अंतराळातील वारकरी

विवेक मराठी    24-Mar-2025   
Total Views |
 
 
vivek
 
आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावरून (आय.एस.एस.) कमांडर निक हेग या स्पेस फोर्स रक्षकाच्या (गार्डियन) नेतृत्वाखाली आणि अलेग्झांडर गॉर्बुनॉव्ह या आय.एस.एस.मधील प्रमुख प्रणालींचा तज्ज्ञ असलेल्या रशियन अंतराळवीराच्या देखरेखीखाली सुनिता विल्यम्स आणि बॅरी ‘बुच’ विल्मोर हे दोघे अंतराळवीर जवळजवळ नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 19 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतले. जगभरातून विविध माध्यमातून आनंद व्यक्त झाला. पृथ्वीवर परतण्याआधी त्यांनी दिलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश..दोघांनाही अंतराळाविषयी असलेली आस्था व ओढ यातून व्यक्त होते.
5 जून 2024 रोजी सुनीता विल्यम्स (59) आणि बुच विल्मोर (62) या दोघांना एका अल्पकालीन मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर पाठवण्यात आले होते. अंतराळवीरांना तिथे पोहोचवण्यासाठी आणि त्यांना पृथ्वीवर घेऊन येण्यासाठी बोइंग कंपनीने बनवलेल्या स्टारलाइनर या महत्त्वाकांक्षी अंतराळयानाची चाचणी घेण्याची ती मोहीम होती. हे यान पुन्हा पुन्हा वापरता येईल अशा पद्धतीने बनवले होते आणि त्यात काही नव्या अत्याधुनिक यंत्रणा बसवल्या गेल्या होत्या. सात दिवस आयएसएसमधून पृथ्वीला प्रदक्षिणा घालून झाल्यावर त्याच यानाने परतण्याचे ठरले होते. मात्र आयएसएसला जोडले जात असतानाच त्याच्या 28 थ्रस्टर्सपैकी 5 अतिउष्णतेमुळे बंद पडले आणि सदोष रबरी सीलमुळे हेलियम वायूची गळती झाली. एवढे होऊनही ते यान पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकते, असा बोईंग कंपनीचा दावा होता. मात्र ही चाचणी मोहीम असल्यामुळे अमेरिकेची अंतरिक्ष संस्था नासाने तो धोका न पत्करण्याचे ठरवले. अशा स्थितीमध्ये 6 सप्टेंबर रोजी ते यान अंतराळवीरांशिवायच पृथ्वीवर सुखरूप परतले. त्यानंतर 25 ऑक्टोबर 2024 रोजी क्रू8 मोहीमेतील चार अंतराळवीर आय.एस.एस.वरून पृथ्वीवर परतले. हे यासाठी सांगितले की सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोघांचे पृथ्वीवर परतणे लांबले; म्हणजे ते आय.एस.एस.मध्ये अडकून पडले; म्हणजे त्यांच्यावर जणू काही मोठे संकट ओढवले अशी जी भावना निर्माण झाली, त्यात काही तथ्य नाही. पृथ्वीवर परतण्यापूर्वी निक हेग, बुच विल्मोर आणि सुनिता विल्यम्स यांनी आय.एस.एस.मधून एक पत्रकार परिषद घेतली.
 
 
आय.एस.एस.वरील मुक्कामादरम्यान तुमच्या दृष्टीने सर्वाधिक जबाबदारीचे किंवा अभिमानाचे कोणते क्षण असतात, असे विचारल्यावर बुच यांनी सांगितले की, ‘प्रत्येक वेळी जेव्हा अंतराळवीर आयएसएसमधून अंतराळात चालण्यासाठी जातो (स्पेस वॉक), तेव्हा तो सुखरूपपणे अंतराळयानात परत येणे हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे असते.’ निक म्हणाले की, ‘परतीच्या प्रवासाचा कमांडर या जबाबदारीपोटी आम्ही सर्वांनी सुरक्षित पृथ्वीवर परतणे हे त्यांच्यासाठी अभिमानाचे असेल.’ ‘सूर्य उगवताना अवकाशातून पाहताना दिसणारी आभा प्रत्येक वेळी या विश्वामध्ये आपण किती छोटे आहोत याची जाणीव करून देते आणि त्यातून आपल्यावरील जबाबदारीची जाणीव दृढ होते’, असे सुनीता म्हणाल्या.
 
 
‘बुच आणि आपली ही तिसरी अंतराळवारी आहे. हे अंतराळस्थानक स्थापन करण्यापासून या प्रकल्पामध्ये आमचा सहभाग आहे. यात झालेले बदल आम्ही जवळून पाहिले आहेत. येथे येणार्‍या अडचणी दूर करण्याचे आम्ही साधलेले कसब आम्ही गमावू नये अशी इच्छा आहे. त्यामुळे येथून परत आल्यानंतर या सार्‍यापासून दूर आल्याची हुरहुर मला लागेल. तसे होऊ नये म्हणून हे सारे मला एका कुपीमध्ये बंद करून आणावे लागेल’, असे सुनिता म्हणाल्या.
 
