भारतरत्न लालजी

विवेक मराठी    06-Feb-2024   
Total Views |
भाजपा नेते, या देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे भारतरत्न या महागौरवाने सन्मानित झाले, हा देशासाठी आनंदाचा क्षण आहे. हा महागौरव प्राप्त करणारे लालजी 50वी व्यक्ती आहेत. पण राजकीय जीवनात भ्रष्टाचाराचा आरोप होताच, “जोवर मी किटाळमुक्त होत नाही, तोवर संसदेत पाय ठेवणार नाही” हे सांगून खासदारकी त्यागणारे लालजी एकमेव खासदार आहेत. भीष्मप्रतिज्ञेसारखा निर्धार करून तो पार पाडणारे अन्य उदाहरण भारतीय राजकारणात अन्य कोणतेही नाही. त्या निर्धाराचा हा महागौरव आहे.  लालजींना भारतरत्न हा गौरव प्राप्त झाला. त्याच्या आधी अटलजींना हा सन्मान मिळाला होता. राजकारणात एकाच विचार प्रणालीत वाटचाल करणार्‍या दोघांना भारतरत्न सन्मान मिळणे हा आगळावेगळा गौरव आहे.
lal krishna advani
 
1991 साली हवाला प्रकरण खूप गाजत होते. एस.के. जैनसह चार जैन बंधूंनी हवालामार्गे पैसा पाठविला होता. त्यात जैन यांनी भारतीय राजकारणातील दिग्गजांना पैसे दिले होते, असा आरोप झाला. 25 एप्रिल 96 व 31 डिसेंबर 96ला या संदर्भात दोन गुन्हे दाखल झाले. विनीत नारायण नावाच्या पत्रकाराने ते प्रकरण पुढे नेले होते. 50 हजारापासून साडेसात कोटी रुपयांपर्यंत लाच दिल्याचे आरोप लालकृष्ण अडवाणी, मदनलाल खुराणा (भाजपा) विद्याचरण शुक्ला, माजी लोकसभा सभापती बलराम जाखड (काँग्रेस), देवीलाल व शरद यादव (लोकदल व जदयू) या लोकांवर लावण्यात आले. त्या वेळी पी.व्ही. नरसिंहराव हे पंतप्रधान होते. हे आरोप झाले, त्या दिवशी संध्याकाळी लालजी पंडरा रोडवरील आपल्या निवासस्थानी बसले होते. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी अटलजींना सांगितला. अटलबिहारी वाजपेयी यांनी लालजींना असा निर्णय न घेण्यास सांगितले, पण लालजींनी राजीनामा तर दिलाच, शिवाय घोषित केले, “मी जोवर किटाळमुक्त होत नाही तोवर संसदेत पाय ठेवणार नाही.” आता न्यायालयात प्रकरण निकाली निघायला किती काळ लागेल, हे कुणालाच माहीत नव्हते. लालजींनी कोर्टाला विनंती केली की, या प्रकरणी माझी सुनावणी रोजच्या रोज करावी. तरी विलंब लागणार होता.
 

advaniji 
 
राजकारणात परिवर्तने होत होती. स्वत: अटलजी 13 दिवसांसाठी पंतप्रधान झाले. नंतर एच.डी. देवगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान झाले. त्या काळात पक्षाला गरज असतानाही लालजी तत्त्वावर ठाम राहिले. रायपूर न्यायालयाने 98 साली त्यांना दोषमुक्त केले. आणि त्यानंतर 98च्या लोकसभा निवडणुकीत लालकृष्ण अडवाणी उभे राहिले. लखनौ व गांधीनगर या दोन मतदारसंघांतून ते विजयी झाले. पण लखनौ मतदारसंघ त्यांनी कायम ठेवला. किटाळमुक्त होऊनच लालजी लोकसभेत पाय टाकते झाले. भारतीय राजकारणात हे उदाहरण आगळेवेगळे होते. भाजपातच नाही, तर कोणत्याही पक्षात असे उदाहरण नाही. आजतर अनेक नेते जामिनावर मुक्त आहेत, पण लोकसभेत खासदारपदी आहेत. त्या वेळी लालजीचा हा निर्धार ‘निस्तुला’ म्हणावा लागेल.
 
