शक्तिरूपेण संस्थिता

विवेक मराठी    07-Oct-2024   
Total Views |
 
नवरात्रीच्या पावनपर्वात त्यांच्यासारख्या स्त्रीचे चरित्र वाचणे, त्यातून प्रेरणा घेत पुढे जाणे, ही एक प्रकारची शक्तिपूजाच आहे. अशी शक्तिपूजा नवरात्रोत्सव खर्‍या अर्थाने साजरा केल्याचे समाधान देऊन जाईल. 

vivek
 
सर्वत्र शक्तिपूजा आणि जागराचे पर्व सुरू असताना, स्मरण होते ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे. कारण हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिजन्मशताब्दीचे वर्ष आहे. 31 मे 1725 ही अहिल्याबाईंची जन्मतारीख. 31 मे 2024 पासून त्यांच्या त्रिजन्मशताब्दीला सुरुवात झाली. यानिमित्ताने होत असलेल्या विविध व्याख्यानांमधून अहिल्याबाईंचे जीवनकार्य आणि त्याची महती आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी, हा उद्देश आहे. अहिल्याबाईंचे व्यक्तिमत्त्व जसे बहुआयामी होते तसेच त्यांचे कर्तृत्वही! बहुसंख्यांसाठी अहिल्याबाई म्हणजे, अयोध्येतील राम मंदिरासहित भारताच्या चारही दिशांना असलेल्या अनेक महत्त्वाच्या मंदिरांचे पुनरुज्जीवन करणारी, येणार्‍या यात्रेकरूंसाठी त्या धार्मिक स्थळांभोवती पाणपोई-अन्नछत्र-धर्मशाळा उभारणारी सत्त्वगुणसंपन्न अशी राज्यकर्ती. त्यांनी केलेले हे कामही मोठेच होते, कारण स्वत:च्या राज्याची वेस ओलांडून हे काम भारतभरात करणारी ती एकमेव राज्यकर्ती होती. त्यामुळे त्याचे मोल आहेच; पण त्यावरून अहिल्याबाईंच्या अजोड व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण उलगडा होत नाही, हेही लक्षात घ्यावे. ही कामे त्यांच्या अनेक महत्त्वाच्या कामांपैकी काही होती. म्हणूनच त्यांच्या त्रिजन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांना समग्रतेने जाणून घ्यायला हवे.
 
 
28 वर्षे इतका दीर्घकाळ एकहाती राज्यकारभार सांभाळणारी राज्यकर्ती, युद्धकौशल्य आणि युद्ध व्यवस्थापन कौशल्यनिपुण असूनही शक्यतो युद्धापासून लांब राहणारी राज्यकर्ती, राज्यात शांतता-सुव्यवस्था नांदावी यासाठी अनेक उपाययोजना करतानाच भौतिक समृद्धीचे मोल जाणत त्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणारी राज्यकर्ती, न्यायनिपुण आणि वेळप्रसंगी न्यायनिष्ठुर असलेली राज्यकर्ती, चारही बाजूंनी वैभव नांदत असतानाही विरागी वृत्ती अंगी बाणवलेली राज्यकर्ती, स्त्री-पुरुष समानता याचा उच्चार न करताही कृतीतून या विचाराची सदैव पाठराखण करणारी राज्यकर्ती... या एकेक गुणविशेषासाठी त्यांच्या जीवनचरित्रात अनेक उदाहरणे सापडतात. काळाच्या पुढे असलेली त्यांच्या विचारांची झेप, निर्णयक्षमता आपल्याला थक्क करते. त्यांचे जीवनचरित्र आपल्याला अंतर्बाह्य उजळून टाकते आणि त्याच वेळी आजवर एका मर्यादित परिघात त्यांचा परिचय असल्याबद्दल खंतही वाटते.
 
 
अनेक प्रेरक घटनांनी युक्त असे अहिल्याबाईंचे चरित्र आहे. त्यातले एक निवडणे तसे कठीणच, तरीही आजच्या नवरात्रोत्सवाच्या-शक्तिपूजेच्या पावनपर्वात एक प्रसंग आवर्जून सांगावा असा. प्रत्यक्षात रणांगणात न उतरताही जिंकलेल्या एका युद्धाची ही हकीकत आहे.
 
