गेल्या काही दशकांमध्ये मोठं आणि एकत्र कुटुंब ते विभक्त आणि लहान कुटुंब असं कुटुंबव्यवस्थेत होत गेलेलं परिवर्तन; कुटुंबातील स्त्री-पुरुष या दोघांचंही करिअर, मुलांची सुरक्षितता यातून पाळणाघर या व्यवस्थेची गरज अधिकाधिक भासू लागली. मोठ्या महानगरांमध्ये आता तर पाळणाघर ही अपरिहार्यता झाली आहे. अनेक नव्या-जुन्या पाळणाघरांनी सामाजिक गरज ओळखून वात्सल्याचा वसा घेतला आहे. त्याच वेळेस बदलती सामाजिक स्थिती, वाढलेल्या अपेक्षा आणि गरजा याचं भान बाळगत मूळ रचनेत कालानुषंगिक बदलही केले आहेत. पाळणाघर म्हणजे बदलत्या सामाजिक परिस्थितीतून निर्माण झालेली अपरिहार्यता आणि मुलांच्या डोळस संगोपनासाठी उभी राहिलेली व्यवस्था. या समाजोपयोगी व्यवस्थेचं मनापासून स्वागत आणि स्वीकार करायला हवा.
आठ वर्षीय मुलीचा पाळणाघरात छळ
सहा महिन्यांच्या बाळाला मारलं, तुमचं पाळणाघराकडे लक्ष आहे का?
चिमुकलीला डे केअर सेंटरमध्ये मारहाण, आईबाबांनो सावधान
अशा बातम्या आपण कितीदा वर्तमानपत्रात वाचल्या असतील, किती पोर्टल्सनी याच्या रसभरीत वर्णनाचा आपल्यावर मारा केला असेल, व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या क्लिप्स व्हॉट्सअॅपवर फिरल्या असतील. आपलंही हृदय ते पाहून पिळवटलं असेल, बाळाच्या असुरक्षिततेच्या भावनेने ग्रासलं असेल. या घटनांमध्ये तथ्य असेलही, नाही असं नाही. पण या बातम्यांवर घाईने व्यक्त होण्याच्या किंवा ते फॉरवर्ड करण्याच्या नादात पाळणाघर ही आजच्या काळातली अतिशय उपयुक्त, कालसुसंगत अशी व्यवस्था टीकेची धनी होत आहे, हे लक्षात घ्यायला हवं. त्यावर टीका करण्यापूर्वी तिच्या अंगोपांगाची माहिती घेणं, तिच्या आवश्यकतेची जाणीव असणं, त्याबाबत स्वतःला अपडेटेड ठेवणं आणि त्याची सामाजिक गरज लक्षात घेत चिंतन करणं अत्यंत गरजेचं आहे.
गरजेतून विचार, विचारातून विकास
गेल्या शतकात संपूर्ण जगभरात समाजाने जेवढी स्थित्यंतरं पाहिली आहेत, त्या वेगाने आणि त्या प्रमाणात क्वचितच आधी पाहिली असतील. संशोधन, संरक्षण, रोजगार, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत जगभरातच लक्षणीय प्रगती झाली. भारतासारखी प्रतिभाशाली राष्ट्रं पाश्चात्य जोखडातून स्वतंत्र झाली आणि त्यांचा प्रगतीपथावरील प्रवास सुरू झाला. मागील पन्नास ते साठ वर्षांत माणसं नोकरी व्यवसायानिमित्त शहरात, दुसर्या गावात अधिक प्रमाणात स्थलांतरित होत गेली. पूर्वीच्या काळी पुरुषांनी अर्थार्जन करायचं आणि स्त्रियांनी कौटुंबिक जबाबदार्या पूर्ण करायच्या ही जनरीत होती. एकत्र कुटुंबपद्धती असल्यामुळे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न फार भेडसावत नसे. पण पुढे शिकलेली माणसं नोकर्यांसाठी, अर्थार्जनासाठी वेगळ्या गावात, शहरात स्थिरावू लागली. तर कधी घरातील सर्वांना एकाच ठिकाणी राहण्याकरिता जागा अपुरी पडू लागल्यावर वेगवेगळ्या जागा घेऊन राहू लागली. एकत्र कुटुंबव्यवस्था विभक्त कुटुंबव्यवस्थेत परिवर्तित होऊ लागली. अशा विभक्त कुटुंबांमध्ये घरात एकच स्त्री असण्याचं प्रमाण अधिक होतं. माझा स्वतःचा जन्म 80च्या दशकातला. सर्वसाधारणपणे माझ्या आईच्या आणि थोड्याफार प्रमाणात आजीच्या पिढीत स्त्रियांची, विशेषकरून शहरी स्त्रियांची आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकडे, विविध क्षेत्रांत कार्यरत होण्याकडे व नोकरी करण्याकडे कल हळूहळू वाढू लागला होता. यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे दिवसभर मुलांना सांभाळणार कोण? यात काही सामाजिक व्यवस्था साहाय्यभूत ठरल्या व त्यांची एक इकोसीस्टीम किंवा परिसंस्था तयार झाली त्यातीलच एक म्हणजे पाळणाघर किंवा बेबी सिटींग ही सुविधा.
