अक्षय्य हिंदू पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नाही, तर तो आहे सर्वसामान्य हिंदूंच्या शक्तीचा हुंकार. श्रद्धेच्या, विश्वासाच्या भगव्या पदराच्या टोकाला बांधलेले स्वच्छ, शुद्ध हेतूचे बावनकशी सोनेरी नाणे! हा पुरस्कार सरकार देत नाही, राजकारणी लोक देत नाहीत, वा कॉर्पोरेट फंडिंगमधून दिला जात नाही - हा पुरस्कार हिंदू समाज देतो, आपल्यातल्याच काही धडपडणार्या मुलांना, काही कष्टाळू हातांना. आजच्या जगात कौतुक हे बोलून दाखवणार्याचं होतं, करणारा मागेच राहतो. पण आम्ही सन्मान करतो तो काम करणार्या हातांचा, हिंदुत्वाची आग ज्यांच्या हृदयात आहे, त्या जमिनीवर तळमळीने काम करणार्या हिंदू कार्यकर्त्यांचा.. नुकताच अक्षय्य हिंदू पुरस्कार सोहळा पुण्यात पार पाडला गेला, त्याविषयी थोडक्यात...
तिसरा अक्षय्य हिंदू पुरस्कार सोहळा 3 मे 2025 रोजी पुण्यात सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात भरगच्च गर्दीत पार पडला. कार्यक्रम तब्बल तीन तास चालला तरी काही तुरळक लोक वगळता कोणीही उठून गेले नाही. आजच्या सोशल मीडिया आणि स्क्रीन अॅॅडिक्शनच्या दिवसांमध्ये दोन-अडीचशे लोक शांतपणे, पूर्ण लक्ष देऊन तीन तास चालणारा एखादा कार्यक्रम न कंटाळता बघतात हे किती दुर्मीळ आहे!
ही गर्दी काही राजकीय पक्षांच्या सभांना असते तशी एक बिर्याणी आणि पाचशे रुपये बोलीवर जमवलेली भाडोत्री गर्दी नव्हती, की हे लोक कोणा सेलिब्रिटीला पाहायला आले होते. ही होती सजग असलेल्या, विचार करू शकणार्या, सुबुद्ध हिंदू समाजाची उपस्थिती. सभागृहात उपस्थित असलेली एकही व्यक्ती आयोजकांची किंवा पुरस्कारविजेत्यांची आडनावे बघून तिथे जमली नव्हती तर पुरस्कारविजेत्यांचे कार्य जाणून घ्यायला आली होती. कुठल्याही पेपरमध्ये जाहिरात न देता, बातमी छापून न आणता केवळ आमच्या सोशल मीडियावरच्या आवाहनातून इतके लोक या कार्यक्रमासाठी आले होते, ते ही केवळ पुण्यातून नाही, तर कोणी अहिल्यानगरहून, कोणी सातार्यातून, कोणी मुंबई, कोल्हापूर, बंगळुरूहून - केवळ या पुरस्कार सोहळ्यासाठी म्हणून पुण्यात आले होते!
अक्षय्य हिंदू पुरस्कार हा केवळ एक पुरस्कार नाही, तर तो आहे सर्वसामान्य हिंदूंच्या शक्तीचा हुंकार. श्रद्धेच्या, विश्वासाच्या भगव्या पदराच्या टोकाला बांधलेले स्वच्छ, शुद्ध हेतूचे बावनकशी सोनेरी नाणे! हा पुरस्कार सरकार देत नाही, राजकारणी लोक देत नाहीत, वा कॉर्पोरेट फंडिंगमधून दिला जात नाही - हा पुरस्कार हिंदू समाज देतो, आपल्यातल्याच काही धडपडणार्या मुलांना, काही कष्टाळू हातांना. आजच्या जगात कौतुक हे बोलून दाखवणार्याचं होतं, करणारा मागेच राहतो. पण आम्ही सन्मान करतो तो काम करणार्या हातांचा, हिंदुत्वाची आग ज्यांच्या हृदयात आहे त्या जमिनीवर तळमळीने काम करणार्या हिंदू कार्यकर्त्यांचा. असे नि:स्वार्थी कार्यकर्ते जे प्रसिद्धीची अपेक्षा ठेऊन काम करत नाहीत, पण त्यांचे कार्य, त्यांच्या कथा हिंदू समाजापर्यंत पोचणं गरजेचं आहे.
