तो हा सुखसोहळा काय वर्णू!

विवेक मराठी    16-Feb-2024   
Total Views |
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष असणार्‍या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा दिवसीय उपवासाचे मातृहृदयी ममतेने पारणे फेडणार्‍या स्वामीजींचा हा अमृतमहोत्सव सर्वांच्या नेत्राचे पारणे फेडणारा ठरला, हे वैशिष्ट्य!
स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विराट गीताभक्ती महोत्सव. आळंदीच्या पावन भूमीवर सोमवार 5 ते रविवार 11 फेब्रुवारी या काळात साजरा झाला.
 
govind giri maharaj 
‘सर्व सुखाची लहरी। ज्ञानाबाई अलंकापुरी।’ असे म्हणतात, त्याप्रमाणे या परमार्थाच्या आळंदी महानगरीने आपल्या भव्यदिव्य परंपरेलाच साजेलसा एक महासुखसोहळा नुकताच अनुभवला, तो म्हणजे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या पंचाहत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित विराट गीताभक्ती महोत्सव. या पावन भूमीवर सोमवार 5 ते रविवार 11 फेब्रुवारी या काळात हा सोहळा साजरा झाला. ‘शिवपीठ हे जुनाट। ज्ञानाबाई तेथे मुकुट।’ अशी ख्याती असलेल्या आळंदीत हा सोहळा साजरा होण्याचे औचित्य म्हणजे भगवान आदिनाथांपासून सुरू झालेल्या आणि आपल्या विश्वात्मक पसायदानाने वैश्विक पटलावर आरूढ झालेल्या योगियांचा मुकुटमणी आणि ज्ञानियांचा राजा असे संबोधन असलेल्या ज्ञानेश्वर माउलींबद्दल अत्यंत आदरणीय श्रद्धा आणि स्वामीजींच्या ठायी असलेला शरणागत भाव. गीता परिवार, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवानिधी आणि संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या या सुखसोहळ्याच्या अमृतवर्षावात संपूर्ण सप्ताहभर आळंदीकरच नव्हे, तर येथे अवतरलेल्या संतांच्या महामांदियाळीमुळे संपूर्ण भारतच न्हाऊन निघाला, असे म्हटल्यास ती मुळीच अतिशयोक्ती ठरणार नाही. ‘विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव। स्वर्गीहुनि देव करिताती।’ ही पंक्ती आळंदीकरांनी साक्षात अनुभवली या अमृतमहोत्सवात, कारण येथे या सोहळ्यावर खरोखरच हेलिकॉप्टरमधून गुलाबपुष्पांचा वर्षाव करण्यात आला. नुकतेच श्री क्षेत्र अयोध्याभूमी येथे जी भगवान रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष असणार्‍या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा दिवसीय उपवासाचे मातृहृदयी ममतेने पारणे फेडणार्‍या स्वामीजींचा हा अमृतमहोत्सव सर्वांच्या नेत्राचे पारणे फेडणारा ठरला, हे वैशिष्ट्य!
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत या महोत्सवाच्या शुभारंभाला उपस्थित होते. या प्रसंगी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या कार्याचा गौरव करून ते आपल्या भाषणात म्हणाले, “राज्य व्हावे ही श्रींची इच्छा याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती. ती ईश्वराचीच इच्छा होती आणि महाराज ती पूर्ण करण्याचे एक माध्यम होते. त्यामुळे आपण सर्वांनी सर्व काही ईश्वराकडे सोपवून द्यावे आणि त्याच्या मोबदल्यात कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्याला कार्यासाठी समर्पित करावे. पुराणे, रामायण, गीता आणि महाभारत यांच्यातील कोणताही अंश आपल्या मताने मांडून काही मंडळी लोकांच्या मनात भ्रम निर्माण करतात. पण असा कोणत्याही भ्रमाचा प्रसार होऊ नये, म्हणून या प्राचीन ग्रंथातील सत्य साहित्याचा प्रचार-प्रसार आवश्यक आहे, याच भावनेतून आपल्याला कार्य करायचे आहे. आज जगासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत आणि त्यातून सर्वांना सोडविण्यासाठी एक उद्धारकर्ता या रूपाने आज भारताला उभे राहायचे आहे.”
 
govind giri maharaj 
या गीताभक्ती अमृतमहोत्सवी सोहळ्यात काय नव्हते ते सांगा! बाबा श्री सत्यनारायण मौर्य यांच्या भारतमातेच्या आरतीने सर्वांच्या मनात एकात्मतेची आणि प्रेमाची जागृती घडविली. देशप्रेम आणि अध्यात्म यांच्या अपूर्व संगमामुळे संपूर्ण वातावरण प्रभारित झाले.
 
