रवीदादा म्हणजे समरसता चळवळीतील आदर्श व्यक्तीमत्त्व. समरसता चळवळीसाठी आवश्यक कनवाळूपणा, निर्व्याजता, भावुकता हा रवीदादांचा स्थायीभाव होता. रवीदादांनी समरसता हे आपले जीवनमूल्य मानले होते. या मूल्यापासून ते कधीही ढळले नाहीत. ’समरसता‘ हा केवळ भाषण व व्याख्यानाचा नाही तर तो जगण्याचा विषय आहे याची पुरेपूर जाण असलेला हा माणूस समरसता शब्दशः आयुष्यभर जगला होता.
सामाजिक चळवळींमध्ये कार्य करत असताना, निर्मळ आणि संवेदनशील मन:स्थितीच्या कार्यकर्त्यांची वानवा हा कायमच चिंतेचा विषय राहिला आहे. नाशिकमधील विद्यार्थी परिषद आणि समरसता मंचाचे जुनेजाणते कार्यकर्ते रवी सहस्रबुद्धे यांचे नुकतेच निधन झाले आणि मनात ही चिंता अधिकच गडद झाली.
रवीदादा म्हणजे आमच्या पिढीच्या दृष्टीने समरसता चळवळीतील एक आदर्श. वर्षानुवर्षे सामाजिकदृष्ट्या उपेक्षिल्या गेलेल्या दलित समाजाच्या वेदना समजून घेत, किती हळुवार आणि सावधानतेने आपला व्यवहार करणे आवश्यक आहे, याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे रवीदादाचे संपूर्ण जीवन म्हणता येईल.
एकदा संभाजीनगरमध्ये विविध क्षेत्रांतील प्रमुख कार्यकर्त्यांचे एकत्रीकरण होते. निमित्त होते श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्यासोबत अनौपचारिक गप्पांचे... त्यावेळी चर्चा करताना समरसता किंवा एकूणच दलित बांधवांप्रती असलेला जिव्हाळा याबद्दल विषय निघाला. संघविचारांच्या विविध संघटनांमधील कार्यकर्त्यांच्या मनोभूमिकेचाही विचार झाला. त्यावेळी दत्तोपंत म्हणाले होते, ’आपण समरसता चळवळीत कार्य करणारे कार्यकर्ते आहोत. चळवळीत जे कार्यकर्ते कार्य करत आहेत त्यांची मनोभूमिका स्वच्छ, स्पष्ट आणि निर्भेळ आहे काय?‘ एकूणच सर्वांना अंतर्मुख करणारा हा त्यांचा सवाल होता. पण समरसता मंचाचा कार्यकर्ता म्हणून एक निर्मळ, निर्भेळ, निर्व्याज, निर्वैर, नि:स्पृह आणि शब्दशः ज्याला पारदर्शकतेचा परमोच्च बिंदू म्हणता येईल असे जीवन जगणारे रवीदादा या प्रश्नाचे आमच्यापुढील प्रत्यक्ष जिवंत उदाहरण होते.
मुळात असे कृत्रिम जीवन जगण्याची रवीदादांना कधी आवश्यकताच भासली नाही, कारण मनाची शुद्धता, निर्मळता ही त्यांना उपजतच लाभलेली देणगी होती. आपल्या अकृत्रिम स्नेहाने त्यांनी आयुष्यात अक्षरशः शेकडो घरांशी संबंध जोडले. लाभ-हानी, मान-अपमान याचा विचार न करता शेकडो कुटुंबीयांच्या सुखदुःखाशी ते समरस झाले.
अफाट जनसंपर्क हे रवीदादाचे खास वैशिष्ट्य. कुठलीही बाह्य आकर्षकता नसताना केवळ संघ-विद्यार्थी परिषदेने दिलेले संस्कार आणि निर्मळ मनाच्या बळावर त्यांनी अक्षरशः शेकडो घरे जोडली. त्यातील बहुतेक कुटुंबे ही अनुसूचित जातींमधील होती. त्यासाठी त्यांना ना कधी आडवे आले ते सिक्युरिटी प्रेसमधील त्यांचे अधिकारीपण आणि ना त्यांचे जन्मजात सहस्त्रबुद्धेपण! नाशिक रोड भागातील काही घरांमध्ये त्यांच्यासोबत जाण्याचा एकदा सहज योग आला होता. जवळपास प्रत्येक घरातील वृद्ध आईवडीलांच्या एका वेगळ्याच रोषाला त्यांना सामोरे जावे लागले होते. कारण काय तर त्यांचे खूप दिवसांनी या घरी जाणे झाले होते. ’अरे, जास्त शहाणा झालास का?‘, ’फार मोठा झालास का? आणि या म्हातार्या आई-बापाला विसरलास का?‘, असे म्हणत कित्येक घरातील आया हमसून रडत होत्या. त्यांना प्रेमाने जवळ घेत पाठीवरून हात फिरवित होत्या. निर्व्याज प्रेमाचे अद्भुत दर्शन घडविणारा हा प्रसंग होता.
