समाजासमोरचे आदर्श आणि क्षुद्रबुद्धींची कावकाव

विवेक मराठी    12-Jul-2025   
Total Views |
पंतप्रधान मोदींची देशांतर्गत आणि देशाबाहेरील लोकप्रियता वाढतच चालली आहे, हे त्यांना सहन होण्यासारखे नाही. त्यामुळे सरसंघचालकांच्या विधानाचा पंतप्रधानांच्या निवृत्तीशी काहीही संबंध नसताना त्या मुद्द्यावरून निरर्थक व केविलवाणी कावकाव करण्याखेरीज त्यांच्या हाती काही पडण्यासारखे नाही. या निरर्थक मुद्द्यावरून घराणेशहांना उलटे ऐकवण्याची इच्छाशक्ती त्यांना विकल्या गेलेल्या या माध्यमांमध्ये नाही. 
 
vivek
 
‘मोरोपंत पिंगळे - द आर्किटेक्ट ऑफ हिंदू रिसर्जन्स’ (हिंदू पुनरूत्थानाचे शिल्पकार) या मंदार मोरोनी आणि प्रांजली काणे या लेखकद्वयीच्या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन पू. सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हस्ते नुकतेच नागपूरमध्ये झाले. ‘योजक संघमहर्षी’ या रवींद्र गोळे लिखीत मोरोपंतांच्या मराठी चरित्रग्रंथाचे प्रकाशन दोन वर्षांपूर्वी झाले होते.
 
 
प्रकाशनाच्या निमित्ताने आपल्या व्याख्यानामध्ये सरसंघचालकांनी मोरोपंतांच्या कार्याचे स्वरूप सांगितले, त्याची व्याप्ती सांगितली, त्यांचा स्वभाव सांगितला. मोरोपंत हे प्रकल्पपुरूष होते. कोणत्याही कार्याचा संकल्प केला ते त्याचा आराखडा आखत,
अंमलबजावणीची कालबद्ध योजना आखत आणि ती योजना पूर्णत्वास जाताना स्वत:ला त्याचे श्रेय मिळणार नाही अशा पद्धतीने सार्वजनिक जीवनात अलिप्त राहत. आपल्या व्याख्यानाचा समारोप सरसंघचालकांनी एका संघगीताच्या खालील ओळींनी केला.
 
त्या अहंकार कोशात कोंडून पडे पुरूषार्थ
तो कोश दुभंगून होतहे विशाल जीवन आता
जगतास देऊ मानवता
संघ हीच मानवगाथा
 
या ओळी मोरोपंत सर्वार्थाने जगले, असा गौरव त्यांनी केला. वृंदावनमधील संघाच्या एका कार्यक्रमाच्या समारोपाच्या सत्रामध्ये शेषाद्रीजींनी अगदी सहज उल्लेख केला की त्यादिवशी मोरोपंत पंचाहत्तर वर्षांचे झाले आहेत आणि त्या निमित्ताने त्यांनी त्यांना शाल भेट दिली. म्हणजे हा काही मोरोपंतांसाठी आयोजित केलेला खास असा कार्यक्रम नव्हता. त्या निमित्ताने मोरोपंतांना दोन शब्द बोलण्यास सांगितले गेले. पंचाहत्तरीनिमित्त होणारा गौरव आपल्या मनाला-शरीराला चिकटू नये याकरता अशा प्रसंगीदेखील आपल्या निरपेक्ष भावना मोरोपंतांनी व्यक्त केल्या. पंचाहत्तरीची शाल खांद्यावर टाकली याचा अर्थ - आता तुझे वय झाले आहे, आता थोडेसे इतरांच्या मार्गातून दूर व्हा - हे सूचित करणे आपल्या लक्षात आले आहे, असे मोरोपंतांनी त्यांच्या मिष्किल पद्धतीने म्हटल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. अर्थात ते त्यानंतरही अविरत कार्यरत होते. पुढे त्यांचे शरीरच साथ देईनासे झाल्यावर मात्र ते केवळ सल्लागाराच्या भूमिकेत सर्वांना मार्गदर्शन करत राहिल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. मोरोपंतांच्या विनोदी स्वभावाची बाजूदेखील सरसंघचालकांनी यावेळी दाखवली. संकल्प आणि प्रत्यक्ष कार्य कितीही कठीण असले, तरी ते विनोदी पद्धतीने आणि तरीही त्यातील गांभीर्य नष्ट होणार नाही अशा पद्धतीने मांडले की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि आपल्या मनावरील ताणदेखील हलका होतो, अशी त्यांची कार्यपद्धत त्यांनी सांगितली. त्यावरून जाणवले की देशहिताचे किंवा देशप्रेमाचे काही सांगताना ते गंभीर चेहर्‍याने म्हणजे चेहर्‍याची इस्त्री न मोडता का करता, त्याऐवजी विषयाच्या गाभ्याच्या गांभीर्‍याशी तडजोड न करता नर्मविनोदी पद्धतीने मांडणी केल्यास ती मनाला अधिक भिडते, अशी तरूणाईची जी भावना असते, तशीच मोरोपंतांची विवेचनाची आणि विश्लेषणाची पद्धत होती असे दिसते.
 
