अफगाणिस्तानच्या नथीतून पाकिस्तानवर तीर

विवेक मराठी    17-Oct-2025   
Total Views |
*डॉ. शैलेंद्र देवळाणकर,
परराष्ट्र धोरण विश्लेषक
 
afghanistan
बगराम विमानतळावर भारतीय विमाने उतरू शकतात. तसे झाल्यास तो पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का असेल. याला ‘ऑपरेशन सिंदूर- भाग दुसरा’ म्हणता येईल. ज्या पाकिस्तानने पहलगाममध्ये 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला आणि आजवर हजारो दहशतवादी हल्ले करुन भारताला रक्तबंबाळ केले, त्या पाकिस्तानविरोधात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या युद्धशास्रातील सुप्रसिद्ध सिद्धांताच्या आधारे भारत एक मोठा गेम प्लॅन आखण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पूर्वेकडील संघर्षाचा सामना करताना जराजर्जर झालेल्या पाकिस्तानला आता पश्चिमेकडील सीमेवर अफगाणिस्तानचे आव्हान भेडसावणार आहे. पुढील काळात पाकिस्तानचे तुकडे पडल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या युद्धसंघर्षाचा भडका उडाला असून येणार्‍या काळात हा संघर्ष अधिक चिघळण्याची दाट शक्यता दिसत आहे. या दोन्ही देशांमधल्या संबंधांना तसेच अफगाणिस्तानात शासन प्रस्थापित करणार्‍या तालिबानसोबतच्या पाकिस्तानच्या संबंधांना प्रदीर्घ इतिहास आहे. परंतु अलीकडील काळात या संबंधांमध्ये घनिष्ट संबंधांचे पर्व संपून कटुता, वितुष्ट आणि आता तर थेट शत्रुत्व निर्माण झाल्याचे दिसत आहे. तथापि, ताज्या संघर्षास कारणीभूत ठरला आहे तो पाकिस्तान. अफगाणिस्तानात अलीकडेच पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 50हून अधिक निष्पाप महिला व बालकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर चिडलेल्या तालिबानने पाकिस्तानला कडाडून प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान यांना विभागणार्‍या ड्युुरंड लाईनवर असणार्‍या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर तालिबानने केलेल्या बॉम्बहल्ल्यामध्ये 60हून अधिक पाकिस्तानी जवान ठार झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये 15 ऑगस्ट 2021 रोजी दुसर्‍यांदा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले. यापूर्वी 1996 ते 2001 मध्ये अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा होता. 2021 नंतर पहिल्यांदा तालिबान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये इतका मोठा संघर्ष उफाळून आल्याचे दिसून आले आहे. यामध्ये जोरदार बॉम्बहल्ले, आर्टिलरींचा वापर केला जात असून सद्यस्थिती पाहता लवकरच हा संघर्ष पूर्ण युद्धामध्ये रुपांतरित होण्याचे संकेत मिळताहेत.
 
 
भारतापासून विभक्त होत पाकिस्तानची निर्मिती झाली असली तरी आज भारत जगातील तिसर्‍या क्रमांकाची महासत्ता बनण्याच्या दिशेने जात आहे; तर पाकिस्तान भिकेकंगाल बनून जगभरात हातात कटोरा घेऊन आर्थिक मदतीची भीक मागत आहे. इतकेच नव्हे तर पाकिस्तान आज विघटनाच्या मार्गावर आहे. तरीही पाकिस्तान आमच्या देशात सारे काही आलबेल असल्याचे जगाला सांगत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनीर आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मेजवानी घेतल्यानंतर जग जिंकल्याच्या आविर्भावात भारतावर डोळे वटारत असले तरी हा देश अंतर्गत असंतोषाच्या एका भयंकर ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये विभक्त होण्यासाठीची नागरी चळवळ आता निर्णायक स्तरावर पोहोचली आहे. बलुच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानी सैन्यावर प्रचंड मोठे हल्ले केले जात आहेत. गिलगिट- बाल्टिस्तानमधील नागरीक पाकिस्तान सरकार व लष्कराच्या दंडेलशाहीला आणि चीनच्या वाढत्या प्रभावाला विरोध करण्यासाठी पेटून उठलेले आहेत.
 
