"बाबर का बेटा हूमायूँ, हूमायूँ का बेटा अकबर...’ अशा गौरवपूर्ण उल्लेखाप्रमाणे आपला इतिहास जुन्या अभ्यासक्रमानुसार त्यातच घोटाळत राहिलेला होता. एनसीईआरटीने त्यांच्या अभ्यासक्रमात नवीन सुधारणा करताना शालेय पाठ्यपुस्तकांमधून विदेशी आक्रमक राजवटीचे संदर्भ वगळले आहेत आणि भारतीय राजवंशांवरील एक प्रकरण जोडलेले आहे. या प्रकरणातून ’भारतीय नीतिमूल्ये’ या विषयावर भाष्य करण्यात आलेले आहे.
आपण आपला इतिहास कशासाठी शिकतो? तर त्यातून आपली संस्कृती, परंपरा आणि उच्च नैतिक मूल्ये यांचा आपल्याला परिचय व्हावा आणि त्याच्या प्रकाशात आपल्याला सामाजिक जीवनात प्रगती करण्यासाठी दिशाबोध व्हावा. ही भूमिका कोणीच नाकारू शकत नाही. पण आपण आपल्या शालेय जीवनात पुन्हा एकदा डोकावून पाहिले तर इतिहास हा विषय आपल्या किती आवडीचा होता? हे पुन्हा आठवेल. आपण आपल्या समाजजीवनात ज्या सांस्कृतिक गोष्टींचे म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात येथील वारी परंपरा असो, समाजसुधारणेच्या दृष्टिकोनातून उभारली गेलेली भक्ती चळवळ असो, यांचे दर्शन करतो, ज्या समाजव्यवस्थेत व मूल्यपरंपरेचा वारसा घेऊन आपण सध्या जगतो त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब जर त्या इतिहासात आढळत नसेल आणि त्याची कोणतीच उत्तरे मिळत नसतील एवढेच नव्हे तर त्या इतिहासाशी आपले सांस्कृतिक जैविक नाते नव्या पिढीला सांगता येत नसेल तर त्या इतिहासाशी त्यांची नाळ कशी जोडली जाणार? पण याचा पुरेसा विचार न करता, निरागस मनावर संस्कार करताना एका जाहिरातीत केलेल्या ’बाबर का बेटा हूमायूँ, हूमायूँ का बेटा अकबर...’ अशा गौरवपूर्ण उल्लेखाप्रमाणे आपला इतिहास जुन्या अभ्यासक्रमानुसार त्यातच घोटाळत राहिलेला होता. ज्यांचा जन्मसुद्धा आपल्या भारत देशात झालेला नाही अशा या विदेशी आक्रमकांच्या राजवटीशी आपली नाळ आणि आपली मूल्यपरंपरा कशी जोडली जाणार? त्यामुळे तो अनेकांचा नावडता विषय ठरावा यात नवल ते काय! पण अलीकडेच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफएसई) 2023 च्या अनुरूप काही बदल करण्यात आलेले आहेत. एनसीईआरटीने त्यांच्या अभ्यासक्रमात नवीन सुधारणा करताना शालेय पाठ्यपुस्तकांमधून विदेशी आक्रमक राजवटीचे संदर्भ वगळले आहेत आणि भारतीय राजवंशांवरील एक प्रकरण जोडलेले आहे. या प्रकरणातून ’भारतीय नीतिमूल्ये’ या विषयावर भाष्य करण्यात आलेले आहे. त्यासोबत महाकुंभाची माहिती आणि केंद्र सरकारच्या प्रमुख उपक्रमांचे संदर्भसुद्धा यात आढळतात. याच गोष्टीचा काही जणांना पोटशूळ उठलेला आहे.
एक सर्वसाधारण माहिती म्हणून भारतावरील विविध राजवटींचा इतिहास सांगणे वेगळे आणि त्यांचा केवळ निवडक व सोयीचा ऐतिहासिक भाग सांगत त्यांचे गोडवे गाणे व त्याचवेळी एतद्देशीय राजवटी आणि त्यांच्या काळातील समृद्ध भारतीय नीतिमूल्ये सांस्कृतिक परंपरा याबाबत सोयीस्कर मौन बाळगणे, या गोष्टी आतापर्यंत झाल्या त्याबाबत तथाकथित अभ्यासकांनी काही आवाज उठविला नाही व आता ओरड करणार्या मंडळींच्या पूर्वसुरींनाही ते खटकले नाही. पण भारतीय समाज व या समाजाची लोकपरंपरा व संस्कृती अधोरेखित करणार्या गोष्टींचा समावेश त्यांना सहन होत नाही, हे लोकांना पटणे अवघड आहे.