 
तेव्हा पुस्तकप्रकाशनाचा हा कार्यक्रम एका उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या हृद्य स्मरणाचा होता हे सर्वांच्या लक्षात आले असेल. अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात सरसंघचालकांनी मोरोपंतांचे व्यक्तिमत्व सर्वांसमोर उभे केले.
 

vivek 
 
असा हृद्य कार्यक्रम झाल्यानंतर माध्यमांकडून प्रत्यक्षात काय अपेक्षा असायला हवी? आपले बातम्यांचे बव्हंशी निरर्थक गुर्‍हाळ न चालवता स्व. मोरोपंतांच्या अलौकिक कार्याची माहिती त्यांनी आपल्या वार्तांकनात द्यायला हवी होती; सरसंघचालकांचे संपूर्ण भाषण दाखवायला हवे होते; ज्यायोगे त्यांचे अफाट कार्य घराघरात पोहोचले असते. तसे करण्याऐवजी त्यांनी सरसंघचालकांच्या व्याख्यानातील केवळ एक ओळ उचलली आणि त्यातून सनसनाटी बातमी निर्माण केली. सरसंघचालकांच्या व्याख्यानातून वाद निर्माण केला जाणे हे नित्याचे झाले आहे. या वादाला कोणताही आधार नसतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता मोरोपंतांच्या पंचाहत्तरीनिमित्तच्या त्यांच्या उद्गारांवरून वाद निर्माण केला गेला. की वयाची पंचाहत्तर वर्षे झाली की निवृत्त व्हावे, असा संकेत सरसंघचालकांनी दिला आणि तो कोणाला दिला? तर पंतप्रधान मोदींना, का? तर यावर्षी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण होतील. यावरून साक्षात हिमालयाच्या भव्यतेचे दर्शन घडवले जात असताना बुद्धीचा टेकडीएवढाही उंचवटा नसलेली व्यक्ती त्या दृश्याशी समरस होऊ शकत नाही, हेच प्रसारमाध्यमातील अनेकांनी सिद्ध केले.
 
 
हा निरर्थक वाद कोणी निर्माण केला? तर सातत्याने अतिशय सवंग आणि निर्बुद्धपणाची विधाने करणार्‍या विरोधी पक्षातील नेत्यांनी. यांच्यापैकी एकाला दररोज सकाळचा पिचका भोंगा म्हटले जाते. घराणेशहा हीच दुसर्‍याची राजकारणातील अस्तित्वाची एकमेव पात्रता आहे. काहीजण उत्तर प्रदेश, बिहार आणि प. बंगाल या राज्यांमध्ये आणलेल्या भयानक जंगलराजचे वारस आहेत. नेहरू-गांधी घराणेशाहीशिवाय अन्य काही सहन होणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील यात हात धुवून घेतले. यांच्यापैकी एका नेत्याने तर आपल्या वयापेक्षा पाचच वर्षांनी मोठ्या असलेल्या आणि तेव्हा एकोणसत्तर वर्षांचे असलेल्या विरोधी पक्षातील एका नेत्याला उद्देशून बैल म्हातारा झाला की त्याची रवानगी बाजारात करायची असते असे अतिशय असंवेनशील उद्गार काढले होते. गंमत म्हणजे त्यानंतर वीस वर्षे उलटूनही हा ‘म्हातारा बैल’ स्वत:साठी बाजारात न जाता आजही सातत्याने समाजघातकी कारस्थाने करण्यात मग्न आहे.
 
