आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत भारताचे एक चिकन्स नेक असेल तर, बांगलादेशाच्या एक नव्हे तर दोन चिकन्स नेक्स आहेत असे ठासून सांगितले. बिस्वा यांचे म्हणणे अगदी खरे आहे. यातील पहिले चिकन्स नेक म्हणजे 80 किमी लांबीचा उत्तर बांगलादेश कॉरिडॉर होय. हा कॉरिडॉर दक्षिण दिनाजपूरपासून नैऋत्य गारो हिल्सपर्यंत पसरलेला आहे. सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये कोणताही व्यत्यय आणल्यास बांगलादेशाचा संपूर्ण रंगपूर विभाग देशाच्या उर्वरित भागापासून पूर्णपणे वेगळा करणे शक्य आहे. तसेच दुसरे चिकन्स नेक म्हणजे 28 किमी लांबीचा चितगाव कॉरिडॉर होय. दक्षिण त्रिपुरा आणि बंगालच्या उपसागर यामधील ही अरुंद पट्टी.
”जंववरि रे तंववरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ॥” असे संतश्रेष्ठ माउली ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अभंगात म्हटलेले आहे. जोपर्यंत पंचानन म्हणजे जंगलाचा राजा सिंह याला पाहिलेले नसते तोपर्यंतच कोल्ह्याची कोल्हेकुई चालू असते. सध्याच्या वातावरणात या अभंगाची आठवण होण्याचे कारण म्हणजे ते या अभंगातील पुढच्या चरणात असे सांगतात - ”जंववरि रे तंववरी युद्धाचीं मात । जंव परमाईचा पूत देखिला नाहीं बाप ॥” ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये नागरी संरक्षण मॉक ड्रिल होणार असल्याचे वृत्त आहे. याच सुमारास, निवृत्त मेजर जनरल आणि बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार फजलुर रहमान यांनी त्यादरम्यान जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर बांगलादेशाने ईशान्य भारतातील सात राज्ये ताब्यात घ्यावीत यासंदर्भात, चीनसोबत संयुक्त लष्करी व्यवस्थेवर चर्चा सुरू करणे आवश्यक आहे, अशी फेसबुक पोस्ट लिहिली होती. ही बांगलादेशाचे सध्याचे प्रशासकीय सल्लागार मोहम्मद युनूस यांचीच भूमिका आहे. हा सीमेचा वाद असला तरी आश्चर्याला काही सीमा नसते, हेच खरे. भारताने आमचे पाणी रोखले तर रक्ताच्या नद्या वाहतील अशा वल्गना करणारा पाकिस्तान भारताने चर्चेसाठी मेजावर यावे अशी अपेक्षा जागतिक पातळीवर व्यक्त करीत आहे आणि पाकव्याप्त काश्मीर यावरच चर्चा होईल व दहशतवाद व सामोपचाराची चर्चा एकाच वेळी चालू राहू शकत नाही अशी ताठ कण्याची भूमिका भारताने घेतलेली आहे. पण पाकिस्तानकडून त्याचा जुन्या काळातील जुळा भाऊ म्हणजे आताचा बांगलादेश काही धडा शिकेल तर शपथ. त्यानेही आपले स्वत:चे नाक कापून दुसर्याला अपशकुन घडविण्याचा चंग बांधलेला आहे असे दिसते.
खरे म्हणजे सीमावाद हा माणसाच्या रक्तामांसात भिनलेला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. अगदी घरांच्या कुंपणावरून आणि शेताच्या बांधावरूनही लोक वाद घालतात, पण जेव्हा हा सीमावाद दोन देशांमध्ये उभा राहतो तेव्हा तो गंभीर स्वरूप धारण करीत असतो. पहलगामच्या प्रतिशोधाच्या निमित्ताने जेव्हा पाकव्याप्त काश्मीरच्या संदर्भात चर्चा सुरू आहे तेव्हा केवळ एक भूभाग पुन्हा मिळविणे एवढाच त्यामागचा हेतू नसून आपल्या सीमा सुरक्षित करून देशाला अभेद्य कवच मिळवून देणे हा त्यामागचा व्यापक हेतू आहे. भारताची दक्षिण सीमेचा रक्षक प्रत्यक्ष सागर असला तरी देशाची उत्तर, उत्तरपूर्व आणि उत्तरपश्चिम या सीमांबाबत असे म्हणता येत नाही. हे कवच कोठेकोठे भेदता येण्याइतपत कमजोर आहे. याचा गैरफायदा उचलण्याचा आपले शेजारी देश नेहमीच प्रयत्न करीत असतात. आपले सुरक्षा कवच जेथे अत्यंत कमजोर आहे तो भाग चिकन्स नेक या नावाने ओळखला जातो. ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल व भारतातील इतर राज्ये यांना जोडणार्या एक 70 किलोमीटर लांबीचा चिंचोळा पट्टा म्हणजेच सिलिगुडी कॉरिडॉर होय. हा पट्टा कोंबड्याच्या मानेप्रमाणे दिसत असल्यामुळे त्याला चिकन्स नेक असे संबोधले जाते.
