याबाबत बेसावध राहून चालणार नाही. कित्येक शतकांची आक्रमणे व पारतंत्र्य या सार्‍यातूनही इथली संस्कृती शिल्लक आहे, असे आपण अभिमानाने सांगतो खरे; मात्र ते केवळ अर्धसत्य आहे. जे हिंदुद्रोही आहेत, त्यांची मने मुर्दाड बनलेली असल्यामुळे केवळ जन्माने हिंदू असलेल्यांची चालती-बोलती कलेवरे आपल्या आसपास दिसतात ती याचमुळे. थोडे खोलात जाऊन पाहिले, तर गेल्या एक हजार वर्षांमध्ये इस्लामी व ब्रिटिश आक्रमकांनी आपल्या मानसिकतेचे जेवढे नुकसान केले नसेल, त्यापेक्षा गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये आपणच अधिक नुकसान करून घेतलेले आहे, हे लक्षात येईल.
 
सार्थ भव्यतेचा ध्यास
 
निर्माण होणारे श्रीराम मंदिर खरोखरच भव्य असणार आहे, हे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्याचे स्थापत्य वाखाणले जात आहे. आजवर ठिकठिकाणी उभ्या होणार्‍या कलाकुसर असलेल्या अक्षरधाम मंदिरांचे कौतुक होत असे. तेव्हा प्रश्न पडत असे की देशात उभी असलेली कित्येक शतकांपूर्वीची भव्य-अतिभव्य मंदिरे त्या काळात कशी बांधली असतील! आज संपूर्ण देश अशा भव्य मंदिराच्या उभारणीच्या कार्याचा साक्षीदार आहे. या निमित्ताने हेदेखील सांगावेसे वाटते की गेल्या काही वर्षांमध्ये देशाने भव्यतेचा सार्थ ध्यास घेतलेला दिसतो. जगातील सर्वात उंच असलेल्या सरदार पटेलांच्या पुतळ्यानंतर ब्रह्मपुत्रेवर 9 कि.मी. लांबीचा भूपेन हजारिका पूल बांधला गेला. महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग खुला झाला. नव्या संसद भवनाचे देशार्पण झाले. ध्यानासाठीचे जगातील सर्वात मोठे सात मजली स्वर्वेद मंदिर वाराणसीत अलीकडेच खुले झाले. सुरतमध्ये जगातील सर्वात मोठे कार्यालय संकुल असलेल्या हिरेबाजाराचे उद्घाटन नुकतेच झाले. मुंबईत 12 जानेवारीला उद्घाटन होणारा अटल सागरी पूल आणि लदाखला जोडणारा तब्बल 14 कि.मी. लांबीचा निर्माणाधीन असलेला जोझिला बोगदा ही आणखी काही उदाहरणे. असे भव्य प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्याने देशवासीयांच्या आत्मविश्वासात भर पडणार आहे.
 
सरतेशेवटी आवाहन
रे माझ्या हिंदू बांधवांनो,
 
 
भलेही श्रीराम मंदिरनिर्माणास हातभार लावणार्‍या संघटनांबाबत तुमच्या काही शंका असतील,
 
तरी अयोध्येतले व त्या निमित्ताने एकूणच देशातले भारावून टाकणारे वातावरण अनुभवायला बाहेर पडा. अयोध्येला जाणे शक्य नसेल, तर त्या निमित्ताने ठिकठिकाणी चालू असलेल्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा.
 
एका सदाखोडसाळ पत्रकाराने हिंदुत्वावर आधारित पुस्तके आयुष्यात प्रथमच आणि तीदेखील अयोध्येत पाहिली. हिंदुत्ववादी एरवी कशाच्या आधारावर बोलतात, हेच त्याला आजवर माहीत नव्हते, असे हा म्हणतो.. म्हणजे आता त्याच्यात एवढा बदल तरी झाला आहे. ’गेल्या अनेक शतकांची प्रतीक्षा पूर्ण होत आहे’ असेदेखील तो म्हणाला.
 