 
एक तर यांच्या लक्षात आले नाही की स्वत: सरसंघचालक हे सर्वसाधारणपणे पंतप्रधानांच्याच वयाचे आहेत. संघाची परंपरा अशी की प्रकृतीअस्वास्थ्यामुळे निवृत्त होऊन पुढील सरसंघचालकांसाठी जागा करून देणारे सरसंघचालक या देशाने पाहिले आहेत. त्यामुळे आताचे सरसंघचालक याबाबत योग्य तो निर्णय यथावकाश घेतील. तेच पंतप्रधान मोदीदेखील करतील. संघ काय किंवा भारतीय जनता पार्टी काय, त्यांचे अधिकारी किंवा नेते काँग्रेस किंवा अन्य प्रादेशिक पक्षांच्या घराणेशहांप्रमाणे आमरण सत्तेला किंवा अधिकारपदाला चिकटून राहणारे नसतात हे यांच्या पचनी पडण्यासारखे नसते. त्यामुळे सत्तेत असताना देशाचे लचके तोडणारे नेहरू-गांधी घराण्याचे नेते आणि जंगलराज आणून त्या-त्या राज्याला किमान पंचवीस वर्षे अंधारात लोटणारे नेते यांच्याशी भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाची तुलना होऊच शकत नाही. संघ आणि भारतीय जनता पार्टी हे देशासाठी कोणतीही दृष्टी नसलेल्या या राजकीय पक्षांप्रमाणे एकखांबी तंबू नव्हेत. भाजपमध्ये अटलजींच्या बरोबरीने ज्येष्ठ असलेल्या लालकृष्ण अडवाणींना अटलजींच्या निवृत्तीनंतर पक्षाचे नेतृत्व करण्याची पुरेपूर संधी दिली गेली. तीच बाब ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी यांची. त्यांची तब्येत ठीक असेपर्यंत ते केंद्र सरकारमध्ये मंत्री होते. खुद्द अटलजी प्रकृतीअस्वास्थ्य असताना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहिले नव्हते. त्यामुळे देशाचे किंवा संघाचे नेतृत्व करण्याची वेळ येईल, त्यावेळी केवळ ज्येष्ठत्वाच्या निकषावर त्या व्यक्तीची किंवा तिने नेमून दिलेल्या प्रतिनिधीची निवड केली जाईल, अशी संस्कृती भाजपने किंवा संघाने जोपासलेली नाही हे कळू शकते.
 