या अमृतमहोत्सवात यज्ञनारायण स्वत: विराजमान झाले होते, कारण येथे 81 कुंडी यज्ञाचे होमहवन संपन्न झाले. आळंदीचा आधीचाच पवित्र परिसर या यज्ञाच्या आभेमुळे आणखीनच आलोकित झाला.
 
सोहळ्यात आलेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी आवर्जून सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांची कथा ऐकावी तर स्वामी गोविंददेव गिरी यांच्याच मुखातून. कारण तेच अशी दिव्य कथा करतात. महाराजांसारख्या महायोद्ध्याची कथा करताना अन्य कोणी साधुसंताला पाहिलेले नाही. स्वामीजी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची कथा जेव्हा सांगतात, तेव्हा ही गौरवगाथा या देशबांधवात शौर्य, वीरता आणि पराक्रम या भावांची जागृती घडविते.”
 
श्री संजीव कृष्णजी महाराज यांनी या प्रसंगी अशी भावना व्यक्त केली की, “भगवंताने स्वामीजींना शतायुषी होण्याचे वरदान द्यावे. त्यांचे ज्ञान, त्यांचे तप, त्यांची साधना, ही आपल्या समाजासाठी, मानवतेसाठी, हिंदुत्वासाठी - नव्हे नव्हे, संपूर्ण विश्वासाठी दैवी देणगी आहे. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला सदैव लाभावे, हीच ईशचरणी प्रार्थना आहे.”
 
govind giri maharaj 
 
श्री एम. स्वामी प्रणवानंदजी महाराजांचे दिव्य वचनामृत असे होते की, “स्वामी गोविंददेव गिरी यांचे कार्य फार महान आहे. श्रीमद्भगवद्गीता हा आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे. हा मानवतेसाठीचा महान ग्रंथ आहे. मानवतेसाठीचे सर्वांत उत्तम तत्त्वज्ञान येथे प्रकटले आहे. हे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वामीजींनी महान परिश्रम केले आहेत.” या वाणीतूनच स्वामी गोविंददेव गिरी यांच्या महान कार्याकडे आणि नि:स्वार्थी समर्पित भावाकडे निर्देश होतो.
 
साध्वी ॠतंभरा यांनी स्वामीजींचा गौरव करताना सांगितले की, “पूज्य महाराज म्हणजे भारतभरातीलच नव्हे, तर विश्वभरातील संतसमुदायातील आध्यात्मिक नक्षत्रांमधील एक असे देदीप्यमान नक्षत्र होय, ज्यांना वेदांचे खरे मूळच हाती लागले आहे. त्यांना पुराणांचे मर्म समजले आहे. गीतासाराला धारण करून त्यांनी हा दैवी प्रसाद सर्वांना वाटून दिला आहे.”
 
या सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आवर्जून उपस्थित राहिले होते. ‘पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी सनातन वैदिक धर्मासाठी आपले सर्व काही समर्पित केले आहे. वैदिक पाठशाळांच्या माध्यमांतून त्यांनी श्रीमद्भगवद्गीतेचा दिव्य संदेश जगभरात पोहोचविला आहे. आपल्या भारत देशाला वेदांचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे, या पवित्र भावनेतूनच स्वामीजींनी हे कार्य केले आहे. हेच कार्य पूर्वी समर्थ रामदास स्वामींनी केले होते, ज्यातून छत्रपती शिवरायांनी बोध घेऊन स्वराज्य साकारले होते. माउली ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेच्या सेतुबंधनाचे कार्य स्वामीजींनी केले आहे. त्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. ही अद्भुत शौर्याची आणि पराक्रमाची भूमी आहे. त्याचे कारण एकच आहे की येथे पूजनीय संतांचे सान्निध्य सतत लाभले आहे आणि त्यांच्या कृपेचा आपल्यावर सदा वर्षाव होत आहे.” गुरू गोरखनाथ मठाचे महंत आदित्यनाथजींनी अशा प्रबोधनातून स्वामीजींच्या कार्याप्रती त्यांना असलेला दिव्य आदर आणि श्रद्धा प्रकट केली.
 
