अयोध्येत साकारला रामदरबार

विवेक मराठी    17-Jun-2025   
Total Views |
Ayodhya's Ram Darbar is now open
 
Ram Darbar
गंगा दशहराच्या दिवशी आयोजित या समारंभात राम जन्मभूमी संकुलात तीन दिवसांच्या विधीचा समारोप झाला. वैदिक मंत्र, शंख आणि आचार्यांच्या सुमधुर स्वरात उच्चारलेल्या मंगल मंत्रांनी संपूर्ण शहरात एक अतीव पवित्र वातावरण निर्माण झाले होते. अगदी खरोखरच इतक्या वर्षांनंतर जणू प्रभू रामचंद्रांचा पुनश्च राजाभिषेक झाला, असे वातावरण अयोध्यानगरीत होते. त्यामुळे आता राम दरबारात येणार्‍या भाविकांना प्रभू श्रीराम यांच्यासह माता सीता, हनुमान, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नन यांचे दर्शन घेता येईल.
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥
श्री रामरक्षा स्तोत्रातील या श्लोकाचा अर्थ असा आहे की - ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे तसेच डाव्या बाजूस सीता आहे पुढे मारुती आहे अशा श्रीरामांना मी वंदन करतो. हाच श्लोक मूर्तिमंतपणे साकार झाला आहे, प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्यानगरीत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत श्री राम दरबार आणि इतर देवतांचा प्राणप्रतिष्ठा विधी व अभिषेक असा धार्मिक समारंभ मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाल्याने अयोध्येत आध्यात्मिकदृष्ट्या उत्साही वातावरण पसरले. गंगा दशहराच्या दिवशी आयोजित या समारंभात राम जन्मभूमी संकुलात तीन दिवसांच्या विधीचा समारोप झाला. वैदिक मंत्र, शंख आणि आचार्यांच्या सुमधुर स्वरात उच्चारलेल्या मंगल मंत्रांनी संपूर्ण शहरात एक अतीव पवित्र वातावरण निर्माण झाले होते. अगदी खरोखरच इतक्या वर्षांनंतर जणू प्रभू रामचंद्रांचा पुनश्च राजाभिषेक झाला, असे वातावरण अयोध्यानगरीत होते.
प्रभू रामचंद्रांच्या राजाभिषेकाचे अत्यंत काव्यमय वर्णन संतकवींनी केले आहे. नगरीतील मार्गावरून सुगंधित सडा घालण्यात आला. प्रत्येक घरावर दिव्यांची रोषणाई झाली. घराघरावर शोभिवंत ध्वजापताका फडकू लागल्या. सुरेल संगीताचे स्वर सर्वत्र ऐकू येऊ लागले. देवमंदिरातून शंख-घंटांचा मांगल्योत्साहवर्धक ध्वनी पुनःपुन्हा कानी येऊ लागला. चौका-चौकातून मंगल गीते गायिली जाऊ लागली. सर्व नागरिक स्त्री-पुरुषांनी उत्तमोत्तम वस्त्र अलंकार धारण केले होते. प्रत्येकजण जणू आपल्याच घरचे मोठे मंगलकार्य समजत आनंदात न्हाऊन निघाला होता.
राजभवनामध्ये राजा सुग्रीवांनी पाठविलेल्या जांबवान, हनुमान, वेगदर्शी व ऋषभ या वीरांनी चारही दिशांच्या समुद्राचे जल आणून पोहोचविले आहे. तीनही मातांना प्रणाम करून आलेल्या श्रीरामांना महर्षी वसिष्ठांनी रत्नजडित चौरंगावर आदराने विधिपूर्वक सीतेसहित स्थानापन्न केले. सर्वप्रथम आठ पुरोहितांनी स्वच्छ, सुगंधित, पवित्र जलाने राजसंस्कारांचा अभिषेक प्रारंभ केला. सर्व औषधींचा रस, पांचशे नद्यांचे तीर्थ, चारी दिशांचे-समुद्रजल यांचा अभिषेक आधी देवांनी आणि तत्पश्चात् षोडश कन्यांनी संपन्न केला. नंतर मंत्रीमंडळ व सेनेतील अधिकार्‍यांनी अभिषेक केला. त्यानंतर रत्नजडित, तेजोमय परंपरागत राजमुकुट महर्षी वसिष्ठांनी श्रीरामांच्या मस्तकी चढविला. तदनंतर अन्य अलंकारांनी श्रीरामांना सजविण्यात आले. शत्रुघ्नाने रामचंद्राच्या मस्तकावर छत्र धरले आहेे. सुग्रीव व विभीषण चवर्‍या वारीत उभे राहिले. देवराज इंद्राच्या सूचनेनुसार वायुदेवांनी श्रीरामांच्या गळ्यांत सुवर्णकमळांची शोभिवंत माळ समर्पित केली. वेदमंत्रांच्या घोषात, विविध वाद्यांच्या गजरात, मंगल गीतांच्या सुरेल स्वरात आणि शंखध्वनी व जयजयकाराच्या निनादात विधिपूर्वक राजसिंहासनावर विराजमान प्रभू श्रीरामचंद्राच्या भाळी महर्षी वसिष्ठांनी राजतिलक लावला. बिरुदावलीची ललकारी झाली. सनया-चौघडे वाजू लागले. ’राजाधिराज प्रभु श्रीरामचंद्र महाराजकी जय’ हा जयजयकार थांबेचना. लोकांची लोचने आनंदाश्रूंनी पाणावली. अयोध्यावासियांचे वर्षानुवर्षांचे स्वप्न साकार झाले...