vivek 
 
अशा परिस्थितीमध्ये या सनसनाटी बातम्या पसरवायला चटावलेल्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यामागे अनेक कारणे आहेत. अघोषित आणीबाणी किंवा असहिष्णुता यासारखे अनेक विषय निवडणुकीच्या तोंडावर काढूनदेखील, ‘चौकीदार चोर है’, ‘अदानी-अंबानींना देश विकला’ यासारखा कांगावा करून देखील आणि राज्यघटना अमलात आल्यापासून स्वत:च मनमानी करत तिची सातत्याने पायमल्ली केलेली असूनही आता तिसर्‍यांदा सत्तेत आल्यास पंतप्रधान मोदी घटनाबदल करतील अशी भीती घालून देखील हे लोक भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून खाली खेचू शकलेले नाहीत. पहलगामच्या भयानक घटनेनंतर पंतप्रधान मोदींनी संरक्षणदलांना खुली सूट देऊन पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवरूनच्या ब्लॅकमेलला भीक न घालता आजवर कधी नव्हे तसा धडा शिकवला आहे. यापूर्वी पाकिस्तान भारतीय लष्कराकडून पराभूत होऊनदेखील तहाच्या वाटाघाटींमध्ये भारताला पराजित करण्याचे जे कसब काँग्रेसने कमावले होते; त्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला आणि त्याला रसद पुरवणार्‍या तुर्कीये आणि चीन यांच्या बचावयंत्रणांना पुरते निष्प्रभ केले आहे. बोफोर्स प्रकरणी लाच दिली गेली हे सिद्ध झाल्यामुळे आणि शस्त्रास्त्रांच्या इटालियन व्यापार्‍यांशी या घराण्याचे घरगुती स्वरूपाचे संबंध असल्याचे उघड झाल्यामुळे नेहरू-गांधी घराण्याचे खरे स्वरूप देशासमोर आले आहे. त्याचा बदला घेण्यासाठी काँग्रेसने राफेलप्रकरणी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. मात्र हा दोन सरकारांमधील व्यवहार असल्यामुळे काँग्रेसने व इतरांनी कितीही आकांडतांडव केले तरी ते आरोप त्यांना चिकटू शकले नाहीत. शाहिन बाग किंवा कथित किसान आंदोलन अशा कारस्थानांद्वारे अराजक पसरवून केंद्र सरकार अस्थिर करण्याचे विरोधी पक्षांचे प्रयत्न असफल ठरले. आर्थिक आघाडीवर जगात काळजी करण्यासारखी स्थिती निर्माण होत असली, तरी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत नेत्रदीपक प्रगती करत आहे. गेल्या अकरा वर्षांपूर्वी जगातील दहावी अर्थव्यवस्था असलेला भारत लवकरच तिसर्‍या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये भारताच्या मोठ्या लोकसंख्येला वीज-पाणी-स्वच्छतागृहे-स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन अशा मुलभूत गरजांपासून वंचित ठेवले गेले, त्याची भरपाई मोदीसरकार धडाक्यात करत आहे. खुद्द पंतप्रधानांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा न भूतो उंचावली आहे. ऑपरेशन सिंधूच्या निर्विवाद यशानंतर किफायतशीर भारतातील संरक्षण तंत्रज्ञान जगभरात लोकप्रिय होऊन त्याची मागणी वाढत आहे. अमेरिकेने रशियावर निर्बध लादलेले असूनदेखील भारताने आपले हितरक्षण केले. युक्रेन-रशिया, इस्त्रायल-पॅलेस्टाइन किंवा इस्त्रायल-इराण संघर्ष असो, भारताने आपले हितरक्षण करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. रशिया-युक्रेन संघर्षाप्रमाणेच आताच्या इस्त्रायल-इराण संघर्षाच्या वेळी इराणने केवळ भारतीयांना देशाबाहेर जाऊ देण्यासाठी आपल्या हवाई सीमा खुल्या ठेवल्या. भारताच्या दौर्‍यावर आलेले चिलेचे तरुण अध्यक्ष गॅब्रियल बोरिच पंतप्रधानांचा गौरव करताना म्हणाले की जगात चालू असलेल्या विविध संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जगातल्या कोणत्याही राष्ट्रप्रमुखाला भेटू शकणारे मोदी हे एकमेव नेते आहेत. जगभरातील अनेक देशांनी आपल्या पंतप्रधानांना आपल्या देशाचे सर्वोच्च सन्मान दिले आहेत. भारताच्या आजवरच्या पंतप्रधानांना मिळालेल्या अशा सन्मानांच्या संख्येचा हा विक्रम आहे.
 