काही समविचारी लोकांमधल्या गप्पांमधून सहज जन्माला आलेली ही अक्षय्य हिंदू पुरस्काराची संकल्पना आता तीन वर्षांची झाली आहे. सर्वसामान्य हिंदू समाजाने हिंदू कार्यकर्त्यांना दिलेला हिंदूंसाठी असलेला हा पुरस्कार देशातला एकमेव असा अशा स्वरूपाचा पुरस्कार आहे.
काही समविचारी लोकांमधल्या गप्पांमधून सहज जन्माला आलेली ही अक्षय्य हिंदू पुरस्काराची संकल्पना आता तीन वर्षांची झाली आहे. सर्वसामान्य हिंदू समाजाने हिंदू कार्यकर्त्यांना दिलेला हिंदूंसाठी असलेला हा पुरस्कार देशातला एकमेव असा अशा स्वरूपाचा पुरस्कार आहे. अक्षय्य हिंदू पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे पुरस्कार देणारी व्यक्ती कार्यकर्ता आणि पुरस्कार घेणारे हातही कार्यकर्त्यांचेच. आम्ही सरकारी अनुदान, कॉर्पोरेट फंडिंग किंवा संस्थात्मक अनुदान यातले काहीही स्वीकारत नाही. आम्ही फक्त हिंदू समाजाने फूल ना फुलाची पाकळी म्हणून दिलेले दान या पुरस्कारासाठी निधी म्हणून स्वीकारतो. अगदी पहिल्या वर्षापासून आम्हाला हिंदू समाजाने या कार्यात भरभक्कम साथ दिलेली आहे. या वर्षीच्या सोहळ्याचा गोवर्धन पर्वत उचलून धरायला ज्या दात्यांच्या, समर्थकांच्या, कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेणार्या कार्यकर्त्यांच्या काठ्या लागल्या, त्यांचे मन:पूर्वक आभार.
या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यातला सर्वात बुलंद आवाज होता तो प्रमुख पाहुणे पद्मश्री चैत्रामजी पवार यांचा. चैत्रामजी बारीपाडा या गावातले शेतकरी, जलसंवर्धक, पर्यावरणवादी. त्यांच्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना याच वर्षी पद्मश्री प्रदान केली. कुठलाही अभिनिवेश नसलेलं त्यांचं बीजभाषण साधं, अकृत्रिम आणि तरीही अत्यंत प्रभावी, मनाला खोलवर भिडणारं होतं.
‘कुठल्याही परिवर्तनाची सुरुवात एका माणसाच्या कामाने होते’ हे सत्य त्यांनी त्यांच्या खास, मिश्किल, विनोदाचा नरम शिडकावा असलेल्या, अस्सल या मातीतल्या शैलीत वारंवार अधोरेखित केलं. जीवाचा कान करून त्यांचे भाषण ऐकणार्या सभागृहातल्या प्रत्येक श्रोत्याला हे जाणवलं असेल खर्या मोठेपणाला कोट-टायच लागतो असं नाही, थोर कर्तृत्व साध्या झिजलेल्या कोल्हापुरी चपलेतही फिरू शकतं.
या वर्षीचे पाच अक्षय्य हिंदू पुरस्कार विजेते म्हणजे तर भगव्या रंगाच्या पाच छटा होत्या, वेगवेगळ्या पण तितक्याच तेजस्वी. मीडिया क्षेत्रातील योगदानासाठी पुरस्कार मिळालेली राजधर्म चॅनेलची तडफदार पत्रकार अर्चना तिवारी सध्या काश्मीरमध्ये रिपोर्टींगसाठी गेलेली असल्यामुळे ती पुरस्कार सोहळ्याला प्रत्यक्ष हजर नव्हती, पण तिने आपलं भाषण व्हिडिओद्वारा पाठवलं होतं. ती म्हणाली की, ’खरं बोलायला धैर्य लागतं पण हिंदूंच्या इतकी वर्षे बंद पाडलेल्या आवाजाला न्याय देणं, त्यांच्यावरच्या अन्यायाच्या कथा ऐकल्या जाणं महत्त्वाचं आहे.’