नेपाळ, बांगलादेश आणि भूतान यांनी वेढलेल्या या कॉरिडॉरचा सर्वात अरुंद बिंदू जिथे आहे तिथे भारताच्या हद्दीतील भूभागाची रुंदी केवळ 22 किलोमीटर आहे. ईशान्य भारताशी दळणवळण, व्यापार आणि लष्करी रसद पुरवण्याच्या दृष्टीने हा संपर्कबिंदू अविरत चालू राहणे अपरिहार्य ठरते. मोहम्मद युनूस यांनी चीनशी हातमिळवणी करून भारताला अडचणीत आणण्याच्या कारवाया सुरू केल्या आहेत.
मोहम्मद युनूस यांनी त्यांच्या चीन भेटीत सिलिगुरी कॉरिडॉर म्हणजे चिकन नेकपासून केवळ 130 किलोमीटरच्या अंतरावर असणार्या लालमोनिरहाट या जागी म्हणजे बांगलादेशातील रंगपूर प्रांतात असलेला एक जुना हवाई तळ चीनला देण्याची तयारी दाखवली. ईशान्य भारतीय राज्यांना स्वतःचा समुद्र किनारा नाही, तो भूभाग भूपरिवेष्टित आहे. त्या भागातील समुद्रावर महासागराचा एकमेव संरक्षक असा बांगलादेशच आहे आणि चीनची इच्छा असेल तर या सगळ्यात चीनलाही शिरकाव करायची संधी बांगलादेश देऊ शकतो, वगैरे वल्गना देखील त्यांनी केल्या आहेत.
याच दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत भारताचे एक चिकन्स नेक असेल तर, बांगलादेशाच्या एक नव्हे तर दोन चिकन्स नेक्स आहेत असे ठासून सांगितले. बिस्वा यांचे म्हणणे अगदी खरे आहे. यातील पहिले चिकन्स नेक म्हणजे 80 किमी लांबीचा उत्तर बांगलादेश कॉरिडॉर होय. हा कॉरिडॉर दक्षिण दिनाजपूरपासून नैऋत्य गारो हिल्सपर्यंत पसरलेला आहे. सिलिगुरी कॉरिडॉरमध्ये कोणताही व्यत्यय आणल्यास बांगलादेशाचा संपूर्ण रंगपूर विभाग देशाच्या उर्वरित भागापासून पूर्णपणे वेगळा करणे शक्य आहे. तसेच दुसरे चिकन्स नेक म्हणजे 28 किमी लांबीचा चितगाव कॉरिडॉर होय. दक्षिण त्रिपुरा आणि बंगालच्या उपसागर यामधील ही अरुंद पट्टी, बांगलादेशाची आर्थिक राजधानी (चितगाव) आणि राजकीय राजधानी (ढाका) यांना जोडणारा एकमेव दुवा आहे. हा कॉरिडॉर भारताच्या सिलिगुडी कॉरिडॉरपेक्षाही अरुंद आहे आणि मुख्य म्हणजे त्रिपुरातुन भारतीय सीमेच्या अगदी जवळ आहे. सिलिगुडी कॉरिडॉरची व्यवस्था अस्थिर करण्याचा किंवा ती अस्थिर होईल असा कोणताही प्रयत्न बांगलादेशाने केल्यास त्याचा परिणाम बांगलादेशाच्या स्वतःच्या अंतर्गत एकतेवर होऊ शकेल. त्यातून आधीच अडचणीत असलेल्या बांगलादेशाचे भूराजकीय संतुलन बिघडू शकते याचीच जाणीव कदाचित युनूस यांना नाही. भारताला हे धोरणात्मक पर्याय उपलब्ध असल्याने भारताच्या विरोधात कोणतीही शत्रुत्वपूर्ण कृती किंवा वक्तृत्व करणे बांगलादेशाला भारी पडू शकते. पण ज्यांना बालिश बहु बडबडला... अशी सवय लागली आहे ते भारतमातेचा सुपुत्र जेव्हा समोर उभा ठाकेल तेव्हा या युद्धाबिद्धाच्या बाता पार विसरून जातील. पण ज्यांना हात दाखवून अवलक्षण करूनच घ्यायचे आहे त्यांना कोण वाचवू शकतो. चीनचे युद्धसामग्रीचे साहाय्य पाकिस्तानला किती उपयुक्त पडले हे ऑपरेशन सिंदूरने दाखवून दिल्यावरही चीनच्या मांडीवर बसून बोळ्याने दूध पिणार्या खुळ्या युनूस यांना लवकरच कळल्यावाचून राहणार नाही.