 
सध्याचा संघर्ष खैबर पख्तुनवा भागात पेटलेला आहे. हा भाग अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील प्रांत आहे. या भागात प्रामुख्याने पख्तुन लोकांचे वर्चस्व आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये 1893 मध्ये ड्युुरंड लाईन ब्रिटिशांनी आखलेली होती. 1947 साली पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि त्यानंतर अफगाणिस्तान-पाकिस्तान संघर्षाला सुरुवात झाली. याचे कारण अफगाणिस्तानला ही ड्युरंड लाईन मान्य नाहीये. त्यांच्या मते, पाकिस्तानातील इस्लामाबादपर्यंतचा भाग हा प्रामुख्याने अफगाणिस्तानचा आहे. अफगाणिस्तानात अनेक टोळ्या आहेत. या टोळ्यांचे अस्तित्व खैबर पख्तुनवा भागात आहे. त्यामुळेच ते सातत्याने दावा करत आहेत की, हा संपूर्ण प्रदेश आमचा आहे. पाकिस्तानमधील लष्करी हुकुमशहा असोत किंवा लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे असोत, त्या सर्वांनी अफगाणिस्तानमध्ये आपल्या मर्जीतले सरकार प्रस्थापित करण्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न केले. यामागचे कारण दोन्ही देशातला सीमावाद भडकू नये, अशी या राज्यकर्त्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे तालीबान या संघटनेचा उदय पाकिस्तानच्या कुशीतूनच झालेला आहे. पाकिस्तानने अल् कायदाच्या मदतीने तालिबान जन्माला घातले. तालिबानी संघटनेच्या माध्यमातून दहशतवाद्यांची, योद्ध्यांची एक मोठी फौज तयार करावी आणि तिचा वापर भारताला रक्तबंबाळ करण्यासाठी करावा, असा पाकिस्तानचा कुटिल डाव होता. मात्र बिल क्लिटंन यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिटंन यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य करुन पाकिस्तानला खडसावले होते. त्या म्हणाल्या होत्या की,‘तुम्ही ज्या सापाला दूध पाजत आहात आणि तुमची अपेक्षा आहे की ते साप शत्रूंना चावावेत; पण असे कधीही घडत नाही. साप हा साप असतो. तो कोणालाही डसू शकतो. उद्या तो तुम्हालाही डसायला कमी करणार नाही.’ हिलेरी यांनी दिलेल्या इशार्‍याकडे पाकिस्तानने दुर्लक्ष केले; पण आज हाच साप पाकिस्तानला डंख मारत आहे. वास्तविक, अफगाणिस्तानातून अमेरिकन फौजा मागे फिरल्यानंतर पाकिस्तानच्या मदतीनेच तेथे तालिबानचे शासन प्रस्थापित झाले; पण आज याच तालिबानने पाकिस्तानविरुद्ध शस्र उगारले आहे. दोन्ही देशांमध्ये अघोषित युद्ध पेटलेले आहे. दोन सुन्नीपंथीय देशांमध्ये अशा प्रकारचा संघर्ष पहिल्यांदाच पेटलेला आहे.
 
