मरुभूमीतील विश्वबंधुत्वाचे प्रतीक

विवेक मराठी    15-Feb-2024   
Total Views |
  अबुधाबी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संयुक्त अरब अमिरातीतील भव्य हिंदू मंदिराचे लोकार्पण झाले. हे मंदिर हिंदूंचे असले, तरी जगभरातल्या विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारी चित्रे इथे आहेत. तसेच अन्यधर्मीयांच्या उपास्य देवतांच्या प्रतिमाही कोरल्या गेल्या आहेत. अन्यधर्मीयांनी या मंदिराच्या उभारणीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळेच हे मंदिर खर्‍या अर्थाने विश्वबंधुत्वाचे प्रतीक ठरले आहे.
 
Hindu temple in Abu Dhabi
 
वसंतपंचमीच्या - सरस्वती पूजनाच्या शुभमुहूर्तावर अबुधाबी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संयुक्त अरब अमिरातीतील भव्य हिंदू मंदिराचे लोकार्पण झाले. बीएपीएस या संस्थेने आजवर जगभरात 1600हून अधिक स्वामीनारायण मंदिरे उभारली असली, तरी या मंदिरांची रचना, बांधणी पारंपरिक हिंदू मंदिरांप्रमाणे नाही. पूर्ण दगडी बांधकाम असलेले अबुधाबी येथील हे हिंदू मंदिर त्याला अपवाद ठरावे, कारण या भव्य मंदिराची उभारणी पूर्णपणे पारंपरिक हिंदू पद्धतीने झाली आहे. ते तसे असावे हा निर्णय संयुक्त अरब अमिरातीच्या राज्यकर्त्यांचा होता, हे विशेष! या मंदिराच्या उभारणीसाठी येथील राज्यकर्त्यांनी 27 एकर जागा देऊ केली आणि त्याच्या उभारणीच्या प्रत्येक टप्प्यावर आस्थेने लक्ष ठेवले.
 
 
या मंदिरात भगवान स्वामीनारायण यांच्यासह राम-सीता, लक्ष्मण, हनुमान, शंकर-पार्वती, राधा-कृष्ण, गणपती, कार्तिकेय, पद्मावती, अय्यप्पा अशा अनेक हिंदू देवदेवतांच्या मूर्ती आहेत. नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने भारताच्या विविध प्रांतांतील लोक इथे वास्तव्यास आहेत. त्या सर्वांच्या उपास्य देवतांच्या मूर्ती या मंदिरात आहेत, म्हणून हिंदू मंदिर हे त्याचे संबोधन सार्थ ठरत आहे.
 
 
गेल्याच महिन्यात अयोध्येत रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. शतकानुशतकांचा कलंक पुसणार्‍या त्या ऐतिहासिक सोहळ्याचा डंका जगभरात वाजला. त्याची आठवण मनात ताजी असतानाच, देशाची वेस ओलांडून एका मुस्लीम देशात तेथील राज्यकर्त्यांच्या मदतीने उभ्या राहिलेल्या हिंदू मंदिराने आणखी एक इतिहास निर्माण केला आहे. हे मंदिर भारतीयांच्या भक्तीचे प्रतीक आहे, परदेशात वाढत असलेल्या भारतीयांच्या शक्तीचे प्रतीक आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या भारत देशाच्या प्रभावाचेही ते प्रतीक आहे.
 
 
मंदिर हिंदूंचे असले, तरी जगभरातल्या विविध संस्कृतींचे दर्शन घडवणारी चित्रे इथे आहेत. तसेच अन्यधर्मीयांच्या उपास्य देवतांच्या प्रतिमाही कोरल्या गेल्या आहेत. अन्यधर्मीयांनी या मंदिराच्या उभारणीतही उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळेच हे मंदिर खर्‍या अर्थाने विश्वबंधुत्वाचे प्रतीक ठरले आहे. त्याच्या घडणीच्या प्रक्रियेत राज्यकर्त्यांसह अन्यधर्मीयांचे दिलेले योगदान आणि त्यांच्या धर्मातील प्रतिमा-प्रतीकांचा मंदिराच्या रचनेत केलेला समावेश दोहोतूनही हे सिद्ध होते. ‘आपण एकमेकांचे बंधू आहोत’ असे तेथील राज्यकर्ते केवळ बोललेच नाहीत, तर त्यांनी ते कृतीतूनही व्यक्त केले. हा एका रात्रीत घडलेला चमत्कार नाही, तर जागतिक समस्यांमध्ये भारताने घेतलेल्या समंजस पुढाकारातून, त्यातून वाढलेल्या प्रभावातून हिंदू धर्माविषयी, हिंदूंविषयी आस्था निर्माण झाली आहे, होते आहे. असे मतपरिवर्तन होण्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे केलेले समर्थ प्रतिनिधित्व कारणीभूत आहे. भारताला आणि हिंदू धर्माला जागतिक स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देणारे ठरते आहे.
 
