नक्षली वेढ्याला खिंडार

विवेक मराठी    22-May-2025   
Total Views |
 सरकार देत असलेल्या मूलभूत सुविधांपासून जंगलातल्या वनवासींना वर्षानुवर्षे वंचित ठेवणारी, त्यांंच्या जगण्याचा शब्दश: नरक बनविणारी ही नक्षली चळवळ म्हणजे देशाच्या सर्वांगीण विकासातला फार मोठा अडसर आहे. अतिशय दुर्गम भागातून आधुनिक शस्त्रास्त्रांसह लढणारे हे नक्षलवादी पोसले जातात ते त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणार्‍या प्रचंड निधीमुळे आणि शहरात त्यांच्यासाठी काम करणार्‍या समर्थकांमुळे. हे जंगलराज उभे आहे ते शहरी नक्षलवादाच्या भरभक्कम पाठिंब्यावर. नक्षलवादाचे हे समग्र रूप लक्षात घेत 2014 पासून हळूहळू याच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे.
 
naxalite
 
 
पहलगाम येथील नृशंस हल्ल्याचा प्रतिशोध म्हणून ऑपरेशन सिंदूर ही मोहीम जेव्हा भारतीय सैन्यदलाकडून प्रभावीपणे राबवली जात होती, त्याच कालखंडात छत्तीसगडमधील करेगुट्टाच्या पहाडावर सुरक्षा दलाच्या जवानांनी 22 माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. या संदर्भात प्रसारमाध्यमातून बातम्या आल्या तरी त्याकडे म्हणावे तसे सर्वसामान्यांचे लक्ष गेले नाही, कारण त्यावेळी ऑपरेशन सिंदूरविषयी जाणून घेण्यात भारतीयांना अधिक रस होता आणि ते स्वाभाविकही होते.
 
 
‘ऑपरेशन कगार’ हे माओवाद्यांविरोधात भारत सरकारने सुरू केलेले आजवरचे सर्वात मोठे अभियान आहे. करेगुट्टा येथे घडले ते या मोहिमेचा भाग म्हणूनच. घनदाट जंगलांनी वेढलेला करेगुट्टाचा परिसर माओवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीच्या बटालियन क्रमांक 1 चा सर्वात सुरक्षित तळ मानला जातो. या भागात लपलेल्या माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला. इथून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसेच पहाडावरील माओवाद्यांचे बंकर आणि गुंफा ताब्यात घेऊन जवानांनी तिथे तिरंगा रोवला.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
याच ऑपरेशन कगारचा पुढचा टप्पा म्हणजे 21 मे रोजी छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात 27 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी घातलेले कंठस्नान. 21 मे हा दिवस दहशतवादविरोधी दिवस म्हणून आपल्या देशात साजरा होतो. या दिवशीच ही कारवाई झाली. केवळ म्हणून तिचे महत्त्व नाही तर, नक्षलवादाविरोधात जवळपास गेली 6 दशके चालू असलेल्या लढाईत प्रथमच सरचिटणीस दर्जाचा नक्षलवादी मारला गेला आहे. छत्तीसगडमधील दंतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अबुझमाड व इंद्रावती राष्ट्रीय उद्यान जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची खबर सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. तेव्हा ऑपरेशन कगार मोहिमेअंतर्गत, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट राबविण्यात आले. पाचशेहून अधिक जवानांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बसवराजूवर विविध राज्यांचे मिळून जवळपास 6 कोटीचे बक्षीस लावले गेले होते. असा हा नक्षल्यांचा सर्वोच्च नेता, सरचिटणीस आणि पॉलिट ब्युरोचा सदस्य असलेला नंबाला केशवराव उर्फ बसवराजू या चकमकीत ठार झाला. तो मारला गेल्याने माओवादी संघटनेचा कणा मोडल्याचे मानले जाते आहे.
 
 
बसवराजू हा माओवादी संघटनेचा सर्वोच्च कमांडर होता. अनेक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांचा तो सूत्रधार होता. 2010 मध्ये दंतेवाडा इथे केलेल्या हल्ल्यात एकाच वेळी सीआपीरएफचे 76 जवान हुतात्मा झाले होते. तर 2013 साली छत्तीसगडमधील सुकमा येथे काँग्रेसच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्याचा कटही बसवराजूनेच आखला होता.
 
 ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ पूर्ण झाल्यानंतर छत्तीसगड, तेलंगण आणि महाराष्ट्रातून 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली
 
‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ पूर्ण झाल्यानंतर छत्तीसगड, तेलंगण आणि महाराष्ट्रातून 54 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली असून 84 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. गेले काही वर्षे केंद्र सरकार ज्या नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवादाविरोधातल्या मोहीमा चालवत आहे त्यावरून सरकारने निश्चित केलेल्या, 31 मार्च 2026 या तारखेपर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होईल अशी खात्री वाटते आहे.
 
 
सरकार देत असलेल्या मूलभूत सुविधांपासून जंगलातल्या वनवासींना वर्षानुवर्षे वंचित ठेवणारी, त्यांंच्या जगण्याचा शब्दश: नरक बनविणारी ही नक्षली चळवळ म्हणजे देशाच्या सर्वांगीण विकासातला फार मोठा अडसर आहे. अतिशय दुर्गम भागातून आधुनिक शस्त्रास्त्रांसह लढणारे हे नक्षलवादी पोसले जातात ते त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणार्‍या प्रचंड निधीमुळे आणि शहरात त्यांच्यासाठी काम करणार्‍या समर्थकांमुळे. हे जंगलराज उभे आहे ते शहरी नक्षलवादाच्या भरभक्कम पाठिंब्यावर. नक्षलवादाचे हे समग्र रूप लक्षात घेत 2014 पासून हळूहळू याच्या समूळ उच्चाटनासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. भारतीय लष्कर सीमेवर शौर्य दाखवत असतानाच देशाला आतून पोखरत असलेल्या या डाव्या वाळवीला संपविण्याचे फार मोठे आव्हान देशाच्या नेतृत्वासमोर आहे. ते भारतीय सैन्याच्या तसेच निमलष्करी दलाच्या साथीने सरकारने समर्थपणे पेलले आहे.
 
 
सीमेवरचा दहशतवाद असो वा देशांतर्गत नक्षलवादाविरोधात द्यावा लागणारा लढा, या दोहोंशी लढण्याचे सामर्थ्य आपल्या सैन्यदलात आहे. ते आधीही होतेच. आता त्याला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची, राजकीय इच्छाशक्तीची आणि मन:पूर्वक पाठिंब्याची जोड मिळाली आहे. याच्या बळावर भारताचे वीर काय पराक्रम करतात याची प्रचिती ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच ऑपरेशन कगारमध्ये सहभागी झालेले वीर जवान देत आहेत.
 
 
जंगलातून सूत्रे हलविणार्‍या नक्षलींचा खात्मा करतानाच शहरी नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करणे समांतरपणे चालू असतानाच ज्या मूलभूत विकासापासून नक्षलग्रस्त भागातला वनवासी अनेक दशके वंचित राहिला त्या भागातील विकासकामांना गती देणेही चालू झाले आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून नक्षलींच्या मगरमिठीतून आदिवासी बांधवांची सुटका होते आहे. उपलब्ध झालेल्या मूलभूत सुविधांमुळे जगणे थोडे सुसह्य होत असतानाच शिक्षणाची गंगाही त्यांच्या दारी येते आहे. या सकारात्मक बदलांमुळे जोरजबरदस्तीने नक्षलवादाच्या दावणीला बांधल्या गेलेल्या तसेच काही काळापूर्वी या विचारांच्या प्रभावामुळे नक्षलवादी चळवळीचा भाग झालेल्या अनेकांंना आता उपरती होत असून ते आत्मसमर्पण करत आहेत. या बदलांची गती धिमी असेल, परिणामांचा वेग अद्याप मंद असेल पण हे घडते आहे. निश्चितपणे घडते आहे.
 
 
21 मे रोजी नारायणपूर येथे जे झाले त्याने नक्षली चळवळीला सुरुंग लागून भलेमोठे खिंडार पडले आहे. कधीही न बुजणारे खिंडार. त्याने भारतीय सुरक्षा दलांचे, सरकारचे मनोधैर्य उंचावले आहे.
 
 
ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच ऑपरेशन कगारमुळे भारतीय सुरक्षा दलाच्या सामर्थ्याचे घडलेले दर्शन भारतीयांना आश्वस्त करणारे, दिलासा देणारे आहे.