ऑपरेशन पोलो - प्रत्यक्ष कारवाई

विवेक मराठी    14-Jul-2025   
Total Views |
Operation Polo
निजाम मीर सर उस्मान अली खान आसफजाह सातवा याच्याकडून एक निरोप्या, भारत सरकारचे हैद्राबादेतले प्रतिनिधी कन्हैयालाल मुन्शी यांच्याकडे आला. निजामाने संध्याकाळी 4 वाजता मुन्शींना राजवाड्यावर बोलावले होते. याप्रमाणे मुन्शीजी गेल्यावर निजामाने यांना सांगितले की, ’माझा पंतप्रधान मीर लायक अली याच्यासह सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आता पुढे मी काय करावे?’ मुन्शीजींनी सांगितले की, ’शरणांगती मान्य करा..’ त्यामुळे मूळ दिल्लीची मोगलाई इंग्रजांनी 1858 सालीच संपवली होती. आता ऑपरेशन पोलोमध्ये हैद्राबादचा निजामही संपला...
ऑक्टोबर 1947 पासून काश्मीरमधले युद्ध चालूच होते. काश्मीरच्या युद्धात शेख अब्दुल्लाच्या कलाने चालणारे पंडित नेहरू (सुदैवाने) हैद्राबादच्या बाबतीत सरदार पटेलांच्या धोरणाशी सहमत होते. गृहमंत्री सरदार पटेल आणि त्यांचे प्रशासकीय सहायक आय. सी. एस. अधिकारी डी. पी. मेनन यांनी हैद्राबादवर लष्करी हल्ला चढवून त्याचे विलीनीकरण घडवून आणण्याची तयारी सुरू केलीच होती. पण लष्कर कुणावर हल्ला करते, तर शत्रूच्या प्रदेशावर. पटेल आणि मेनन यांनी ठरवले की, निजाम संस्थान हा भारताचाच प्रदेश आहे. तो गुंडांनी जबरदस्तीने आपल्या ताब्यात ठेवला आहे. आम्ही तो त्यांच्या तावडीतून मोकळा करणार आहोत. म्हणून या कारवाईला ’लष्करी कारवाई’ न म्हणता ’पोलीस कारवाई’ म्हणावे. याला म्हणतात खरे वकिली डोके! पंडित नेहरूंनी याला मान्यता दिली. 7 सप्टेंबर 1948 या दिवशी भारत सरकारने निजाम सरकारला निर्वाणीचा खलिता पाठवला. निजामाने रझाकार संघटनेवर बंदी घालावी आणि भारतीय सैन्याला पुन्हा सिकंदराबाद छावणीत परतू द्यावे, असे या खलितात म्हटले होते. रझाकारांची संख्या यावेळी दोन लाखांपर्यंत पोचली होती आणि त्यांची गुंडगिरी प्रत्येक दिवसागणिक वाढत होती.
 
 
परदेशी पत्रकारांचा चोंबडेपणा पाहा -’टाईम’या विख्यात अमेरिकन साप्ताहिकाने टिप्पणी केली की, जर भारतीय सैन्याने हैद्राबाद संस्थानवर आक्रमण केले, तर रझाकार, संस्थानातील हिंदू प्रजेची सरसहा कत्तल करतील आणि याची प्रतिक्रिया म्हणून भारतभरातील मुसलमान, संतापलेल्या हिंदूंच्या प्रक्षोभाचे बळी ठरतील.
 
 
रझाकारांचा उन्माद
 
7 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने निजाम सरकारला निर्वाणीचा खलिता धाडण्यासाठी एक घटना होती. 6 सप्टेंबर 1948 रोजी भारताच्या चिल्लाकल्लू नावाच्या खेड्यातील पोलिस ठाण्यावर रझाकारांनी उघड-उघड हल्ला चढवला. या प्रकरणाची खबर मिळताक्षणी भारताच्या ’पूना हॉर्स’ या चिलखती दळाची एक स्क्वॉड्रन आणि गुरखा रायफल्स या पायदळ तुकडीची एक कंपनी तातडीने चिल्लाकल्लूमध्ये आली. ’आमचा एकेक रझाकार हा हिंदच्या दहा सैनिकांना भारी आहे’ हे कासिम रझवीचे शब्द ऐकून ते रझाकार मुसलमान इतके माजले होते की, त्यांनी भारताच्या रणगाड्यांवर बेधडक हल्ला चढवला. त्यांचा धार्मिक उन्माद आणि आवेश एका परीने कौतुकास्पद म्हटला पाहिजे. पण रणगाड्यांसमोर आणि ब्रह्मदेशाच्या युद्धात जपान्यांशी लढून आलेल्या गुरखा पायदळासमोर तलवारी, भाले आणि ठासणीच्या बंदुका कशा तग धरणार? रझाकारांच्या या गुंड तुकडीने जबर मार खाल्ला. त्यांनी हैद्राबाद हद्दीतल्या कोदाद या गावाकडे पळ काढला. यांचा पाठलाग करीत भारतीय रणगाडे कोदादमध्ये घुसले, लगेच, आमच्या सरहद्दीत हिंदच्या फौजा घुसल्या, म्हणून हैद्राबाद संस्थानच्या अधिकृत सैन्यदलाची चिलखती तुकडी प्रतिकारासाठी धावून आली. ’पूना हॉर्स’ने अल्पावधीत त्यांचा बीमोड करून त्यांना शरणागती पत्करायला लावली. आता मात्र आभाळ काठोकाठ भरून आले, निजामाची-मुघल पातशाहीच्या शेवटच्या अवशेषाची घटका भरली. पराक्रमी बाजीराव पेशव्याने निजामावरच्या एका विजयी स्वारीला 13 सप्टेंबर या दिवशी सुरुवात केली होती. तोच मुहूर्त पक्का करून 13 सप्टेंबर 1948 या दिवशी भारतीय सेना निजाम संस्थानावर आक्रमण करून निघाल्या.
 