 
हा अतुलनीय निर्णय लालजी का घेऊ शकले, याचे उत्तर ते संघ स्वयंसेवक असण्यात आणि संघ प्रचारक असण्यात दडले आहे, असे मला वाटते.
 

vivek

  
लालजींनी मुंबईच्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि ते शिवाजी पार्क शाखेचे मुख्य शिक्षक झाले. 1951 ते 57 ते जनसंघाचे सचिव होते. 
लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म कराचीमधील. हा भाग आज पाकिस्तानात आहे. 8 नोव्हेंबर 1927चा त्यांचा जन्म. कराचीला पॅट्रिक स्कूलमध्ये इंग्लिश माध्यमातून त्यांचे शिक्षण झाले. वयाच्या 15व्या वर्षी लालजी संघाच्या संपर्कात आले आणि त्यांच्या जीवनाने संघवळण घेतले. त्यानंतर ते लाहोरमधील दूधवाली शाखेचे स्वयंसेवक होते. या शाखेचे वैशिष्ट्य होते की, स्वयंसेवकांना शाखा सुटल्यावर ग्लासभर दूध मिळत होते. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि देशाची फाळणी झाली. त्यानंतर सप्टेंबर 47मध्ये लालजींचा सर्व परिवार कराची सोडून मुंबईला आला. लालजींनी मुंबईच्या गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि ते शिवाजी पार्क शाखेचे मुख्य शिक्षक झाले. 1951 ते 57 ते जनसंघाचे सचिव होते. 1957मध्ये लालकृष्ण अडवाणी यांना मुंबईहून दिल्लीला पाठविले गेले. ते अटलजींचे सहकारी झाले.
 
 
लालजींना भारतरत्न हा गौरव प्राप्त झाला. त्याच्या आधी अटलजींना हा सन्मान मिळाला होता. राजकारणात एकाच विचार प्रणालीत वाटचाल करणार्‍या दोघांना भारतरत्न सन्मान मिळणे हा आगळावेगळा गौरव आहे. लालजी धरून आतापर्यंत जनसंघ, संघपरिवारातील तीन जणांना भारतरत्न हा सन्मान मिळाला आहे. गंमत अशी की, आणीबाणीनंतर केंद्रात जे मोरारजीभाई देसाई यांचे सरकार आले, त्यात जनसंघ गटातील तिघांना स्थान मिळाले होते. अटलजी परराष्ट्र मंत्री झाले होते, तर लालजींकडे माहिती व नभोवाणी खाते सोपविण्यात आले होते. नानाजी देशमुख यांना दळणवळण खाते सोपविण्याचे ठरले होते. पण नानाजींनी मंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. नानाजींच्या नकारानंतर बी.सी. वर्मा यांना ही जबाबदारी सोपविण्यात आली. नानाजी देशमुख यांनाही भारतरत्न या सन्मानाने गौरवान्वित करण्यात आले.
 