 
भारतात अनेकेश्वर उपासनापद्धती असताना आणि प्रांताप्रांतात अनेक प्रकारचे वैविध्य असतानाही परस्परांविषयी कटुता वा तेढ निर्माण न होता एकत्वाची भावना रुजली, शतकानुशतके टिकली, वर्धिष्णू राहिली आणि त्यातून बंधुत्वाचे दृढ बंध निर्माण झाले, हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा उच्चार मोदींनीही अबुधाबी येथील मंदिर लोकार्पण सोहळ्यात केला. अशी बंधुत्वाची भावना जगण्याच्या, व्यवहाराच्या मुळाशी असल्याने भारतीय जगभरात जिथे जिथे गेले तिथे त्यांनी तेथील लोकांशी सहजतेने जुळवून घेतले. स्नेहबंध निर्माण केले. वैविध्याला वैशिष्ट्य समजणारी, ताकद समजणारी भारतीय संस्कृती आहे. त्याचेच प्रतिबिंब अबुधाबी येथील हिंदू मंदिरात उमटले आहे.
 
 
काही वर्षांपूर्वी बामियान येथील बुद्ध मूर्ती फोडणार्‍या तालिबानी राजवटीला पाठिंबा देणार्‍या संयुक्त अरब अमिरातीची भूमिका, इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी जगभरात केलेल्या कारवायांमुळे बदलली आहे. याच संयुक्त अरब अमिरातीत स्थापन झालेले सर्वधर्मसमभाव मंत्रालय हे त्यांच्या बदललेल्या भूमिकेचेच द्योतक. या मंत्रालयाच्या धोरणाचा एक भाग म्हणून बिगर मुस्लीम धर्मीयांची प्रार्थनास्थळे उभारण्यात येत आहेत. हिंदू मंदिराला भारतीय परंपरेप्रमाणे बांधायला दिलेली परवानगी हा त्या धोरणाचाच एक भाग. मंदिरांच्या माध्यमातून होणारे एकत्रीकरण परस्परांमधील सौहार्दाला उत्तेजन देते, याची जाणीव झाल्याने मंदिरांकडे बघण्याचा अन्यधर्मीयांचा दृष्टीकोन बदलला आहे. सकारात्मक झाला आहे.
 
 
हे मंदिर निर्माण होत असतानाच गेल्या 9 वर्षांत या दोन देशांमधल्या व्यापारी संबंधांनाही विशेष चालना मिळाली आहे. अरब देशांशी भारताचा होणारा व्यापार प्राचीन असला. तरी आत्ताची गती उल्लेखनीय आहे. ती योजनापूर्वक, विचारपूर्वक दिली गेली आहे. यातूनच व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, ऊर्जा, शिक्षण, अन्नधान्य देवाणघेवाण याबरोबरच डिजिटल सुविधा, बंदर विकास या क्षेत्रांत उभय देश परस्परपूरक होत आहेत. दोन देशांमधला वार्षिक व्यापार लवकरच 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार करणार आहे. द्विपक्षीय व्यापारात अमिरातीने अमेरिकन डॉलरऐवजी भारतीय चलनाला दिलेले प्राधान्य, भारतीय यूपीआय व्यवस्थेचा वापर करण्याचा घेतलेला निर्णय ही जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या प्रभावाची चिन्हे आहेत. जो आपल्याशी सलोख्याचे धोरण ठेवतो, त्याच्याशी व्यापारउदीम करताना त्याचा धर्म आपल्यासाठी कधीही अडसर ठरत नाही, असा संदेश जगभरातल्या नेत्यांपर्यंत पोहोचतो आहे. त्यातून देशाची आणि सहिष्णू हिंदू धर्माची प्रतिमा अधोरेखित होते आहे. त्याच वेळी कतारमध्ये अटकेत असलेल्या भारतीय नौदलातील निवृत्त अधिकार्‍यांची झालेली सुटका हे केवळ यशस्वी मध्यस्थीचे वा मुत्सद्देगिरीचे उदाहरण नाही, तर आखातात भारताच्या वाढत असलेल्या प्रभावाचे ते द्योतक आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर अबुधाबीतील हिंदू मंदिराचे सर्वधर्मीयांकडून होत असलेले स्वागत समजून घेतले पाहिजे. हे मंदिर विश्वबंधुत्वाचे प्रतीक होण्याचे मूळ हिंदू धर्माविषयी वाढत असलेल्या आस्थेत आहे. बीएपीएस दुसर्‍या मुस्लीम देशात - बहारिन इथे अशाच प्रकारचे आणखी एक हिंदू मंदिर उभारत आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहणाचे उपचार पार पडले असून लवकरच निर्मितीला प्रारंभ होईल. तेव्हा अबुधाबीतील हिंदू मंदिर हा योगायोग नसून एका परंपरेचा शुभारंभ झाला आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.