बागेश्वर धाम पीठाधीश श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, “सर्वांनी गीता वाचली पाहिजे, भारताच्या प्रत्येक घराघरांत गीता पोहोचली पाहिजे, तरच भारत खर्‍या अर्थाने हिंदुराष्ट्र होईल!” आचार्य श्री लोकेश मुनी जी महाराज यांनी म्हटले की, “ज्ञान, अध्यात्म आणि समर्पणभाव यांचे सजीव प्रतिबिंब म्हणजे स्वामी गोविंददेव गिरी आहेत.”
 
केरळचे मा. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी असे सांगितले की, “श्रीमद्भगवद्गीता म्हणजे सर्वोत्तम शिकवणीचा स्रोत आहे. आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारा हा अपरिमेय ग्रंथ होय. गीतेतील सनातन संदेश हा व्यक्तिगत तसेच सामाजिक उन्नतीसाठी खरोखरच पथप्रदर्शक आहे.”’
 
एकाच्या कैवाडे ।
उगवे बहुतांचे कोडे ॥
govind giri maharaj 
 
आळंदीमध्ये पूज्य श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचा 75व्या वाढदिवसाचा सोहळा पार पाडला.
एक सुखाचा सोहळा असे याचे वर्णन करता येईल. आजवर आळंदीमध्ये झालेल्या काही भव्यदिव्य व संस्मरणीय सोहळ्यांमध्ये या सोहळ्याची गणना होईल. गीता परिवार आणि वारकरी संप्रदाय व सद्गुरू जोग महाराज संस्था आदीच्या माध्यमातून झालेला हा भव्यदिव्य सोहळा सर्वांना एक अत्यंत सुखद अनुभूती देऊन गेला. एक आळंदीकर म्हणून व एक सांप्रदायिक व्यक्ती म्हणून या सोहळ्याची मला जाणवलेली काही वैशिष्ट्ये आवर्जून सांगावीशी वाटतात.
 
 
पहिली गोष्ट म्हणजे अत्यंत भव्यदिव्य सोहळ्याचे केलेले चोख व नेटके नियोजन. दुसरी गोष्ट म्हणजे नियोजनाला साजेसा सभामंडप, आकर्षक रोशणाई, उत्तम बैठक व्यवस्था, चोख प्रकाशव्यवस्था, ध्वनिव्यवस्था व अन्य आवश्यक व्यवस्था. सोहळा यशस्वी होण्यासाठी राबणारे आणि आलेल्या प्रत्येक निमंत्रिताशी अत्यंत नम्रतेने, आदराने बोलणारे व योग्य त्या सूचना देणारे सर्व स्वयंसेवक. नोंदणीपासून बैठक व्यवस्थेपर्यंत, भोजनापर्यंत सर्व गोष्टींचे त्यांनी मार्गदर्शन केले. या सोहळ्यात काही अलौकिक गोष्टी घडल्या, असे मी आवर्जून सांगेन. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सनातन हिंदू धर्मातील सर्व पुराणांचे वाचन कार्यक्रमस्थळी झाले. त्याचबरोबर सर्व देवतांचे यज्ञसुद्धा करण्यात आले. सर्व लोकांना यानिमित्त आलेले सर्व संतमहंत यांचे एकत्रित दर्शन मिळाले. म्हणजे ‘एकाच्या कैवाडे । उगवे बहुतांचे कोडे ॥’
 
 
वारकरी संप्रदायातील भजन-कीर्तनाचा समावेश कार्यक्रमात असल्याने अनेक विद्वान कीर्तनकारांची कीर्तने ऐकण्याची संधी मिळाली. काल्याच्या आदल्या दिवशी इंद्रायणीच्या पवित्र घाटावर सामूहिक पखवाज वादन वारकरी चालींच्या बरोबरीने करण्यात आले. त्याचबरोबर मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. वारकरी संप्रदायातील कथाकार, कीर्तनकार, गायक, वादक, वारकरी, टाळकरी, सर्व जण आनंदाने कार्यक्रमात सहभागी झाले. सनातन हिंदू धर्माच्या अत्युच्च परंपरेचा वैभवशाली सोहळा संपूर्ण जगाने पाहिला.
 