 
lal krishna advani
 
भाजपात अटलजी व लालजी यांचे दोन गट आहेत. गमतीने हे दोन्ही नेते म्हणत, “असे गट आहेत, पण लालजींचा जो गट आहे, त्याचे नेतृत्व अटलजी करतात, तर अटलजींच्या गटाचे नेतृत्व लालजी करतात.” 
लालजी व अटलजी यांचे मैत्र अभिन्न होते. माध्यमातील मंडळी नेहमीच अशा बातम्या चालवीत की, भाजपात अटलजी व लालजी यांचे दोन गट आहेत. गमतीने हे दोन्ही नेते म्हणत, “असे गट आहेत, पण लालजींचा जो गट आहे, त्याचे नेतृत्व अटलजी करतात, तर अटलजींच्या गटाचे नेतृत्व लालजी करतात.” मुंबईत 1980मध्ये भाजपाची स्थापना झाली, त्या वेळी अटलजी अध्यक्ष तर लालजी संस्थापक सदस्य सरचिटणीस होते. अटलजी खासदार होऊन लोकसभेत पोहोचले, तेव्हा लालजी वार्ताहर दीर्घेत बसून पत्रकार म्हणून अटलजींचे भाषण कव्हर करीत होते. 1980 ते 86 सरचिटणीस राहिल्यावर अडवाणीजी भाजपाचे अध्यक्ष झाले. लालजींनी 91पर्यंत अध्यक्षपद सांभाळले. लालजी तीन वेळा भाजपाचे अध्यक्ष होते. 5 वेळा विरोधी पक्षनेते म्हणूनही लालजींच्या नावाची नोंद आहे. 1998 ते 2004 या काळात लालजी केंद्रीय गृहमंत्री होते, तसेच 2002 ते 2004 ते देशाचे उपपंतप्रधान होते. 2019पर्यंत ते खासदार होते. त्यांनी 2019ची निवडणूक लढविली नव्हती. फाळणीनंतर भारतात आल्यावर लालजी काही वर्षे राजस्थान प्रांतात संघप्रचारक होते. दिल्लीला जनसंघाच्या कामात आल्यावर ते काही काळ ऑर्गनायझर या वृत्तपत्रात साहाय्यक संपादक होते. इंग्लिशवर विलक्षण प्रभुत्व असल्यामुळे, मुत्सद्दी अशी लालजींची जगात ओळख होती. अटलजींचे हिंदी वक्तृत्व प्रभावशाली होते, तसे लालजींचे इंग्लिशमधील वक्तृत्व खिळवून ठेवणारे होते. मात्र जनमानसात ते हिंदीत बोलून सभांना संबोधित करीत. लालजी राजकारणात असले, तरी क्रिकेट व चित्रपट ही त्यांची आवडती क्षेत्रे आहेत. ऑर्गनायझरमध्ये ते चित्रपट परीक्षण करीत असत. त्यांना चॉकलेटही भरपूर आवडतात.
 

lal krishna advani 
 
25 फेब्रुवारी 1965ला कमलाजी त्यांच्या जीवनात पत्नी म्हणून आल्या व नंतर त्यांनी लालजींना अखेरपर्यंत साथ दिली. त्या सावलीसारख्या त्यांच्यासमवेत वावरत असत. प्रतिभा ही कन्या व जयंत हा त्यांचा मुलगा.
 
 
1980मध्ये भाजपाची स्थापना झाली, त्या वेळी भाजपाने गांधीवादी समाजवादाचा स्वीकार केला होता. 1984ची निवडणूक भाजपासाठी नीचांकी ठरली. इंदिराजींच्या हत्येनंतर झालेल्या या निवडणुकीत भाजपाला फक्त 2 जागा जिंकता आल्या. त्यातील एक आंध्रमधील जंगा रेड्डी यांची होती. त्यांनी नरसिंहरावांना पराभूत केले होते, तर दुसरी जागा गुजरातमधील होती. वास्तविक अत्यंत नैराश्य यावे अशी ती स्थिती होती, पण लालजींनी त्यातून पक्षाला बाहेर काढले. त्याआधी 25 जून 1975ला लागलेल्या आणीबाणीत लालजी व अटलजीही मिसाखाली स्थानबद्ध होते. दोघेही बंगलोर जेलमध्ये होते.
 
 25 सप्टेंबर 1990 रोजी लालजींनी सोमनाथपासून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी लालजींचे वय 63 वर्षे होते.
 
गांधीवादी समाजवाद स्वीकारलेल्या भाजपाने 84 साली आपल्या पालमपूर येथील बैठकीत रामजन्मभूमी आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्ष कृती म्हणून 25 सप्टेंबर 1990 रोजी लालजींनी सोमनाथपासून अयोध्येपर्यंत रथयात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी लालजींचे वय 63 वर्षे होते. या रथयात्रेत त्यांच्यासमवेत प्रमोद महाजन व विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. जवळजवळ तीन हजार किलोमीटरचा हा प्रवास होता. या प्रवासात दिवसभरात ते 6-7 सभांना संबोधित करीत. याशिवाय वाटेत थांबवून लहान लहान सभाही होत असत. सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद घेऊन ते प्रवासाला सुरुवात करीत. पहाटे कितीही वाजेपर्यंत सभा चालली, तर लालजी 8 वाजता पत्रकार परिषदेला अतिशय ताजेतवाने होऊन संबोधित करीत असत. त्यांच्या या रथयात्रेतील ‘पांढरकवडा ते जबलपूर’ हा टप्पा तरुण भारत प्रतिनिधी म्हणून मी कव्हर केला. दिवसभराच्या प्रवासात धावपळ सुरू होती. जबलपूरच्या मानसभवनात लालजींची सभा पहाटे 2 वाजता सुरू झाली. मानसभवनातील प्रचंड गर्दी, प्रवासाचा ताण यामुळे आमचे छायाचित्रकार जयंत हरकरे फोटो काढताना मूर्च्छित होऊन खाली कोसळले. लालजींची सभा सुरू होती. त्यांचे भाषण सुरू होते, तरी त्यांचे लक्ष बरोबर होते. दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजता पत्रकार परिषदेला मी पोहोचल्यावर त्यांनी अतिशय तत्परतेने हरकरे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. स्वत: हरकरे समोर आल्यावर त्यांनी “प्रकृतीची काळजी घ्या. डॉक्टरांना दाखवा वगैरे” सांगितले.
 
