उथळ पाण्याचा खळखळाट

विवेक मराठी    19-Jun-2025   
Total Views |
 एखादा जबाबदार राष्ट्रप्रमुख असता तर अन्य देशांच्या प्रश्नात अनावश्यक ढवळाढवळ करण्याऐवजी त्याने आपल्याविरोधात देशांतर्गत वाढत चाललेली बंडाळी मोडून काढण्याला प्राधान्य दिले असते. दहशतवादाचा जगाला पडलेला विळखा आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्या विरोधात लढण्यासाठी भारताबरोबर सर्वसामर्थ्यानिशी उभा राहिला असता. पण स्वत:च्या मर्जीचे गुलाम असलेले ट्रम्प यापैकी काही गांभीर्याने घेत नाहीत.
 
trump
पहलगाम इथे झालेला पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ला आणि त्याचा ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने घेतलेला प्रतिशोध संपूर्ण जगाने पाहिला. येथून पुढे भारत दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेईल आणि थेट कारवाई करेल याची जाणीव जगाला झाली. ‘यह नया भारत है’ म्हणजे काय याची एक झलक या निमित्ताने जगाला दिसली.
 
ही लढाई दीर्घकाळ चालणारी आहे आणि हे जगासमोरचे संकट आहे. त्यामुळे त्या विरोधात फक्त भारत ठामपणे उभा राहणे पुरेसे नाही तर भारताने या विषयात नेतृत्व करत जगातल्या लोकशाहीवादी राष्ट्रांना एकत्र आणण्याची गरज आहे, या विचाराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-7 परिषदेदरम्यान झालेल्या ऊर्जासुरक्षा सत्रात बोलताना उपस्थित राष्ट्रांच्या प्रमुखांचे या विषयाकडे लक्ष वेधले. “भारताचा शेजारी देश दहशतवाद पसरवणारी भूमी झाला आहे. तिथूनच दहशतवादाला खतपाणी मिळते. याकडे कानाडोळा केला तर तो मानवतेचा विश्वासघात ठरेल” अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाचे गांभीर्य अधोरेखित केले आणि दहशतवादाला सक्रिय पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानविरोधात जागतिक स्तरावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच, यापुढे भारतावर होणार्‍या दहशतवादी हल्ल्याला ‘प्रॉक्झी वॉर’ न समजता युद्ध समजून त्याचा प्रतिशोध घेतला जाईल हे ही त्यांनी या राष्ट्रप्रमुखांसमोर स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मागेही भारताची तीच भूमिका असल्याचे सांगितले.
 
 
कॅनडा इथे झालेल्या या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रत्यक्ष भेट ठरली होती. परंतु ट्रम्प यांना अचानक अमेरिकेत परतावे लागल्याने ही भेट होऊ शकली नाही. मात्र, कॅनडाहून परतताना अमेरिकेत येण्याचे ट्रम्प यांनी दिलेले निमंत्रण मोदींनी पूर्वनियोजित क्रोएशिया दौर्‍यामुळे नाकारले आणि ट्रम्पना क्वाड समिटसाठी भारतात येण्याचे निमंत्रण दिले. तूर्तास ट्रम्प यांनी या आमंत्रणाचा स्वीकार केला आहे.
 
 
या दोघांची प्रत्यक्ष भेट जरी होऊ शकली नाही तरी ट्रम्प यांच्या विनंतीवरून मोदींनी त्यांच्याशी सुमारे 35 मिनिटे संवाद साधला. या दरम्यान ट्रम्पना ऑपरेशन सिंदूची सविस्तर माहिती देतानाच या विषयात भारत-पाकिस्तानदरम्यान तिसर्‍या देशाची मध्यस्थी नकोच आणि भविष्यातही ती नको असल्याचे मोदींनी सांगितले.
 
