भारताचे विधिलिखित घडविणारे नेतृत्व

विवेक मराठी    23-Feb-2024   
Total Views |
@विजय चौथाईवाले
देशात स्थैर्य असताना, वातावरण शांत असताना, नागरिकांना एखादी व्यवस्था वा धोरण सवयीचे झालेले असताना, आणि अशा वर्तमान स्थितीत ते आनंदी असताना दीर्घकालीन फायद्याचा पण कटू भासणारा असा एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा, तर त्याकरिता धाडस व दूरदृष्टी आवश्यक असते. अशा वेळी नेतृत्वक्षमतेचा कस लागतोे. असे अनेक निर्णय मोदींनी त्यांच्या कार्यकाळात घेतले. अशा धोरणांची अंमलबजावणी करून त्यांनी राजकीय, आर्थिक व सामाजिक बदल घडवून आणले. यशाचे उच्चांक गाठत असताना मोदींनी भारतीय मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही, तर अनेक भारतीय मूल्यांना जगमान्यता मिळवून दिली. देशाच्या अमृतकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपात भारताचे विधिलिखित घडविणारे नेतृत्व देशाला लाभले आहे, हे नक्की.
modi
 
कोणत्याही निवडून आलेल्या नेत्यासाठी आपल्या लोकप्रियतेची लाट कायम राखणे हे एक आव्हान असते. अमेरिका, जर्मनी, जपान आणि युनायटेड किंगडम यासारख्या जगभरातील मोठमोठ्या लोकशाही देशांच्या नेत्यांसाठीदेखील 2023 हे वर्ष या लोकप्रियतेच्या दृष्टीकोनातून घसरणीचेच ठरले. याला एकमेव अपवाद ठरले ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. नऊ वर्षे पंतप्रधानपदी राहत देशाचे नेतृत्व केल्यानंतर, आता तिसर्‍यांदा कारभार हाती घेण्याच्या उद्देशाने निवडणुकीसाठी सज्ज होत असताना त्यांच्या लोकप्रियतेची टक्केवारी सातत्याने 70 टक्क्यांच्या वरच राहिली आहे. कोणाही राजकीय नेत्याला हेवा वाटावा अशीच ही स्थिती आहे.
 
 
मात्र नेतृत्व म्हणजे केवळ लोकप्रियतेचा अट्टाहास नव्हे वा सततच्या जनसंपर्कामुळे नागरिकांकडून प्राप्त झालेली आपुलकी व विश्वासार्हता यातून सिद्ध झालेली आकडेवारी नव्हे. प्रभावी नेत्याकडे राष्ट्राच्या हितासाठी वरकरणी कठोर भासणारे पण अंतिमत: फलदायक असणारे निर्णय घेण्याची धमक असावी लागते. 1991 साली परकीय गंगाजळीच्या तुटवड्यासारख्या आपत्कालात असे निर्णय घेणे सोपे गेले असावे, वा पर्याय नसल्याने अनिच्छेने का असेना, निर्णय स्वीकारलेही गेले असावेत. पण देशात स्थैर्य असताना, वातावरण शांत असताना, नागरिकांना एखादी व्यवस्था वा धोरण सवयीचे झालेले असताना, आणि अशा वर्तमान स्थितीत ते आनंदी असताना दीर्घकालीन फायद्याचा पण कटू भासणारा असा एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा, तर त्याकरिता धाडस व दूरदृष्टी आवश्यक असते. अशा वेळी नेतृत्वक्षमतेचा कस लागतोे. जो खरा नेता असतो, तो अशा राजकीय, आर्थिक व सामाजिक बदलांसाठी पुढाकार घेतो.
 
