बिघडलेले समाजस्वास्थ्य आणि बेभान माध्यमे

विवेक मराठी    13-Jun-2025   
Total Views |
घटनांचे गांभीर्य ओळखून त्यामागील कारणांवर विचार मांडत समाजदिग्दर्शन करणार्‍या तज्ज्ञांच्या चर्चा आयोजित करण्यापेक्षाही असे व्हिडिओ/रिल्स दाखवून ते चवीने पाहण्याची चटक सर्वसामान्यांना लावली गेली आहे. असे विषय मनोरंजनाचे होणे हे अंगावर येणारे जीवघेणे वास्तव आहे.

vivek
 
गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांमधून पुन्हापुन्हा येणार्‍या बातम्यांनी समाजस्वाथ्यापुढे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पुण्यात हुंड्याच्या हव्यासापायी बळी गेलेली वैष्णवी हगवणे, इंदोरमधील व्यावसायिक राजा रघुवंशीची मेघालयात त्याच्या नवपरिणित वधूने सुपारी देऊन घडवून आणलेली हत्या, विवाहानंतर अवघ्या पाऊण महिन्यातच पतीशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर सांगलीच्या कुपवाड येथील राधिका इंगळेने कुर्‍हाडीचे घाव घालून पतीची केलेली निर्घृण हत्या आणि पतीसह सासरच्यांनी धर्मांतरासाठी आणलेल्या दबावाला कंटाळून सात महिन्याची गर्भवती असलेल्या ऋतुजा राजगेने केलेली आत्महत्या...या सगळ्या बातम्या अतिशय अस्वस्थ करणार्‍या आहेत. राधिका इंगळेचा पती वगळता मारले गेलेले आणि मारेकरी दोन्हीही तिशीच्या घरातले आहेत. तसेच, अगदी काही दिवसांपूर्वीच झालेला विवाह ते विवाहानंतरच्या पहिल्या पाच वर्षात घडलेल्या घटना आहेत.
 
 
विवाहसंस्था हा समाजाचा मूलाधार आहे हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. तेव्हा कुटुंब हे समाजाचे एकक असणे ओघाने आलेच. मात्र या कुटुंबव्यवस्थेत, विवाहसंस्थेत बदलत्या काळानुसार आवश्यक ते बदल करणे गरजेचे. वर नमूद केलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ताबडतोबीने विवाहसंस्थेवर वा कुटुंबव्यवस्थेवर चिखलफेक करण्यापेक्षा सामूहिक विचारमंथन व्हायला हवे. या घटनांमागील कारणांचा शोध घेऊन, त्यावर समाजात साधकबाधक चर्चा घडवून आणणे आणि समाजमाध्यमांच्या झालेल्या विस्फोटाशी याचा काही संबंध आहे का, हे तपासणेदेखील गरजेचे आहे. समाजातली वाढलेली सर्व प्रकारची उतावीळ वृत्ती, दुसर्‍याच्या आयुष्याविषयीचे वाढते विकृत कुतूहल यामागच्या कारणांचाही शोध घ्यायला हवा.
 
 
मुलाची आणि त्याच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी कळल्यावरही प्रियकराने टाकलेल्या दबावामुळे पुण्याच्या वैष्णवीचा विवाह त्याच्याशीच लावून देणे तिच्या आईवडिलांना भाग पडले. या दबावाला बळी पडल्यावर तर हगवणे कुटुंबीयांनी ऊत आल्यासारखे सोने, चांदी, महागडे वाहन अशा बेहिशेबी मागण्यांना सुरुवात केली. यातल्या कुठल्याही टप्प्यावर हे लग्न मोडण्याची धमक वैष्णवी आणि तिच्या पालकांनी दाखवली नाही. हा विवाह म्हणजे दोन व्यक्तींचे वा दोन घराण्यांचे एकत्र येणे नाही तर ही खुलेआम केलेली पिळवणूक आहे हे त्यांच्या लक्षात आले नसावे का? प्रतिष्ठेच्या बेगडी कल्पनांना कुरवाळत विवाहसोहळ्याच्या नावाखाली शब्दश: पैशाचा धूर काढला गेला. वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर वृत्तवाहिन्यांवर आणि समाजमाध्यमातून या लग्नसोहळ्याचे आणि अन्य संबंधित जे व्हिडिओ फिरत होते त्यातून ओंगळवाण्या श्रीमंतीचे आणि माणसाच्या हव्यासाचे प्रदर्शन होते. हे दाखवताना कुठे थांबावे याचे भान हरवलेल्या वृत्तवाहिन्यांनी आणि समाजमाध्यमांनी तसेच सनसनाटी दुसरे काही मिळेपर्यंत या विषयातल्या बातम्यांचा, व्हिडिओंचा ओघ चालू ठेवला.
 