 
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन करून भारताप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या त्यानंतर 18 जून रोजी झालेला हा दूरध्वनी संवाद हा दोघांमधला पहिला संवाद. ट्रम्प स्वत:ला मुत्सद्दी आणि वाटाघाटीत तरबेज नेते समजतात. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही तरीही ते या भ्रमात वावरतात. ऑपरेशन सिंदूर सुरू झाले तेव्हा भारत-पाकिस्तानमधले हे नेहमीचे प्रकरण आहे म्हणणारे ट्रम्प या दोन देशांदरम्यान शस्त्रसंधी झाल्यावर श्रेय घेण्यासाठी पुढे सरसावले. ‘माझ्या मध्यस्थीमुळे भारताने ऑपरेशन सिंदूरला स्थगिती दिली. दोन्ही देशांनी सशस्त्र संघर्ष संपवला,’ असे ट्रम्प यांनी अतिउत्साहात समाजमाध्यमावरून जाहीर केले होते. त्यांचा हा दावा चुकीचा, निराधार असल्याचे भारतीय नेतृत्वाने ताबडतोब जाहीर केले होते. इतकेच नव्हे तर ऑपरेशन सिंदूरनंतर राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांचे नावही न घेता भारत प्रतिशोध घेण्यास समर्थ असल्याचे आणि अन्य कोणाच्याही मदतीची गरज नसल्याचे ठणकावून सांगितले होते. वास्तविक शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो. पण ट्रम्प यांनी शहाणपणाला सोडचिठ्ठी दिलेली असल्याने त्यांनी त्यानंतरही किमान 13 वेळा ‘भारत पाक दरम्यानचे युद्ध आपल्या मध्यस्थीमुळे थांबले. एरव्ही या दोन देशांदरम्यान अणुयुद्ध भडकले असते’, अशी अतिशयोक्त विधाने करायला मागेपुढे पाहिले नाही. जागतिक स्तरावर त्यांचे हे दावे कोणी गांभीर्याने घेतले नाहीत यावरून त्यांची जगभरात तयार झालेली प्रतिमा लक्षात येते.
 
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रम्प यांची तयार झालेली प्रतिमा आणि त्यांच्या देशात त्यांच्याविरोधात तयार होत असलेले जनमत याचा त्यांनी गांभीर्याने विचार करण्याची आणि त्यानुसार वर्तणुकीत, धोरणात आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे. मात्र ट्रम्पना त्याची पर्वा नाही. परिणमांचा विचार न करता बेधडक कृती आणि सनसनाटी विधाने करणे यातच ते मश्गुल आहेत.
 
जो पहलगाम हल्ल्यामागचा सूत्रधार समजला जातो त्या पाकिस्तानी लष्करप्रमुखासाठी अमेरिकेत पायघड्या अंथरल्या जातात आणि त्याच्यासाठी शाही मेजवानी आयोजित केली जाते. हे कृत्य निंदनीय आणि चीड आणणारे आहे. पाकिस्तानी लष्कर कोणाच्या आधारामुळे भारताशी पंगा घेते हे दाखवून देणारे आहे.
 
एखादा जबाबदार राष्ट्रप्रमुख असता तर अन्य देशांच्या प्रश्नात अनावश्यक ढवळाढवळ करण्याऐवजी त्याने आपल्याविरोधात देशांतर्गत वाढत चाललेली बंडाळी मोडून काढण्याला प्राधान्य दिले असते. दहशतवादाचा जगाला पडलेला विळखा आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्या विरोधात लढण्यासाठी भारताबरोबर सर्वसामर्थ्यानिशी उभा राहिला असता. पण स्वत:च्या मर्जीचे गुलाम असलेले ट्रम्प यापैकी काही गांभीर्याने घेत नाहीत. जगातल्या सर्वात शक्तीमान देशाचा प्रमुख जगाचे नेतृत्व करण्याच्या योग्यतेचा, क्षमतेचा असतोच असे नाही. ट्रम्प याचे ठळक उदाहरण आहेत.