 

दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी

2024ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’

भारतात झालेले परिवर्तन समजून घेण्यासाठी, कोणता खेळ मोदींनी बदलला, हे समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

गोंधळसदृश परिस्थिती हाताळण्यासाठी कायम तयार असणे हे प्रभावी नेतृत्वाचे एक वैशिष्ट्य आहे. नेतृत्व करणे म्हणजे समाजात सकारात्मक बदल घडवून आणणे, बदलाकरिता पुढाकार घेणे आणि बदलांशी जुळवून घेण्याची तयारी असणे होय. कोणताही महत्त्वाचा बदल घडत असताना काही वेळा अनिश्चिततेची परिस्थिती उद्भवते आणि अशा वेळेस मोदींच्या नेतृत्वातील वेगळेपण अधोरेखित होते. ते केवळ बदलांशी जुळवून घेतात असे नव्हे, तर राष्ट्राच्या भल्याच्या दृष्टीकोनातून त्या बदलाला वेगळा आयामही मिळवून देतात. बदलाला सामोरे जात असताना नागरिकांना त्याची गरज आणि घेतलेल्या निर्णयाचे फायदे हे दोन्ही पटवून द्यावे लागतात. मोदींच्या पहिल्या कार्यकाळातील निश्चलनीकरण आणि वस्तू व सेवा कराची (जीएसटीची) अंमलबजावणी ही याची दोन उत्तम उदाहरणे आहेत. निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर सुरुवातीला गोंधळ उडाला असला, तरी काळा पैसा व भ्रष्टाचाराविरोधात मोदींनी हाती घेतलेले अस्त्र आहे हे लक्षात येऊन देशातील गरीब जनतेने त्यांना पाठिंबाच दिला. जीएसटीच्या अंमलबजावणीच्या निर्णयामुळे व्यवसाय क्षेत्रात थोडा व्यत्यय आला, अर्थव्यवस्थेत तात्पुरती घसरण झाली आणि तो निर्णय पचवायला जरा त्रासदायक ठरला असला, तरी या करव्यवस्थेने भारतीय अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम व आधुनिक केली.
 
  
जनतेशी साधलेला थेट संवाद हे मोदींचे बलस्थान आहे. मोठ्या निर्णयामागे असणारी तर्कशुद्ध भूमिका समजावून सांगणे आणि अत्यंत नम्रपणे अल्पकाळ वेदना सहन करण्यासाठी लोकांची समजूत घालणे हे त्यांचे वैशिष्ट्य. हे करत असतानाच त्यांनी संकटाचे (रोख पैशाची अनुपलब्धता) रूपांतर संधीत (युनिफाइड पेमेंट इंटरफेसचे अर्थात यूपीआयचे लाँचिंग) रूपांतर केले व डिजिटल पेमेंट वापरण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले. कोविडच्या महासंकटात भारतात जी आणीबाणी उद्भवली, त्यात देशात लॉकडाउन लागू करणे आणि संवादाच्या माध्यमातून जनतेचे मनोबल कायम राखणे हे मोदींनी केलेले कार्य एक आदर्श प्रस्थापित करणारे ठरले. भारताच्या आरोग्यविषयक सोयीसुविधांमध्ये या काळात वाढ झाली आणि गंभीर आजारांवरच्या औषधांच्या व लसींच्या निर्मितीत व अन्य देशांना पुरवठा करण्यातही भारताला यश मिळाले. 200 कोटी जनतेचे झालेले लसीकरण हा मोदींच्या नेतृत्वाचा अमीट पुरावा आहे.
 
 
मोदींच्या नेतृत्वगुणातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सर्वसामान्य जनतेप्रती त्यांना वाटणारी सहअनुभूती - एम्पथी. वंचितांच्या रांगेत सर्वात शेवटी उभ्या असणार्‍या महिलेविषयी त्यांना सहअनुभूती वाटते. त्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वत:ला कल्पून परिस्थिती समजून घेणे म्हणजे सहअनुभूती. अंत्योदयाची हीच कल्पना आहे. या गुणवैशिष्ट्यामुळे त्यांना कोणत्याही निर्णयप्रक्रियेदरम्यान वेगवेगळ्या परिस्थितीची कल्पना करता येते व त्यातून घेण्यात येणार्‍या साधकबाधक निर्णयाला यश मिळण्याची शक्यता वाढते. जनहिताचा कोणताही निर्णय घेण्याआधी तळागाळातील माणसांची प्रतिक्रिया जाणून घेणे व त्या दृष्टीकोनातून योग्य, अनुकूल धोरण निवडणे हे त्यांचे वैशिष्ट्य. भारतभर होत असलेल्या सततच्या भ्रमणाने मोदींना जीवनावश्यक गरजांच्या पूर्ततेच्या अभावामुळे झालेले हाल आणि परिस्थितीमुळे उत्पन्न झालेल्या गरजा समजून घेता आल्या, म्हणूनच ते बँकिंग, घरे, वीज, आरोग्यसेवा, पाणी आणि स्वच्छता या वंचितांच्या गरजा ओळखून त्यांच्या पूर्ततेसाठी काम करू शकले.
 