 
त्यांच्या परतीच्या वेळेमागे काही राजकारण असल्याचे त्यांना वाटते का, या प्रश्नावर बुच यांनी तसे काही नसल्याचे नि:संदिग्धपणे सांगितले. ‘नियोजनाचा भाग म्हणून आमचा आयएसएसमधील मुक्काम किती कालावधीचा असेल हे आम्हाला सांगितलेले असते. मात्र त्यात कितीही बदल होऊ शकतो, हेदेखील आम्हाला प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीच सांगितलेले असते. त्यामुळे त्या दृष्टीने आमची मानसिक तयारी झालेली असते’, असे ते म्हणाले. आमची आताची परतीची वेळ ही नियोजनाप्रमाणेच असल्याचे निक यांनी सांगितले. मात्र, ‘परतीच्या प्रवासाच्या तारखेबाबत अनिश्चितता असल्यास पृथ्वीवरील आमच्या नातेवाईकांमध्ये आणि अन्य सुहृदांमध्ये चलबिचल होते. महत्त्वाच्या अशा कौटुंबिक किंवा मित्रपरिवारातील कार्यक्रमाचे नियोजन केले जात असताना आपण परतेपर्यंत थांबा, असेही यातील अनिश्चिततेमुळे सांगता येत नाही. या अनिश्चिततेमधील हा सर्व भाग सर्वात कठीण असतो’,असे सुनीता यांनी सांगितले.
 
 
तुमच्या तेथील वाढलेल्या मुक्कामावरून येथे राजकारण केले जाऊ लागले आहे याबद्दल तुमचे काय मत आहे असे विचारले गेल्यावर निक यांनी सांगितले की,‘ह्यूस्टनमधील आमच्या तळाशी आमचा तांत्रिक बाबींबाबत आणि एकूणच रोजचा संपर्क असतो. अन्य बाबींपासून आम्ही दूर असतो. बुच यांनी सांगितले की, त्यांची येशू ख्रिस्तावर श्रद्धा आहे आणि जे काही घडते ते त्यात तो नेहमीच माझ्या पाठीशी असल्याची आपली खात्री असते.’
‘आपल्या प्रदीर्घ अंतराळ कारकिर्दीमध्ये आपल्याला सोयूझ, स्टारलाइनर आणि आता स्पेस-एक्स अशा विविध अंतराळयानांमधून प्रवास करण्याची संधी मिळाली. प्रत्येक अंतराळयानाच्या यंत्रणांमध्ये फरक असतो. मात्र अशा वेगवेगळ्या यंत्रणांवर काम करणे हे अतिशय उत्साहवर्धक असते,’ असे बुच आणि सुनीता यांनी सांगितले.
स्टारलाइनरच्या परतीच्या प्रवासात धोका असल्यामुळे तुमच्यावर तेथे दीर्घकाळ राहण्याची वेळ आली. मात्र ते यान सुखरूपपणे परत गेले. तेव्हा भविष्यात तुम्ही स्टारलाइनरने प्रवास कराल का, या प्रश्नावर,‘आपल्याला तज्ज्ञांनी आखून दिलेल्या मार्गावर चालावे लागते’, असे बुच यांनी सांगितले.
अंतराळप्रवासामध्ये जेव्हा जेव्हा आपण खिडकीमधून पाहतो तेव्हा विश्वाच्या प्रचंड पसार्‍यात आपली पृथ्वी केवढी छोटी आहे याची जाणीव सदैव होत राहते. अंतराळातून पृथ्वीकडे पाहताना मानवाने आखलेल्या सीमारेषाही कोठे दिसत नाहीत. त्यामुळे आपल्यातील सामायिक घटकांमधून आपण सर्वांनी एकत्र यावे. आयएसएस हा बहुराष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे सर्व देश एकत्र आल्यास मानवजातीच्या कल्याणासाठी काय केले जाऊ शकते हे लक्षात येते, असे निक यांनी सांगितले.
आयएसएस म्हणजे केवळ अंतराळात थांबण्यापुरते मर्यादित नसून मानवजातीच्या हितासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी जीवशास्त्रापासून औषधशास्त्रापर्यंत जगण्याशी संबंधीत विविध विषयांवरील प्रयोग येथे हाती घेता येतात, असे सुनीता यांनी सांगितले.
आयएसएसची ही आपली अखेरची सफर असेल का या प्रश्नावर विचार करणे मी टाळते; कारण त्यामुळे आपल्याला वाईट वाटते, मात्र ही आपली अखेरची सफर नसावी अशी आपली मनोमन इच्छा असल्याचे सुनीता यांनी सांगितले. ही आपली अखेरची अवकाशसफर असल्याचे अजिबात वाटत नाही; कारण आपण भविष्यात मंगळावर जाणार आहोत असे बुच यांनी गमतीने म्हटले. तसे झाल्यास आपण बुच यांच्याबरोबर असू असे सुनीता यांनी जाहीर करून टाकले.