 लालजी आपल्या तत्त्वनिष्ठेमुळे त्या वेळी संसदेत नव्हते. वाजपेयी सरकारच्या स्थापनेबरोबर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काँग्रेस पक्ष खर्‍या अर्थाने सत्तेतून बाहेर पडला. लालजी ‘राष्ट्रनायक’ झाले.
 
ही रथयात्रा 30 ऑक्टोबर 90 रोजी अयोध्येला पोहोचणार होती. पण 23 ऑक्टोबरला समस्तीपूरजवळ लालजींची रथयात्रा अडविण्यात आली. लालूप्रसाद यादव त्या वेळी बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यांनी लालजींना दुमका या गावी सरकारी विश्रामगृहात ठेवले. लालजींना अटक होताच भाजपाने व्ही.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या रथयात्रेने भाजपाला राष्ट्रजीवनात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले व लालजी राष्ट्रीय नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. 1984मध्ये दोन जागा मिळविणार्‍या या पक्षाला रथयात्रेनंतरच्या लोकसभेत 86, 1992मध्ये 121 जागा मिळाल्या. 96 साली 161 जागांवर झेप घेऊन भाजपाने सत्ता मिळविली. तेरा दिवसांचे सरकार झाले, पण लालजी आपल्या तत्त्वनिष्ठेमुळे त्या वेळी संसदेत नव्हते. वाजपेयी सरकारच्या स्थापनेबरोबर स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा काँग्रेस पक्ष खर्‍या अर्थाने सत्तेतून बाहेर पडला. लालजी ‘राष्ट्रनायक’ झाले.
 
 
या रथयात्रेनंतर भाजपाने लालजींच्या नेतृत्वात खूप रथयात्रा काढल्या. स्वर्णजयंती रथयात्रा, जम्मू-काश्मीर लाल चौक तिरंगा ध्वज फडकविण्यासाठी मुरली मनोहर जोशींनी रथयात्रा काढली. रामरथयात्रेनंतर भारतीय राजकारणात यात्रांचे पर्व सुरू झाले. फक्त भाजपालाच नाही, तर भाजपा विरोधकांना तो मार्ग पत्करावा लागला. या रामयथयात्रेनंतर अडवाणीजी हे कट्टर हिंदुत्वाचे नेते म्हणून माध्यमांनी रंगविणे सुरू केले. पण लालजी राष्ट्रवादी नेते होते. सर्व जण ‘सर्वधर्मसमभाव’ हा विषय रंगवू लागले, त्या वेळी लालजींनी काँग्रेस पक्ष‘छद्म सर्वधर्मसमभाव’ चालवीत आहे असा जबरदस्त प्रतिवाद केला.
 
 
2004-2009ची अशा दोन लोकसभा निवडणुका अडवाणीजींच्या नेतृत्वात लढविण्यात आल्या. त्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष झाला, पण त्याला विरोधात बसावे लागले. 2014मध्ये नरेंद्र मोदी यांच्यावर भाजपाने प्रचाराची धुरा सोपविली व ते पंतप्रधान झाले. 2014मध्ये अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे मार्गदर्शक नेते झाले. प्रकृतीचीही कुरकुर सुरू झाली होती. आज वयाच्या 97व्या वर्षी लालजी भारतरत्न झाले आहेत. एक अख्खा इतिहास रचला गेला.