 
modi
 
डॅनियल गोलमन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने सहअनुभूती हे भावनिक बुद्धिमत्तेच्या पाच महत्त्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. समोरच्या व्यक्तीची भावनिक जडणघडण समजून घेणे आणि लोकांच्या भावनिक प्रतिसादानुसार त्यांच्याशी वर्तन ठेवणे असे भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेची व्याख्या करताना गोलमन यांनी नमूद केले आहे. त्याची अनेक उदाहरणे मोदींच्या आजवरच्या कार्यकाळात सापडतात.
 
 
नैसर्गिक संकटांच्या वेळेस (पूर्वसूचना असेल तर संकटाच्या आधीच) तयारी आणि गरजांच्या पूर्ततेबाबत चर्चा करण्यात ते सर्वात पुढे असतात. अनेकदा त्यांनी याबाबत संबंधित राज्यातील विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करून तातडीने तेथील आवश्यकतांची पूर्तता केलेली आहे. कोविडच्या काळात त्यांनी अनेकांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी वैयक्तिक स्वरूपात अक्षरश: शेकडो फोन केले आहेत. युक्रेन-रशिया युद्धास सुरुवात झाली, त्या वेळेस आपल्या पंतप्रधानांना केवळ भारतीय विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करण्याची चिंता नव्हती, तर रोमानिया व पोलंडसारख्या देशातील संक्रमितांचीही काळजी होती. त्या काळात त्यांनी मध्यरात्री (माझ्यासह) अनेकांना संपर्क केला, तातडीने ताजे, स्वच्छ वातावरणात शिजवलेले अन्नपदार्थ व उबदार निवासाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. राष्ट्र म्हणून आपल्या परराष्ट्रविषयक धोरणांपलीकडे जाऊन नि:स्वार्थीपणे गरजू देशांना मदतीसाठी कशा प्रकारे हात दिला जातो, याचे ‘व्हॅक्सिन मैत्री’ प्रकल्प हे एक उत्तम उदाहरण आहे.
 
 
नरेंद्र मोदी हे संवेदनशीलतेमुळे डोळे पाणावून आपल्या समोरील चित्र अस्पष्ट होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतात. त्यांच्या मनातील सहानुभूतीला, हळवेपणाला काठिण्याची भक्कम तटबंदी आहे. निर्णय घेण्याकरिता, समोरच्या ध्येयावर लक्ष केंद्रित राहण्याकरिता आणि कृतीआराखडा तयार करण्याकरिता या कठोरपणाची गरज असते. लेखक रॉबर्ट गॉफी आणि गॅरेथ जोन्स हे "Why should Anyone Be Led by You?' (2006) या ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’मधील लेखात या स्वभावाचे वर्णन ‘टफ एम्पथी’ असे करतात. ही संकल्पना स्पष्ट करताना ते लिहितात, ‘टफ एम्पथी म्हणजे लोकांना ज्याची ‘गरज’ आहे ते देणे, जे ‘हवे’ ते देणे नाही.’ कशाची गरज आहे आणि काय हवे आहे यातील फरकाची जाण मोदींना आहे. ही जाणच त्यांना आर्थिक सारासार विचार बाजूला न ठेवता समाजातील वंचित समूहांसाठी अर्थसुरक्षा, अन्नसुरक्षा आणि आरोग्यसुरक्षाविषयक मदतीची एकत्रित धोरणे आखण्यात मदत करते. लोकप्रियतेसाठी अनियंत्रितपणे केल्या जाणार्‍या मदतीचा उल्लेख ते ‘रेवडी संस्कृती’ असा करतात. या मदतीबाबत घेतलेली ही त्यांची भूमिका अत्यंत परखड अशीच आहे.
 