 
afghanistan
 
अलीकडेच अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान यांनी भारताला भेट दिली. भारतीय परराष्ट्रमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा-वार्तालाप सुरू असतानाच तिकडे पाकिस्तानने हा एअर स्ट्राईक घडवून आणला. यामागचा अर्थ काय? तालिबानने पहिल्यांदा जेव्हा अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला होता, तेव्हा भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हिंसाचाराने परमोच्च बिंदू गाठला होता. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैय्यबा यांसारख्या दहशतवादी संघटनांना तालिबानचा पूर्ण पाठिंबा होता. त्यामुळे भारताने अफगाणिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले होते. परंतु 2021 नंतर अफगाणिस्तानात दुसर्‍यांदा तालिबानचे शासन प्रस्थापित झाले त्यावेळी परिस्थिती बदललेली दिसून आली. यामागचे कारण म्हणजे भारताने अफगाणिस्तानात विकास प्रकल्पांमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. हे विकासात्मक प्रकल्प पुढे सुरू राहावेत, तसेच अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानकडून भारतविरोधी कारवायांसाठी केला जाऊ नये ही यामागची प्रमुख भूमिका होती. आमीर खान भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी स्पष्टपणाने सांगितले की, जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनांना आम्ही आमच्या भूमीवर पाय ठेवू दिलेला नाहीये. ही आपल्यासाठी खूप मोठी दिलासादायक बाब आहे.
 
 
 
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतभेटीवर येण्यामागे एक प्रमुख कारण आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबूलपासून 30 किलोमीटर अंतरावर असणार्‍या बगरामचा एअरबेस आम्हाला परत द्या, अन्यथा परिणामांना सामोरे जा अशी उघड धमकी अलीकडेच दिली आहे. बगराम विमानतळाची उभारणी सोव्हिएत महासंघाने केलेली होती. अफगाणिस्तानला मध्य आशिया आणि पश्चिम आशियासाठी ‘फ्लड गेट’ मानले जाते. याचे कारण अफगाणिस्तान हा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवल्यास एकाच वेळी कझाकिस्तान, उजबेकिस्तान, कैरेगिस्तान म्हणजेच मध्य आशियावर नियंत्रण प्रस्थापित करता येते. त्याचप्रमाणे पश्चिम आशियातील सर्व अरब देशांवर नियंत्रण ठेवता येते. इतकेच नव्हे तर चीनचा शिनशियांग प्रांत आणि रशिया यांच्यावरही नजर ठेवता येते. यामुळेच अफगाणिस्तानला ताब्यात घेण्यासाठी रशिया, इंग्लंड आणि अमेरिका या जागतिक महासत्तांनी शर्थीचे प्रयत्न केले; पण कुणालाही यामध्ये यश आले नाही. त्यामुळे अफगाणिस्तानला ‘जगाचे थडगे’ म्हटले जाते. अफगाणिस्तान जिंकणे अत्यंत अवघड आहे. अशा स्थितीत आता ट्रम्प महाशय बगराम विमानतळ ताब्यात घेण्याची गर्जना करत आहेत.
 