त्रेतायुगात हा जो रामदरबार भरला होता तोच या कलियुगात पुन्हा साकार झाला. या रामदरबारात प्रभू श्रीराम, सीतामाई सिंहासनावर विराजमान झालेले आहेत. श्रीरामांच्या शेजारी लक्ष्मण उभा आहे व त्याच्या बाजूला वीरासनात हनुमंतराय बसलेले आहेत. त्यांच्यासमोरच सीतामाईच्या पायाजवळ भरत बसलेले आहेत व त्यांच्याशेजारी शत्रुघ्न उभे आहेत. प्रभू श्रीराम यांनी पितांबर धारण केलेला आहे. तर सीतामाईने गुलाबी रंगाची साडी परिधान केलेली आहे. पांढर्‍याशुभ्र संगमरवरात या रामदरबारातील मूर्ती जयपूरचे विख्यात मूर्तिकार सत्यनारायण पांड्ये व त्यांच्या चमूने घडविलेल्या आहेत. मूर्तिकार सत्यनारायण पांड्ये यांचे म्हणणे आहे की, हा विशेष संगमरवर आहे व तो 40 वर्षे जुना आहे. हा एक हजार वर्षे टिकून राहू शकतो. या मूर्तींना पाण्याने जितके जास्त वेळा धुतले जाईल तितकीच त्यांची चमक वाढतच जाणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या कार्यक्रमाचत सहभागी होणे हा एक महान आध्यात्मिक महत्त्वाचा क्षण आहे आणि तो ’एक भारत श्रेष्ठ भारत’चे प्रतिबिंब आहे.
हा कार्यक्रम 3 जून रोजी सुरू होता. या कार्यक्रमात अधिवास, उत्सव विग्रहांची परिक्रमा आणि औपचारिक हवन अशा पारंपारिक विधींचा समावेश होता. सकाळी 6.30 वाजता यज्ञ मंडपात देवतांच्या पूजेसह विधी सुरू झाले, त्यानंतर सकाळी 9 वाजता हवन झाले. या कार्यक्रमात अनेक मंदिरांना जोडण्यासाठी दृकश्राव्य तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला, ज्यामुळे वैदिक मुहूर्तानुसार एकाच वेळी अभिषेक करणे शक्य झाले. प्राणप्रतिष्ठा झालेल्या देवतांमध्ये श्री राम दरबार, शेषावतार, शिव, गणेश जी, हनुमान जी, सूर्यदेव, माँ भगवती आणि अन्नपूर्णा माता यांचा समावेश आहे. विविध परंपरांतील संतमंडळी, ट्रस्टचे अधिकारी आणि हजारो भक्त उपस्थित असलेल्या विशेष आरती आणि भंडारा याने कार्यक्रमाचा समारोप झाला.
न्यासाचे महासचिव चंपतराय यांनी अशी माहिती दिलेली आहे की, ही आठ मंदिरे साधारण तीन महिन्यांत सर्व लोकांना दर्शन घेण्यासाठी खुली करण्यात येतील. एका वेळेस 50 लोकांना रामदरबाराच्या दर्शनासाठी प्रवेशिका मिळू शकतात. पहिल्या टप्प्यात दररोज 600 लोक येथे दर्शन घेऊ शकतील. त्यामुळे रामदरबार साकारला आहे, आता भाविकांना प्रतिक्षा आहे रामप्रभूंच्या दर्शनाची.