 
टफ एम्पथीचे आणखी एक लक्षण म्हणजे हातातील कामे आणि इतरांचा आदर यांचा साधलेला तोल. सार्वजनिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर कठोरपणे नेमका संदेश पोहोचवण्यात नरेंद्र मोदी जराही कचरत किंवा संकोचत नाहीत. या स्वभावाचे वर्णन करताना त्यांच्या एका वेगळ्या कौशल्याचाही उल्लेख आवर्जून करायला हवा. एखाद्या ठरावीक विषयाबाबत कठोर राहून संदेश देणे आणि त्याच वेळेस समोरच्याच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे, याचा तोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी आहे. याच वैशिष्ट्यामुळे जगभरातील अक्षरश: हजारो लोकांच्या संपर्कात राहण्याची क्षमता त्यांनी प्राप्त केली आहे. ज्यांनी त्यांचे व्हिडिओज (modistory.in) पाहिले असतील, त्यांना या त्यांच्यातली प्रांजळता नक्की जाणवली असेल. एखाद्या सोहळ्यानिमित्त वा दु:खद प्रसंगी त्यांनी लिहिलेली पत्रे ही कधीही कोरडी नसतात, उलट त्या व्यक्तीशी त्यांच्या असणार्‍या ऋणानुबंधाचे प्रतिबिंब त्यात उमटलेले असते.
 
 
वसंतराव चिपळूणकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुजरातमधील ज्येष्ठ प्रचारक. वसंतराव हे आनंदी वृत्ती आणि सदैव हसतमुख चेहरा यासाठी ओळखले जात. प्रदीर्घ आजारपणानंतर 2007 साली वसंतरावांचे निधन झाले ते मोदी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत होते त्या दिवशी. मोदींनी गुजराती भाषेत त्या वेळेस ‘न सरलेला वसंत’ अशा अत्यंत हृद्य शब्दात त्यांच्यासाठी श्रद्धांजली संदेश लिहिला होता. वसंतरावांना श्रद्धांजली वाहताना हळवे दु:खद भाषण करण्याऐवजी ते म्हणाले की, ‘’हास्य बाजूला ठेवून वसंतरावांबद्दल बोलणे अशक्य आहे. त्यांच्या जाण्याने दु:खी होण्याऐवजी त्यांनी भरभरून जगलेल्या आयुष्याबद्दल आनंद साजरा करायला हवा.‘’ वसंतरावांशी झालेल्या संवादातील अनेक किश्श्यांना त्यांनी त्या वेळेस उजाळा दिला.
 
 
मोदींच्या स्वभावातील वेगळेपणा दर्शवणारी अशी अगणित उदाहरणे आहेत. काही काळापूर्वी झालेल्या त्यांच्या सिडनी दौर्‍यापूर्वी त्यांनी आमच्यावर एक जबाबदारी सोपवली. आपल्या मुलांसोबत राहायचे म्हणून ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेल्या एका वृद्ध महिलेचा शोध घेण्यास आम्हाला सांगण्यात आले. त्या महिलेचे नावही अगदी चारचौघींसारखेच होते. स्थानिक संपर्क वापरून भरपूर शोधाशोध केल्यावर आम्हाला समजले की त्यांचे निधन झाले आहे. ती महिला हयात नसतानाही मोदी तिच्या कुटुंबीयांना भेटले. का बरे भेटले असतील ते त्यांना? कारण आणीबाणीच्या काळात (1975-77) भूमिगत असताना बडोद्यात ते या कुटुंबासोबत राहत होते. एकदा केनिया दौर्‍यावर नैरोबीत समाजातील काही नेत्यांसह फोटो घेत असताना त्यांनी पाहिले की एक वृद्ध महिला त्यांना भेटण्यासाठी कोणाच्यातरी आधाराने हळूहळू चालत येत आहे. ते तत्काळ चालत त्या महिलेपर्यंत पोहोचले, त्या वृद्ध महिलेचा हात हातात घेतला आणि विचारले, “केम छो अरुणाबेन?” (कशा आहात अरुणाबेन?) बर्‍याच वर्षांपूर्वी केनिया दौर्‍यावर असताना या महिलेच्या कुटुंबीयांसह मोदींनी भोजन घेतले होते आणि खूप वर्षांनी ते या महिलेला भेटले होते.
 
