नया भारत

विवेक मराठी    15-May-2025   
Total Views |
 
Operation Sindoor
दहशतवादी संकट देशावर पुन्हा कधीही ओढवू नये. पण आलेच तरी त्याचा प्रतिशोध आपण समर्थपणे घेऊ शकतो याची खात्री भारतीयांना पटली आणि जगालाही. या संकटाने सर्वांना दिलेली ही प्रचिती आहे...यह नया भारत है... 
‘यह नया भारत है...’ हे विधान गेले काही वर्षे आपण पुन्हापुन्हा ऐकतो आहोत. ते ऐकल्यावर अंगावर रोमांच उभे राहत नाहीत असा देशप्रेमी विरळा. हे विधान साक्षात पंतप्रधान करत असल्याने त्या विधानाला ठोस मुद्द्यांचे पाठबळ आहे हे ओघाने आलेच. त्याच्या उच्चारातून प्रकटणारा विश्वास आणि देशाभिमान ऐकणार्‍यालाही उत्तेजित करणारा आहे. गेल्या 10 वर्षात या ‘नया भारताचे’ दर्शन आपण विविध क्षेत्रांत घेतले. पण खर्‍या अर्थाने त्याचे सर्वांगीण दर्शन घडले ते ऑपरेशन सिंदूरदरम्यान. हा भारत शस्त्रसिद्ध आहे, नीडर आहे, कूटनीतीज्ञ आहे आणि दक्षिण आशियासह जगाचे नेतृत्व करायला सिद्ध होत असलेला समर्थ भारत आहे. खरेच, यह नया भारत है...!
ऑपरेशन सिंदूर आता विरामस्थितीत असले तरी हा पूर्णविराम नाही, हे पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले आहे. भारत युद्धखोर कधीच नव्हता. ही मोहीम राबवली ते केवळ आणि केवळ पाकिस्तानने केलेल्या अक्षम्य आगळिकीमुळे. स्वत: भुकेकंगाल होऊनही दहशतवादाला पोसणारे आणि लष्करी पोशाखातल्या क्रूरकर्म्यांच्या तालावर नाचणारे हे राष्ट्र. स्वतंत्र राष्ट्र होऊनही चुकीच्या धारणांमुळे विकासापासून, पुढारलेपणापासून शेकडो योजने दूर असणारा हा देश. भारतद्वेष हा त्याच्या पाचवीला पूजलेला. या द्वेषातूनच गेली काही दशके दहशतवादाला आश्रय देणारा, त्याला पोसणारा यासाठीच पाकिस्तान जगात ओळखला जातो. अर्थात हा दहशतवाद पोसायला या ना त्या प्रकारे पाकिस्तानला मदत करणारे जगभरातले धनाढ्य देशदेखील तितकेच जबाबदार. अशी मदत करण्यामागे त्यांना पाकिस्तानविषयी फार ममत्व नाही तर त्याच्या माध्यमातून आपले स्वार्थ साधणे हेच या मदतखोरांचे ईप्सित आहे.
 
नमस्कार सुहृदहो !
 
दहशतवादाच्या माध्यमातून भारताला दुबळे करण्याचा, भीतीच्या छायेखाली ठेवण्याचा खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळण्यात आला आहे. 2014 पासून अशा कारवायांना चोख प्रत्युत्तर देणारे कणखर सरकार, नीडर नेतृत्व सत्तेवर आले तरी हे कारनामे अधूनमधून चालूच होते. मात्र पहलगाम येथील अमानुष घटना ही अखेरची काडी ठरली.
 
‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ हे भारतीय नेतृत्वाच्या लक्षात आले आणि त्याने सामथ्यर्र्शील सैन्यदलांना प्रतिशोध घेण्यासाठी योजना आखण्याचे, ती शत प्रतिशत अंमलात आणण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यानंतर जे घडले तो इतिहास आहे. भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा इतिहास. आपण सर्व भारतीय त्याचे साक्षीदार आहोत. यह नया भारत है, याचा अर्थ उलगडून सांगणारी ही मोहीम होती. तिने फक्त दहशतवादी आणि दहशतवादाला पोसणार्‍या देशालाच धडा शिकवला नाही तर संपूर्ण जगाला भारताच्या कणखर सामर्थ्याची, बदललेल्या रूपाची नोंद घ्यायला भाग पाडले आहे.
 
 
विद्यमान नेतृत्वाने आणि भारताच्या लष्कराने ‘यह नया भारत है’चा अर्थ कृतीतून उलगडून दाखवला आहे. या देशातील नागरिकांनी, समाजरचनेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या विविध संस्था-संघटनांनी आपल्या कृतीतून या नया भारताचेच आपण पाईक आहोत हे दाखवायला सुरुवात केली आहे. अशांची संख्या अद्याप फार मोठी नसली तरी त्यांची कृती लक्षणीय आहे...दखल घेण्याजोगी आहे हे निश्चित.

