पराभूतांचा ‘प्रिती’संगम?

विवेक मराठी    06-Dec-2025   
Total Views |
आवळ्याभोपळ्याची मोट बांधण्याचा चमत्कार घडून आला होता व वेगवेगळ्या विचारधारांच्या मंडळींना एका मंचावर आणण्यात ज्यांनी यश संपादन केले होते त्याच राष्ट्रवादी विचारधारेची मंडळी सध्या बहुतेक राज्यांत आणि केंद्रातही सत्तेत आहेत. तेव्हा ही मंडळी कौरव कौन पांडव कौन? असा वेगळाच तेढा सवाल पैदा करण्यात गुंतली आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते.
 
politics
 
केंद्रातील दिवसेंदिवस बलवान होणारे भाजपा पर्यायाने एनडीए आघाडीचे सरकार ज्यांच्या डोळ्यांत सलत आहेत ते आधी बिहारच्या निवडणूक निकालांकडे आशा लावून बसले होते. प्रदीर्घ काळ एकच राजवट राहिली तर तिच्या विरोधात आपोआपच एक जनरोष तयार होतो आणि त्यामुळे ती सत्ता उलथून पडते असे एक गृहितक आहे. मात्र सत्तेऐवजी हे गृहितकच कोलमडले आणि बिहार राज्यात झालेल्या निवडणुकीनंतर विरोधकांचे इमले आणि मनोरथ भुईसपाट झाले तर केंद्र सरकार अधिकच भरभक्कम झाले. आता विरोधकांनी अजून टप्प्यात नसलेल्या 2029 च्या निवडणुकांची धास्ती घेतलेली आहे. रालोआ आघाडीला अपशकुन करण्यास सज्ज झालेल्या वाचावीरांना विरोधकांचा बुडत्याचा पाय खोलात अशीच वाटचाल राहील की काय अशी चिंता वाटू लागली आणि केंद्रात भाजपाचे बळकट सरकार आले तर मग देशांतर्गत लोकशाहीचे काय होईल असा कीडा त्यांचे मानस पोखरू लागला आहे. त्यातून अशा स्वयंघोषित विचारवंतांनी व वाचावीरांनी इंडिया आघाडी आणि पराभूत परंपरा चालविणार्‍या विरोधकांना अनाहूत सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.
या वाचावीरांना असे वाटते की, एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी सरळसरळ लढत झाली तर मग एनडीएचा धुरळा उडाल्याशिवाय राहणार नाही. जसा धुरळा 1977 साली देशावर आणीबाणी लादण्याचे कुकर्म करणार्‍या इंदिरा गांधी यांचा उडाला होता. तसाच प्रयोग आताच्या एनडीए सरकारच्या विरोधात झाला पाहिजे असे यातील बहुतेकांचे मनोरथ आहे. यातील विनोद म्हणजे ज्यांच्या पुढारीपणाखाली हे सर्व आता व्हावे असे वाटत आहे त्याच काँग्रेसने उभा देश तुरुंग करून लोकशाहीच्या गळ्याला नख लावण्याचा प्रयास केला होता. त्यावेळेस ज्यांच्या निरलस प्रयासामुळे आवळ्याभोपळ्याची मोट बांधण्याचा चमत्कार घडून आला होता व वेगवेगळ्या विचारधारांच्या मंडळींना एका मंचावर आणण्यात ज्यांनी यश संपादन केले होते त्याच राष्ट्रवादी विचारधारेची मंडळी सध्या बहुतेक राज्यांत आणि केंद्रातही सत्तेत आहेत. तेव्हा ही मंडळी कौरव कौन पांडव कौन? असा वेगळाच तेढा सवाल पैदा करण्यात गुंतली आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते.
केंद्रात एवढ्या दीर्घ कालांतराने देशाची मान जगभरात उंचावणारी राष्ट्रवादी विचारांची मंडळी नेतृत्व करण्यास लाभली आहे व देशातील महासत्तांच्या नजरेला नजर भिडवून देशहित सर्वोपरि मानत देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी कष्ट उपसत आहेत, तेव्हा या लोकांना देशातील लोकशाही ही मंडळी धोक्यात आणणार असल्याचा साक्षात्कार होतो यासारखा करंटेपणा नाही. बरे, ज्या सर्वच आघाड्यांवर पराभूत झालेल्या मंडळींचा असा प्रितीसंगम घडून यावा अशी वेडी आशा हे वाचावीर बाळगत आहेत, त्यांची तशी लक्षणे आहेत का? हा हितोपदेश ते मानणार आहेत का? हाच मोठा बिकट सवाल