अयोध्येतील मंदिरनिर्माणाची माहिती घेताना एका महिला पत्रकाराला भरून आले. तेथील वातावरणामुळे विचार करण्याच्या पद्धतीत बदल होणे साहजिक आहे.
 
आजवर तुम्हाला हिंदुत्व या शब्दाची अ‍ॅलर्जी असेल, तर त्यावरचा उपाय शोधून त्या शब्दाचा व्यापक अर्थ समजून घेण्याची ही उत्तम संधी आहे. ती दवडू नका.
 
अयोध्येत श्रीरामाचे मंदिर उभे करणार्‍या हिंदुत्ववादी शक्ती श्रीरामापेक्षा खचितच मोठ्या नाहीत. मात्र आज जे भव्यदिव्य घडताना दिसत आहे, ते केवळ आणि केवळ त्यांच्याचमुळे आहे, हे विसरू नका.
 
संविधानाचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही, मात्र त्यातील धर्मनिरपेक्षतेचा दाखला देत दुसरीकडे प्रत्यक्षात काय घडवले जात आहे, याबाबत तुमची दिशाभूल केली गेल्याचे वास्तव पडताळून पाहा.
 
फेकू व तत्सम संबोधनांपलीकडे जात पंतप्रधान मोदींना वारंवार जनसमर्थन का मिळत आहे, याचा गंभीरपणे विचार करा.
भलेही तुमच्यापैकी काही जण नास्तिक असतील, मात्र तरीही तुम्ही श्रीराम मंदिरनिर्माणामागचा राष्ट्रनिर्मितीचा अजेंडा लक्षात घेऊ शकता.
 
सत्तेसाठी श्रीरामाला काल्पनिक म्हणण्यापर्यंत मंदिरविरोधकांची मजल गेली. याचा अर्थ किती गंभीर आहे, हे लक्षात घ्या.
तुमचे हिंदू असणे हे तुमच्या जन्माच्या प्रमाणपत्रातील उल्लेखापुरते मर्यादित आहे की तुम्हाला हिंदुहिताची जाण आहे, चाड आहे?
तुम्ही हिंदू आहात म्हणजे नक्की काय आहात, याची जाणीव या अतिशय मंगल अशा पर्वामुळे तरी तुमच्यात निर्माण होते का, याचा विचार करा. तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. ती दवडू नका.
 
‘श्रीराम यांच्या मालकीचे आहेत का?’ असे विचारणार्‍यांचा बदमाशपणा तुमच्या लक्षात यायला आता फार वेळ लागणार नाही. कारण वाराणसी-मथुरा-अयोध्येसाठी काही करण्याची बुद्धी तुम्हाला का सुचली नाही? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकाल.
श्रीराम मंदिरनिर्माण होऊ नये याकरता जंग जंग पछाडूनदेखील सर्व क्षेत्रांमधील लिब्रांडू आणि दांभिक राजकारणी चारीमुंड्या चित झाले आहेत आणि भव्य श्रीराम मंदिराचा मार्ग आता प्रशस्त झाला आहे. आनंद त्याचा नाही. त्यांच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडणे गरजेचे आहे.
 
 
एका प्रकारे हा इतिहास तुमच्या-माझ्या जीवितकाळात घडत आहे. हे तुमचे भाग्य आहे. माझेही.
 
ही संधी गमावण्याचा करंटेपणा करू नका.
 
श्रीरामांनी लंकेत पोहोचण्यासाठी शक्य त्या सर्वांची मदत घेऊन रामसेतू बनवून घेतला होता.
 
श्रीराम मंदिरनिर्माणाच्या कितीतरी पलीकडे जात आपल्याला राष्ट्रनिर्माणाचा सेतू बांधायचा आहे. या ‘शिव’कार्यात तुमचाही यथाशक्ति हातभार लागू द्या.