तुर्की आणि अझरबैझानचा पाकिस्तानला असणारा पाठिंबा, मिळत असलेले सहकार्य लक्षात आल्यावर अनेक भारतीयांनी या दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षात या दोन्ही देशांमध्ये पर्यटनाला जाण्याचे, तिथे डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे भारतीयांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. 2024 मध्ये 2.5 लाख भारतीयांनी अझरबैझानला तर 3.3 लाख भारतीयांनी तुर्कीयेला भेट दिली होती. यातून या दोन्ही देशांना जवळपास 5000 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या आठवड्याभरात मेक माय ट्रिप व अन्य प्रवासी कंपन्यांनी या देशांतील पर्यटनाच्या जाहिराती आणि ऑफर बंद केल्या आहेत. या देशांसाठीच्या नवीन बुकींगमध्ये 60 टक्के घट झाली असून, रद्द केलेल्या बुकींगचे प्रमाण 250 टक्के इतके आहे. हे आकडे जसे भारतीय जनतेच्या राष्ट्रप्रेमाची साक्ष आहेत तसे भारतीय बाजारपेठेच्या ताकदीचेही निदर्शक आहेत. यह नया भारत है...
 
भारतीय लष्कराने दिलेले प्रत्युत्तर, त्यातून दिसलेले सामर्थ्य आणि या मोहिमेदरम्यान बलिदान दिलेल्या वीरांमुळे सर्वसामान्य भारतीयांची मानसिकता बदलली आहे. आपली बर्‍याच वर्षांची परदेशवारीची मनिषा पूर्ण करण्याऐवजी, ती सहल रद्द करून एका जोडप्याने स्वकष्टाचे एक लाख रूपये या मोहिमेत बलिदान दिलेल्या मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना दिले. एका जोडप्याची ही कृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल हे निश्चित! तुर्कीयेच्या सफरचंदांवर भारतीय फळ व्यापार्‍यांनी घातलेला बहिष्कार तसेच तुर्कीयेहून मार्बल मागविण्यावर मार्बल विक्रेत्यांनी घातलेला बहिष्कार या गोष्टीही नोंद घेण्याजोग्या. भारतात जवळजवळ 70 ते 80 टक्के मार्बल तुर्कीयेहून येतो, हे लक्षात घेतले तर भारतीय व्यापार्‍यांचा हा निर्णय किती परिणामकारक ठरू शकतो हे लक्षात येईल. हे बहिष्कारास्त्र म्हणजे भारतीय जनतेने स्वयंप्रेरणेने सुरू केलेली बिगर-राजकीय चळवळ आहे. यह नया भारत है...
 
 
जवाहरलाला नेहरू विद्यापीठ -जेएनयूने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करत तुर्कीये येथील इनोनु विद्यापीठासोबतचा सामंजस्य करार स्थगित केल्याची घोषणा केली आहे. या संदर्भात ‘एक्स‘ या समाजमाध्यमावर केलेल्या निवेदनात जेएनयूने म्हटले आहे की,‘जेएनयू देशाच्या पाठीशी आहे.’ जेएनयूतील वातावरण हळूहळू पण निश्चितपणे बदलत आहे याची ही खूण आहे. यह नया भारत है...
 
दहशतवादाच्या विषयात पाकिस्तानला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत करणारे, त्यासाठी कारवायांसाठी भरीस पाडणारे काही फक्त हे दोनच देश नाहीत. याहून कैकपटीने सामर्थ्यवान असलेले, जगात सर्वात बलाढ्य असलेले अमेरिका व चीन यांनीही यासाठी हातभार लावला आहे, हे उघड गुपित आहे. त्यामागचे त्यांचे राजकीय हिशोब वेगळे आहेत. पण हा नवा भारत त्यांचे डाव धुळीस मिळवू शकतो याची जाणीव त्यांनाही झाली आहे. पंतप्रधानांनी जे भारतीयांना उद्देशून भाषण केले त्यात या दोन देशांचा उल्लेखही नव्हता. या अनुल्लेखातून तसेच संपूर्ण भाषणातूनच त्यांनाही योग्य इशारा देण्यात आला आहे. आणि तो न समजण्याएवढे ते भाबडे नक्कीच नाहीत.
 
असे दहशतवादी संकट देशावर पुन्हा कधीही ओढवू नये. पण आलेच तरी त्याचा प्रतिशोध आपण समर्थपणे घेऊ शकतो याची खात्री भारतीयांना पटली आणि जगालाही. या संकटाने सर्वांना दिलेली ही प्रचिती आहे...यह नया भारत है...