एनसीईआरटीने त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये अभ्यासक्रमाचे तर्कसंगतीकरण (रॅशनलायझेशन) केल्यावर विरोधी पक्षांकडून यावर बोचरी टीका झाली आहे आणि त्यांनी या नवीन सुधारणेवरून, सत्ताधारी पक्षाचा अजेंडा शिक्षणाच्या माध्यमातून पुढे रेटण्यासाठी हे सर्व भगवेकरण झालेले आहे, असा आरोपच केला आहे.
वास्तविक पाहता जे काही बदल झालेले आहेत ते सर्व नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2023 यांना अनुरूप असेच आहेत. या धोरणामध्ये शालेय शिक्षणात भारतीय परंपरा, तत्त्वज्ञान, ज्ञान प्रणाली आणि स्थानिक संदर्भ समाविष्ट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. तुघलक, खिलजी आणि लोदी यांसारख्या राजवंशांचे तपशीलवार वर्णन आणि मुघल सम्राटांची कामगिरी अशा गोष्टी अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्या यावर विरोधकांचा आक्षेप आहे. परंतु आता अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांचा पहिलाच भाग प्रकाशित झालेला आहे व त्याचा पुढचा दुसरा भाग यावयाचा आहे. तेव्हा तो दुसरा भाग येईपर्यंत वाट पाहणे अधिक इष्ट आहे.
एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड या सामाजिक विज्ञान पाठ्यपुस्तकात मगध, मौर्य, शुंग आणि सातवाहन यांसारख्या प्राचीन भारतीय राजवंशांवर नवीन प्रकरणे जोडण्यात आली आहेत, मात्र याचा उद्देेश आपल्या नव्या पिढीला या एतद्देेशीय राजवंशाच्या कालखंडाच्या माध्यमातून भारतीय नीतिमूल्यांची व आपल्या सांस्कृतिक परंपरांची माहिती व्हावी इतका सरळ आणि स्वच्छ आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देशातील सांस्कृतिक वैभव सांगताना हा देश ’तीर्थक्षेत्रांची भूमी’ म्हणून वर्णन केलेले आहे, तेसुद्धा विरोधकांना मान्य नाही का?
आपण शाळेत प्रतिज्ञा म्हणत असतो की, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मग या परंपरा नेमक्या कोणत्या आहेत याचा परिचय या शालेय अभ्यासक्रमातून करून देणार नाही तर कसा करून देणार? त्या परंपरांची माहिती झाल्याखेरीज नवी पिढी त्यांचा अभिमान तरी कसा बाळगणार? जेव्हा या सांस्कृतिक नीतिमूल्यांचे महत्त्व नव्या पिढीच्या लक्षात येईल, ते त्यांना पटेल तेव्हाच ही नवी पिढी त्याबाबत रास्त अभिमान बाळगू शकेल आणि मग आपण त्या परंपरांचा पाईक बनून देशसेवा करावी ही भावना व प्रेरणा त्यांच्या मनात जागृत होईल. या दृष्टीने सरकार त्या अभ्यासक्रमाची रचना करीत असेल तर त्यावर अनाठायी टीका कशासाठी करायची?
मुळात आपली भावी पिढी सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हावी या उद्देेशानेच आपला शैक्षणिक अभ्यासक्रम तयार होत असतो आणि याचेच शिक्षण शिक्षणव्यवस्थेच्या माध्यमातून दिले जात असते. देशाच्या पातळीवर देशाची एकात्मता अखंड राखण्याच्या उद्देशाने भारतीय राजवंशाची माहिती देणे व राज्याच्या पातळीवर तेथील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचे दर्शन अभ्यासक्रमातून पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून घडविणे हे सर्व तर्कसुसंगतच समजले पाहिजे. आपली भारतीय जीवनमूल्ये, सामाजिक व्यवस्था आणि सांस्कृतिक परंपरा यांचे प्रतिबिंब ज्यात उमटलेले आहे असा इतिहास जोडण्याचे काम जर होत असेल तर त्या प्रयत्नांना कोत्या आणि संकुचित समजुतीने विरोध करण्यापेक्षा या प्रयत्नांचे स्वागतच केले पाहिजे.