 
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या ज्ञानेश्वरीने व आळंदीने शेकडो वर्षांपासून जागतिक पातळीवर अभ्यासकांच्या मनात व देशपातळीवर सर्व धार्मिक लोकांच्या हृदयात अढळ असे स्थान केलेलेच होते. परंतु आधुनिक काळातील लोकांना व भक्तिमार्गापासून लांब असणार्‍या लोकांनासुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आळंदी संत ज्ञानेश्वर व ज्ञानेश्वरी यांचे महत्त्व नव्याने कळले. मी या सोहळ्याचा अल्प साक्षीदार होऊ शकलो, याचा मला खूप खूप आनंद आहे.
 
हा सोहळा आयुष्यभर स्मरणात राहील.
 
- ह.भ.प. प्रसाद महाराज माटे (चर्‍होलीकर)
प्रवचनकार, कीर्तनकार, संतसाहित्य अभ्यासक
 
 
 
या सोहळ्यात विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. गीतोपदेश हा गहन खरा, पण येथे ‘यह पुण्यप्रवाह हमारा’ या दिव्य महानाट्याचे सादरीकरण झाले आणि हा आध्यात्मिक गीतार्थ नाट्यरूपाने श्रोत्यांसमोर साकार झाला. पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स यांच्या वतीने, भक्तिमय ऊर्जेने परिपूर्ण अशा या महानाट्याचे सादरीकरण झाले आणि ‘सा कला या विमुक्तये’ या उक्तीचे खरे भान या नाट्यकलाकारांनी जागविले. ही ‘ललितकला’ असली, तरी येथे कोणताच भोळेपणा नव्हता! हे विशेष.
 
या सोहळ्यात संपूर्ण आध्यात्मिक भारताचे दर्शन झाले. आपल्या सनातन गौरवमय गरिमापूर्ण गहन परंपरेचे दर्शन झाले. आध्यात्मिक जगतातील शिखरपुरुष असे संबोधिले जाणारे कांची कामकोटी पीठाधीश्वर पूज्य जगद्गुरू शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती महाराज यांनीही सोहळ्यात उपस्थित राहून आशीर्वचनाने आळंदीला आणखीनच अलंकृत केले.
 
या संपूर्ण गीता महोत्सव काळात या देवाच्या आळंदीने अपूर्व ऊर्जेचा, दिव्य आध्यात्मिकतेचा आणि दैवी समर्पण भावनेचा पूर्ण अनुभव घेतला. या इंद्रायणीकाठी परमपवित्र सरितेच्या घाटावर जेव्हा 1,111 विद्यार्थ्यांनी मृदंगवादन केले, तेव्हा संपूर्ण परिसर थरारून गेला. श्रीमद्भगवद्गीतेच्या महामंत्राने हा संपूर्ण परिसर निनादून गेला व स्वरांजलीच्या 111 विद्यार्थ्यांनी येथे जे गीतापठण केले, त्यांनी आध्यात्मिकतेच्या अपूर्व आयामाचे दर्शन घडविले. माउलींनी आपल्या हरिपाठातून प्रापंचिक माणसाला ईश्वरभक्तीचा साधासोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. जेव्हा माउलींचे अमृतमय अभंग 750 वारकरी विद्यार्थ्यांच्या एकरस वाणीतून प्रकट झाले, तेव्हा उपस्थितांना एक दैवी साक्षात्कार आपोआप घडून आला. असा एकही आत्मा नसेल, जो या भक्तिरसात न्हाऊन निघालेला नाही. ज्ञानेश्वरोपासना आणि श्रीमद्भागवत कथा म्हणजे अलौकिक आध्यात्मिक ज्ञान आणि अनन्यभक्ती यांचा अपूर्व संगम या महोत्सवात साकार झाला. या सोहळ्याला उपस्थिती म्हणजे आळंदीचे अपूर्व वैभव आपल्या सोहळ्यात आपोआप भरून घ्यावे आणि सुलभपणे संजीवन समाधानाला प्राप्त व्हावे, याची अमृतमय संधी होती.
 
त्याचबरोबर दीदी माँ साध्वी ॠतंभराजी, पूज्य संजीव कृष्ण जी महाराज, आचार्य सुधांशुजी महाराज, श्री श्री रविशंकरजी महाराज, गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांचीही प्रेरक उपस्थिती या सोहळ्याचे अपूर्वत्व दर्शवून गेली.