 
नवविवाहित पत्नी सोनमबरोबर मधुचंद्रासाठी मेघालयात गेलेला इंदोरचा राजा रघुवंशी तिथे गेल्यावर दोनच दिवसात गूढपणे बेपत्ता झाल्यानंतर, सनसनाटी बातम्यांसाठी चटावलेल्या वृत्तवाहिन्यांनी आपला मोहरा या विषयाकडे वळवला. त्यातल्या बहुतेकांनी मेघालयातील कायदा सुव्यवस्थेवर तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. काहीच दिवसांत घटनेचे धागेदोरे हाती लागून राजाची हत्या पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने घडवून आणल्याचे सिद्ध झाले. तिला हे लग्न पसंत नसल्याने, मी याचा बदला घेईन असेही तिने विवाहापूर्वी घरच्यांना सांगितल्याचे आता समोर येत आहे. म्हणजेच तिच्या मनाविरूद्ध हे लग्न लावून देऊन एका निरपराध तरुणाचा बळी जाण्यात अप्रत्यक्षपणे तिच्या घरचेही जबाबदार आहेत. पोलीस तपासाआधी मीडिया ट्रायल सुरू केलेल्या वाहिन्यांनी या दोघांच्या विवाहपूर्वीची रिल्स, विवाहादरम्यानचे व्हिडिओज सातत्याने दाखवायला आणि त्यावर बेंबीच्या देठापासून ओरडत बातम्या द्यायला सुरुवात केली.
 
 
घटनांचे गांभीर्य ओळखून त्यामागील कारणांवर विचार मांडत समाजदिग्दर्शन करणार्‍या तज्ज्ञांच्या चर्चा आयोजित करण्यापेक्षाही असे व्हिडिओ/रिल्स दाखवून ते चवीने पाहण्याची चटक सर्वसामान्यांना लावली गेली आहे. असे विषय मनोरंजनाचे होणे हे अंगावर येणारे जीवघेणे वास्तव आहे.
 
 
सांगलीतल्या कुपवाडा येथील राधिकाने महिन्यापूर्वी ज्याच्याशी विवाह झाला त्या पतीची कुर्‍हाडीचे घाव घालून निर्घृण हत्या केली. विवाह झाल्यापासून दोघांमध्ये होत असलेल्या भांडणाचे पर्यवसान पतीच्या हत्येत झाले असे सांगितले जाते. पती बिजवर होता. त्याची पहिली पत्नी आजारपणात गेल्यानंतर हा विवाह झाला होता. त्यांच्या वयात अंतर होते. तिने या विवाहसंबंधांना नकार द्यायचा होता वा पटत नाही हे लक्षात आल्यावर वेगळे व्हायचे होते. तसे न करता पतीचा जीव घेण्याचा आणि हत्या कबूल करण्याचा पर्याय राधिकाने का स्वीकारला याचा विचार व्हायला हवा. केलेल्या कृत्याची योग्य ती शिक्षा तिला व्हायलाच हवी पण या घटनेमागची कारणमीमांसा कळली आणि त्यावर समाजात साधकबाधक चर्चा झाली तर अशा प्रकारे अन्य संभाव्य जोडपी आपले नकोसे विवाह टाळू शकतात. मात्र हे प्रकरण अशा पद्धतीने पुढे नेण्याऐवजी प्रसारमाध्यमांनी अतिशय सवंग बातम्या देणे सुरू केले. वटपौर्णिमेच्या दिवशीच पतीची कुर्‍हाडीने हत्या हे जाणीवपूर्वक अधोरेखित करण्याचा खोडसाळपणा करण्यात आला.
 
 
वर नमूद केलेल्यापैकी चौथ्या घटनेची मात्र माध्यमात फारशी चर्चा अजून तरी झालेली नाही. सांगलीतल्या उच्चशिक्षित, नोकरी करणार्‍या ऋतुजाला नवर्‍याने तो हिंदू आहे असे सांगून तिच्याशी विवाह केला. हा प्रेमविवाह होता. राजगे कुटुंब धर्मांतरित ख्रिश्चन असल्याने लग्नानंतर पती आणि त्याच्या आईवडिलांनी ऋतुजावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. या अतिरेकी दबावाला कंटाळून गर्भवती ऋतुजाने मृत्यूला कवटाळले. धर्मांतरासाठी दबाव टाकणे हा गुन्हा आहे. तो गुन्हा करत ऋतुजाला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हाही तिच्या सासरच्या मंडळींनी केला आहे. समाजात धर्मांतर होत नाही हे छातीठोकपणे सांगणार्‍यांचे या उदाहरणाने डोळे उघडतील का? तसे न होता, अशा घटनांकडे सोयीस्कर कानाडोळा करणार्‍या दांभिकांची संख्या समाजात आणि प्रसारमाध्यमात भरपूर असल्याने ऋतुजाचे मरण लवकरच विस्मरणात जाईल.
 
 
सोयीची दुसरी सनसनाटी घटना घडेपर्यंत वृत्तवाहिन्या आणि समाजाला रिल्सचा नाद लावणारी समाजमाध्यमे शांत राहतील. समाजस्वास्थ्यावर उपाय शोधताना, या बेभान आणि केवळ टीआरपीच्या मोहात अडकलेल्या बेजबाबदार माध्यमांबाबतही कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.