afghanistan
 
बगरामचा एअरबेस हा संरक्षण कार्यासाठी वापरल्या जाणार्‍या जगातील सर्वांत मोठ्या विमानतळांपैकी एक आहे. अफगाणिस्तानात आपले सैन्य घुसवल्यानंतर अमेरिकेने 20 वर्षांत या बगराम एअरपोर्टचे रुपांतर एका शहरात केलेले आहे. तेथे मॅकडोनल्डसारख्या मोठमोठ्या ब्रँडस्ची रेस्टॉरंट आहेत. परंतु ज्यो बायडेन यांनी बगराम एअरबेस रिकामा करण्याचा निर्णय घेतला आणि तो तालिबानच्या कब्जामध्ये आला. आता डोनाल्ड ट्रम्प यांना यावर पुन्हा एकदा नियंत्रण हवे आहे. यामागचे कारण बगरामच्या माध्यमातून त्यांना रशिया आणि पाकिस्तानवर नियंत्रण ठेवायचे आहे. यासाठी त्यांनी पाकिस्तानला मांडीवर घेतल्याचे दिसून आले. अन्यथा मागील दशकभराच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानपासून पूर्णपणे फारकत घेतल्याचे दिसत होते. पण आता पाकिस्तानचे लष्करशहा, पंतप्रधान थेट व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसोबत मेजवानी घेताना दिसताहेत. मागील महिन्यात पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी तीन वेळा अमेरिकेला भेटी दिल्या. आपल्या पहिल्या कार्यकाळात पाकिस्तानला विश्वासघातकी म्हणणार्‍या ट्रम्प यांच्या या यू टर्नचा अर्थ सुरुवातीला अनेकांच्या लक्षात आला नाही. पण बगरामचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर अमेरिका-पाकिस्तान जवळीकीचे कारण समोर आले. बगरामबाबत तालिबानची मनधरणी करण्याची जबाबदारी जनरल आसिम मुनीर यांना देण्यात आली. पण तालिबानने यास पूर्णपणे नकार दिला. आम्ही एक इंचही जमीन अमेरिकेला देणार नाही, असे स्पष्ट केले. विशेष म्हणजे भारताने अमेरिकेच्या विरोधात जाऊन तालिबानच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. त्यामुळे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे स्वप्न भंगणार आहे. अशा वेळी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री भारतभेटीवर येतात आणि बगरामच्या विमानतळावर भारताने उतरावे अशी अपेक्षा व्यक्त करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच्या काळात म्हणजेच 2018 मध्ये एक सामरिक भागीदारीचा करार करण्यात आला होता. त्या करारानुसार अफगाणिस्तानच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैनिक अफगाणिस्तानात जाऊ शकतात असे निर्धारित करण्यात आले होते. मात्र 2021 मध्ये तालिबानी राजवट प्रस्थापित झाल्यानंतर भारताने हा करार रद्द केला होता. तथापि, आता भारताचा तालिबानकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. काबूलमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरू होणार आहे. कदाचित 2018 चा करारही पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या माध्यमातून अफगाणी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय सैन्य, भारतीय वायूदल पुन्हा अफगाणिस्तानात जाऊ शकतात. तसेच बगराम विमानतळावर भारतीय विमाने उतरू शकतात. तसे झाल्यास तो पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का असेल. याला ‘ऑपरेशन सिंदूर- भाग दुसरा’ म्हणता येईल. ज्या पाकिस्तानने पहलगाममध्ये 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला आणि आजवर हजारो दहशतवादी हल्ले करुन भारताला रक्तबंबाळ केले, त्या पाकिस्तानविरोधात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या युद्धशास्रातील सुप्रसिद्ध सिद्धांताच्या आधारे भारत एक मोठा गेम प्लॅन आखण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पूर्वेकडील संघर्षाचा सामना करताना जराजर्जर झालेल्या पाकिस्तानला आता पश्चिमेकडील सीमेवर अफगाणिस्तानचे आव्हान भेडसावणार आहे. पुढील काळात पाकिस्तानचे तुकडे पडल्यास नवल वाटण्याचे कारण नाही.
 
 
भारत- अफगाणिस्तान यांच्यातील सांस्कृतिक संबंध ऐतिहासिक काळापासून चालत आलेले आहेत. मध्यंतरी तालिबानच्या काळात यामध्ये व्यत्यय आला होता. पण अफगाणी लोकांसोबत भारतीयांचे भावनिक बंध जुळलेले आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान सातत्याने भारताकडे मदतीसाठी धावून येतो. 2021मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यानंतर संपूर्ण जगाने या देशाकडे पाठ फिरवली होती. परिणामी, या देशातील नागरिकांवर उपासमारीचे संकट आले. त्यावेळी भारताने मानवतेच्या भूमिकेतून 10 लाख टन गहू देऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता त्याच अफगाणिस्तानच्या माध्यमातून भारत पाकिस्तानला काटशह देण्याची तयारी करत आहे. भारत-अफगाणिस्तान यांच्यातील वाढते संबंध हा डोनाल्ड ट्रम्प यांनाही कडक इशारा आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक