मोदीद्वेषाकडून भारतद्वेषाकडे

विवेक मराठी    18-Dec-2025   
Total Views |
पृथ्वीबाबांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी केली जात असतानाही, मला संविधानाने प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे म्हणून त्यांनी धुडकावून लावलेली आहे. त्यांच्या बरळण्यामुळे काँग्रेसचीच पुरती कलंकशोभा होऊन हा पक्ष आपली उरलीसुरली पत घालवून बसेल की काय हा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे. मोदीविरोधातून राष्ट्रविरोधाकडे वाटचाल करणार्‍या आताच्या काँग्रेसींसाठी कोणता समानार्थी शब्द योजावा हे जनताच ठरवेल.
 
Prithviraj Chavan
 
कोणे एके काळी देशभक्त आणि काँग्रेसी हे समानार्थी शब्द होते. पण तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अशी पार्टी नसून ती एक चळवळ होती आणि या चळवळीचे नेते होते पितामह दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक यासारखी मंडळी. आता काँग्रेसनामक पार्टीचे नेतृत्त्व करतात सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि बाबा पृथ्वीराज चव्हाण - खरे म्हणजे त्यांच्या वर्तनाने या पवित्र नावाचीही एका अर्थाने अवमाननाच झाली आहे - अशी मंडळी. ही मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अगदी पाण्यात पाहतात. मोदी तेरी कबर खुदेगी, अशी घोषणा दिल्लीत काँग्रेसकडून करण्यात आली होती. काँग्रेसच्या केंद्रसत्तेला ज्याने सुरुंग लावलेला आहे अशा माणसाबाबत त्यांना अप्रियता असणे स्वाभाविक आहे. पण मोदीद्वेषाने आंधळे होऊन जेव्हा हे लोक बेताल आणि बेलगाम बरळताना जी गरळ ओततात ती आपल्या भारतीय सैन्याचे यश आणि भारत देशाची धवलकीर्ती कलंकित करण्याचा केविलवाणा प्रयास असतो, हेच सर्व देशाच्या नजरेत भरत चाललेले आहे. काय बरळले ते पृथ्वीबाबा? त्यांनी नुकतीच ‘ऑपरेशन सिंदूर’वर पुन्हा एकदा आगपाखड केली. आपण जाणतोच की, काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या 26 हिंदू पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी दि. 7-10 मे दरम्यान भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आणि पाकिस्तानची हवाई संरक्षणसिद्धता नष्ट केली. दि. 6 मेच्या मध्यरात्रीनंतर केलेल्या हवाईहल्ल्यांत अवघ्या 25 मिनिटांत पाकिस्तानमध्ये असलेले 11 दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात आले. त्यात असंख्य दहशतवादी मारले गेले. ‘ब्रह्मोस’सारख्या अमोघ क्षेपणास्त्राचा आणि शक्तिशाली तोफखान्याचा वापर करून भारताने पाकिस्तानला नामोहरम केले आणि केवळ तीन दिवसांतच पाकिस्तान शस्त्रसंधीची भीक मागत भारताकडे आला. हा सारा घटनाक्रम आणि त्याचा तपशील आता जगाने स्वीकारला आहे. इतका देदिप्यमान विजय जगातील कोणत्याच लष्कराने वा सशस्त्र दलाने आजवर संपादन केलेला नाही. या युद्धातील भारताच्या पराक्रमावर दोन चांगले शब्दही बोलण्यास काँग्रेसचे कुटील नेते तयार नाहीत.
पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत अनेक धक्कादायक विधाने केली. त्यांच्या मते, ‘ऑपरेशन सिंदूर’ ज्या दिवशी सुरू झाले, त्या पहिल्याच दिवशी भारताचा संपूर्ण पराभव झाला!‘ हे त्यांचेच शब्द आहेत. भारताची अनेक लढाऊ विमाने पाकिस्तानने पाडल्याने भारताला त्या दिवशी एकही लढाऊ विमान उडविता आले नाही. पृथ्वीबाबा सांगतात, हे सारे युद्ध केवळ क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांच्या मदतीने केले गेले. त्यात सैन्यदलाचा काहीच सहभाग नव्हता. या स्थितीत भारत 12 लाखांचे खडे सैन्य का बाळगतो आहे? कारण, यापुढील काळातही लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रे यांच्याद्वारेच युद्धे खेळली जातील.