अगदी सुरुवातीच्या काळात त्याला ‘पाळणाघर’ असं शीर्षकही नसेल कदाचित. शेजारील किंवा कोणी जवळच राहणारी परिचित आजी, लांबच्या नात्यातील कोणी आत्या, काकू, मावशी या अतिशय आनंदाने ही मूल सांभाळण्याची जबाबदारी घेऊ लागल्या आणि आई-बाबांचा वर्ग मुलांच्या दिवसभराच्या संगोपनाबाबत निश्चिंत झाला. ज्या स्त्रियांना अर्थार्जनाची गरज होती, पण घरातील जबाबदार्यांमुळे घराबाहेर पडणं शक्य नव्हतं किंवा शिक्षणाच्या अभावामुळे नोकरी मिळणं कठीण होतं किंवा व्यवसायाकरिता भांडवल उभं करणं आव्हानात्मक होतं अशा स्त्रियांसाठी पाळणाघर चालवणं ही सुवर्णसंधी होती. या काळात अनेक स्त्रियांनी हा बिनगुंतवणुकीचा व्यवसाय आपापल्या घरात सुरू केला. हाच काळ भारतातील ‘पाळणाघर संस्कृती’च्या उदयाचा काळ म्हणता येईल.

गेल्या पन्नास ते साठ वर्षांत ही पाळणाघर संस्कृती इथे रुजली, वाढली, विस्तारली आणि बदलतही गेली. आज घरातील स्त्रीने नोकरी करणं, करिअर करणं समाजात बर्यापैकी रुळलं आहे. त्याचप्रमाणे वाढती महागाई, नोकर्यांमधली अनिश्चितता अशा अनेक कारणांमुळे नवराबायको दोघांनीही नोकरी करणं हे अनेकदा अपरिहार्यदेखील असतं. गेल्या काही वर्षांत नातवंडं आणि आजीआजोबा यांच्या वयातील दरीदेखील वाढली आहे. वय झाल्याने किंवा उतारवयात मोकळीक हवी असल्याने किंवा अन्यत्र राहात असल्याने आजीआजोबा ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ ठरतात. अशा वेळेस मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने पाळणाघर हा पालकांसाठी मोठा आधार ठरतो. गेल्या काही वर्षांत पाळणाघरांमध्ये जाणार्या मुलांची संख्या लक्षणीय स्वरुपात वाढली आहे. आज तर ग्रामीण भागातही नोकरदार/उद्योजक स्त्रियांचं प्रमाण वाढतंय, त्यामुळे तिथेही पाळणाघरांची मागणी वाढते आहे.
अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वीपर्यंत पाळणाघरं बर्याचदा फक्त घरातूनच चालवली जात होती. पण, घरातून करता येणारा बिनभांडवली व्यवसाय ही चौकट आता पाळणाघरांनी ओलांडली आहे. व्यवस्थित गुंतवणूक करून, स्वतंत्र जागेत व्यावसायिक पद्धतीने चालवल्या जाणार्या पाळणाघरांच्या संख्येतही आता वाढ होत आहे. व्यवस्थित प्रशिक्षित असलेला कर्मचारी वर्ग, मुलांसाठी खेळणी, योग्य आहार-विहार यांचा व्यवस्थित विचार करून ही पाळणाघरं चालवली जातात. हल्ली छोट्या-मोठ्या घरातील पारंपरिक घरगुती पाळणाघरांसह संस्थात्मक, भांडवली गुंतवणूक करून सुरू केलेली व्यावसायिक आणि प्रीस्कूल + डे केअर + नर्सरी अशी विविध स्वरूपाची पाळणाघरं समाजात सुरू असल्याचं दिसून येतं. स्वरूप बदलत गेल्याने पाळणाघरांना मिळणार्या सामाजिक दर्जातही सकारात्मक फरक पडला असून त्यांना वेगळी प्रतिष्ठा प्राप्त झाल्याचं जाणवतं. दुसरीकडे पालकांचीही खर्च करण्याची तयारी असल्याने सर्वसाधारण घरगुती पाळणाघरापासून कॉर्पोरेट दर्जाचं पाळणाघर असे निवडीचे अनेक पर्याय पालकांपुढेही उपलब्ध असतात.