काळाराम मंदिरप्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह ही नाशिकच्या इतिहासातील मोठी ऐतिहासिक घटना. तेव्हा हिंदू समाजाने समजूतदारपणा दाखवला असता तर देशाच्या, हिंदू समाजाच्याच हिताचे ते ठरले असते असे मानणार्यांपैकी रवीदादा होते. या सत्याग्रहात सहभाग घेतलेल्या अनेकांशी रवीदादांनी व्यक्तिगत संबंध निर्माण केले होते. 1989ला डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीचे निमित्त साधून त्यापैकी अनेक सत्याग्रहींचा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. एका अर्थाने नाशिकच्या दृष्टीने हीदेखील एक ऐतिहासिक घटना होती.
नाशिकमधल्या जवळपास सर्व ख्यातनाम व्यक्तींशी रवीदादाचा संपर्क होता. रवीदादाचे वागणे-बोलणे इतके निर्मळ होते की कित्येक जण संघाचे तथाकथित विरोधक असले तरी रवीदादांचा शब्द मोडणे त्यांच्या दृष्टीने अशक्यप्राय बाब होती. त्यातही दलित चळवळीतील जवळपास सर्व नेत्यांशी रवीदादाचे वैयक्तिक म्हणजे अगदी अरे-तुरेचे संबंध होते. दलित समाजातील अधिकारपदावर पोहोचलेल्या अनेक व्यक्तींशी त्यांचे उत्तम संबंध होते.
नाशिकला तरुण भारतमध्ये कार्यरत असताना, साधारण 1997 ला मुंबईमधील रमाबाई नगरात झालेल्या दंगलीत काही दलित बांधव मृत्युमुखी पडले होते. हिंदू समाजात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. पत्रकारिता क्षेत्रात असल्याने या प्रश्नाची धग मला चांगलीच जाणवत होती. या अस्वस्थतेतून मी रवीदादाला फोन केला. माझी अस्वस्थता त्यांच्या कानावर घातली. बराच वेळ झालेल्या चर्चेनंतर ज्यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही अशा दलित समाजातील मान्यवरांशी सहज संपर्क करून त्यांच्यासोबत गप्पा मारण्याचे ठरले. अर्थात यादी काढण्याची आवश्यकता नव्हतीच कारण रवीदादाच्या डोक्यात ही नावे होतीच. या सर्व व्यक्तींशी त्यांचा जिवंत संपर्क होता. जवळपास 12-15 व्यक्तींसोबत मी आणि रवीदादानी जाऊन सहज गप्पा मारल्या. अशा संवेदनशील विषयावरून आपल्याशी कुणी संवाद साधण्यासाठी आले आहे याचा आनंद त्या व्यक्तींना होताच पण आमचीदेखील अस्वस्थता कमी होण्यास मदत झाली होती. मात्र यानिमित्ताने रवीदादाचा अफाट संपर्क आणि या सर्व परिवारांमध्ये त्याचे असलेले स्थान लक्षात आले होते.
रवीदादाचे अफाट वाचन हाही असाच एक कौतुकाचा विषय होता. भेट झाली की ’सध्या काय वाचतोस?‘ हा त्याचा प्रश्न कायम ठरलेला. एकदा नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयात दत्तोपंत ठेंगडी यांच्या उपस्थितीत एक कार्यक्रम झाला होता. त्यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मु.शं.औरंगाबादकर यांनी ’नाशिक शहरातील सर्वांत जास्त पुस्तके वाचणारा सर्वांत मोठा वाचक‘ अशा शब्दात रवी सहस्त्रबुद्धे यांचा गौरव केला होता. अक्षरशः हजारोंच्या संख्येने त्यांनी विविध विषयांवरची पुस्तके नजरेखालून घातली होती. मात्र या वाचनाचा किंवा त्यातून निर्माण झालेल्या व्यासंगाचा उपयोग त्यांनी कधीही कुणाला नामोहरम किंवा निरुत्तर करण्यासाठी केला नाही.