आक्रमण
 
मूळचा ब्रिटिश सेनेतला, पण स्वातंत्र्यानंतरही भारतीय सेनेतच राहिलेला लेफ्टनंट जनरल एरिक गोडार्ड हा भारतीय सेनेच्या सदर्न कमांडचा प्रमुख होता. निजामाला निकालात काढण्याची युद्ध योजना त्यांने केव्हाच बनवून ठेवलेली होती. म्हणून तिला म्हणतात ’गोडार्ड योजना’. या योजनेनुसार मेजर जनरल जयंतनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली 7व्या ब्रिगेडने सोलापूरकडून हल्ला चढवला. एक ब्रिगेड म्हणजे सुमारे 3 ते 5 हजार सैनिक. या ब्रिगेडमध्ये राजपूत होते, डोग्रा होते, शीख होते, पंजाबी होते, गुरखा होते. नळदुर्ग या ऐतिहासिक किल्ल्याजवळ हैद्राबादी पायदळाचा प्रतिकार मोडून काढत, उमरगा, जालकोट ही ठाणी जिंकत ते तुळजापूरला पोचले. श्रीक्षेत्र तुळजापूर हे छत्रपती शिवरायांच्या कुलदेवता तुळजाभवानीचे ठाणे. अवघ्या महाराष्ट्राच्या श्रद्धेचे स्थान. तिथे ’1 हैद्राबाद इन्फन्ट्री’ आणि 200 रझाकार गुंडसेना यांनी प्रखर प्रतिकाराचा प्रयत्न केला. पण तो मोडून काढत 14 सप्टेंबरच्या सकाळी ’पंजाब रेजिमेंट’, ’मेवाड इन्फन्ट्री’ आणि ’गुरखा रायफल्स’ या तुकड्यांनी श्रीक्षेत्र तुळजापूर स्वराज्यात आणले.
 
 
तिकडे पूर्वेकडे मेजर जनरल अजित रुद्र यांच्या नेतृत्वाखाली विजयवाड्यावरून भारतीय सेना निजामी हद्दीत घुसल्या. या दिशेला मात्र भारतीय सैन्याला चांगलाच प्रखर प्रतिकार झाला. ’2 हैद्राबाद लान्सर्स’ आणि ’4 हैद्राबाद लान्सर्स’ या हैद्राबादच्या चिलखती तुकड्या इरेसरीने लढू लागल्या. मुळात लान्सर्स म्हणजे भालाईत. पण आधुनिक युद्धात भाले-बरच्या मागे पडल्या. तेव्हा नावे तीच ठेवून या तुकड्यांना रणगाडे आणि आर्मर्ड कार्स - चिलखती मोटारींनी - लढण्यासाठी सज्ज करण्यात आले. या चिलखती दलांकडे ’हंबर’ आणि ’स्टॅगहाउंड’ या चिलखती गाड्या होत्या. या गाड्यांनी दुसर्‍या महायुद्धात चांगली कामगिरी बजावलेली होती. आताही यांनी चांगली झुंज दिली. भारतीय सैन्यातले सगळेच लोक दुसर्‍या महायुद्धात विविध आघाड्यांवर जर्मन नि जपानी सैनिकांशी दोन हात करून आले होते. यांच्यासमोर हे निजामी सैन्य काय टिकणार? कोदार, मुनागाला, होस्पेट, तुंगभद्रा - निजामाची एका पाठोपाठ एक ठाणी पांढरे बावटे फडकवू लागली.
 