बदलांचं वर्तुळ आणि केंद्रस्थानी मुलं
गेल्या काही वर्षांत पालकांच्या कामाचे तास आणि ताण वाढले आहेत. तसंच, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणार्यांच्या वेळाही वेगळ्या असतात. सामाजिक सुरक्षितता अधिक आव्हानात्मक होत चालली आहे, स्क्रीनटाईम हा एक नवा राक्षस घराघरात वास करतो आहे. काही मुलं हायपर असतात, कधी हट्टी असतात तर कधी प्रकृतीने नाजूक असतात. अशा मुलांना घरात एकटं ठेवणं योग्य नसतं. त्यामुळे विभक्त कुटुंबात राहणार्या मुलांचं योग्य प्रकारे संगोपन हा आईबाबांपुढील एक आव्हानात्मक मुद्दा असतो. पूर्वी मुलांवर लक्ष असावं आणि त्यांना खायला-प्यायला मिळावं एवढीच पाळणाघरांकडून पालकांची अपेक्षा असे. आधी घरातून चालणार्या पाळणाघरांची संख्या अधिक होती. आता मात्र पालकांचे पाळणाघर निवडीचे निकष, त्यांच्या अपेक्षा आणि त्यासाठी खर्च करण्याची तयारी यात अतिशय वैविध्य आलं असल्याचं दिसून येतं. सर्वसाधारणपणे पालकांच्या सर्वसाधारण अपेक्षा किंवा पाळणाघर निवडीचे निकष असे असतात - पाळणाघर फार कोंदट नसावं. स्वच्छ खेळती हवा, वावरायला पुरेशी जागा असावी, मुलांना खेळण्यासाठी, जेवण्यासाठी आणि झोपण्यासाठी चांगली सोय असावी, स्वच्छतागृहे पुरेशी आणि नियमित स्वच्छता राखली जाणारी असावीत. शी शू किंवा तत्सम स्वच्छतेसाठी मदत करणार्या मावशी असाव्यात, मुलांना वयोगटाप्रमाणे ठेवलं जावं व त्यानुसार त्यांच्या सोयी असाव्यात, त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष असावं, मुलांना पाळणाघरातच सकस व पौष्टिक आहार मिळावा, मुलांच्या वयोगटाप्रमाणे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असे उपक्रम असावेत, पाळणाघरात मुलांना सांभाळणार्या व्यक्ती प्रशिक्षित असाव्यात, त्या व्यक्तींचं मानसिक आणि शारिरीक आरोग्य चांगलं असावं, पाळणाघरात किंवा अगदी जवळच्या अंतरावर वैद्यकीय सुविधा असावी, पाळणाघरात मुलांची संख्या मर्यादित असावी व त्याला अनुसरून सेविकांची संख्या असावी. या सर्व निकषांच्या पूर्ततेबाबत पालक अत्यंत जागरुक असतात आणि ते असणं अत्यंत गरजेचंही आहे. काही ठिकाणी वातानुकुलित यंत्रणेचीही मागणी पालक करतात व त्यासाठी खर्च करण्याचीही त्यांची तयारी असते. शाळा, आपलं ऑफिस आणि राहते घर यांच्यातील दोन ठिकाणं तरी पाळणाघराच्या जवळ असावीत याकडे पालकांचा कल असतो, असंही लक्षात येतं. हा लेख लिहिण्यासाठी पाळणाघर संस्कृतीच्या एकूण विस्ताराच्या आणि विकासाच्या अनुषंगाने आम्ही विविध प्रकारच्या पाळणाघरांना संपर्क करून त्यांच्याकडून त्यांची कार्यपद्धती, त्यामागील मानसशास्त्र, पालकांची सोय, शाळांशी संलग्नता अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचप्रमाणे समुपदेशकांकडूनही याबाबतची माहिती समजून घेतली.
चार दशकांचं पाळणाघर
दादरमधील प्रभा पंडीत काकू या 1980 पासून घरात पाळणाघर चालवतात. लग्नानंतर नोकरी करणं शक्य नव्हतं; पण अर्थार्जन करायची इच्छा होती, म्हणून चाळीस वर्षांपूर्वी त्यांनी पाळणाघर सुरू केलं. यजमान काम करत असलेली मिल 1986-87मध्ये बंद पडली. तेव्हा काकूंच्या संसाराला या पाळणाघरानेच मोठा आधार दिला. आजही त्या घरात ताजा स्वयंपाक करून आईच्या मायेने मुलांना आमटीभात खाऊ घालत आहेत. त्या सांगतात, ‘मुलांचे डबे दुपारपर्यंत अगदी गार होऊन गेलेले असायचे. कधी कधी माझ्याकडे एका वेळेस 25-30 मुलंही असायची. अशा वेळेस प्रत्येकाचा वेगळा डबा गरम करून देणं कठीण असायचं. आईदेखील घरात स्वयंपाक करणार की ऑफिससाठी आवरणार? त्या मुलींचीही धांदल व्हायची. त्यामुळे इथेच सगळ्यांसाठी एकच ताजा स्वयंपाक करून जेवू घालणं मला जास्त सोयीचं वाटायचं. मुलं आजही माझ्याकडे आनंदाने जेवतात. दुपारचं खाणंही मीच इथे देते. त्यांचे कपड्याचे सेटही इथेच धुवून वाळवून वापरते. पूर्वी मी स्वतः हाती धुवायचे, काही वर्षांपूर्वी मशीन घेतल्याने ते अजून सोपं झालं. पालकांनाही आठवणीने वापरलेले, शीशूने खराब झालेले कपडे धुवा, त्यांच्या बॅगा सोबत आणा हे करावं लागत नाही. त्यांचीही सोय होते आणि मलाही या सगळ्यात आनंद मिळतो.’
