केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वाला मानणारे सरकार आहे. तेव्हा कोणत्याही महापुरुषांबद्दल बेजबादार आणि उद्दाम वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत हा संदेश अबू आझमीला आणि या विचारांना मानणार्या सर्वांना मिळायला हवा. मग ते अबू आझमीसारखे आमदार असतील वा इंद्रजित सावंतसारखे तथाकथित इतिहास अभ्यासक असतील वा उथळपणे बोलणारे राजू परूळेकरांसारखे बोलघेवडे माध्यमकर्मी असतील...अशा सगळ्यांना योग्य समज तर द्यायलाच हवी आणि साथीच्या रोगासारख्या पसरणार्या त्यांच्या जहरी विचारांनाही वेळीच वेसण घातली जायला हवी.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अनन्वित हाल करून मारणारा, क्रूरकर्मा मुघल शासक औरंगजेब याची जाहीर प्रशंसा करण्याचा नतद्रष्टपणा समाजवादी पक्षाचा आमदार असलेल्या अबू आझमीने केला. तो त्याला चांगलाच भोवला असून झालेल्या गदारोळामुळे विधान मागे घेण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबनही करण्यात आले आणि या निलंबन काळात त्यांना विधीमंडळ परिसरात प्रवेशासही बंदी घालण्यात आली आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘छावा’ हा चित्रपट सध्या देशभरात आणि देशाबाहेरही गाजतो आहे. संभाजी महाराजांनी धर्म आणि स्वराज्य रक्षणासाठी सोसलेले अनन्वित अत्याचार पाहून प्रेक्षक अंतर्मुख होत आहेत. राजांच्या बलिदानाचे महत्त्व सर्वसामान्यांना कळते आहे आणि अस्वस्थ करते आहे. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी का होईना, संभाजी महाराजांचा खरा इतिहास पडद्यावर दाखवण्याचे धाडस एका दिग्दर्शकाने आणि निर्मात्याने केले. ही मांडणी इतकी परिणामकारक झाली आहे की, मूळ हिंदी भाषेत तयार झालेला हा चित्रपट आता खास लोकाग्रहास्तव अन्य भारतीय भाषांमध्येही डब होतो आहे. या पार्श्वभूमीवर अबू आझमीने मुक्ताफळे उधळण्याचा उद्दामपणा केला आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी ‘छावा’ चित्रपटाविषयी बोलताना, त्यातील औरंगजेबाच्या व्यक्तिचित्रणावर आक्षेप घेताना त्याने म्हटले की, “चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवली. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. त्याच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तानापर्यंत होती. त्या काळात भारताचा जीडीपी 24 टक्के इतका होता. त्याच्याच कार्यकाळात भारत सोने की चिडिया होता. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबामध्ये जी लढाई झाली ती राज्यकारभारासंदर्भात होती. ती कुठेही हिंदू मुस्लीम अशी नव्हती...”आपले हे म्हणणे इतिहासाशी केलेली बेईमानी आहे याची कल्पना असूनही अबू आझमीने हे विधान केले आहे. कारण समाजात अस्वस्थता पेरायची, वादग्रस्त विधानांनी लोकांची माथी भडकवायची आणि दिशाभूल करायची हे या समाजवादी पक्षाच्या आमदाराचे धोरण आहे. निलंबन ही केवळ त्याच्या गालावर मारलेली चापट झाली. त्याहून कठोर कारवाई व्हायला हवी. ती होईल अशी आशा आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे सभागृहाला आश्वस्त केले आहे.
क्रूरकर्मा औरंगजेबाचे उत्तम प्रशासक म्हणून गुणगान करणे ही इतिहासाशी केलेली घोर प्रतारणा आहे याचे भानही समाजवादी पक्षाच्या या आमदाराला नाही. संभाजीराजांचे छळ करणार्या या मुघल शासकाने सत्तेच्या हव्यासापायी आपल्या जन्मदात्या वडिलांना तर तुरुंगात टाकलेच, शिवाय आपल्या तीन भावांचीही हत्या केली आणि पोटच्या पोरांचीही गय केली नाही. क्रौर्य हा त्याचा स्थायीभाव होता. त्यापायी त्याने रक्ताच्या नात्यालाही कस्पटासमान मानले. अशा शासकाची भलामण करणारा अबू म्हणजे आजही ही वृत्ती नामशेष झालेली नाही याचे निदर्शक आहे.
काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, आप, एआयएमआयएम, कम्युनिस्ट या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मतपेटीच्या स्वार्थापोटी मुस्लीम समाजाची वेगळी अस्मिता जोपासणे, त्यांच्यात सतत जहाल विचार पेरत त्यांचा बुद्धिभेद करणे, त्यांची माथी भडकविणे आणि देशाच्या मुख्य प्रवाहाशी एकरूप होण्यापासून त्याला रोखणे हेच देशघातकी धोरण चालविण्यात धन्यता मानली. या पक्षांची नावे वेगवेगळी असली तरी मुस्लिमांच्या बाबतीत सर्वांचे धोरण एकसमान आहे. या मतलबी धोरणापायी देशाचे आणि इथल्या मुस्लीम समाजाचेही अपरिमित नुकसान झाले असले तरी या पक्षांना मात्र त्याची पर्वा नाही. समाजवादी पक्षाने तर डॉ. लोहियांच्या मूळ मांडणीशीच फारकत घेतली. स्वत:ला सेक्युलर समजत सर्वसामान्य भारतीय जनतेला गंडवणारी ही सर्व नेतेमंडळी आहेत.
इथल्या हिंदू राज्यकर्त्यांना नेस्तनाबूत करणे, हिंदूंच्या मंदिरांना उद्ध्वस्त करून तिथे मशिदी उभारणे, हिंदू स्त्रियांवर-मुलींवर अनन्वित अत्याचार करणे, हिंदूंचे मनोबल खच्ची करत त्यांना स्वधर्माकडे वळवण्याची शिकस्त करणे यात क्रूरकर्मा औरंगजेबाची हयात गेली. कडवी झुंज देणार्या शिखांच्या सर्वोच्च गुरूंनाही त्याने हालहाल करून ठार मारले. अशा क्रूर शासकाचा जाहीर गौरव करणे हे कशाचे लक्षण मानायला हवे? ही इतिहासाबद्दलची अनभिज्ञता समजावी की कोडगेपणाची हद्द? छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे सरसकट सर्व भारतीयांचे मानबिंदू आहेत. तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान होईल असे वक्तव्य जाहीरपणे करण्यात ज्यांना जराही शरम वाटत नाही ते औरंग्याच्याच मनोवृत्तीचे पाईक आहेत. औरंगजेब ही केवळ एक व्यक्ती नाही तर वृत्ती आहे. आणि अबू आझमीचे वक्तव्य ती वृत्ती आजही हद्दपार झाली नसल्याचा ठोस पुरावा आहे. संभाजी महाराजांच्या शौर्याचे यथोचित गुणगान गाणारे कवी ‘कलश’ कुठे! आणि औरंग्याचे गुणगान करणारे हे ‘विष’ कलश कुठे!!
केंद्रात आणि राज्यात हिंदुत्वाला मानणारे सरकार आहे. तेव्हा कोणत्याही महापुरुषांबद्दल बेजबादार आणि उद्दाम वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत हा संदेश अबू आझमीला आणि या विचारांना मानणार्या सर्वांना मिळायला हवा. मग ते अबू आझमीसारखे आमदार असतील वा इंद्रजित सावंतसारखे तथाकथित इतिहास अभ्यासक असतील वा उथळपणे बोलणारे राजू परूळेकरांसारखे बोलघेवडे माध्यमकर्मी असतील...अशा सगळ्यांना योग्य समज तर द्यायलाच हवी आणि साथीच्या रोगासारख्या पसरणार्या त्यांच्या जहरी विचारांनाही वेळीच वेसण घातली जायला हवी.
भ्रामक कथ्याचे भोवरे निर्माण करून त्यात समाजाला गुंतवू - गुंगवू पाहणारे हे सर्वच जण देशाचे नुकसान करत आहेत. देशाचे हेतूपुरस्सर नुकसान करणार्यांसाठी शब्दकोशात ‘देशद्रोही’शिवाय दुसरा समर्पक शब्द नाही.