 
लष्कर म्हणजे पायदळ आणि रणगाडा दल अशी आगेकूच करीत असताना भारतीय वायुदल स्वस्थ बसलेले नव्हते. वायुदलाच्या टेम्पेस्ट विमानांनी राजापूर, झहीराबाद, बीदर, हुमणाबाद आणि औरंगाबाद या निजामी लष्करी ठाण्यांवर बाँबफेक करून निजामी सैन्याला हादरवून सोडले. कासिम रझवीने वल्गना केल्या होत्या की, ’आमचे वायुदलसुद्धा अतिशय सुसज्ज आहे.’ त्यामुळे भारतीय वैमानिक निजामी वायुदलाशी झुंजायला एक प्रकारे उत्सुक होते. पण तो बार अगदीच फुसका निघाला. निजामीहद्दीत वारंगळ आणि बीदर हे दोन सैनिकी विमानतळ होते, तर खुद्द हैद्राबाद हा नागरी विमानतळ होता. भारतीय वैमानिक मोठ्या अपेक्षेने वारंगळ आणि बीदरवर बाँबफेक करायला गेले, बघतात तर काय, तिथे एकही सैनिकी विमान नव्हते. फुस्! अर्थात् एकही नागरी विमान उडणार नाही, याची आवश्यक ती काळजी आपल्या वायुदलाने घेतलीच.
 
 
17 सप्टेंबर 1948
 
रझाकारांना अशी आशा होती की, आपण गनिमी काव्याने भारतीय सैन्याशी दीर्घकाळ लढू शकू. पण गनिमी कावा हा डोंगरात, जंगलात, अवघड भूप्रदेशात यशस्वी ठरू शकतो. सपाट पठारी प्रदेशात, समोरासमोरच्या लढाईत गनिमी कावा यशस्वी ठरू शकत नाही. सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर आगेकूच करणार्‍या भारतीय सैन्यावर जाहिराबाद परिसरात रझाकार तुकड्या गनिमी हल्ले करू लागल्या. डोग्रा रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल रामसिंग रझाकारांची ही युक्ती बघून मिशीतल्या मिशीत हसले. त्यांनी तोफखाना विभागाला 7.5 मि.मि. च्या तोफा पुढे आणण्याची सुचना दिली. या तोफांच्या मार्‍याच्या संरक्षक कवचाखाली भारतीय सेना आगेकूच करू लागली आणि तिकडे रझाकारांच्या गनिमी मोर्चांचा साफ हुरडा भाजून निघू लागला.
 
 
17 सप्टेंबर 1948 च्या सकाळी चित्र स्पष्ट झाले की, भारतीय सेना सर्व बाजूंनी हैद्राबादच्या अगदी जवळ पोहोचत आहेत. हैद्राबादी सेना आणि रझाकार गुंडसेना यांची भरपूर माणसे ठार अथवा निकामी झालेली आहेत. याला लष्करी भाषेत ’कॅज्युअल्टी‘ असे म्हणतात. म्हणजे ठार किंवा जबर जखमी. अर्थात युद्धाच्या दृष्टीने निकामी.
 
17 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजता निजाम मीर सर उस्मान अली खान आसफजाह सातवा याच्याकडून एक निरोप्या, भारत सरकारचे हैद्राबादेतले प्रतिनिधी कन्हैयालाल मुन्शी यांच्याकडे आला. निजामाने संध्याकाळी 4 वाजता मुन्शींना राजवाड्यावर बोलावले होते. याप्रमाणे मुन्शीजी गेल्यावर निजामाने यांना सांगितले की, ’माझा पंतप्रधान मीर लायक अली याच्यासह सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. आता पुढे मी काय करावे?’ मुन्शीजींनी सांगितले की, ’शरणांगती मान्य करा आणि तुमचे सेनापती मेजर जनरल अल इद्रूस यांना बोलावून हैद्राबाद शहरात दंगेधोपे होणार नाहीत, याचा बंदोबस्त करा.’
 
 
अशा प्रकारे मोगलाई संपली. मूळ दिल्लीची मोगलाई इंग्रजांनी 1858 सालीच संपवली होती. आता हे वळवळणारे शेपूटही संपले, शिवछत्रपतींनी सन 1646 साली तोरणा जिंकून हिंदवी स्वराज्य स्थापना केली, त्यांचा सुरुवातीचा काळ हा विजापूरकर आदिलशहा विरुद्ध होता. मोगलांविरुद्ध पहिली लढाई शिवरायांनी केली ती 30 एप्रिल 1657 या दिवशी. स्वत: महाराजांनी या दिवशी फक्त 500-600 सैनिकांनिशी जुन्नर या मोगली ठाण्यावर धाड घालून त्याचा पाडाव केला होता. तेव्हापासून मोगल सत्तेचा शेवट व्हायला 1948 साल उजाडले.

मल्हार कृष्ण गोखले

वीस वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या विश्वसंचार या लोकप्रिय सदरचे लेखक. विपुल प्रमाणात वृत्तपत्रीय लिखाण. आंतरराष्ट्रीय घडामोडीवर खुसखुशीत भाष्य. भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव आहेत..