गेली अनेक वर्षं अनेक आईबाबा आपल्या मुलांना पंडित काकूंकडे सोडून निर्धास्तपणे ऑफिसला जातात. अनेकदा तर त्यांच्या आयाही ‘काकू आज मी पण डबा घेऊन जाते’, म्हणत हक्काने पोळीभाजीचा डबा घेऊन जायच्या. काकू सांगतात, ‘तुमच्या हातची शेंगा घातलेली आमटी आणि भात, लोणचं, संध्याकाळचा खाऊ याची चव आजही विसरलो नाही असं परदेशातूनही आवर्जून फोन करून सांगणारी माझी अनेक मुलं आहेत.’ काही वर्षांपूर्वी एका दीड वर्षांच्या बाळाच्या आईला बँकेत बढती मिळून रत्नागिरीला बदलीवर जावं लागणार होतं. त्या वेळेस दिवसा मी आणि रात्री बाळाचे बाबा व आजी अशी आम्ही जबाबदारी वाटून घेतली आणि तिला निर्धास्तपणे रत्नागिरीला जा असं सांगितलं. ‘तुम्ही सगळे होतात म्हणून मी रत्नागिरीला जाऊन नोकरी करू शकले’, असं ती आई मला आजही सांगते. अशा कृतज्ञता व्यक्त करणार्या अनेक मुली आहेत. हेच अनुभव या वयातही काम करायला मला बळ देतात. पाळणाघर या क्षेत्रात खूप काही करण्यासारखं आहे, स्त्रियांच्या नोकरीच्या वाढत्या प्रमाणात या क्षेत्राची मागणी खूप आहे. फक्त मायेने आणि आपुलकीने मुलांना सांभाळायची त्या स्त्रीची तयारी हवी.
विलेपारले येथील लोकमान्य सेवा संघाचे पाळणाघर
मुंबईच्या विलेपारले येथील लोकमान्य सेवा संघ या संस्थेच्या माध्यमातून गेली चाळीस वर्षं मृणालिनी काळे बालसंगोपन केंद्र सुरू आहे. पाळणाघराच्या कार्यवाह लीना बर्वे यांनी पाळणाघराची माहिती दिली. ‘हा बराचसा मराठी परिसर आहे. त्यामुळे पाळणाघरात येणारी 99 टक्के मुलं ही मराठी आहेत. हा परिसर उच्च मध्यमवर्गीय असला तरी पाळणाघरात मात्र सर्व आर्थिक घटकातील मुलं येतात, हे विशेष. संस्थेतील महिन्याची फी सर्वसामान्यांना परवडण्यासारखी असल्याने अनेक निम्न मध्यमवर्गीय पालकही मुलांना संस्थेत ठेवतात’, असं बर्वे मॅडम सांगतात.

सकाळी साडेआठ ते संध्याकाळी सात या वेळात हे पाळणाघर चालतं. मुलांना वरणभात, पोळीभाजी केंद्रातच दिली जाते. शाळेत जाणारी मुलं संस्थेतूनच पोळीभाजीचा डबा घेऊन जातात. एकूण 12 सेविका आहेत. त्या प्रशिक्षित असतील याची खातरजमा केल्यावरच त्यांना नियुक्त केलं जातं. पाळणाघरात मुलांना बसण्यासाठी मोठ्ठा हॉल, मुलांना झोपण्यासाठी अंथरूण-पांघरुणाची सोय, जी लहान पेज-खिमट वगैरे खाणारी मुलं त्यांना ती करून भरवली जाते. मोठ्या मुलांना वरणभात/आमटीभात दिला जातो. प्रत्येक महिन्यात ज्या ज्या मुलांचा वाढदिवस असतो, त्या निमित्त त्यांच्या आवडीचे कधी पराठे, कधी शिरा असे पदार्थ महिन्यातील एका दिवशी संस्थेतच केले जातात. संस्थेत भांडी, अंथरुणं-पांघरूण यांची स्वच्छता पाळली जाते. सेविकांना युनिफॉर्म, स्वच्छतेसाठी नॅपकिन टॉवेल दिले जातात. मुलांसाठी संगीत खुर्ची, पझल्स, सॉफ्ट टॉय अशा खेळांची सुविधा आहे. पावसाळा नसेल तर अंगणात मैदानी खेळही खेळण्यासाठी नेतात. संस्थेत दहिहंडी, चैत्रगौर, तीळगूळ समारंभ, गुढीपाडवा असे विविध सण साजरे केले जातात. मुलांकडून जेवणाआधी श्लोक म्हणून घेतले जातात. इंग्लिश गाणी, कविता म्हणून घेतल्या जातात. संध्याकाळी स्तोत्र म्हणून घेतली जातात.