 
अगदी तळागाळातील कामगारांना, मजुरांना पहिल्यांदा भेटले तरी त्या माणसाला वर्षानुवर्षाची ओळख आहे असे वाटावे इतकी सहजता मोदींच्या वागण्यात असते. इंग्लंडमधील कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत त्यांनी बोलण्याची सुरुवात केली तीच मुळी “सुरेश, क्या चल रहा है?” या प्रश्नाने. या अनौपचारिक प्रश्नाने सगळ्यांच्याच मनावरील ताण दूर झाला. मध्यंतरी स्वित्झर्लंडमधील एका जोडप्याने स्विस आल्प्समध्ये झालेल्या शिखर परिषदेत अत्यंत उत्साहात योग दिन साजरा केला. मोदींची भेट झाली, तेव्हा तत्परतेने त्यांनी या दांपत्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “योगा के लिये बहुत अच्छा काम किया आपने.” (आपण योगविषयक खूप चांगली कामगिरी केली आहे.)
 
 
मोदींना कायमच प्रामाणिक प्रतिक्रिया, वेगवेगळे प्रतिसाद/सुधारणा आणि नवनवीन कल्पना ऐकण्यात रस असतो. त्यामुळे एरवीच्या आयुष्यात लोकांशी होणार्‍या अनौपचारिक बैठका आणि औपचारिक व्यावसायिक स्तरावरील बैठकांमध्ये व्यवस्थित समतोल ते साधू शकतात. गॉफी याला ‘सॉफ्ट सिग्नल्स’ म्हणतो. शांतपणे समोरच्याचे ऐकून घेण्याचा पंतप्रधानांचा गुण त्यांच्या विचारप्रक्रियेला चालना देतो. त्यातून विविध कल्पना सुचतात. काही वेळेस या कल्पना अत्यंत आगळ्यावेगळ्या प्रकारच्या असतात. काही वेळेस अगदी विरोधाभासीही असतात व त्या विविध स्रोतांमधून आलेल्या असतात. सुसंबद्ध संकल्पनेअंतर्गत त्या सर्व कल्पनांचे एकत्रीकरण करण्याचे व त्याचे अत्यंत हुशारीने एक सुसंगत चित्र तयार करण्याचे काम ते करतात. मोदी बारीकसारीक गोष्टींकडे कशा प्रकारे लक्ष देतात, हे गुजरातमध्ये त्यांच्यासोबत काम केलेले लोक आवर्जून सांगतात. यामुळेच त्यांनी ठरवलेली उद्दिष्टे काही वेळेस सुरुवातीला आव्हानात्मक, पूर्ण न होण्यासारखी वाटली, तरी ती ठरलेल्या वेळेत, क्वचित वेळेआधीच व्यवस्थित पूर्ण होतात. जन धन योजना हे याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
 
 
स्वत:च्या कृतीतून एक वेगळे उदाहरण लोकांसमोर ठेवणे हे मोदींच्या नेतृत्व शैलीतील विशेष उल्लेखनीय असे वैशिष्ट्य आहे. राष्ट्रीय स्वच्छता मोहीम राबवण्याचे त्यांनी देशाला आवाहन केले आणि स्वत: रस्त्याच्या कडेला असणारा केरकचरा साफ करत त्या मोहिमेत सहभागीदेखील झाले. एका पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी प्रकाशन करताना पुस्तकाचे वेष्टन काढले, सर्वप्रथम त्या वेष्टनाची घडी केली आणि व्यवस्थित खिशात ठेवली व त्यानंतरच ते पुस्तक प्रेक्षकांना दाखवले. एखादी साधीशी कृतीदेखील एक अनुकरणीय उदाहरण ठरते, ती अशी! पक्षाच्या बैठकीतदेखील ब्रेकनंतर पुढच्या सत्रासाठी आपापल्या जागी स्थानापन्न होणार्‍यांमध्ये सर्वात प्रथम येणारे तेच असतात. ‘स्वयंशिस्तीचे केलेले अखंड पालन ही यशस्वी नेत्याने आपल्या नेतृत्वासाठी दिलेली किंमत असते.’ यशस्वी नेत्यांची वैशिष्ट्ये सांगताना चार्ल्स दी गॉल यांनी नोंदवलेल्या या निरीक्षणाची प्रचिती मोदींचा दिनक्रम पाहिल्यावर येते. याच स्वयंशिस्तीला गोलमन ‘स्वयं नियमन’ असे म्हणतात आणि मोदी त्याचे जितेजागते उदाहरण आहेत.
 