समरसता चळवळीसाठी आवश्यक कनवाळूपणा, निर्व्याजता, भावुकता हा रवीदादाचा स्थायीभाव होता. फुले-आंबेडकर संदेश यात्रा आणि विश्व बौद्ध प्रदर्शनी यानिमित्ताने त्यांच्या या स्वभावाचा पूर्ण अनुभव मी घेतला. नाशिक, मनमाड, येवला, नाशिक रोड अशा प्रमुख चळवळीच्या ठिकाणी संदेश यात्रेचे कार्यक्रम संपन्न झाले होते. यात सहभागी झालेली बहुतांश मंडळी ही रवीदादाच्या संपर्कातून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिली होती. विश्व बौद्ध प्रदर्शनीला काही संघटनांकडून विरोध होऊन देखील दलित चळवळीतील अनेक कार्यकर्ते प्रदर्शनीच्या समारोपासाठी उपस्थित होते. अर्थात याचे श्रेय देखील रवीदादाचेच.
याच कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी आपल्या भाषणांमध्ये जी समतोल भूमिका मांडली ती ऐकून रवीदादा एवढे उत्साहित झाले की त्यांची अचानक चुळबूळ सुरू झाली. याप्रसंगी ’भारताचि या महारथा या‘ हे अगदी समयोचित गीत गायले गेले पाहिजे, असे त्यांच्या मनाने घेतले. त्यांनी गीतगायकाचा शोध सुरू केल्याने ही चुळबूळ असल्याचे लक्षात आले. अखेर त्यांनी संजय कुलकर्णीकडून हे गीत गाऊन घेतले व या कार्यक्रमाचा समारोप केला. गीत चालू असताना रवीदादाच्या चेहर्यावरील भाव अजूनही जशास तसे आठवतात.
रवीदादांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील निष्ठा ही अशीच अनन्यसाधारण होती. बाबासाहेब त्यांच्या दृष्टीने केवळ अभ्यासाचा वा चिंतनाचा विषय नव्हते तर ती त्यांच्या दृष्टीने एक जीवननिष्ठा होती. एकदा परिषदेचे आम्ही काही कार्यकर्ते रात्री अकरा-साडे अकराच्या दरम्यान सीबीएसच्या आसपास गप्पाटप्पा करत चहा पीत होतो. समोरून रवीदादा चालत येताना दिसले. त्यांच्या हातात कागदाचे पुडके होते. एवढ्या रात्री थंडीत कुठे निघालात असे विचारल्यावर ते म्हणाले, ’उद्या 6 डिसेंबर. डॉ. बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आता पावणेबारा झालेत. बरोबर बारा वाजता शिवाजी चौकातील बाबासाहेबांच्या प्रतिमेला मी पुष्पहार अर्पण करणार.‘ नंतरच्या गप्पांमध्ये असेही लक्षात आले की, अनेक वर्षापासून 6 डिसेंबर आणि 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करणे, हा त्यांनी आपल्या जीवनाचा एक भाग करून टाकला होता.
रवी सहस्त्रबुद्धे म्हणजे खरंच एक अजब व्यक्तिमत्व होतं. निरपेक्ष भावनेने केवळ स्नेह, प्रेम वाटण्यासाठीच या माणसाला परमेश्वराने पाठवले आहे की काय असे त्यांच्याकडे पाहून सारखे वाटे. त्यामुळे कुठलीही संघटना, कार्यपद्धती यात ते फार रमू शकले नाही. मात्र हा माणूस सच्चा आणि प्रामाणिक आहे अशी संघातीलच नव्हे तर विरोधी विचारांच्या व्यक्तींची देखील ठाम खात्री होती. कारण रवीदादानी समरसता हे आपले जीवनमूल्य मानले होते. या मूल्यापासून ते कधीही ढळले नाहीत. ’समरसता‘ हा केवळ भाषण व व्याख्यानाचा नाही तर तो जगण्याचा विषय आहे याची पुरेपूर जाण असलेला हा माणूस समरसता शब्दशः आयुष्यभर जगला.
आपल्या समाजावर निःस्पृहपणे प्रेम करणारे रवी सहस्त्रबुद्धे यांच्यासारखे समर्पित कार्यकर्ते ही एका अर्थाने कुठल्याही चळवळीची श्रीमंती मानली जाते. समरसता चळवळीसाठी रवीदादा हे असेच एक महत्त्वपूर्ण नाव होते. ते संघविचाराचे आहेत हे माहीत असून देखील विरोधी विचारांच्या व्यक्तींनी देखील त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. असे भाग्य खूप कमी जणांच्या वाट्याला येते. एक मात्र खरे आहे की, रवीदादा सहस्त्रबुद्धे नाशिकमधील दलित चळवळ आणि संघ यातील एक प्रमुख दुवा होते.
त्यांच्या जाण्याने हा दुवा मात्र आता निखळला आहे!!