मुलांना पाळणाघरात ठेवण्यात संस्काराचा भाग फार मोठा आहे. विशेषतः सेवावस्त्यांमध्ये राहणार्या व घरोघरी किंवा अन्यत्र घरकाम करणार्या महिलांच्या मुलांना याचा विशेष लाभ होतो. कसं राहावं, कसं खावं, स्वच्छता कशी राखावी याचे संस्कार पाळणाघरात होतात. दिवसभर पाळणाघरात असल्याने वस्तीमध्ये सर्रास ऐकू येणारे अपशब्द, दिसणार्या मारामार्या यापासून मुलं दूर राहतात. एक संस्कारी नागरीक घडण्याकडे त्यांचा प्रवास होत असतो. त्यामुळे त्या महिला खूश असतात. मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालकांना ओळखपत्र दिलं जातं. ते ओळखपत्र दाखवल्याशिवाय मुलांना आईबाबा, शाळेची गाडी किंवा जे कोणी घ्यायला आलं असेल त्यांच्याकडे सोपवलं जात नाही. अनेकदा सुट्टीच्या दिवशीही मुलांना संस्थेत यायचं असतं इतके छान बंध तयार होतात. घरात एकेकटी राहणारी मुलं मित्रांशी खेळायला मिळतं म्हणून पाळणाघरात यायला अतिशय उत्सुक असतात. केवळ मुलंच नव्हे, तर पालकांचेही संस्थेसोबत ऋणानुबंध जुळतात, असं बर्वे मॅडम आवर्जून नमूद करतात.
नंदनवन, अंबाबाई देवस्थान गोरेगाव
गोरेगाव पश्चिमेतील अंबाबाई देवस्थान न्यासाच्या माध्यमातून 2013 पासून नंदनवन पाळणाघर चालवलं जातं. बदलती कुटुंबव्यवस्था, मध्यमवर्गीय-निम्न मध्यमवर्गीय नोकरदार स्त्रियांच्या मुलांच्या संगोपनाचा विचार करत, काळाची गरज लक्षात घेऊन नंदनवन सुरू करण्याचा निर्णय संस्थेने घेतला. मुलांना केवळ सांभाळणं या पलीकडे जात त्यांच्या वाढीच्या वयात त्यांच्यावर उत्तम संस्कार व्हावेत याचाही विचार पाळणाघर चालवताना केला जातो, अशी माहिती देवस्थानचे ट्रस्टी गिरीश सामंत यांनी दिली. नंदनवनच्या माध्यमातून पालकांना परवडणार्या दरात पाळणाघर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलं. प्रशिक्षित शिक्षिका आणि सेविकांची नेमणूक संस्थेत करण्यात आली. संस्थेत कॉर्पोरेट ते सेवावस्ती अशा विविध आर्थिक स्तरातील पालकांची साधारण सहा महिने ते बारा वर्षं वयोगटाची मुलं येतात. अगदी लहान मुलांना सांभाळणार्या महिलांना विशेष प्रशिक्षणाची गरज असते. त्यासाठी एउउएचं (एरीश्रू उहळश्रवहेेव उरीश रपव एर्वीलरींळेप)प्रशिक्षण घ्यावं लागतं. नंदनवनच्या सुरुवातीच्या काळात अनुभवी मार्गदर्शकांची मदत घेतल्यानंतर पद्मा देवकर यांची प्रमुख म्हणून नियुक्ती करताना त्यांना एका वर्षासाठी शास्त्रीय दृष्टीकोनातून प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली. नियुक्ती होताना शिक्षिका प्रशिक्षित असावी याकडे संस्थेचा कटाक्ष असतो. शिक्षिकांच्या-सेविकांच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेतली जाते. नंदनवन पाळणाघराची फी अतिशय कमी असून आज तिथे 75 ते 80 मुलं आहेत. पाळणाघर अत्यंत प्रशस्त असून मुलांचे वयोगटानुसार तीन गट केले आहेत. अगदी लहान बाळांसाठी वेगळी खोली आणि पाळणे-बंदिस्त असे छोटे पलंग आहेत. मोठ्या मुलांसाठी मोठा हॉल, झोपण्याची खोली, अंथरूण-पांघरूण इत्यादी सोयी आहेत. लहान मुलांसाठी खिमटी आणि मोठ्या मुलांना दुपारी पौष्टिक खिचडी दिली जाते व मुलं ती आवडीने खातात, असं पद्मा देवकर सांगतात. इमरजन्सीसाठी वैद्यकीय सोयही जवळच आहे. शाळांप्रमाणेच पाळणाघराची पालकसभा घेतली जाते. संस्थेतील बरीचशी मुलं अंबाबाई देवस्थानाजवळील शाळेत जातात. मुलांच्या संगोपनासाठी शाळेतील शिक्षकांचीही मदत, सल्ला घेतला जातो. पाळणाघरात मुलांना वेगवेगळी गाणी, गोष्टी, नाच, चित्रकला, इत्यादी शिकवलं जातं. वेगवेगळे खेळ घेतले जातात. पपेट्सच्या माध्यमातून शिकवलं जातं, रोप लावून; ते जोपासायचं कसं हे शिकवलं जातं, विविध सण साजरे केले जातात, बाहुलीचं लग्न लावलं जातं. पावसात भिजण्याचाही आनंद मुलांना वर्षातून एकदा दिला जातो. गणेशोत्सवात गणपती आणला जातो. थोडक्यात केवळ खाणं, झोप, सुरक्षितता या पलीकडे जात आनंददायी बालपण देण्याकडेही पाळणाघरं प्राधान्य देतात.
