भाषांमधल्या भगिनीभावाचा अंतःप्रवाह उलगडून दाखवणारे
नवे सदर...
जसजशा निवडणुका जवळ येतात तसतसे काही शहरांत, राज्यांत भाषाप्रेमाचे राजकारण सुरू होते. बरेचदा ते राजकारण विशिष्ट भाषेच्या प्रेमापेक्षा विशिष्ट भाषेच्या द्वेषाचे रूपच घेऊन येते. निवडणुकांची हार-जीत काय ती होऊन जाते. राजकीय पक्ष, राजकारणी मंडळी यांच्यातील वितुष्ट देखील हळूहळू निवळत जाते. पण निवडणुकीच्या काळात मुक्तहस्ते-मुक्तकंठे उधळलेली विशिष्ट भाषाद्वेषाची बीजे मात्र तशीच राहतात आणि कधीतरी रुजून वर येतात.
खरे तर सर्व भारतीय भाषांत वरवर दिसणार्या वेगळेपणाच्या खोलवर आत एक एकात्मतेचा प्रवाह वाहत असतो. थोडे जाणीवपूर्वक बघितल्याशिवाय तो चटकन लक्षात येत नाही. अपरिचित लिपी असेल तर तो फरक अगदी अधोरेखितच होतो. पण अनेक भारतीय भाषा शांतपणे ऐकल्या तर हळूहळू काही शब्द आपल्या परिचयाचे वाटतात. सामाजिक कामाच्या निमित्ताने देशात अनेक ठिकाणी फिरताना, प्रवासात लोकांचे संभाषण ऐकताना हा अनुभव अनेकदा आला. आणखी एका निमित्ताने विविध भाषाभगिनींच्या मधली समानता, नव्हे एकत्व, अगदी सहजपणे अनुभवता येते. ते म्हणजे भारतीय भाषांतील म्हणींचा आणि वाक्प्रचारांचा भव्य खजिना.
माझ्या वडिलांचे स्नेही कै. विश्वनाथ नरवणे यांनी प्रदीर्घ परिश्रमाने ‘भारतीय कहावत संग्रह’ या नावाने अनेक भारतीय भाषांतल्या म्हणींचा संग्रह सिद्ध केला. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले विश्वनाथ नरवणे स्वातंत्र्यसैनिक होते. म्हणींच्या माध्यमातून विविध भाषांतील हा एकात्मतेचा धागा शोधणे आणि त्याचा संग्रह करणे हे त्यांच्या आयुष्याचे ‘मिशन’ झाले होते. त्यांनी केलेल्या या अचाट आणि अफाट कामामुळे आपल्याला विविध भाषांतील एकत्वाच्या धाग्याचा प्रत्यय म्हणींच्या माध्यमातून घेता येऊ शकतो.
वेगवेगळ्या भाषांमधला भगिनीभाव दाखवणार्या म्हणी तुम्हालाही ठाऊक असतील तर अर्थासह नक्की कळवा. आपल्या लेखमालेत त्यांचा जरूर अंतर्भाव करू.
संपर्क - साप्ताहिक विवेक (फक्त SMS / व्हॉटसपसाठी) 9594962304
काखेत कळसा गावाला वळसा ही म्हण सर्वांना परिचित आहे. वस्तू अगदी जवळ असते पण आपण मात्र शोधण्यात घरभर फिरतो हा अनुभव आपण अनेकदा घेतला असेल. गम्मत म्हणजे हा अनुभव सर्वांनाच आला असल्यामुळे विविध भारतीय भाषांत हाच आशय सांगणार्या म्हणी जवळपास सर्व भाषांत आहेत. हिंदीत बगल में लडका, गाव में ढंढोरा अशी म्हण आहे. ढंढोरा शहर में, लडका बगल में असे त्याचे पाठभेद उर्दू, सिंधी, पंजाबी, काश्मीरी, गुजराती, बंगाली, तेलुगु, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषांत प्रचलित आहेत. मराठीमध्ये याच आशयाच्या पण तितक्याश्या लोकप्रिय नसलेल्या अजूनही दोन म्हणी आहेत - अंगात चोळी आणि गावाला आरोळी किंवा गळ्यात गरसोळी आणि गावात बोंब. गरसोळी म्हणजे गळ्यातील चंद्रहार वा तत्सम दागिना.
शब्द किंवा प्रतिमा वेगळ्या वापरून हाच आशय सांगणार्या म्हणी देखील विविध भाषांत आहेत. उदा: कडेवरच्या मुलाच्या जागी मेंढी किंवा कोकरू हा शब्द घालून हाच आशय तमिळ, तेलुगु, कन्नड या भाषांत आहेत. ‘खांद्यावर कुर्हाड आणि वनात शोध’ असे बंगालीत, ‘घरात चोर आणि गावात बोंब’ असे ओडियात किंवा ‘डोक्यावर पगडी घरभर शोध’ असे तेलुगूत, आणि ‘हातात दिवटी आणि आगीचा शोध’ असे तेलुगु व मल्याळम या दोनही भाषांत समान आशय व्यक्त करणार्या म्हणी आहेत.
भूगोलाच्या दृष्टीने विचार केला तर वायव्येकडील सिंधपासून पूर्वेला ओरिसापर्यंत आणि उतरेत काश्मीरपासून ते दक्षिणेत केरळपर्यंत एकच आशय आणि तोही तशाच समान पद्धतीने व्यक्त करणार्या म्हणी आहेत हे थक्क करणारे आहे. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे म्हणी या लोकोक्ती आहेत. आता देशात समानता आणूया असे ठरवून सरकारी किंवा विद्यापीठीय प्रयत्नाने केलेले ते ‘अकादमीय’ काम नाही. नेहमी अनुभवायला आलेला एखादा नित्य अनुभव लोकांनी कमीत कमी शब्दात, लोकांना सहज समजेल असा शब्दबद्ध केला. काही वेळा या म्हणी अशिष्ट भाषा वापरून देखील बोलल्या जातात. त्यांची दखल अर्थातच इथे घेतलेली नाही. पण गम्मत म्हणजे अशिष्ट शब्दात अशा म्हणी मांडण्याची सवय देखील अशीच ‘अखिल भारतीय साधर्म्य’ असलेली आहे.