 
आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास यातील सीमारेषा त्यांना अत्यंत काळजीपूर्वक आखता येते. आत्मविश्वास हा समर्थकांमध्ये ऊर्जेचा संचार करतो, तर अतिआत्मविश्वास हा आत्मसंतुष्टतेची भावना निर्माण करतो. मोदी शेवटचे मत मिळण्याच्या दिवसापर्यंत प्रचार करतील हे खरे आहे. मात्र त्याच्या दुसर्‍याच दिवसापासून म्हणजे निकाल घोषित होण्यापूर्वीच भविष्यकालीन योजनांबद्दलचे त्यांचे नियोजन सुरू झालेले असते, हेदेखील तितकेच खरे आहे.
 
 
मोदी अथकपणे समाजातील विविध स्तरांतील नागरिकांच्या भेटी घेतात. आपल्या कार्याचे आणि परिस्थितीचे भान न सोडता प्रत्येक कार्यक्रमांमध्ये मन:पूर्वक सहभागी होतात. त्यांच्यातला हा अस्सलपणा आणि प्रामाणिकपणा लोकांना जाणवतो.
 
 
त्यांच्यासारख्या प्रगल्भ उंची असणार्‍या नेत्याला एखाद्या चौकटीत वा घटनाक्रमाच्या मर्यादेत अडकवणे अशक्य आहे. पण त्यांच्यात एक प्रकारचा खरेपणा आहे. हा खरेपणा वारशाने मिळत नाही. तुमचे कुटुंब कसे आहे, तुमच्याकडे सत्ता आहे का किंवा श्रीमंती आहे का, यावर तो अवलंबून नसतो. कोणी स्वयंघोषितपणे ‘अस्सल’ असू शकत नाही. लोकांना फसवणारे नव्हे, तर खरे नेतृत्व हवे आहे आणि मोदींचे हेच लक्षण त्यांना विरोधकांपेक्षा वेगळे ठरवते. लोकांच्या डोळ्यात ‘मोदी की गॅरंटी’बद्दलची असणारी विश्वसनीयता या लक्षणामुळे अधिक स्पष्ट होते. या विश्वसनीयतेमागे आहे आजवर केलेल्या कामाचा डोळ्यांना दिसणारा लेखाजोखा.
 
 
कठोर मेहनत, संकटांना निडरपणे तोंड देण्याची वृत्ती आणि सतत शिकण्याची व अनुभवातून योग्य तो धडा घेण्याची सवय यामुळे नरेंद्र मोदी त्यांचे लक्ष्य नक्की साध्य करतील. आपण जसे आहोत तसे लोकांसमोर येण्यास ते कचरत नाहीत. या माणसाच्या वागण्यात जराही ढोंगीपणा नाही. यशाचे उच्चांक गाठत असताना ते आपली मुळे सोडत नाहीत. देशाच्या विधिलिखिताचा शोध घेण्याच्या या अमृतकाळात भारताला आपले नेतृत्व करण्यासाठी अत्यंत योग्य असा नेता मिळाला आहे.
 
स्वैर अनुवाद - मृदुला राजवाडे

मृदुला राजवाडे

सध्या मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत. तत्पूर्वी, हिंदुस्थान समाचार, साप्ताहिक विवेक, विश्व संवाद केंद्र मुंबई अशा विविध संस्थात कार्यरत. कला, संस्कृती, युवा व सामाजिक घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर नियमित लेखन. मुंबई विद्यापीठातील गरवारे व्यवसाय व विकास संस्थेत पत्रकारिता पदविका वर्गात व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून मार्गदर्शन.