तारांगण, बदलापूर
महामुंबईतील बदलापूरमध्ये नूतन व्यवहारे यांच्या ‘तारांगण’ या पाळणाघराच्या दोन शाखा आहेत. सामाजिक बदलांना अनुसरून पाळणाघरांची गरज लक्षात घेत, आपल्या मुलाला अत्यंत मायेने सांभाळणार्या टिळक काकूंकडून आदर्श घेत नूतन व्यवहारे यांनी स्वतः 2014मध्ये तारांगणची स्थापना केली. मुलांची जशी काळजी घरात घेतली जाते, तितकीच व्यवस्थित काळजी आपल्या पाळणाघरात घेतली जाईल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यांच्याकडे दहा काकू मुलांना सांभाळण्यासाठी आहेत. त्या अत्यंत मायेने सांभाळतात. पाळणाघरात काही तास ते पूर्ण दिवस अशा पद्धतीने मुलं राहत असल्याने त्यानुसार शुल्क ठरतं.
मुलं उंचावर चढून पडू नयेत किंवा त्यांना काही लागू नये या विचाराने तारांगण पाळणाघरात कोणतंही मोठं फर्निचर ठेवण्यात आलेलं नाही. मुलांची खाण्यापिण्याची व्यवस्थाही इथेच केली जाते. केवळ दिवसभरच मुलांना पूर्ण आहार मिळतो असं नव्हे तर, उशीरा घरी जाणारी मुलं पोळीभाजी, पोळीचा रोल किंवा तत्सम खाऊनच बाहेर पडतात. थोडं पोट भरलेलं असल्याने कामावरून दमून येणार्या आईला स्वयंपाकाची धावपळ करावी लागणार नाही किंवा चटरफटर मुलांना द्यावे लागणार नाही, असा विचार यामागे आहे. संस्थेत मुलांना रेडी टू कुक किंवा पॅक्ड खाणे दिले जात नाही. नूडलऐवजी ज्वारीच्या शेवया, क्रिमच्या केक ऐवजी घरी केलेला रव्याचा केक असे पदार्थ दिले जातात. मुलांसाठी अॅक्टिव्हिटी क्लास चालवला जातो. ज्यात चित्रकला, हस्तकला, नाच, शैक्षणिक खेळ, जिम्नॅस्टिक्स इत्यादी घेतलं जातं. पालकांना घरी आल्यानंतर अनेकदा गृहपाठ, पाठांतर यामुळे पालक आणि मुलांना अन्य गप्पागोष्टींसाठी वेळ मिळत नाही. तो मिळावा म्हणून पाळणाघरात ट्यूटर्स ठेवण्यात आले आहेत, जे त्यांचा घरचा अभ्यास, पाठांतर इत्यादी करून घेतात. मूल थोड्याशा सर्दीतापाने आजारी असेल तर मुलांना पालकांच्या सूचनेनुसार पाळणाघरात औषधं दिली जातात, त्यासाठी त्यांना सुट्टी घ्यावी लागत नाही. इमर्जन्सीसाठी एक डॉक्टर जवळच आहेत, त्यांनाही पाळणाघराशी जोडलेलं आहे.
तारांगणबद्दल नूतनताई सांगतात, ‘तारांगण केवळ पाळणाघरच नाही तर तारांगणच्या पालकांच्या ग्रुपवर एक वेगळं बिझनेस नेटवर्कच तयार झालं आहे. दर शनिवारी कोणी ना कोणी आपल्या व्यवसायाची जाहिरात करतं. दर्जाची खात्री असल्यामुळे पालक एकमेकांकडून वस्तू विकत घेणं जास्त पसंत करतात. त्यामुळे परिचितांना अर्थसाहाय्य मिळतं. इथे मुलं सांभाळणार्या काकूंना एखादी इमर्जन्सी आल्यास तारांगण त्यांच्या पाठीशी उभं राहतं. मला असं वाटतं की, महिलांनी आपल्या मनातला जन्मजात सेवाभाव, ममत्वभाव आणि आपली अर्थार्जनाची गरज लक्षात घेऊन पाळणाघरासारख्या व्यवसायांना प्राधान्य दिलं पाहिजे. यात जबाबदारी खूप असली, तरी मुलांच्या संगोपनाची सोय करताना एक सामाजिक दायित्व पूर्ण केल्याचा भाव आपल्या मनात राहतो.’
लिटल कृष्णा डे केअर, प्री स्कूल आणि नर्सरी
डोंबिवलीतील प्राजक्ता बोंद्रे आपल्या बिझनेस पार्टनरसह 2018पासून ‘लिटल कृष्णा’ नावाने डे केअर सेंटर, प्री-स्कूल आणि नर्सरी चालवतात. सात-आठ महिने ते दहा-अकरा वर्षांपर्यंतची मुलं लिटल कृष्णामध्ये येतात. सकाळी 8 ते रात्री 8 ही या पाळणाघराची वेळ आहे. दिवसभरातील तीन वेळचं ताजं, पौष्टिक खाणं आणि दूध संस्थेतच दिलं जातं. संस्थेत मुलांना सांभाळायला तीन मावशी आहेत. प्री-स्कूलसाठी वेगळ्या शिक्षिका आहेत आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार लहान मुलांना शिकवलं जातं. संस्कार वर्गही चालवला जातो. शुभंकरोतीपासून अनेक दैनंदिन श्लोक, स्तोत्र शिकवली जातात. संस्थेत सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची सोय आहे. त्याचप्रमाणे मजबूत खिडक्या दरवाजे, मुलांना ऑपरेट करता येणार नाही अशा अंतरावरील कड्या-कुलपे यांची व्यवस्था केलेली आहे. लिटल कृष्णामध्ये चार-पाच तास, किंवा दिवसभर किंवा आवश्यकतेनुसार मुलांना ठेवण्याची सोय आहे. त्यासाठी तशी शुल्करचना केलेली आहे. ज्यांची मुलं एरवी घरात असतात अशा पालकांना कधीतरी महत्त्वाच्या कामासाठी वगैरे जायचं असतं, अशांसाठी केवळ एक किंवा दोन दिवस बाळाला ठेवता येईल अशीही सोय आहे. प्ले ग्रूप, नर्सरी, बालवाडीसाठी वेगळी शुल्करचना आहे.
हल्ली पाळणाघरात मुलांना खाणे, स्वच्छता, झोप यांच्याव्यतिरिक्त शिक्षण मिळावं, संस्कार मिळावेत, अन्य मुलांचा सहवासही मिळावा, मिळून मिसळून वागण्याची सवय लागावी अशी पालकांची अपेक्षा असते. त्यामुळे अगदी दोन तीन तासांसाठीही मुलांना आमच्याकडे ठेवणारे पालक आहेत. त्यांना खेळण्यापुरतं आम्ही बोलवतो. संस्थेत विविध सण साजरे केले जातात. अनेक घरांमध्ये मोबाईल बघत खाण्याची सवय असते, शेअरिंगची सवय नसते, पानात वाढलेलं सगळं संपवण्याची सवय नसते, अनेक मुलांना घरात माणसं नसल्याने कम्युनिकेशनमध्ये अडचणी येत असतात, रंगीबेरंगी आणि मोठा आवाज स्क्रीन बघण्याची सवय असल्याने माणसांनी सामान्य आवाजात दिलेल्या सूचना, शिकवलेली गाणी, नुसत्या तोंडी सांगितल्या जाणार्या गोष्टी त्यांचा मेंदू पटकन स्वीकारत नाही अशा मुलांना विशेषतः करून डे केअर सेंटरचा फायदा होतो, असं प्राजक्ता बोंद्रे सांगतात.
पाळणाघर ही मुलांच्या विकासासाठी साहाय्यभूत व्यवस्था
पाळणाघर, पालक आणि बालक या वर्तुळाबाबत दादरमधील समुपदेशक मधुरा भोंदे यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, आजच्या घडीला पाळणाघर ही शाळेइतकीच अत्यंत आवश्यकतेची बाब झाली आहे. पूर्वी जवळपास प्रत्येक घरी मुलांची काळजी घ्यायला आणि त्यांच्यावर संस्कार करायला आजीआजोबा होते. आज आजीआजोबा असले तरी त्यांचं वय अधिक असतं. त्यांच्या शारिरीक व्याधींचा विचार करता पालक मुलांच्या संगोपनासाठी आईबाबा त्यांच्यावर पूर्ण अवलंबून राहू शकत नाहीत. आज पाळणाघरांचे वेगवेगळे पर्याय पालकांकडे आहेत. गेल्या काही वर्षांत ‘ऍक्टिव्हिटी बेस्ड डे केअर सेंटर+ प्री स्कूल’ हा ट्रेण्ड चलनात आहे. पालकांना अशी पाळणाघरं हवी आहेत, जिथे त्यांच्या लहान बाळांची काळजी घेतली जाईल, थोडं मोठं झाल्यावर त्यांना शाळेसाठी बाहेर जावं लागणार नाही, त्यांना तिथेच पौष्टिक आहारही मिळेल, त्यांच्यावर संस्कार होतील आणि त्यांना शाळेनंतर व्यक्तिमत्त्व विकासासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी देखील करता येतील. अभ्यास, आहारविहार, गाणं, चित्रकला, खेळ असं सगळं एकाच ठिकाणी होईल. अशी अनेक पाळणाघरं आज उपलब्ध आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याची सुविधाही अशा काही पाळणाघरांमध्ये दिली जाते. अशा पाळणाघरांची फी बर्यापैकी जास्त असते. पण पालकांची पैसे मोजण्याची तयारी असल्याचं दिसून येतं. काही पाळणाघरांमध्ये तासावर मुलांना सांभाळण्याचीही सोय असते. त्यामुळे ज्या पालकांचे कामाचे तास इतरांपेक्षा वेगळे आहेत, अशांना त्याचा फायदा होतो. द लर्निंग कर्व्ह, सनशाईन, न्यू होरायझन, क्ले, पोदार इत्यादी काही डे केअर सेंटर्स आज अशा पद्धतीने काम करताना दिसतात. एकूणच पाळणाघर संस्कृतीचा फायदा असा की, घरात एकेकट्या वाढणार्या मुलांवर तिथे अनौपचारिकरित्या संस्कार होतात. म्हणजे इतर मुलांशी होणारा संवाद, देवाण घेवाण, एकत्र बसून डबा खाणं, तो शेअर करणं, एकत्र खेळणं, एकत्र एखादी ऍक्टिव्हिटी करणं. याचा त्यांच्या मनावर अतिशय सकारात्मक परिणाम होत असतो. एकत्र राहण्याची सवय, सहअस्तित्वाची सवय लागते, एकमेकांना समजून घेण्याची सवय लागते. त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या विकासात ही व्यवस्था मोलाची भर घालू शकते.
