एका तपस्वी साधकाचे निर्वाण...

विवेक मराठी    10-Dec-2025   
Total Views |
 
Yashwantrao Lele
 
यशवंतराव लेले यांच्यासारखे तपस्वी हे कधीच निवृत्त होत नसतात. कधीच अंतर्धान पावत नसतात. ते आपली छाया सर्वांवर धरतात..ते सर्वांमध्ये सामावून जातात. आपल्या जगण्याचा ठसा अंतर्मनावर उमटवून जातात... त्यांची व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक राष्ट्रवादाची बैठक. यात जसा प्रबोधिनीचा संस्थात्मक, वैचारिक वाटा, संस्कार आहे, तसाच तो त्यांचा स्वतःच्या हिंदू राष्ट्रवादाच्या अभ्यासातूनही आलेला आहे. आता असे कार्यकर्ते दुर्मिळच.
 
एखाद्या तपस्वी साधकाच्या जाण्याने आपण पोरके झाल्याची भावना मनात दाटते. एक प्रकारचे अदृश्य मायेचे कवच दूर झाल्यासारखे वाटते. यशवंतराव लेले यांचे निर्वाण असेच...मनाला क्षणभर अंधारून आणणारे थरथरवणारे...दिशाहिन झाल्यासारखे वाटणारे....आयुष्याचा होम करून अस्ताला जाताना अनेक तारे तारकांच्या अंतर्ज्योतीला प्रज्ज्वलित करून त्यांनी अनेकांची केवळ व्यक्तिगत जीवनेच उजळवली असे नव्हे; तर सारा आसमंत बहरून सुगंधित होईल अशी ऊर्जा ते देऊन गेलेत...रात्रीच्या गर्भात उद्याच्या आश्वासक उज्वल भविष्याची बीजं पेरून अंतर्धान पावलेत.
 
आज दुर्मीळ होत चाललेली अलौकिक संशोधक वृत्ती यशवंतरावांमध्ये होती. आणि संशोधक असूनही माणसे जोडण्याची एक अद्भुत किमया त्यांना अवगत होती. हे गुण त्यांच्यात कुठून आले असावेत..? एक गोष्ट नक्कीच सांगता येईल, काही प्रमाणात ती माता पित्याकडून अनुवांशिक आली असणार. त्यात त्यांनी जिद्दीने भर घातली. यात शिक्षणाबरोबरच संघ शाखेचा खोलवर झालेला संस्कार. समाजाविषयी आत्यंतिक जिव्हाळा. हा जिव्हाळा नुसता शब्दात कोरडा न राहता, प्रत्यक्ष कृतीतून तो प्रवाहित झाला. या जिव्हाळ्याला स्थळ, काळ किंवा भाषा-प्रांत याची सीमा त्यांनी घालून घेतली नाही. यामुळे त्यांचा संपर्क, परिवार हा खूप मोठा होता. त्यांचे यातले अनेक संबंध मी जवळून अनुभवले आहेत. या सर्व व्यवहाराची बैठक अगदी पक्की होती. ती राष्ट्रवादाची होती.
 
व्यापक सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक राष्ट्रवादाची बैठक. यात जसा प्रबोधिनीचा संस्थात्मक, वैचारिक वाटा, संस्कार आहे, तसाच तो त्यांचा स्वतःच्या हिंदू राष्ट्रवादाच्या अभ्यासातूनही आलेला आहे. संस्कृत, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांचे उत्तम वैचारिक ज्ञान, प्रचंड वाचन, निरंतर अभ्यासू वृत्ती, बोलणं अत्यंत हळुवार संथ ...रिमझिम ...पावसासारखं खोल झिरपत जाणार. वागणं विनयशील...आदराचं. कपडे स्वच्छ. धोतर वर अंगरखा डोक्यावर टोपी फिक्कट रंगाची. बोडक्याने हिंडायच्या काळात टोपीला भूषण मानून प्रबोधिनीने तिला सर्वोच्च स्थान दिलं. यशवंतरावांसारखे वडीलधारे सहज; घरासारखे वावरणारे, ज्येष्ठ असूनही सतत कार्यरत असणारे. स्वकार्याला वाहून घेतलेले कार्यकर्ते. एकत्र कुटुंबासारखे राहिल्यामुळे आपोआपच सदा अनुकरणीय झाले.
 
यशवंतरावांशी माझा प्रथम संबंध केव्हा आला ते नेमकं आता आठवत नाहीय. पण स्व.डॉ.स. ह. देशपांडे यांच्या हिंदू राष्ट्रवादाच्या संदर्भात एका ग्रंथाचे काम सुरू होते. माणूस साप्ताहिक, ग्रामायण यांचं मी काम करू लागलो होतो. टेक्सास गायकवाड आणि दलित रंगभूमी, बुकोई या संस्थातही माझे जाणे येणे होते. संघ आणि दलित यांच्या संबंधांवर स. ह. देशपांडे खूप उत्सुक होऊन अनेक दिवस कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, मुलाखती घेत होते. या भेटीगाठीत यशवंतरावही बरोबर असत. ते त्यावेळी बोलत नसत. पण प्रबोधिनीत आल्यावर चर्चेत सहभागी होत असत.
 
याच काळात मी निमगाव म्हाळुंगी येथे वतनी जमिनीवर, बौद्ध समाजात काम करीत होतो. दोन-तीन वेळा ते त्या ठिकाणी आले. एकदा तर सायंकाळी त्यांनी बुद्धवंदना सांगितली..!
 
मला त्याचं खूप आश्चर्य वाटलं. नंतरच्या भेटीत त्यांनी मला वंदना आणि त्याचे प्राचीन संदर्भ दिले. धम्मपदाची ओळख त्यांनीच प्रथम करून दिली. माझ्या धम्माच्या अभ्यासाला यशवंतरावांचे हे सर्व संदर्भ उपयोगी पडले. हिंदू आणि बौद्ध यांच्यातील साम्य दर्शविणारे अनेक संदर्भ त्यांनी मला दिले.
 
याच काळात ‘ख्रिस्ती महार’चे लेखक बाळासाहेब गायकवाड हे माझ्याकडे रहायला आले. त्यांच्याही समस्या यशवंतरावांनी सोडवल्या. विशेषतः आर्थिक. त्यांना हिंदू व्हायचं होतं. त्यासाठी यशवंतरावांनी पौरोहित्य केलं. त्यासाठी त्यांनी सर्व तयारी केली. सुरुवातीला मराठीत सर्व विधी केले. प्रबोधिनीच्या पद्धतीने पण ते बाळासाहेबांना पसंत नाही पडले. आम्हाला दलित म्हणून संस्कृतचा अधिकार नाही, असे म्हटल्यावर यशवंतरावांनी पुन्हा सर्व विधी संस्कृत मधून केले. यशवंतराव मला म्हणाले,‘हे काही काळ आपल्याला सहन करावं लागेल.’ यशवंतरावांनी अनेक ऋषि मुनींचे जन्माचे संदर्भ मला काढून दिले.
 
माझ्या भटकंतीच्या प्रवासात दर आठवड्याला प्रबोधिनीत एक चक्कर नियमित होऊ लागली स. ह. देशपांडे त्यावेळी सुभाष नगरमध्ये राहत होते. अनेक बैठकीतून यशवंतरावांची भेट होऊ लागली. डॉ.अरविंद लेले, ब्रि.बाळ, एकता मासिकाचे संपादक कानिटकर, असे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते या बैठकीला येत. चर्चा करीत असत. सय्यदभाई पण असत. मुस्लिम सत्यशोधक समाज यांच्यावर राष्ट्रवादाच्या चौकटीत चर्चा होई. यशवंतरावांच्या बरोबर मी अनेकदा सैय्यद भाईंना भेटायला भारत पेन्सिलच्या कारखान्यावर गेलो.
 
मुस्लिम सत्यशोधक समाज या संस्थेला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी स्व.दामुअण्णा दाते यांच्याकडे यशवंतराव आणि स.ह. देशपांडे असे मिळून गेलो होतो. त्या मागची त्यांची तळमळ जाणवत असे. तुटलेले लोक... विखुरलेला समाज... दुभंगलेली मने... सांधण्यासाठी यशवंतरावांची धडपड असे. डॉ. भीमराव गस्ती हे तर त्यांचे दुसरे प्राणच जणू...!
 
भीमरावांचे बेरड हे आत्मकथन वाचून यशवंतराव भीमरावांच्या कार्यात खेचले गेले. भीमरावांचे कार्य तसे पुण्यापासून दूर कर्नाटकात, पण यशवंतराव बसचा प्रवास करून जायचे. वाड्यावस्त्यांवर हिंडायचे. देवदासींच्या व्यथा वेदना ऐकून अस्वस्थ व्हायचे. यातूनच उत्थानचे कार्य सुरू झाले. संस्था नोंदणीकृत करण्याची सारी धडपड यशवंतरावानी केली. अखेरपर्यंत यशवंतराव त्यांच्यामागे उभे राहिले. एका गंभीर प्रसंगात एका मुलीचा शोध घ्यायला भीमरावांच्या बरोबर यशवंतराव मला घेऊन दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर परिसरातील लालबत्ती भागातील चाळीचाळीतून हिंडले. त्यावेळी त्या भागात काम करणार्‍या विजयाताई लवाटे यांना त्यांनी बरोबर घेतले. आणि मुलीला अखेर शोधून काढले त्यावेळी पैसे देऊन त्या मुलीची सुटका केली होती. पहिले पंधरा हजार यशवंतरावांनी घातले, विजयाताईंचे बंधू पु. ग. वैद्य, आणि दामुअण्णा दाते अशांनी मिळून एक लक्ष रुपये भरून ती मुलगी सोडवून आणली होती. आजही ते आठवले की अंगावर शहारा उभा राहतो. यशवंतराव आजारी पडले तर भीमराव लहान मुलांसारखे रडले होते.‘परमेश्वर इतका क्रूर कसा हो ..?..माझं आयुष्य त्यानं यशवंतरावाना द्यावं...’ असं कळवळून भीमराव म्हणाले होते. भीमरावांच्या घरच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी प्रबोधिनी..यशवंतराव त्यांच्या मागे उभे राहिले.
 
यशवंतरावांच्यात हे एवढं बळ कुठून आलं असावं...? ही सहजतेने माणसं जोडण्याची किमया..! कार्यकर्त्यांच्या मागे त्याच्या गुणदोषासहित स्वीकारून खंबीरपणे उभं राहून त्याला सतत मदत करीत राहणं...हे कसं जमलं असेल...?! आईच्या मायेने..वात्सल्यपूर्ण हृदयाने सतत काम करीत राहणे किती अवघड...! मला आठवतंय...यमगरवाडीतल्या अडचणींनी मी निराश झालो होतो. प्रवासातून मोतीबागेत पहाटेच आलो होतो. आबा अभ्यंकर यांनी सहज विचारलं,‘काय म्हणतेय यमगरवाडी...?’ मी वैतागून काहीतरी उत्तर दिलं आणि जाऊ लागलो. तर त्यांनी मला धरलं आणि स्कूटरवरुन श्रेयसवर नेलं तिथं आप्पासाहेब वज्रम, चं .प . भिशीकर, किशाभाऊ पटवर्धन, बापुराव जोशी, रायाकाका पटवर्धन, राजाभाऊ चितळे आणि यशवंतराव लेले असे जमलेले.
 
कॉफीपान झाल्यावर मला सर्वांनी यमगरवाडीची गोष्ट सांगायला लावली... माझ्या स्वभावधर्माप्रमाणे मी आडपडदा न ठेवता सर्व सांगितलं आणि प्रत्येकाने काही रक्कम घालून मोठी देणगी यमगरवाडीला दिली. यशवंतरावांनी मला दुपारी याल का विचारले. दुपारी प्रबोधिनीत गेलो. तिथे सुभाषराव, विवेक कुलकर्णी, डॉ. गिरीश बापट असे अनेकजण जमले होते. मला यशवंतरावांनी सर्वांचा परिचय करून दिला आणि सकाळचा प्रसंग सांगितला. आपण काय काय करू शकतो, हेही सुचवलं. कसं निवेदन करावं याचा सुरेख वस्तुपाठच होता तो! नकारात्मकता टाळून नेमक्या शब्दात अडचण कशी मांडावी हे मी अनुभवलं. यमगरवाडीच्या शैक्षणिक अडचणींपासून आर्थिक विषयापर्यंत सर्व बाबतीत सहकार्य सुरू झालं. अनेक कार्यकर्ते जोडले गेले. शुभांगी तांबट याच प्रयत्नांचे फळ होय. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे जावई डॉ. पवार यांना सहकुटुंब घेऊन आले. डॉ. शंकरराव खरात यांना घेऊन आले. स्वतःचे काम सांभाळत त्यांनी अशी अनेक माणसे जोडली.
 
यात संस्थात्मक अभिनिवेशाचा लवलेश जाणवत नसे. प्रबोधिनीची अशी एक वैचारिक मांडणी आहे. त्या मांडणीला पूरक असे वागणे बोलणे राहणे हे पहिल्या पिढीने करून दाखवले. जगून दाखवले. आज त्यातून परंपरा निर्माण झालीय. अनेक क्षेत्रात अनेक जण प्रबोधिनीतून तयार झालेले आज कार्यरत आहेत. अडचणींवर मात करून मार्ग काढताना दिसतात. यशवंतरावांसारखे तपस्वी हे कधीच निवृत्त होत नसतात. कधीच अंतर्धान पावत नसतात. ते आपली छाया सर्वांवर धरतात..ते सर्वांमध्ये सामावून जातात. आपल्या जगण्याचा ठसा अंतर्मनावर उमटवून जातात...