महाराष्ट्राच्या मातीत रूजलेल्या आध्यात्मिक परंपरेचा नव्या पिढीलाही परिचय व्हावा, हा हेतू संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातून साध्य होताना दिसला. या चित्रपटाची कथा लोकांना बर्यापैकी माहीत आहे, पण ती कथा यशोदा नामक समकालीन स्त्री लोकांना सांगते असे दर्शवून घटना-प्रसंग गतिमान ठेवलेले असल्याने प्रेक्षक त्यात गुंतत जातो आणि आपण चित्रपटाच्या शेवटाकडे कधी येतो हे त्याला कळतही नाही.
समोरच्या चंदेरी पडद्यावर संत ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतल्याचे दृश्य साकार झाले आणि चित्रपटगृहातून कोणीतरी गजर केला, ‘पुंडलिकवरदा...हरिविठ्ठल, श्रीज्ञानदेव... तुकाराम...’ अन्य प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त साथ दिली.
“अप्रतिम...! मला संजीवन समाधीचा प्रसंग आवडला. अगदी बारकाव्यांनुसार तो साकारला आहे...” चित्रपट पाहायला आलेल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया सहज आजमावून पाहावी म्हणून एका ज्येष्ठ जोडप्याला मी विचारल्यावर असे उत्तर आले. उत्तर देणारे गृहस्थ रा. स्व. संघाचे पर्वती भाग संघचालक करमळकर होते, हे त्यांनी नाव सांगितल्यावर मला समजले. दोन तरुण जोडपी त्यांच्या मुलाबाळांसह जिना उतरताना दिसली. ते होते पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे अक्षय कदम आणि त्यांचे मित्र अशोक तरटे दोघांनीही या चित्रपटाची प्रशंसा करताना असे सांगितले, आपण चित्रपटगृहात बसलेलो आहोत असे आम्हाला वाटलेच नाही. एखाद्या भव्य मंदिरात बसून हा संपूर्ण ज्ञानेश्वरकाळ अनुभवतो आहोत, असे आम्हाला वाटले. हे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांचे यश आहे. त्यांच्या मेहनतीला सलाम.
चित्रपटाला बर्यापैकी गर्दी होती आणि त्यात आबालवृद्धांचा समावेश होता. एकंदर दिग्पाल यांनी ज्या हेतूने हा सिनेमा बनवला तो हेतू साध्य झालेला दिसला आणि ज्यांच्यासाठी हा सिनेमा बनवला आहे, त्यांनी तो पाहावा हा हेतूही साध्य झाला. महाराष्ट्राच्या मातीत रूजलेल्या आध्यात्मिक परंपरेचा नव्या पिढीलाही परिचय व्हावा, हा हेतू साध्य होताना दिसला. तसे पाहायला गेले तर या चित्रपटाची कथा लोकांना बर्यापैकी माहीत आहे, पण ती कथा यशोदा नामक समकालीन स्त्री लोकांना सांगते असे दर्शवून घटना-प्रसंग गतिमान ठेवलेले असल्याने प्रेक्षक त्यात गुंतत जातो आणि आपण चित्रपटाच्या शेवटाकडे कधी येतो हे त्याला कळतही नाही. याशिवाय आपल्याला विठोबा आणि रखुमाईचेही दर्शन चित्रपटात अतिशय उत्तमपणे घडते.
संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारणारा तेजस बर्वे हा अभिनेता हा अतिशय शोभून दिसला आहे. संजीवन समाधी हा खरोखरच चित्रपटाचा परमोच्च बिंदू आहे. संत मुक्ताई यांच्या भूमिकेत नेहा नाईक यांनी जीव ओतण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मनोज जोशी यांनीही पैठणच्या धर्मपीठाचे प्रमुख ब्रह्मेश्वरशास्त्री ही तुलनेने छोटी भूमिका दमदारपणे साकारलेली आहे. हिंदू धर्माची यथायोग्य व्याख्या येथे केली जाते व सनातन म्हणजे नित्यनूतन असा अर्थ सांगून हा धर्म पोथीबंद अथवा झापडबंद नाही, असेही भाष्य केले जाते. अजय पुरकर यांनी संत चांगदेवाची भूमिका अतिशय समर्पकपणे साकारलेली आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद, कला दिग्दर्शन आणि संकलनही अतिशय चांगल्या प्रकारे झालेले आहे. प्रेक्षकांना रंगवून आणि त्या काळात गुंगवून टाकण्याचे काम हा चित्रपट करतो. या चित्रपटाचे संगीतही चांगली जमेची बाजू आहे. हा संतपट असला तरी केवळ सगळे अभंग आदी निव्वळ भजनी वाटत नाहीत. जुन्या पारंपरिक चालींशी नाळ कायम ठेवत नवीन पिढीलाही आवडेल असे संगीत नियोजन आणि गायनही आहे. चालीही काळजाला भिडणार्या झाल्या आहेत. एकंदर भाविक नसलेल्यालाही भावुक करील असा हा चित्रपट आहे. या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
अलीकडे मसालापटांच्या काळात आणि नैतिक मूल्यांच्या घसरणीलाच हातभार लावणार्या तथाकथित विनोदी रंजनाच्या काळात असा चित्रपट निर्माण करण्याचे धाडस केल्याबद्दल ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटाच्या संपूर्ण चमूचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. निकोप समाजमन घडवून समाजव्यवस्था निरोगी राखण्यासाठी संतांनी केलेले योगदान कोणीही नाकारू शकत नाहीत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे वेगळ्या अर्थाने स्तोम माजविणार्या या काळातही अशा प्रकारे संतपटांची गोडी लावण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.
विसोबा चाटी (खेचर) ही भूमिका कसबी अभिनेते योगेश सोमण यांनी अगदी समरसून केली आहे आणि त्यांच्या भूमिकेची लांबीही जास्त आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर आणि संत मुक्ताई यांच्यापेक्षाही त्यांचा प्रभाव अधिक जाणवतो. त्यातही खलनायकी अधिक झाली व नंतर विसोबांच्यात जे परिवर्तन घडून आले त्याला वाव न दिल्यामुळे ‘खळांची व्यंकटी सांडो’ ही पसायदान मागणीच उदाहरणरूपाने दाखविण्याची संधी दिग्दर्शक आणि लेखकाने येथे घेेतलेली नाही. हे चाटी संत ज्ञानेश्वरांचा द्वेष करीत होते तरी सदाचारी आणि विद्वान होते असे संत साहित्याचे अभ्यासक ल. रा. पांगारकर यांनी म्हटलेले आहे. हेच विसोबा पुढे संत नामदेवरायांचे गुरू होतात, इतका त्यांचा अधिकार आहे. विसोबांचे अन्य खल प्रवृत्ती प्रसंग कमी करून हा प्रसंग थोडक्यात तरी घेणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे संत ज्ञानदेव हे तीर्थयात्रा करण्यासाठी नामदेवांना भेटण्यासाठी पंढरपूरला गेले होते तेव्हा त्या भेटीचे वर्णन स्वत: नामदेवांनी केले आहे -
नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातले नामदेवे ॥
पूर्वपुण्य माझे फळोन्मुख झाले । प्रत्यक्ष भेटले पांडुरंग ॥
पण येथे संत नामदेवांचे अहंकारी स्वभावाचे चित्रण योग्य वाटत नाही. अहंकार म्हणजे देहतादात्म्य भाव असे श्री ज्ञानेश्वरीच्या पाचव्या अध्यायात म्हटलेले आहे. विस्तारभयास्तव येथे ते सर्व देता येत नाही. पण सगुणभक्तीचे प्रेम असल्यामुळे तीर्थयात्रेत नामदेवांना भगवंतांचा वियोग सहन होईना आणि पुढे ज्ञानदेवांनी त्यांच्यात ‘आहे ते आघवे ब्रह्मरूप’ हा भाव जागविण्यासाठी जे काही केले ते ल. रा. पांगारकर यांनी ज्ञानदेवांच्या चरित्रांत अतिशय रोचकपणे विशद केले आहे. पण संत नामदेव आणि संत ज्ञानदेव यांच्यातील भावबंधही दिग्दर्शक आणि लेखकाने दाखविलेले नाहीत. आदिनाथ कोठारे यांनी साकारलेले संत नामदेव येथे पाहुण्या कलाकारासारखेच आलेले आहेत. असो.