 
1767 मध्ये अहिल्याबाईंच्या पुत्राच्या- मालेरावाच्या मृत्यूनंतर, ‘होळकरांचं राज्य आता बेवारस झालं’, असा दरबारातल्या काही कारभारी मंडळींनी समज करून घेतला. त्यात प्रमुख होते होळकर दौलतीचे दिवाण गंगाधरतात्या चंद्रचूड. त्यांनी राघोबादादांना कळवले की, मालेराव यांचा काळ झाला आहे आणि होळकरांची दौलत बेवारस झाली आहे. तेव्हा तुम्ही येऊन होळकर राज्य आणि खजिना ताब्यात घ्यावा. त्यावर, उतावळ्या राघेाबादादांनी जराही मागचापुढचा विचार न करता पन्नास हजार फौजेनिशी इंदूरकडे कूच केले. उज्जैनला क्षिप्रा नदीच्या पलीकडे त्यांचा तळ पडला. अहिल्याबाईंना त्यांनी निरोप पाठवला की, ‘निमूटपणे पेशव्यांना शरण यावे. अन्यथा होळकर राज्य खालसा करून पेशव्यांच्या ताब्यात घेण्यात येईल.’
 
 
या निरोपाने धीर सुटायला अहिल्याबाई काही कच्च्या गुरूच्या चेल्या नव्हत्या. राघोबादादांच्या आक्रमणाची वार्ता त्यांना आपल्या हेरांकडून आधीच कळली होती. त्यावर विश्वासू सहकार्‍यांबरोबर विचारविनिमय करून त्यांनी आजूबाजूच्या सर्व सरदारांना पत्रे पाठवून होळकरांच्या बाजूने, राघोबादादांच्या विरोधात सामील होण्याचे आवाहन केले होते. तसेच, गादीवर असलेल्या माधवराव पेशव्यांनाही या परिस्थितीची कल्पना दिली होती. माधवरावांचा पाठिंबा आणि सरदारांची साथ मिळाल्यानंतर अहिल्याबाईंनी 500 स्त्रियांची स्वतंत्र पलटण तयार केली आणि हत्तीवर अंबारीत बसून आपल्या पलटणीसह त्या राघोबादादांच्या भेटीला निघाल्या. एक प्रकारचे शक्तिप्रदर्शनच होते ते! मात्र त्याआधी राघोबादादाला एक खलिता पाठवायला त्या विसरल्या नाहीत.
 
 
त्यात त्यांनी म्हटले होते, ‘मी बाईमाणूस... मी काय करणार, असा समज असेल तर तो मनातून काढून टाका. मी अहिल्याबाई, सुभेदारांची सून, माझ्या स्त्री सैन्यासह तुमच्याशी लढण्यासाठी सज्ज आहे; पण जरा विचार करा, या लढाईत तुम्ही जिंकलात तर त्यात काहीच आश्चर्य नाही. एका बाईविरुद्ध लढाई जिंकलात म्हणून तुमच्या कीर्तीत काहीच वाढ होणार नाही; पण जर चुकून या लढाईत बाईकडून हरलात तर तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तेव्हा योग्य तो विचार करा आणि पुढे पाऊल टाका...’ युद्ध लढण्यास सज्ज रणरागिणी आणि त्याच तोलामोलाची मुत्सद्दी राजकारणी असलेल्या अहिल्याबाईंचे दर्शन घडविणारा हा प्रसंग.
 
 
 
वस्तुस्थितीचे भान आणून देणारा अहिल्याबाईंचा निरोप आणि समोरच्या तीरावर दिसणार्‍या, शस्त्रसज्ज पलटणीचे नेतृत्व करणार्‍या अहिल्याबाई पाहून राघोबादादा मनातून घाबरले आणि त्यांनी अहिल्याबाईंना कळवले की, ‘बाईसाहेब... तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे. आम्ही तर मालेरावबाबांच्या अकाली मृत्यूनंतर तुमच्या सांत्वनास आलो आहोत.’ त्यावर अहिल्याबाईंनी लगेचच प्रत्युत्तर दिले... ‘सांत्वनासाठी आला आहात तर एवढे सैन्य कशासाठी? तुम्हाला यायचे तर एकटे पालखीत या.’
या उत्तरानंतर आपली हार मान्य करत राघोबादादांनी सैन्य माघारी पाठवून दिले आणि निवडक मंडळींसह ते इंदोरला आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, अहिल्याबाईंनी झाला प्रकार मनाआड करत राज्याच्या इतमामाला साजेसा राघोबादादांचा पाहुणचार केला. राघोबादादा तिथे महिनाभर मुक्काम ठोकून होते.
  
अशी ही निडर राज्यकर्ती होती.
 
नवरात्रीच्या पावनपर्वात त्यांच्यासारख्या स्त्रीचे चरित्र वाचणे, त्यातून प्रेरणा घेत पुढे जाणे, ही एक प्रकारची शक्तिपूजाच आहे. अशी शक्तिपूजा नवरात्रोत्सव खर्‍या अर्थाने साजरा केल्याचे समाधान देऊन जाईल.