आहे. इंडिया आघाडीला ते सांगत आहेत की, नुसते वरकड प्रेम दाखवून काही घडून येणार नाही आणि प्रत्यक्षात अनेक मुद्द्यांवरून आपापसात मतभेद असून भागणार नाही. तसेच वोटचोरी व ईव्हीइम मशीनशी छेडछाड असे अरण्यरुदन पाहूनही आता मतदार भाळणार नाहीत, हे बिहारच्या निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहेत. अजूनही सार्वत्रिक निवडणुकांना तीन वर्षांहून अधिक काळ अवकाश आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येउन निवडणूक लढण्यासंदर्भात रणनीती बनवावी व राज्यांतच नव्हे तर केंद्रातही सत्ता प्राप्त करावी. ज्यांच्या गळ्यात नेतृत्वाची माळ टाकायची आहे त्याच काँग्रेसला राष्ट्रीय पक्षाचा तोरा टिकविणे अवघड झालेले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरयाणा आणि छत्तीसगड वगळता या राष्ट्रीय पक्षाला भिंग घेउनच शोधावे लागेल. पण हे वास्तव काँग्रेसच्या लक्षात आलेले दिसत नाही, असे या वाचावीरांचेच मत आहे. प्रादेशिक पक्षदेखील आपली अस्मिता गडद करण्यातच धन्यता मानत असल्यामुळे ते काँग्रेसला बळ लाभेल अशी भूमिका घेण्यास कचरत आहेत. तसेच काही पक्ष अगदी कुंपणावर बसण्याची भूमिका बाळगतात तर एकला चलो रे असाही राग आळवतात. मग आंध्रामधील ती वायएसआर काँग्रेस असो की ओवेसीचा एआयएमआएम पक्ष असो, तसेच ओडिशातील बिजू जनता दल असो... यांची भूमिका विरोधकांच्या एकजुटीच्या दृष्टीने शंकास्पदच राहिलेली आहे. काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्याबरोबर शरद पवार काम करण्यास उत्सुक नाहीत, ममता बॅनर्जीदेखील उत्सुक नाहीत, जगन मोहन रेड्डीदेखील त्यांच्याकडे कानाडोळा करीत आहेत. मग हा प्रितीसंगम घडावा कसा?
या वाचावीरांच्या निरिक्षणातून सुटलेली गोष्ट म्हणजे परिकथेतील राक्षसाचा प्राण एखाद्या पोपटात असतो त्याप्रमाणे एखाद्या बलवान पक्षाचे मुख्य प्राणतत्त्व काय आहे ते जाणून घेणे. सध्या जे एनडीए सरकार देशाचा गाडा हाकत आहे त्या सरकाराचा कर्णधार असलेल्या भाजपाचे प्राणतत्त्व आहे राष्ट्रवाद आणि बावनकशी राष्ट्रवाद. आपल्या एक दशकाहून अधिकच्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात त्यांनी हा विश्वास आपल्या कामगिरीने सर्व देशबांधवांच्या मनात जागवला आहे. देशाची नौका आता सुरक्षित कर्णधाराच्या हाती आहे, ही बाब जनतेला सुखावत आहे. त्याचप्रमाणे जनतेची नाळ आपल्या मूळतत्त्वांशी कशी जुळली जाईल अशा प्रकारची ध्येयधोरणे हे सरकार राबवत आहे. विकास त्यांना राष्ट्रवादाला तिलांजली देउन घडवायचा नाही. ही गोष्ट अयोध्येतील राममंदिरावर झालेले ध्वजारोहण असो आशियातील सर्वांत भव्य राममूर्तीचे पंतप्रधानांच्या हातून झालेले अनावरण असो, अशा आपल्या स्व-बोध जागरणाच्या घटनांची कुचेष्टा करणे म्हणजे आपला पक्ष येथील जनतेच्या नजरेतून कसा उतरेल याचीच तजवीज करणे होय हे लक्षात घेतले पाहिजे. पण जर यांना पुन्हा बाबरी मशिदीचा पाया रचण्याची भाषा बोलणार्‍यांना सोबत घेउन जर सत्ता संपादन करायची असेल तर जनता त्यांच्यासोबत जाणे अशक्य समजले पाहिजे. सध्या देशात नवनवे विकासाचे कीर्तिमान स्थापित होत असताना नागरिकांच्या मनात भ्रम निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सदोष अहवाल असो की रुपया गडगडण्याची भाषा कंठशोष करून सांगणे असो. ही करामत पराभूत मानसिकतेच्या विरोधकांकडून पराक्रम घडवून आणू शकत नाही, हे निश्चित.