यात ही सर्व भावंडे नाथपंथीय असल्यामुळे नाथ संप्रदायाचा सोपा परिचय गहिनीनाथ व निवृत्तीनाथ यांच्या भेटीच्या निमित्ताने घडविला असता तर प्रबोधनाच्या दृष्टीने अधिक चांगले झाले असते.
या चित्रपटात संत मुक्ताई यांची चरित्रकथा साकारण्याचा प्रामाणिक प्रयास झालेला आहे. पण तुलनेने आतापर्यंतच्या साहित्यात या भावंडांतील संत ज्ञानेश्वरांच्याच चरित्रकथेची आणि योगदानाची दखल मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांच्याइतके ऐतिहासिक संदर्भ संत मुक्ताबाई यांच्या बाबतीत उपलब्ध होणे अवघड असतानाही त्या काळातील महिला संताला महत्त्व देऊन त्यांच्या नावे चित्रपट काढण्याचा स्तुत्य उपक्रम दिग्पाल लांजेकर यांच्या चमूने केला आहे. यात संत मुक्ताई इतकेच महत्त्व संत ज्ञानेश्वरांना दिलेले असल्याने ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायांचा पाया कसा रचला याचे कर्तृत्वदर्शन घडविणे भाग होते, असे वाटते. भिंत चालविणे, रेडा बोलविणे, मांडे भाजणे या चमत्कारापेक्षा ज्ञानेश्वरीसारख्या अपूर्व ग्रंथाची निर्मिती हाच त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा चमत्कार मानला पाहिजे. या ज्ञानेश्वरीची निर्मितीकथा अपेक्षेपेक्षा लवकर आटपते व या महान ग्रंथाचा सुबोध परिचय प्रेक्षकांना पुरेसा घडून येत नाही. अशी अपेक्षा व्यक्त करण्याचे कारण म्हणजे सर्वसाधारण लोक सहजपणे संतसाहित्याकडे वळत नाहीत आणि जे वळतात त्यांचा ओढा अभ्यास आणि अध्ययन यापेक्षा पुण्यप्राप्तीकडेच अधिक असतो. त्यामुळे संतांनी मांडलेले जीवनविषयक तत्त्वज्ञान व उदात्त नैतिक परंपरा या विचार वैभवाला अलीकडची पिढी काही प्रमाणात पारखी झाली आहे, हे ही खरेच आहे. या चित्रपटाने आपल्या प्रस्तुतीत दर्शनाची भव्यता खरोखर जपलेली आहे. अलीकडची पिढी ही बर्यापैकी इहवादी आणि विज्ञानवादी असल्यामुळे ज्ञानेश्वरीतील जीवनदर्शन घडवून प्रेक्षकांची मने सांस्कृतिक वैभवाने श्रीमंत करण्याचा हेतू साधता आला असता. संतपंचकातील आगामी चित्रपटातून संतांचे जीवनविषयक विचारप्रबोधन प्रकट होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. असे प्रयत्न हे ठरावीक कालांतराने पुन्हा पुन्हा होतच राहिले पाहिजेत आणि जनतेनेही त्याला योग्य प्रतिसाद देऊन अशा प्रयत्नांचे स्वागतच केले पाहिजे. त्या दृष्टीने हा चित्रपट अवश्य पाहण्याजोगा या यादीत मोडतो.