पाळणाघर म्हणजे एका स्त्रीची, एका कुटुंबाची गरज दुसर्या स्त्रीच्या, कुटुंबाच्या अर्थार्जनाचं साधन. कुटुंब प्रबोधनाच्या दृष्टीकोनातून, मुलाच्या एकूण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने, ते समाजाभिमुख होण्याच्या दृष्टीने विचार केला तर रूजलेली पाळणाघर संस्कृती, घराबाहेरचं एक आश्वस्त जग हे काळानुसार समाजात झालेलं परिवर्तन अत्यंत स्वागतार्ह आहे. मुलांना मित्र मिळतात. आईबाबा मुलांच्या सुरक्षेबाबत निर्धास्त होतात. मुलं स्क्रीनपासून बराच काळ दूर राहतात हे सर्वात महत्त्वाचं. हल्ली एकेकटं मूल असतं. पाळणाघरांमुळे एकलकोंडे होण्यापासून दूर राहतात. अशा वेळेस समाजात मिळूनमिसळून राहण्याचा संस्कार घडतो. अर्थात पाळणाघरात काम करण्याच्या, पाळणाघर चालवण्याच्या बाबतीत प्रशिक्षणाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध होणं, त्याच्या सुरक्षिततेबाबत नियमांची निश्चिती होणं, त्यांची पाळणूक होणं, पालकांनी पाळणाघर निवडताना पैशांबरोबरीनेच सुरक्षा, संस्कार या सगळ्यांबाबत सजग असणं, त्याबाबत समाजजागृती होणं हे सारं अत्यंत गरजेचं आहे.
मूल हे केवळ त्या कुटुंबाचं नसतं तर ते समाजाचं असतं. त्यामुळे आपल्या आजूबाजूला असणार्या पाळणाघरातील व्यवस्थेबाबत समाजघटक म्हणून आपणही सजग असणं तितकंच आवश्यक आहे.
आज महिना तीन हजार ते थेट दरमहा तीस ते चाळीस हजार या विविध शुल्कात वेगवेगळ्या प्रकारच्या पाळणाघरांचे प्रकार पालकांसाठी उपलब्ध आहेत. पण, परवडणार्या दरात सेवा देणार्या संस्थात्मक पाळणाघरांची समाजाला जास्त गरज असल्याचं या लेखाच्या प्रक्रियेदरम्यान लक्षात आलं. अनेकदा कुटुंबातील दोघांनाही अपरिहार्यता म्हणून नोकरी करावी लागते. मुलासाठी नोकरी सोडण्याइतकी परिस्थिती चांगली नसते. पण काही वेळेस पाळणाघर परवडत नाही म्हणून आपल्या कमी पगारावरील नोकरीवर स्त्रिया पाणी सोडतात. अशा वेळेस परवडणारी पण संगोपनासह संस्कार करणारी पाळणाघरं हा आधार ठरतो. ‘इट टेक्स अ व्हिलेज टू रेझ अ किड’ असं म्हटलं जातं. पालक, आजीआजोबा, नातेवाईकांप्रमाणेच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणार्या व्यवस्थांपैकी पाळणाघर ही एक महत्त्वाची व्यवस्था आहे. लाखात एखाद्या घडलेल्या प्रकरणामुळे ती डागाळू नये. उलट ती अधिकाधिक सक्षम होत जावी. ही व्यवस्था म्हणजे वात्सल्याचा घेतलेला वसा आहे. तो समाजाभिमुख, अधिक संस्काराभिमुख होत जावा हीच समाजाची खरी गरज आहे.