बरळण्याच्या ओघात थेट देशाचा पंतप्रधान लवकरच बदलणार असल्याचे त्यांनी म्हटले आणि 19 डिसेंबर तारीखही सांगितल्याने लोकही चक्रावून गेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत ते अजूनही संबंध टिकवून आहेत. त्यामुळे आपले वक्तव्य लोकांना गंभीर वाटण्याची शक्यता आहे, असा बहुदा त्यांचा गैरसमज असावा. पण आपले पाय गल्लीत ठेवून दिल्लीतील खबरबात जाणण्यात उस्ताद असलेल्या पृथ्वीबाबांना हे कळलेले नाही का? राष्ट्रीय तपास यंत्रणेने -एनआयएने- केवळ आठ महिन्यांच्या विक्रमी वेळेत अपरिमित परिश्रम घेऊन 1597 पानी सविस्तर आरोपपत्र दाखल करून आपल्या संस्थात्मक कार्यक्षमतेचाच नव्हे तर अशा राष्ट्रविरोधात घडलेल्या गुन्ह्याचा सोक्षमोक्ष लावण्याची त्यांना जी तातडी वाटत आहे तिचाही परिचय घडविला आहे. पण राष्ट्रीय संस्थांचा गौरव करण्याचीच ज्यांना अ‍ॅलर्जी झालेली आहे ती पाकिस्तानी वाहिन्यांना हर्षवायू होईल अशा गतीने चालविल्या जाणार्‍या बातम्यांचीच पुडी सोडण्यात धन्यता मानणार ना. कोणी विदेशी एजंटही धजावणार नाही अशा प्रकारे पृथ्वीबाबांनी पाकिस्तानची तळी उचलून धरलेली आहे. सीमेपलीकडील दहशतवादाच्या विरोधात चाललेल्या दीर्घ लढ्यातील एवढ्या महत्त्वपूर्ण टप्प्याची काँग्रेसने पूर्ण उपेक्षा केली आहे. पाकिस्तानी मोहरा साजिद जाट याच्याच बरोबरीने लष्कर ए तय्यबाचा आणि द रेझिस्टन्स फ्रंटचाही या आरोपपत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे. मग आपण याचे कर्ताकरविता नाही असे पाकिस्तान आपले हात कसे झटकू शकतो? कारण ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सुरक्षा बलाने ज्या तीन पाकिस्तानी अतिरेक्यांना जहन्नुममध्ये धाडले होते त्यांचीही औपचारिकरित्या ओळख पटविण्यात यश आलेले आहे. या आरोपपत्रामुळे सर्व किंतुपरंतुंना विराम मिळालेला आहे. एवढेच नव्हे तर या आरोपपत्रात दोन स्थानिकांचाही समावेश करण्यात आलेला आहे ज्यांनी हे हत्याकांड घडविणार्‍या दहशतवाद्यांना मदत पुरविली होती. याचा स्पष्टपणे असा अर्थ होतो की, जे दहशतवाद्यांच्या हातातील प्यादी बनण्यास पुढे सरसावणार त्यांच्या शवपेटीवर या देशातील कायदा शेवटचा खिळा ठोकायला मागेपुढे पाहाणार नाही. राष्ट्रीय सुरक्षेशी कोणत्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही, असाच संदेश या आरोपपत्राने दिलेला आहे.
पुढच्या काळात पाकिस्तानचे आपला यात हात नसल्याचे केलेले फसवे दावे अवश्य कोलमडून पडणार आहेत. या आरोपपत्रावर सुनावणी झाल्यानंतर पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तोंड काळे झाल्यावाचून राहणार नाही, हे निश्चित. पृथ्वीबाबांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागावी अशी मागणी केली जात असतानाही, मला संविधानाने प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असे म्हणून त्यांनी धुडकावून लावलेली आहे. त्यांच्या बरळण्यामुळे काँग्रेसचीच पुरती कलंकशोभा होऊन हा पक्ष आपली उरलीसुरली पत घालवून बसेल की काय हा गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे. मोदीविरोधातून राष्ट्रविरोधाकडे वाटचाल करणार्‍या आताच्या काँग्रेसींसाठी कोणता समानार्थी शब्द योजावा हे जनताच ठरवेल.