 
अशा प्रकारे अतिशय जंग जंग पछाडूनही आपण भाजपा सरकारला सत्तेवरून खाली खेचणे सोडा; नामोहरमही करू शकत नाही, यामुळे देशातील विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त झाला आहे. जातीय आधारावरील जनगणनेची मागणी हादेखील त्यांच्या तशाच देशघातकी राजकारणाचा भाग आहे. काहीही केले तरी मोदींना जनतेच्या मनातून उतरवायचे, यासाठीचे त्यांचे खुनशी डावपेच यशस्वी तर होतच नाहीत; उलट पंतप्रधान मोदींची देशांतर्गत आणि देशाबाहेरील लोकप्रियता वाढतच चालली आहे, हे त्यांना सहन होण्यासारखे नाही. त्यामुळे सरसंघचालकांच्या विधानाचा पंतप्रधानांच्या निवृत्तीशी काहीही संबंध नसताना त्या मुद्द्यावरून निरर्थक व केविलवाणी कावकाव करण्याखेरीज त्यांच्या हाती काही पडण्यासारखे नाही. या निरर्थक मुद्द्यावरून घराणेशहांना उलटे ऐकवण्याची इच्छाशक्ती त्यांना विकल्या गेलेल्या या माध्यमांमध्ये नाही. असे म्हणण्याचे आणखी एक कारण म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत देशाचा विचार करणार्‍या मोरोपंतांसारख्या देशभक्ताचे गौरवपर भाषण जसेच्या तसे थेट प्रक्षेपित न करता किंवा विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या केविलवाण्या आरोपांनंतरदेखील तसे न करणार्‍या माध्यमांच्या नैतिकतेबद्दल काही बोलण्यासारखी परिस्थिती उरलेली नाही. या बहुतेक माध्यमांनी संपूर्ण व्याख्यानाची पार्श्वभूमी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचू नये म्हणून सुमारे एका मिनिटापेक्षा अधिक क्लिप दाखवलीच नाही. यातून त्यांचा खोडसाळपणा स्पष्ट दिसतो.
 
 
माध्यमांची किंवा आजच्या उथळ विरोधकांची बुद्धी सरसंघचालकांच्या व्याख्यानातील सकारात्मक काही सांगावे असे न वाटता काहीतरी खुसपट काढण्यात चालते. काहीतरी निरर्थक आणि दुष्प्रचारी स्वरूपाचे दाखवण्याखेरीज ती काही करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी अगदी आजचे; म्हणजे 12 जुलैचे उदाहरण देतो. आज पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांचा योगायोगाने पंचाहत्तरीचाच सोहळा झाला. गिरीशजींचे पारधी समाजातील आणि एकूणच उभे केलेले काम किती भव्य आणि उदात्त आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यानिमित्ताने बोलताना तेदेखील म्हणाले आज त्यांची भावना अशी आहे की आपण आता कोठे कामाला सुरूवात केली आहे आणि तेवढ्यात पंचाहत्तरी आलीदेखील. त्यामुळे आणखी बरेच काम बाकी आहे. आजही गिरीशजींनी आपल्या अव्याहत कार्याचे श्रेय स्वत:कडे घेण्याऐवजी संघाच्या वटवृक्षामुळे हे सारे शक्य झाल्याची जी भावना व्यक्त केली. त्यातले काहीच या क्षुद्र प्रवृत्तींना समजण्यासारखे नाही. एकच सांगावे वाटते की गिरीशजी काय, राजेशजी देशकर काय, दामुअण्णा दाते, दत्तोपंत ठेंगडी किंवा मोरोपंत काय, त्यांनी व अशा सर्वांनी संघाने त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदार्‍या पार पाडल्या. ते समाजाप्रती आणि या देशाप्रती असलेले आपले ऋण फेडण्यासाठी निष्ठेने कार्यरत होते आणि आहेत. तेव्हा दुष्प्रचार करत राहणे आणि देशहिताशी देणेघेणे नसणे; हेच ज्यांच्या जगण्याचे स्वरूप आहे अशा शक्तींकडे साफ दुर्लक्ष करत आपण मोरोपंतांसारख्यांचे जे ऋण आपल्यावर आहे, त्याचे स्मरण करत आपल्याकडून समाजासाठी आणि देशासाठी काय करता येणे शक्य आहे याचा विचार करावा हे इष्ट.