गोसेवेसाठी पुरस्कार मिळालेला अश्विन संपतकुमारन हा तरुण वकील केरळच्या पालक्काड जिल्ह्यातल्या दक्षिण वृंदावन नावाच्या गोशाळेचा सहसंस्थापक आहे. त्याच्या वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी एका पाड्याला संरक्षण देत सुरू केलेलं काम आज नऊ एकराच्या परिसरात सहाशे तीस गोवंशासाठीचं नंदनवन आहे. आपल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘हे प्रवाहाविरुद्ध जाऊन केलेलं काम आहे, सुरुवातीला एकटेपणा वाटतो, पण जेव्हा तुमचं पाऊल योग्य मार्गावर पडतं तेव्हा समाजातली सज्जनशक्ती तुमच्या पाठीशी उभी राहतेच.’
जनजाती कल्याणासाठी पुरस्कार मिळालेल्या वर्षा परचुरे महाराष्ट्रातल्या मोखाडा ह्या आदिवासीबहुल भागात गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांच्या कामात शेती, बालकांचे पोषण, आरोग्य, परंपरा, वनाधिकार, महिला सबलीकरण आणि देशी गायींचं महत्त्व हे सगळे आयाम एकत्र दिसतात. आदिवासी भागात हिंदू धर्म आणि दैनंदिन जीवन यामध्ये तुम्ही कोणतं नातं पाहता असा प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, ‘हिंदू धर्म आदिवासींसाठी परका कधीच नव्हता. त्यांची पूर्ण जीवनशैली हिंदू धर्मावर आधारित आहे पण सध्या त्यांना हिंदू धर्माच्या नाळेपासून तोडण्याचे प्रयत्न परकीय शक्तींकडून सुरू आहे. चर्चच्या भक्कम निधीवर चालणार्या धर्मांतर मोहिमेला रोखायचं असेल, तर आदिवासींना आदर, माया आणि सन्मान द्या’. बोलणं सोपं आहे, कृतीच महत्त्वाची आहे हा त्यांचा स्पष्ट संदेश होता.
सामाजिक समरसतेसाठीचा अक्षय्य हिंदू पुरस्कार मिळालेले पराग दिवेकर हे वेदोक्त शिक्षण घेतलेले पुरोहित. कर्मकांडात सुधारणा व्हायला हवी हे आपले मत त्यांनी त्यांच्या मुलाखतीत बोलून दाखवले. त्यांनी स्पष्ट सांगितलं की, वेदाधिकार हा जन्मावर नव्हे तर पात्रतेवर आधारित असावा. कर्मकांड काळानुसार बदलले नाहीत तर ते नष्ट होतील.
धर्मजागरणासाठी अक्षय्य हिंदू पुरस्कार मिळालेला अविनाश तायडे हा सर्वात तरुण पुरस्कारविजेता बुलढाणा जिल्ह्यात जमिनीवर काम करणारा ओजस्वी लढवय्या आहे. आपल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, ‘लोकसंख्यात्मक हिरवे आक्रमण हे भारतात सगळीकडेच सुरू आहे. महाराष्ट्रातली काही गावं लवकरच ‘लघु काश्मीर’ बनतील अशी विदारक परिस्थिती आहे.’ महाराष्ट्रात हिंदुत्वाचे सरकार असूनही एकही आमदार हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या पाठिशी ठामपणे उभा राहात नाही, ही आपली खंतही त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली.
हे पाचही पुरस्कारविजेते सामान्य व्यक्ती नाहीत तर त्या हिंदुत्वाच्या पाच तेजस्वी केशरी ज्वाला आहेत. प्रत्येकाची छटा वेगळी. हिंदुत्व हा एक रंग नाही. ते आहे भगवं इंद्रधनुष्य - त्यागापासून प्रतिकारापर्यंत, पूजेपासून परिवर्तनापर्यंत, आणि सेवेपासून साहित्यापर्यंतचे असंख्य आयाम, असंख्य अविष्कार, अनेक छटा.
आणि आमचा अक्षय्य हिंदू पुरस्कार?
जिथे रेड कार्पेट अंथरलेले नाही.
जिथे डिझायनर कपडे आवश्यक नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराजांची तेजस्वी मूर्ती, काही प्रेरणादायी पुस्तके आणि एक छोटंसं रोख पारितोषिक. कारण आमच्या पुरस्काराचं चलन ग्लॅमर हे नाही, आमचं चलन आहे जिव्हाळा, आदर आणि प्रेमाने पाठीवर मारलेली आपुलकीची थाप! आमच्या पुरस्कारसोहळ्यात धर्मावर चर्चा होत नाही - धर्म कृतीत उतरवला जातो. कारण तुम्ही आम्ही सगळेच आहोत अक्षय्य हिंदू, ती भगवी ज्वाला - जी कधीच विझत नाही, विझणार नाही!